22 September 2020

News Flash

आखीव-रेखीव : घर कोणाचे?

अतिशय सोप्या आणि छोटय़ा गोष्टी आहेत, पण त्याची काळजी घेतली तर घर आनंद देते आणि आपलेसे वाटते.

(संग्रहित छायाचित्र)

कविता भालेराव

घर कोणाचे? हा प्रश्न वाचून मनात अनेक प्रश्न येतील. जसे- घर कोणाच्या नावावर आहे? कोण हप्ते भरतेय? भाडय़ाचे असेल तर अजूनच वेगळे विचार मनात येतील.. पण थांबा. मनात प्रश्नांचं काहूर माजविण्याची गरज नाही. घर कोणाचे? या प्रश्नाचे उत्तरही कठीण नाहीये. तर घर आहे घरातील माणसांचे.. म्हणजेच आपल्याबरोबरच लहान मुलांचे तसेच आजी-आजोबांचेही!

बारकाईने वाचले तर लक्षात येईल की, या दोन्ही प्रकारांत काही गोष्टी या सारख्या आहेत, त्या म्हणजे त्यांना घर हे तुमचेही आहे असे सांगून त्यांचे होत नाही, तर ते त्यांच्या सोयीनेही बनवायला हवे.

अतिशय सोप्या आणि छोटय़ा गोष्टी आहेत, पण त्याची काळजी घेतली तर घर आनंद देते आणि आपलेसे वाटते.

प्रथम आपण लहान मुलांसाठी घरात काय काळजी घेतली पाहिजे, किंबहुना त्यांना त्यांच्या खोलीशिवायही उर्वरित घर हे आपले आणि सोयीचे वाटले पाहिजे.

* सर्वप्रथम घराच्या डोअर बेलची उंची ही खूप नसावी. थोडं विचित्र वाटेल, पण डोअर बेल ही नेहमी मुलांना वाजवता यावी याच उंचीवर ठेवली गेली पाहिजे. म्हणजे ही डोअर बेल त्यांच्या मित्र-मत्रिणींना वाजवता येते. त्यांना चार वेळा आपल्या घराची बेल वाजवून आत-बाहेर करण्याचा आनंद मिळतो आणि त्यांच्या मित्रांना जर डोअर बेल वाजवता आली तर त्यांच्या मित्रांचेही घरात स्वागत आहे हे त्यांच्या मनाला पटते. ही पहिली खूण आहे की, त्यांना हे घर त्यांचे वाटेल. कारण त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे या घरात स्वागत होणार आहे.

* शू रॅकमधले नेहमीच दोन फुटांवरचे उंचीचे कप्पे हे मुलांना द्यावेत. म्हणजे ते पटकन शूज काढून त्याच्यात ठेवू शकतात. आणि शू रॅक जर का जमिनीपासून थोडे उंचावर लावले तर ते पटकन चप्पल त्याखाली सरकवून ठेवू शकतात.

* हॉलमधील सोफे हे जर का संपूर्ण कापडाचे असतील तर आपण सतत मुलांना रागवणार. कारण मुले नेहमीच पाय सोफ्यावर ठेवून बसतात, बऱ्याचदा सोफ्यावर बसूनच खातात आणि त्यालाच हात पुसतात. त्यामुळे मुले जरा मोठी होईपर्यंत जर का आपण साधे-सोपे कुशन असलेले सोफे ठेवले तर ते स्वच्छ राहतात आणि हॉलही छान दिसतो. साधे-सोपे म्हणजे, ज्यांचे कुशन कव्हर बदलता येते आणि धुऊन परत वापरता येते असे.

* सगळ्या फíनचरचे कोपरे हे गोलाकार ठेवावेत. फार शार्प असतील तर ते मुलांना लागतात. कारण मुलं कसेही धावत असतात.

* मुलांची खेळणी ठेवायचे कप्पे हे कपाटात खालच्या भागात ठेवावेत, म्हणजे त्यांना खेळणी सहजपणे काढता येतात आणि परत जागेवर ठेवता येतात.

* घरात फार काचेच्या शोभेच्या वस्तू वर ठेवू नयेत. मुलं घरात खेळताना त्या फुटू शकतात. तसेच हँगिंग लाइटचा वापरही कमी करावा.

* बाजारात आपल्याला चाकं असलेले ट्रे किंवा बॉक्स मिळतात, ते जर का मोठय़ा खेळण्यांसाठी वापरले तर फारच उत्तम. ते घरभर ढकलत नेता येतात आणि पटकन सामान भरून त्यात ठेवता येऊ शकतात.

* मुले ही घरात सतत पळत असतात, पॅसेजमध्ये जर खूप फíनचर असेल तर त्यांना इजा होऊ शकते.

* बाथरूममध्ये एक छोटे, पण थोडेसे उंच स्टूल ठेवा, ज्यावर ते उभे राहून आरशात बघू शकतील, व्यवस्थित ब्रश करू शकतील.

* स्वयंपाकघरात खाऊचे डबे त्यांच्या हाताला लागतील असे ठेवावेत. याशिवाय पाण्याचे ग्लास आणि पाणीही त्यांना सहज घेता येईल असेच ठेवावेत.

* मुलांना चाकाच्या खुच्र्या शक्यतो देऊ नयेत. कारण स्टडी टेबलवरच्या कपाटातून काहीही काढण्यासाठी ते त्याच खुर्चीवर चढताना पडून लागण्याची शक्यता वाढते.

आता बघू या आजी-आजोबांसाठी घराच्या अंतर्गत सजावटीत कोणती काळजी घ्यायची ते.

* मुख्य दरवाजाबाहेर जरा जास्त उजेडाचा लाइट लावावा; जेणेकरून त्यांना कुलूप लावणे आणि उघडणे सोपे व्हावे आणि कोणी आले असेल तर त्या माणसाचा चेहरा नीट दिसावा.

* शू रॅकमध्ये साधारण बोटाच्या उंचीवराचा कप्पा द्यावा म्हणजे खूप वाकून चप्पल ठेवाव्या लागणार नाहीत. शू रॅकजवळच एखादा हुकही असावा, म्हणजे त्यावर बाहेर जाताना लागणारी काठी अडकवता येते. तसेच एखादा छोटा रॉड ठेवावा, ज्याचा उपयोग खूप आत सरकलेल्या चप्पल बाहेर ओढण्यासाठी होतो. कारण बऱ्याचदा एवढे वाकता येणे शक्य नसते.

* सोफ्याचे फोम खूप सॉफ्ट नसावे, नाही तर बसल्यावर पटकन उठता येत नाही.

* टीव्ही रिमोटचे स्टँड बाजारात मिळते ते ठेवावे, म्हणजे त्यांना ते चटकन मिळते.

* घरातील पॅसेज जर का लांब असेल तर त्याला सुंदर, पण नीट पकडता येईल अशी रेलिंग लावावी आणि शक्यतो पॅसेज मोकळा ठेवावा.

* जिना असेल तर त्याचेही रेलिंग दणकट असावे आणि पायऱ्यांची उंचीही बेताची आणि पाय ठेवायला पुरेशी असावी.

* त्यांची खोली ते मुख्य दरवाजा यांमधील पॅसेज शक्यतो मोकळा ठेवावा. कारण कोणी घरात नसताना जर का दार उघडायची वेळ आली आणि त्यांची धावपळ झाली तर त्यांना इजा होण्याची शक्यता वाढते.

* आजी-आजोबांच्या रूममध्ये मोजकेच फíनचर असावे आणि त्यांचे कोपरे गोलाकार असावेत. त्यांना खूप वाकता येत नाही आणि स्टुलावर उभे राहता येत नाही, हे लक्षात घेऊन त्यांच्या कपाटाची अंतर्गत रचना करावी. याशिवाय त्यांच्या बाहेरगावी जायच्या बॅगा त्यांना सहज काढता आल्या पाहिजेत आणि ठेवताही आल्या पाहिजेत.

* बेडच्या साइड टेबलला जर का ड्रॉवर दिले तर त्यांना त्याचा जास्त वापर करता येतो.

* याशिवाय बेडरूममध्ये रात्री डोळ्यावर येणार नाही, पण उठायला लागले तर नीट दिसावे अशी प्रकाशयोजना असावी.

* बेडच्या बाजूलाच जर टू वे स्विच असतील तर त्यांना लाइट आणि पंखा सुरू किंवा बंद करायला सारखे उठावे लागत नाही.

* बाथरूममध्येही बाथरूम रेल बसवून घ्याव्या. बाथरूममध्ये भरपूर लाइटस्ची योजना करावी. तसेच बाथरूम वा दरवाजाला वरच्या उंचीला छोटी अपारदर्शक काच लावावी. कधी अडचणीच्या वेळी तोडून बाथरूमचा दरवाजा उघडणे सोपे जाते.

या गोष्टी छोटय़ा आहेत, पण मुलांना, वृद्धांना घराबद्दल आपुलकी वाटायला हवी, असे वाटत असेल तर या गोष्टींचा विचार झालाच पाहिजे.

काही बदल असे आहेत किंवा काही गोष्टी ज्या या दोन्हीही वयोगटांतल्या व्यक्तींना उपयुक्त ठरतात त्या पुढीलप्रमाणे –

* न घसरणाऱ्या लाद्या, डोअर मॅट असावेत.

* घरातील लाइटच्या स्विच बोर्डची उंची ही जर  ४ह्ण0″ असेल तर मुलांना आणि वयस्कर माणसांना त्याचा वापर नीट करता येतो.

* घरात भरपूर लाइट असणे आवश्यक.

* डोअर लॉक, दरवाजाच्या आतून लावायच्या कडय़ा या नीट उंचीवर आणि उत्तम दर्जाच्या असणे गरजेचे असते.

* घरातील नळ, लाइटची बटणे ही वापरायला सोपी हवीत.

* ज्येष्ठ लोकांच्या रूममध्ये कॉल बेल असावी.

* बाल्कनीच्या रेलिंगची उंची ही जास्त ठेवावी.

* स्वयंपाकघर, पॅसेज, मुख्य प्रवेशद्वाराजवळ सीसीटीव्ही कॅमेरे असणे फारच गरजेचे आहे. आता मनात येईल की, स्वयंपाकघरात कॅमेरा का? कधी कधी वयस्कर माणसांकडून गॅस सुरू राहतो, त्यांना लक्षात येत नाही. अशा वेळी आपण घरात नसलो तरी थोडे लक्ष ठेवू शकतो.

* ए.सी.चे रिमोट हाताला लागेल असे ठेवावे. कारण बऱ्याचदा कूलगिंचे सेटिंग करणे थोडे अवघड असते आणि ते दर वेळेला जमतेच असे नाही.

* घरात चार्जरच्या वायर, टेलिफोनच्या वायर या लोंबकळत असतील तर पायात अडकून पडण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या नीट बांधून ठेवाव्यात. आजकाल बाजारात वायर मॅनेजर मिळतात त्यांचा वापर करावा.

* डायिनग टेबल, सेंटर टेबल यांचे टॉप शक्यतो काचेचे नसावेत. कारण मुले वस्तू जोरात ठेवतात आणि ज्येष्ठ नागरिक उठताना त्याचा आधार घेऊन उठतात.

* घरातील पॅसेजमध्ये किंवा रूमच्या वळणांवर आरसे लावू नयेत, नाही तर अचानक येणारा त्यावर धडकू शकतो. मुले जोरात पळत येतात. त्यांचे लक्ष नसते. ते त्यावर जोरात आदळू शकतात आणि आजी-आजोबांना ते लक्षात येत नाही आणि त्यांचा गोंधळ होऊ शकतो.

बघायला गेले तर क्षुल्लक वाटणाऱ्या या गोष्टी फारच नुकसान करू शकतात. म्हणूनच त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. घरात राहणाऱ्या प्रत्येकाच्या भावनांचा विचार केला पाहिजे, तसेच त्याच्या घरातील रचनेतील गरजांचाही विचार हा झालच पाहिजे. मगच घर हे आपलेसे वाटते. लहानांपासून मोठय़ांपर्यंत घरातील प्रत्येकाच्या मानसिकतेबरोबरच त्यांच्या गरजांचाही विचार होणे आवश्यक आहे.

(इंटिरियर डिझायनर)

kavitab6@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 1:30 am

Web Title: article by aakhiv rekhiv kavita bhalerao
Next Stories
1 अंगण घराचे आभूषण!
2 घराची अंतर्गत रचना
3 स्वयं-पुनर्विकास : वस्तुस्थिती
Just Now!
X