सीमा पुराणिक

संभाषण आणि संवाद यात फरक आहे. संभाषण हे केवळ शाब्दिक माहिती पोचवणारे अथवा व्यावहारिक असण्याचीच शक्यता जास्त. परंतु संवाद हा परस्परांच्या अंतर्मनाचा आवाज ऐकवत असतो. ऋणानुबंधाचे सच्चेपण दर्शवतो.

संवाद म्हटला की साद-पडसाद आलेच. जशी साद तसा पडसाद हा निसर्गनियमच आहे. निसर्गाला जशी साद घालू तसेच पडसाद तो देतो, हे जरी खरे असले तरी आजूबाजूच्या वातावरणातून आपल्याला जी कंपने जाणवतात, त्यानुसार आपणही पडसाद देत असतो.

अगदी व्यावहारिक उदाहरण द्यायचे झाले तर टेबलांची विसंगत मांडणी, सूर्यप्रकाशाचा अभाव, चहुबाजूंना धुळीने माखलेले फायलींचे ढीग अशा वातावरणात काम करत असताना कर्मचाऱ्यांच्या मनात स्वत:च्या आणि कंपनीच्या प्रगतीचा आणि अनुषंगाने देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाचा सकारात्मक विचार कसा बरे येईल? (तर तिथे काय होईल हे न चर्चिणेच बरे, नाही का? कारण सकारात्मक विचारच सकारात्मक मूल्ये निर्माण करतात.)

या उलट कार्यालयाच्या छोटय़ाशा जागेत आवश्यक इतक्याच फर्निचरची सुयोग्य मांडणी, सूर्यप्रकाश, स्वच्छता, नीटनेटकेपणा, प्रसन्न आणि शांत वातावरण, मोजक्याच, पण तजेलदार रंगांनी केलेली विशिष्ट रंगसंगती असेल तर अशा कार्यालयात काम करताना कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता नक्कीच वाढीस लागेल. आपल्या सभोवतालच्या त्रिमितीय वस्तूंच्या मितींची प्रमाणबद्धता, जागेच्या क्षेत्रफळानुसार आणि उंचीनुसार केलेली  घनाकारांची सुसंगत मांडणी, या घनाकारांचे रंग, पोत, छटा मानवी मनाला नक्कीच आनंदी आणि संतुलित बनवतात. आनंदी मन हे माणसाची कार्यक्षमता वाढवते. भौतिक जग आणि मानवी मन यांचा कसा मूकसंवाद चालू असतो नाही?

प्रशस्त, आरामदायी, अत्याधुनिक सुखसोयींनीयुक्त अशी जागा आणि फर्निचरची आकर्षक मांडणी याहीपेक्षा कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन गरजा, काम करत असताना त्यांना सुस होईल अशा सोयी करणे हे जास्त महत्त्वाचे. व्यावसायिक जागा ही खरे तर उद्योगाचा कणा असतो, जिथून कामाची प्रक्रिया सुरू होते. म्हणूनच तिथले वातावरण कर्मचाऱ्यांना कामातून आनंद मिळण्यासाठी उद्युक्त करणारे, इतकेच नाही तर कर्मचाऱ्यांच्या कल्पनाशक्तीला निर्मितीप्रक्रियेला प्रेरणा देणारे असावे.

यातूनच कर्मचाऱ्यांची आणि कंपनीची प्रगती होऊन व्यवसायात जास्त फायदा मिळू शकतो. उद्योगाच्या नव्या वाटा मिळतात. म्हणूनच व्यावसायिक क्षेत्रात- मग ती कंपनी सेवा क्षेत्रातील असो अथवा उत्पादन पुरवणारी असो- सोयी-सुविधा आणि अंतर्गत रचना आणि सजावट यांचे महत्त्व निश्चितच मान्य करावे लागते.

अंतर्गत रचनाकार व्यावसायिक जागेसाठी अंतर्गत रचना करत असताना बऱ्याच गोष्टींचा बारकाईने विचार करत असतो.

उद्योग-व्यवसायासाठी घेतलेल्या जागेचे मोजमाप आणि क्षेत्रफळाचा आवाका लक्षात घ्यावाच लागतो. पण कंपनी प्रोफाईल, संस्थात्मक रचना अर्थात ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, विविध विभाग, कामाची पद्धत, कर्मचाऱ्यांची संख्या.. असे अनेक मुद्दे आराखडा आखताना अत्यंत महत्त्वाचे असतात.

कंपन्यांच्या कार्यालयाच्या सजावटीचा आराखडा तयार करताना कंपनी देत असलेली सेवा, कामाच्या पद्धती समजून घ्याव्या लागतात, तर मालाचे उत्पादन अथवा ट्रेडिंग असेल तर उत्पादनाविषयीची माहिती, प्रमाण, उत्पादनाचा प्रकार, कार्यपद्धती याची माहिती करून घेऊन मगच इंटेरिअर डिझायनर आराखडा बनवण्यास सुरुवात करतो.

कोणत्याही उद्योगासाठी काम करताना इंटेरिअर डिझायनरने तिथे चालणारे काम / कार्यपद्धती समजून घेणे फार महत्त्वाचे असते. कामाची विभागणी, प्रत्येक विभागाच्या कामाचे स्वरूप लक्षात घेणे महत्त्वाचे असते. उदाहरणच द्यायचे झाले तर एखाद्या कंपनीत सेल्स टीमचे सतत कॉल्स करून ग्राहकांशी संवाद साधणे सुरू असते. हे बाजूला बसलेल्या आर अ‍ॅण्ड डी अथवा अकाऊंट्स डिपार्टमेंटच्या माणसाला नक्कीच त्रासदायक ठरेल आणि त्याच्याही नकळत त्याचा परफॉर्मन्स कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, कच्चा माल, तयार माल, स्टॉक, उत्पादने, डिस्पॅच यांची जागा ठरवताना संपूर्ण उत्पादन तयार करतानाची पद्धती समजून घेतल्याशिवाय अंतर्गत रचनाकार स्टॉक लोकेशन्स, मशीन प्लेसमेंट्स नक्कीच सांगू शकत नाही.

त्याचप्रमाणे स्टॉकसाठी रॅक सिस्टम डिझाइन करताना उत्पादनांचा बारकाईने विचार करून मोजमाप दिल्यास कमी जागेत जास्त गोष्टी ठेवता येतात आणि त्या गरजेनुसार वापरता येतात.

योजना आखताना जर कंपनीची भविष्यातील विस्तार, उत्पादन आणि सेवा यांच्यातील बदल यांचा विचार केला तर पुढील काळातील कमीत कमी तीन ते पाच वर्षे उपयुक्त होईल असे सोयी-सुविधा एकदाच निर्माण करून प्रोजेक्ट – कॉस्ट कमी होऊ शकते. रिडिझाइन आणि वारंवार कंपनीच्या सोयी-सुविधांमध्ये करावे लागणारे बदल टाळता येतात. इवल्याशा मुंग्यादेखील पावसाळ्यासाठी बेगमी करतात. व्यावसायिक कार्यालये डिझाईन करताना पुढील तीन ते पाच वर्षांच्या विस्ताराचा विचार करून काम करून घेतले तर येणाऱ्या काळात पूर्णपणे ते उद्योगवाढीकडे लक्ष केंद्रित करू शकतात.

त्याचप्रमाणे कंपनीची दूरदृष्टी, मिशन, आणि ब्रँड व्हॅल्यूज् लक्षात घेऊन इंटेरिअर डिझायनरने सौंदर्यदृष्टीचा विचार केला तर फारच उत्तम. लोगो, ब्रँड एलिमेंट्स/ कलर्स यांच्या अनुषंगाने डिझायनिंग झाले तर ब्रँड संस्थापित करताना नक्कीच फायदा होतो.

seemapuranik75@gmail.com

(सिव्हिल इंजिनीअर,  इंटिरिअर डिझायनर)