वसई: विरार येथे एका इमारतीचा स्लॅब कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. लक्ष्मी राजकुमार सिंग(२७) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. शहरात स्लॅब कोसळण्याची आठवडाभरातील दुसरी घटना आहे.विरार पूर्वेच्या गोपचर पाडा भागात मकवाना कॉम्प्लेक्स, रामू कंपाऊंड परिसरात पूजा अपार्टमेंट इमारत आहे. या इमारतीत लक्ष्मी सिंग ही आपल्या कुटुंबासोबत ३३५ या क्रमांकाचा सदनिकेत राहत होती.सोमवारी दुपारी ती आपल्या दोन मुलांच्या सोबत झोपली होती. त्याच दरम्यान अचानकपणे सदनिकेच्या वरील जीर्ण झालेल्या स्लॅब तिच्या अंगावर कोसळला यात ती गंभीर जखमी झाली होती.
शेजारच्या रहिवाशांनी तिला विरार येथील संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा यात मृत्यू झाला.या घटनेनंतर पालिकेने या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना खाली करून अन्य ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे.या प्रकरणी विरार पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून महिलेच्या मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एल एम तुरे यांनी दिली आहे.
यापूर्वी नालासोपाऱ्यात नालासोपारा पूर्वेच्या आचोळे येथील साई सिमरन इमारतीत सदनिकेचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती. सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने धोकादायक व जीर्ण अवस्थेत असलेल्या इमारतींचा प्रश्न निर्माण झाला आहे.
धोकादायक इमारतींना नोटिसा देण्याचे काम सुरु
वसई विरार शहरातील धोकादायक व अतिधोकादायक इमारती आहेत त्यांना नोटिसा बजावल्या जात असल्याचा दावा पालिकेने केला आहे. आता जी दुर्घटना घडलेली इमारत आहे त्यांना सुद्धा खाली करण्याच्या संदर्भात नोटिसा दिल्या जातील असे सहायक आयुक्त गिल्सन गोन्सालवीस यांनी सांगितले आहे.