News Flash

ओपन टेरेस सदनिका घेताना..

काही वेळेला चटईक्षेत्र किंवा इतर बाबींमुळे एखादा मजला अर्धाच बांधायची परवानगी मिळते.

(संग्रहित छायाचित्र)

 

अ‍ॅड. तन्मय केतकर

ओपन टेरेस असलेल्या सदनिकांच्या विक्री आणि पुनर्विक्री करारांतदेखील ओपन टेरेस आणि त्याचे क्षेत्रफळ दाखवण्यात आलेले असते. मात्र करारांत केवळ लिहिलेले असल्याने ते कायदेशीर ठरते असे नव्हे. भविष्यात सोसायटी किंवा नगररचना विभागाने त्या जागेच्या मालकी, वापर किंवा ताब्याबाबत वाद निर्माण केल्यास त्या जागेचा अनधिकृत वापर केल्याबद्दल दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागण्याचीदेखील शक्यता असते.

मोठ्ठी बाल्कनी किंवा ओपन टेरेसच्या जागेचा अनेक प्रकारे उपयोग करता येत असल्याने मोठ्ठी बाल्कनी किंवा ओपन टेरेस सदनिकांना अनेक लोकांची प्रथम पसंती असते. मात्र अशी सदनिका खरेदी करताना काळजी घेणे आणि काही गोष्टींची शहानिशा करणे अत्यावश्यक आहे.

कोणत्याही बांधकामाला मंजुरी देताना उपलब्ध चटईक्षेत्र (एफ.एस.आय.) आणि इतर कायदेशीर बाबींच्या अनुषंगाने त्यातील प्रत्येक जागेला विशिष्ट मंजुरी देण्यात येते. उदा. रहिवासी सदनिका, व्यापारी गाळे, बाल्कनी, ओपन टेरेस इत्यादी आणि ज्या कारणाकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे त्याच कारणाकरिता त्या जागेचा वापर करणे बंधनकारक असते.

काही वेळेला चटईक्षेत्र किंवा इतर बाबींमुळे एखादा मजला अर्धाच बांधायची परवानगी मिळते. उदा. चार मजली इमारतीकरिता तीन मजले पूर्ण आणि चौथ्या मजल्यावर पूर्ण बांधकाम अनुज्ञेय नसल्याने तिसऱ्या मजल्यापेक्षा कमी सदनिका बांधण्यात येतात. अशा वेळेला शेवटच्या मजल्यावरील सदनिकांच्या क्षेत्रापुढे खालच्या मजल्याची स्लॅब आलेली असते आणि बरेचदा शेवटच्या मजल्यावरील सदनिकांच्या भिंतींना दार वगैरे पाडून खालच्या मजल्याची ती स्लॅब ओपन टेरेस म्हणून वरच्या सदनिकांचाच भाग असल्याचे भासवण्यात येते. मात्र जर बांधकाम परवानगी आणि मंजूर नकाशानुसार ती जागा वरच्या सदनिकांना संलग्न ओपन टेरेस नसेल, तर त्याची मालकी अंतिमत: सोसायटीला मिळणे क्रमप्राप्त असते. साहजिकच अशा ओपन टेरेसबाबत कालांतराने वाद उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बरेचदा अशा सदनिकांच्या विक्री आणि पुनर्विक्री करारांतदेखील ओपन टेरेस आणि त्याचे क्षेत्रफळ दाखवण्यात आलेले असते. मात्र करारांत केवळ लिहिलेले असल्याने ते कायदेशीर ठरते असे नव्हे. भविष्यात सोसायटी किंवा नगररचना विभागाने त्या जागेच्या मालकी, वापर किंवा ताब्याबाबत वाद निर्माण केल्यास त्या जागेचा अनधिकृत वापर केल्याबद्दल दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागण्याचीदेखील शक्यता असते.

या सगळ्याचा एकसमयावच्छेदाने विचार करता, ओपन टेरेससह सदनिका विकत घेताना आपल्या सदनिकेला संलग्न असलेली ओपन टेरेस ही आपल्या सदनिकेची ओपन टेरेस म्हणून बांधकाम परवानगी आणि मंजूर नकाशात दर्शविलेली असल्याची खात्री केल्याशिवाय तो व्यवहार आणि करार पुढे नेऊ नये.

tanmayketkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2021 12:31 am

Web Title: article on when taking an open terrace flat abn 97
Next Stories
1 स्टॅम्प डय़ुटी, गृहकर्ज व्याजदर आणि घरखरेदी
2 मावशीचं घर!
3 स्वयंपाकघरातील प्रकाश योजना
Just Now!
X