News Flash

अडालज विहीर

जमिनीच्या पोटातील पाण्यापर्यंत खोल उतरत जाणे सुलभ व्हावे यासाठी त्या वेळी पायऱ्या असलेल्या विहिरी बांधण्याची पद्धत रूढ होती.

(संग्रहित छायाचित्र)

रजनी देवधर

पाणी हे जीवन. प्रत्येक जीवमात्राला जीव जगविण्याची आस. त्यासाठी पाण्याच्या स्रोताकडे वळतात त्याची पावले. झरे, नद्या, सरोवरे, भूगर्भातील गोडय़ा पाण्याचे झरे.. अथक शोध, उन्हातली तृषार्त वणवण पाण्यासाठी आदिम काळापासूनची. मिळालेले पाणी जतन करताना पावसाचे पाणी साठविणे, वाहते पाणी अडविणे, बांध, बंधारे, धरणे बांधणे, कालवे काढणे; गोडे पाणी शोधत जमिनीत खोल विहिरी खणणे अशा विविध उपायांद्वारे पुरातन कालापासून आजमितीपर्यंत अथक केली जाणारी आणि यापुढेही करायला लागणारी ही यातायात निव्वळ जगण्यासाठी.. उष्ण कटिबंधातील प्रदेशात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई डोळ्यातून पाणी काढणारी. या खडतर समस्येला सामोरे  जायचे, त्यावर मार्ग काढायचे प्रयत्न आपापल्या परीने सर्वाचे.

प्राचीन भारतात त्यावेळच्या राजे, महाराजे, संस्थानिकांनी आपापल्या राज्यात नद्यांना कालवे काढून, विहिरी बांधून तहानलेल्या रयतेला पाणी पुरविले. जमिनीच्या पोटातील पाण्यापर्यंत खोल उतरत जाणे सुलभ व्हावे यासाठी त्या वेळी पायऱ्या असलेल्या विहिरी बांधण्याची पद्धत रूढ होती. या प्राचीन पद्धतीची मुळे हजार वर्षांअगोदरपासून आढळतात. संस्कृती विकसित होताना अन्न, पाणी, निवासाच्या मूलभूत गरजा भागविण्याबरोबर कलेचा उदय होत त्याचा आविष्कारही दैनंदिन जीवनात उमटतो. पाणथळ जागा विपुल असलेल्या गुजरात राज्यामध्ये गोडय़ा पाण्याची वानवा शतकांपासूनची. उष्ण हवा पाण्याची गरज अजूनच वाढविणारी. पायऱ्या असलेल्या मोठय़ा विहिरी खोदणे ही पद्धत तेथे हजार वर्षांपासून अवलंबिली जाणारी. अहमदाबादजवळ सुमारे २० कि.मी. अंतरावर असलेल्या गांधीनगर जिल्ह्यतल्या अडालज नावाच्या  छोटय़ा खेडेगावात पायऱ्या असलेली ही विहीर हा तत्कालीन प्रगत स्थापत्यशास्त्र, कला यांचा विलोभनीय अलौकिक आविष्कार. रखरखत्या उन्हातून वाटचाल करणाऱ्या तहानलेल्या पांथस्थांना विहीर फक्त पाणी घेण्यासाठी नव्हे तर शीतल सावलीत विसावण्यासाठी आणि विसावताना मन रिझवीत आल्हाददायी प्रसन्न करणारी देखील. पायऱ्यांवरून खाली उतरत गेल्यावर दिसून येतो या विहिरीवर बांधलेला पाच मजले असलेला वालुकामय दगडात खोदलेला कोरीव महाल. कडक उन्हात विहिरीवर कडेनी छत धरत पाण्याचे बाष्पीभवन कमी करत पाणी आटू न देणारा, जमिनीच्या पोटात खोदलेला असूनही कुंद काळोखी नव्हे तर अगदी हवेशीर, उजेड आणि सावली असलेला, आत शीतल होत जाणारा, बाहेरच्या उन्हाच्या झळांपासून सुटका देणारा, नेत्रदीपक कोरीवकाम असलेला.. आताच्या अहमदाबामध्ये पंधराव्या शतकात तिथे होते दांडई राज्य; राजपूत वाघेला राज घराण्याचे. राणा वीर सिंग राजा होता तेव्हा त्या राज्याचा. पाणी कमी असलेले त्याचे लहान राज्य. तहानलेल्या रयतेला पाण्यासाठी दूर पायपीट करायला लागायची तेव्हा. पाऊस पडला नाही तर दुष्काळामध्ये प्रजाजन त्रस्त व्हायचे. राजा वीर सिंगने अडालज येथे रयतेला पाण्यासाठी आणि वाटसरू, प्रवासी पांथस्थांना विसावण्यासाठी आगळी वेगळी विहीर बांधण्याचे ठरविले आणि कुशल कारागिरांच्या स्थापत्य कौशल्याला सुरुवात झाली. जमिनीत खोदलेली विहीर आणि त्यावरचा पाच मजली महाल उभारण्यास सुरुवात झाली. राजा हिंदू, साहजिकच बांधकामावर हिंदू शैलीचा ठसा. कोरीवकामात नवग्रहांच्या प्रतिमा, तत्कालीन संस्कृतीमधील लोकजीवन त्याच्या प्रतिमा, हत्ती, घोडे, कमळ, पक्षी साकारले गेले. विहिरीवरचा महाल अष्टकोनी- अनेक खांबांवर उभारलेला. खांबांवर कोरीव नक्षीकाम त्या वेळच्या संस्कृतीचे प्रतिबिंब उमटविणारे, आतमध्ये प्रशस्त मंडपासारखी जागा. महालाच्या या अष्टकोनात भूमितीय संरचना दिसून येतात. याचे बांधकाम सुरू असताना एक आक्रित घडले. त्या वेळचा गुजरातचा सुलतान महमूद बेगदा ऊर्फ महमूद शहाचे या छोटेखानी राजपूत राज्यावर आक्रमण झाले आणि लढाईत राजा वीर सिंग शत्रू कडून मारला गेला. त्याची सौंदर्यवान राणी रुपबा ऊर्फ रुडाबाईने सती जाण्याची तयारी केली. मात्र जेत्या महमूद सुलतानने तिच्या सौंदर्याची मोहिनी पडून त्यापासून तिला रोखले आणि तिच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. राणी तयार झाली ती एका अटीवर, तिच्या पतीच्या स्मरणार्थ तो विहिरीवरचा भव्य महाल बांधून झाल्यावर ती विवाहबद्ध होणार असल्याची अट तिने घातली. राणीच्या सौंदर्यावर फिदा होत तिच्या प्रेमात पडलेला महमूद तयार झाला आणि या महालाचे अर्धवट राहिलेले काम त्याने झपाटय़ाने पूर्ण करून घेतले. हिंदू मंदिरे, लेणी मोगल राजवटीकडून उद्ध्वस्त होत असल्याच्या त्या काळात महमूदने हे काम आधीच्या कलाकृतीला धक्का न लावता त्यावर इस्लामिक शैलीचा बाज चढवत पूर्ण केले. विहिरीवरचा हा अद्वितीय, आगळा महाल बांधून पूर्ण होताच त्याने राणीला विवाहाबद्दल विचारले. राणी विहिरीवरच्या त्या सुंदर महालात गेली. मनात मूर्ती पतीची. त्याचे अखंड स्मरण. प्रार्थना आणि पूजापाठ करण्याच्या निमित्ते गेलेली राणी पुन्हा परतली नाही. पतीच्या चित्तेच्या ज्वाळा नाही तर त्या विहिरीचे जल जल करत पतीनंतर तिने आपली जीवनयात्रा संपवली. पतीकडून अधुरे राहिलेले कार्य पूर्ण करून तिने जीवन समर्पित केले. राजे, बादशहा आपल्या पत्नींच्या स्मरणार्थ महाल, स्मारके बांधण्याच्या त्या काळात ही धर्यवान स्त्री मोठय़ा चातुर्याने आपल्या पतीचे अर्धवट राहिलेले कार्य शत्रूकडून पूर्ण करून घेत आपल्या पतीस भेटण्यास कायमची निघून गेली.

महमूद शहा चिडला मात्र त्याने महालाची तोडफोड केली नाही. क्रूर होत बांधकाम करणाऱ्या त्या पाच कलाकारांची हत्या केली. त्यांच्याकडून अशी देखणी कलाकृती होऊ नये याची दक्षता म्हणून. अशी दु:खद किनार असलेली ही बाजू या महालाविषयी पाच शतकांपूर्वीची आख्यायिकेमध्ये सांगितली जाते. अडालज इथला हा विहिरीवरचा महाल १४९८ साली बांधून पूर्ण झाला. त्याला पाच लाख टांक इतका खर्च आला. महालाच्या संगमरवरी शिळेवर हे तपशील- झालेला खर्च, बांधकाम पूर्ण झाल्याची तिथी, प्रहर आदी संस्कृतमध्ये लिहिले आहेत. पाच मजली महालाच्या पहिल्या मजल्यावर मंडपासारखी प्रशस्त जागा आहे. पायऱ्या असलेले तीन बाजूंनी तीन जिने असलेली ही एकमेव विहीर आहे. पहिल्या मजल्यावरच्या मंडपात तेथून जाता येते. खांब, सज्जा, छत, गवाक्ष येथली कोरीव नक्षीकाम लेण्यांसारखी नेत्रदीपक कलाकृती, मजल्यांना जोडणारे आतमधले चक्राकार दगडी जिने सारेच विस्मयकारी. पाच शतकांपूर्वीच्या त्या कसबी कारागिरांचे कौशल्य फक्त कोरलेल्या नक्षीकामात नव्हे तर भूमितीय प्रमाणबद्ध रचना, आत उत्तम वायुविजन, थंडावा, सावली आणि उजेड दोन्ही राहील अशी रचना यात दिसून येते. स्थापत्यशास्त्राचा या आगळ्या बांधकामशैलीचा नमुना असलेली ही विहीर आणि वालुकामय दगडात खोदलेला भव्य महाल दोन भिन्न शैलींची नजाकत असलेला कलेचा विलोभनीय आविष्कार होय.

deodharrajani@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 1:47 am

Web Title: article on well
Next Stories
1 उद्योगाचे घरी.. : नवसंकल्पनांचा स्रोत असलेला रेकॉर्डिग स्टुडिओ
2 वस्तू आणि वास्तू : धूळ खात पडलेल्या शोभेच्या वस्तू
3 यशस्वी स्वयंपुनर्वकिासाच्या मार्गावर..
Just Now!
X