वर्षभरात ५०० गुन्हे; ९१ टक्के गुन्ह्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश

विरार : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यात महिला सुरक्षिततेच्या बाबतीत अजूनही ठोस उपाययोजना निर्माण झाल्या नाहीत. मागील वर्षभरात ५०० हून अधिक गंभीर आणि किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात समाधानकारक बाब म्हणजे ९१ टक्के गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे. असे असले तरी महिलांच्या स्वरूपातील गुन्हे वाढत आहेत.  

आयुक्तालय सुरू झाल्यापासून सर्व पोलीस ठाणे मिळून महिलांच्या संदर्भातील ५०६ गुन्ह्यांची नोंद झाली असून, ४६५ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. दररोज ५ ते ७ गुन्हे महिलांच्या संदर्भातील होत आहेत. यात समाजमाध्यमांवरील विनयभंगाच्या, ऑनलाइन फसवणुकीच्या, घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. त्यात सोनसाखळी चोरीच्या घटनेत सर्वाधिक महिलांना लक्ष केले जात आहे.

तसेच बलात्कार आणि अपहरणाच्या घटनासुद्धा वाढताना दिसत आहेत. पोलिसांकडे दामिनी पथक उपलब्ध नाही, तसेच निर्भया पथकाची निर्मिती झाली नाही. महिला पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. यामुळे अनेक वेळा गंभीर गुन्ह्याचे तपास लागताना विलंब होतो.   

२३९ महिला लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले असून यातील २३३ गुन्ह्य़ाची उकल झाली आहे. मागील वर्षभरात २६७ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची नोंद आहे. यातील २३२ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आहे तर ३५ मुलींच्या अपहरणाचे गूढ कायम आहे. तर ८० हून अधिक ऑनलाइन फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत.

तपास जलदगतीने

या संदर्भात माहिती देताना पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी माहिती दिली की, सर्व  पोलीस ठाण्याला महिला संदर्भातील गुन्हे तातडीने सौजन्यपूर्वक दाखल करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास जलद गतीने केला जात आहे. त्याचबरोबर प्रेम संबंध, पालकांशी भांडण, अभ्यासाची भीती किंवा वाईट संगती यातून मुले घर सोडून जात असल्याचे प्रमाण अधिक आहे. अशा मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन कसे करता येतील यासंदर्भात पोलीस काम करत आहेत. तसेच महिलांसाठी ११२ असलेली मदत वाहिनी अधिक प्रभावी करण्यासाठी वाहनांची संख्या वाढवली जात आहे. शहरातील अधिकाधिक रस्ते सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांची भरतीसुद्धा केली जाईल असे दाते यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.