वसई:-  धावत्या लोकल मधून नारळ फेकल्याने एका तरुणाच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली. संजय भोईर (२५) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संजय भोईर हा नायगाव आणि भाईंदर खाडी बेटावर असलेल्या पाणजू बेटावर राहतो.  तो गोरेगाव येथील खाजगी कंपनीत नोकरीला आहे. शनिवारी फेरीबोट ही विलंबाने सुरू असल्याने संजय हा नायगाव भाईंदर रेल्वे खाडी पुलावरून पायी प्रवास करत कडेकडेने निघाला होता.याच दरम्यान धावत्या लोकल मधून एका प्रवाशाने निर्माल्य खाडीत फेकण्याच्या उद्देशाने नारळ फेकला तो नारळ संजय याच्या डोक्याला लागला.

यात संजय गंभीर जखमी झाला. याची माहिती तेथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मिळताच त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना बोलावून त्याला वसईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र गंभीर स्वरूपाची दुःखापत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.

बोट बंद झाल्यानंतर नागरिकांना या रेल्वे उड्डाणपूलावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो. धावत्या लोकल मधून निर्माल्य फेकल्यामुळे आतापर्यंत गावातील दहा ते बारा नागरिक जखमी झाले आहेत अशी माहिती येथील नागरिकांनी दिली आहे. यापूर्वी वैतरणा रेल्वे खाडी पुलावर ही धावत्या लोकलमधून नारळ फेकल्याने एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती.

गावकऱ्यांची अडचण काय ? .

नायगाव व भाईंदर खाडीच्या बेटावर पाणजू हे गाव आहे. या भागातील नागरिकांना पाणजू बंदर ते नायगाव बंदर असा बोटीने प्रवास करावा लागतो.  काही वेळा हवामान बदलामुळे बोट विलंबाने सुरू असते. तर काही वेळा तांत्रिक अडचण निर्माण होऊन ही बोट बंद पडते. अशा वेळी काही प्रवासी नागरिक नायगाव भाईंदर खाडी पुलावरून पायी प्रवास करतात.

निर्माल्य फेकणे रोखायला हवे

रेल्वे लोकल मधून प्रवास करणारे  काही प्रवासी आपल्या सोबत येताना निर्माल्य व इतर कचऱ्याच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या आपल्या सोबत आणून धावत्या लोकलमधूनच खाडी मध्ये फेकत असल्याने याचा फटका आजूबाजूने चालणाऱ्या पादचारी नागरिकांसह पाण्यातील जलचर  घटकांना देखील बसत आहे. अशा पद्धतीने कचरा व निर्माल्य टाकणे चुकीचे असून यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.   पश्चिम रेल्वे वरून लोकल मधून प्रवास करीत असताना वैतरणा, भाईंदर, नायगाव पाणजू अशा प्रकारचे रेल्वेपूल आहेत दररोज या पुलावरून अनेक प्रवासी निर्माल्य खाडीत फेकत असतात यामुळे याधी अनेक जण जखमी झाले आहेत.