|| कविता भालेराव

जून महिना सुरू झाला की पावसाबरोबरच चाहूल लागते ती शाळेची. नवीन पुस्तकांना जागा करू, या असे म्हणतच पुस्तकांबरोबरच इतरही जुन्या वाटणाऱ्या आणि आवश्यक नसणाऱ्या गोष्टी काढून टाकता येतात. कपाटातून वस्तू काढत असताना आणि ठेवत असताना बऱ्याचदा एकच प्रश्न मनात येत असतो- एवढी सगळी कपाटे बनवूनही वस्तू नीट बसत का नाहीत. बाहेरच का? अनेकदा तर मुलांच्या खोलीत व्यवस्थित कपाट असूनही भरपूर पसारा आढळतो. मुलांची खोली ही घरातील फार महत्त्वाची जागा असते.

आपण जितकी काळजी स्वयंपाकघर, आपली खोली डिझाइन करताना घेतो तितकीच काळजी मुलांची खोली डिझाइन करताना घेतली पाहिजे. खूप रंग वापरले, भौमितिक आकार वापरले म्हणजेच मुलांची खोली वाटते, असा अनेकांचा समज असतो. मुलगी असेल तर गुलाबी आणि मुलगा असेल तर निळा रंग हे अगदी मनात पक्कं बसलेलं असतं. मुलांच्या कपाटात काय हवं याबाबत सर्वसाधारण लोकांना असं वाटतं, की एक कप्पा- जो अभ्यासाच्या पुस्तकांना हवा. एखादा कपडे ठेवायला हवा. जी काही मुलं पूरक वाचन करतात त्या अन्य पुस्तकांसाठी एक कप्पा हवा.. असं सर्वसाधारण नियोजन असतं.

वस्तूंना जागा देणं म्हणजे खोली डिझाइन करणं होत नाही आणि मुलांची खोली तर फार विचार करून डिझाइन करावी लागते. मुलांच्या आवडीनिवडी या त्यांच्या वयोमानानुसार बदलत राहतात. त्यामुळे मुलांची खोली डिझाइन करताना आपल्याला हे छोटय़ा-मोठय़ा गोष्टी लक्षात घ्यायला लागतात.

जाहिरातीत आपण बघतो किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्या दुकानात डिस्प्लेवर असलेल्या मुलांच्या खोलीचा सेट बघतो तितकं सोपं नाहीए मुलांची खोली डिझाइन करणं. मुलांची खोली डिझाइन करताना काही गोष्टींचा प्रामुख्याने विचार करावा लागतो.

मुलांचं वय -आपण कोणत्या वयाच्या मुलांसाठी खोली डिझाइन करणार आहोत हे लक्षात घ्यायला हवं. आपण ही खोली जर का टॉय खोली म्हणून वापरणार असू तर डिझाईन वेगळं असतं. मूल खूप लहान असेल तर अनेकदा त्याचे खेळ ठेवणं, कपडय़ाचं कपाट आणि एक छोटासा पलंग एवढंच त्या खोलीमध्ये ठेवावं.

मुलांच्या वयाबरोबरच त्यांच्या आवडीनिवडीही बदलतात. पहिलीत असणाऱ्या ज्या मुलाला किंवा मुलीला जे कार्टून आवडत असेल तेच सहा महिन्यांनीदेखील आवडेल याची खात्री आपण देऊ शकत नाही. तेव्हा खोली डिझाइन करताना आपल्याला कार्टूनचा खरंच वापर करायचा असल्यास किती प्रमाणात करायचा याचा विचार करणं आवश्यक आहे.

वाढत्या वयानुसार मुलांच्या आवडीनिवडी सतत बदलत असतात. अगदी खेळण्यांची आवडही बदलत राहते. एखादं खेळणं आज जर का फारच प्रिय असेल तरीदेखील कदाचित त्यांच्यालेखी सहा महिन्यांनी ते फार महत्त्वाचं राहील असं नाही. आणि कधी कधी कुठली तरी एखादी किरकोळ गोष्टही त्यांच्यासाठी कायम महत्त्वाची असते. थोडक्यात काय तर, मुलांच्या खोलीत कधी कुठल्या गोष्टीला महत्त्व येईल याचा नेम नसतो आणि त्याचा वयाशी काहीही संबंध नसतो.

जेव्हा आपण खोली डिझाइन करू त्या वेळी मुलांचं वय लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यानुसार बऱ्याच गोष्टींच्या जागा ठरतात. त्यांना कोणती गोष्ट पटकन् हाताशी हवी आहे? जरा थोडी वर ठेवली आणि चढून काढता आली तरी चालणार आहे का.. या सगळ्याचा विचार करावा लागतो. ते आपल्याला त्यांच्या उंचीचा विचार करून ठरवता येतं. खोली जर एकच मूल वापरणार असेल तर डिझाइन करणं फारच सोपं असतं, पण जर का दोन वेगवेगळ्या वयाची मूलं ही खोली वापरणार असतील तर खोली डिझाइन करणं फार आव्हानात्मक असतं.

खोलीचा वापर आणि मुलं- एकापेक्षा अधिक जण वा एकच जण खोली वापरणार असतील यावर या खोलीचं डिझाइन अवलंबून असते. जर का भाऊ आणि बहीण ही खोली वापरणार असतील तर त्याचं प्लॅनिंग वेगळं करावं लागतं. दोन मुलंच वापरणार असतील तरी प्लॅनिंग वेगळं असतं. किंवा दोन मुलीही वापरणार असतील तरी प्लॅनिंग वेगळंच असतं. काही घरांमध्ये एखादंच मूल असतं, पण त्याच्यासोबत आजी-आजोबा ती खोली वापरणार असतात. या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.

वरील प्रकारच्या कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला खोली डिझाइन करायची आहे हे ठरवल्यानंतर प्लॅनिंग करणं सोपं पडतं. यामध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक माणसं जर ती खोली वापरणार असतील तर त्या प्रत्येकाच्या गरजा, आवडीनिवडी, उंची, वय या सगळ्याचा विचार करून ती खोली डिझाइन करायची असते.

दोन वेगळ्या व्यक्ती जर का एकच खोली वापरत असतील आणि त्यातूनही जर का ते भाऊ आणि बहीण असतील तर त्यांच्या आवडी-निवडी बऱ्यापकी वेगळ्या असतात. त्या सगळ्या आवडीची सांगड घालून त्यांची खोली डिझाइन करणं हे फार जिकिरीचं काम असतं. यामध्येही सगळ्यात अवघड असतं ते एक लहान वयाचं मूल आणि त्याबरोबर त्या खोलीत राहणारे आजी-आजोबा.. या दोन्ही वयाची आणि पिढीची आवड याची सांगड घालणं फारच कठीण असतं.

आपण जर का या गोष्टींचा विचार न करता नुसतीच खोली बनवून घेतली तर मात्र दोघांपकी एकच जण कायम खूश राहू शकतो. त्यामुळे कोणत्या व यासाठी कोणत्या खोलीचा वापर करणार आहे, किती जण करणार आहे हेच लक्षात घेऊन, खोली डिझाइन करणं योग्य पद्धतीने बनवून घेणं फार महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा असं वाटतं, की यात काय अवघड? पण यात फार अवघड असतं. दोन वेगळ्या व्यक्तींच्या वयानुसार त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे फर्निचर ठरते. दोन वेगळ्या साइझचे बेड हे बाजूबाजूला असणे हे फारच वाईट दिसते. जर का आपण एकाच भिंतीला दोन-तीन जणांच्या आवडीचे कलर वापरायला गेलो तर ते फारच खराब दिसतं. त्यामुळे आपल्याला हे फार आधीच ठरवायला लागतं, की खोलीचा वापर कोण करणार आहे. या सगळ्याचा नीट विचार करूनच खोलीचं प्लॅनिंग करा.

खोलीचं प्लॅनिंग आणि फर्निचर-

आत्ता आपण वळतोय खूप महत्त्वाच्या भागाकडे. ते म्हणजे खोलीचं प्लॅनिंग आणि त्यानुसार बनणारं फर्निचर. आता आपण थोडक्यात माहिती घेऊ या की मुलांच्या खोलीचं प्लॅनिंग कसं करावं याचा. प्लॅनिंग करताना जशी आपण वर माहिती घेतली की- मुलांचं वय किती, खोली वापरणारी किती मुलं आहेत हे लक्षात घेऊन तुम्ही अगदी व्यवस्थित यादी करा.

खोलीमधील हवा आणि उजेड याचा योग्य तो अभ्यास करून आपल्याला खोलीचं प्लॅनिंग करावं लागतं. खोलीच्या साइझनुसार फर्निचरची रचना करणं हे उत्तम. पलंग, कपाट, स्टडी टेबल या सगळ्या फर्निचरमध्ये आपल्याला मुलाला खेळायलाही थोडी जागा ठेवायला लागणार आहे, याचा विचार खोलीचं प्लॅनिंग करताना नक्की करावा. खोली मोठी असेल तर आपल्याला स्टडी टेबल, कपाट असं वेगवेगळं डिझाइन करायला जागा मिळत असते. पण खोली लहान असेल तर मात्र फर्निचरची जागा अतिशय काळजीपूर्वक निश्चित करावी.

आता आपण फर्निचरविषयी माहिती घेऊयात. वरवर पाहता असं दिसतं की, खूप जास्त कप्पे असलेलं कपाट घेतलं की त्यात सगळं व्यवस्थित सामान बसेल. खरं तर एका कपाटात आपण यापकी बऱ्याचशा गोष्टी एकत्र बसू शकतो, पण त्यासाठी कपाटातील खणांचं योग्य पद्धतीने नियोजन करणं आवश्यक आहे.

सर्वप्रथम आपल्या मुलांसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याला त्या दिवसभरात कशा, कधी, किती वेळा लागतात हे विचारात घेणं आवश्यक आहे. कधी कधी मुलं एकाच पद्धतीचा खेळ सारखा खेळतात. काही खेळांकडे ते बघतही नाहीत. अभ्यासाची पुस्तकं, दप्तर, त्यांना जर वेगवेगळे क्लासेस असतील तर त्याच्या बॅग्ज या सगळ्याची व्यवस्थित वेगळी यादी करावी. म्हणजे आपल्याला मुलांच्या वस्तूंच्या वापरानुसार त्यांच्या जागा निश्चित करता येतात.

हे कपडय़ाच्या बाबतीतही लागू होतं. रोजचे वापरायचे कपडे, रात्री झोपण्याचे कपडे, बाहेर जायचे कपडे आणि कार्यक्रमांना वापरले जाणारे कपडे या सगळ्यांची वेगवेगळी यादी करून त्यापद्धतीने सामान ठेवलं तर एकाच कपाटात बऱ्याच गोष्टी राहतात आणि तुमच्या खोलीमध्ये जास्तीत जास्त जागा मोकळी राहते. त्यामुळे मुलांना वावरायला, खेळायलाही छान जागा होते.

कपाटाइतकंच महत्त्वाचं असतं ते बेड डिझाइन. बऱ्याच जणांना बंक बेड करायचा असतो, तर काही ठिकाणी डबलबेड केला जातो. काही घरांमध्ये दोन वेगवेगळे बेड केले जातात. आपल्याला ज्या पद्धतीचा बेड हवा आहे तो टाइप निश्चित करावा. बेडच्या खालच्या जागेत हे छोटे ड्रॉवर तयार केले तर मुलांचे खेळ त्याच्यात बसू शकतात.

स्टडी टेबलच्या युनिटचं डिझाइन करताना त्यामध्ये पुस्तकं, वह्य याशिवाय भविष्यात जर कम्प्युटर हवा असेल तर तो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळेच्या बॅगाही ठेवता येतील अशा पद्धतीने डिझाइन केलं तर ते फारच उपयुक्त ठरतं.

मुलांच्या खोलीत काही ठिकाणी ओपन शेल्फही खूप छान दिसतात. थोडय़ा वेगळ्या आकाराचे वेगळ्या डिझाइनचे शेल्फ फारच उपयुक्त ठरतात. त्यावर त्यांची छोटी खेळणी, पुस्तकं राहू शकतात, त्यांना मिळालेली बक्षिसंही आपण त्यावर ठेवू शकतो. फक्त उंची मात्र ठरवून घ्यावी लागते, नाही तर ते डोक्यालाही लागण्याची दाट शक्यता असते.

याच प्रमाणे मुलांची रूम डिझाइन करताना एक मात्र काळजी घ्यायची- तुमच्या फर्निचरला कुठेही शार्प कॉर्नर करू नये. मुलं कशीही वावरत असतात, खेळत असतात, अशा वेळी त्यांना इजा होण्याची शक्यता असते.

मुलांच्या खोलीत एक व्हाइट बोर्ड आणि सॉफ्ट बोर्ड हे दोन्ही मात्र अगदी आवर्जून ठेवावे. त्यांना जे काही लिहायचं असेल आणि काही त्यांच्या वस्तू डिस्प्ले करायच्या असतील तर या दोन्हीचा वापर अतिशय योग्य पद्धतीने करता येतो.

मुलांच्या रोजच्या लागणाऱ्या वस्तू त्यांच्या हाताशी ठेवाव्यात. मुलांना बऱ्याच गोष्टी गोळा करण्यात आनंद मिळतो. आपल्या मोठय़ांना बऱ्याचदा या गोष्टी फारच त्रासदायक वाटत असतात, त्यामुळे आपण त्यातल्या काही गोष्टी नेहमीच मागे ठेवत असतो. पण एक लक्षात घ्या की, मुलांची खोली डिझाइन करताना आपल्यासाठी महत्त्वाच्या नसलेल्या, पण त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी या त्यांच्या हाताशीच राहिल्या पाहिजेत.

रंगसंगती- मुलांसाठी फारच जिव्हाळ्याचा विषय असतो तो म्हणजे खोलीचा रंग. आणि असं कुठेही लिहिलेलं नाही की मुलींनी पिंक आणि मुलांनी ब्लू हेच रंग वापरावेत. नेहमीच मुला-मुलींना बरोबरीचं स्थान देण्याच्या गप्पा मारणारे आपण मुलांची खोली डिझाइन करताना मात्र मुलगा-मुलगी असा फार विचार करतो. मुलांना सगळेच रंग आवडत असतात हे मला इतक्या वर्षांच्या अनुभवातून लक्षात आले आहे. पालकच ठरवतात की मुलींसाठी पिंक रंग हवा आणि बऱ्याचदा मुलींना तो रंग आवडतही नसतो आणि काही मुलांना लाइटशेडचे कलर आवडतात. आणि यात काही चुकीचं नाही हे पालकांनी लक्षात ठेवायला हवं. खोली जर का दोन मुलं वापरणार असतील तर दोघांच्या आवडीच्या रंगाचं कॉम्बिनेशन हे चांगलं दिसेलच असं नाही. रंगाचा वापर करताना फारच काळजी घ्यावी लागते. खोली अगदी कंटाळवाणीही नको आणि खूप डिझाइन करून भिंती अंगावर आल्यासारखाही वाटायला नकोत.

फर्निचरचा आणि भिंतीचा ररांगसंगतीचा मेळ साधायला हवा. भिंतीलाच वेगळा रंग दिला पाहिजे असा काही नियम नाहीए. आपण भिंती सफेद ठेवून फर्निचरला वेगळा रंग वापरू शकतो. अगदी पूर्ण वेगळा एकच रंग वापरण्याऐवजी आपण दोन रंगांचं कॉम्बिनेशनही करू शकतो.

एकाच खोलीत खूप वेगवेगळे रंग वापरणं टाळावं. मुलांच्या वस्तूच खूप रंगीबेरंगी असतात. त्यामुळे त्या वस्तू आणि आपण वापरलेले रंग त्याशिवाय पडदे, बेडशीट यांचे रंग यामुळे रंगांची फार सरमिसळ होते.

रंगाच्या वापरावर आणि रंगाच्या निवडीवर मुलांच्या खोलीचं सौंदर्य अवलंबून असतं.

आपण कोणते रंग वापरतो आहोत- गडद रंग वापरतोय की फिकट रंग वापरतोय यावर आपली मन:स्थिती किंवा मूड्स अवलंबून असतात. रंगाचा परिणाम हा मनापासून मेंदूपर्यंत होत असतो; तेव्हा रंग वापरताना नेहमीच काळजी घ्यायची. रंगामुळे घरातला लाइटवरही परिणाम होत असतो, त्यामुळे आपला मूडही बदलू शकतो. या सगळ्या गोष्टींसाठी रंग निवडताना फार सावधगिरी बाळगावी. मुलांच्या खोलीत शक्यतो वॉलपेपर वापरणं टाळावं. अगदी एखाद्या भिंतीला वॉलपेपर वापरणं ठीक आहे.

याशिवाय पूर्ण भिंतीवर कार्टून करणं- अगदी सीिलगलाही कार्टून करणं हे डिझाइिनग म्हणून चांगलं दिसत नाही. आणि भिंतभर कार्टून काढलं, चित्र काढली म्हणजे ती खोली लहान मुलांची झाली आणि ती फार सुंदर झाली असंही नसतं. अशा वेगवेगळ्या गोष्टींपेक्षा मुलांनी केलेली कामं जर तिथे डिस्प्ले करता आली तर ती खोली जास्त छान दिसते.

याशिवाय आजकाल बाजारात असे रंग उपलब्ध आहेत की ज्यावर तुम्ही चित्र काढू शकता आणि नंतर ते पुसून टाकू शकता. त्यांचाही आपण वापर करू शकतो. जी मुलं लहान आहेत, ज्यांची उंची अधिक टेबलाची उंची खालीच असते, जे भिंतीवर चित्र काढण्याच्या वयातले आहेत त्या पालकांनी अशा रंगाचा वापर जमिनीपासून सुरू करून तीन फूट उंचीपर्यंत करावा; म्हणजे मुलांच्या हाताच्या उंचीपर्यंत राहतं आणि मुलं त्याच्यावर चित्र काढतात बाकीच्या भिंती व्यवस्थित राहतात आणि मुलांची हौसही भागते.

मुलांची खोली डिझाइन करताना त्यांचाही त्यात सहभाग फार आवश्यक असतो. त्यांचा सहभाग घेऊन जर खोलीचं डिझाइन केलं तर त्यांचा आनंद द्विगुणित होतो. त्यांच्या गरजेनुसार त्यांच्या खोलीतील कपाट बनवली तर त्यांना एक प्रकारच्या जबाबदारीची जाणीव होत असते. घेतलेल्या वस्तू या जागेवर ठेवल्या गेल्या पाहिजेत. मुलांना एक वेगळ्या प्रकारची शिस्त लागते, की ही खोली माझी आहे. याच्यात माझा सहभाग होता, तर ही खोली मी नीट ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.

प्रत्येक गोष्टींत मुलांच्या भावना गुंतलेल्या असतात. या भावनांचा आदर करण्याकरता पालकांनी मुलांचा विचार करून खोली बनवायची आहे. आपल्याला काय आवडतं, आपल्याला लहानपणी काय करावंसं वाटलं आणि आपल्याला काय सोयीच आहे त्यानुसार त्या खोली डिझाइन होऊ शकत नाहीत.

kavitab6@gmail.com

(इंटिरियर डिझायनर)