आजकाल खेडय़ापाडय़ांपासून ते शहरापर्यंत सर्वजण निरनिराळ्या कारणांसाठी विजेचा सर्रासपणे उपयोग करताना आढळतात. वीज ही प्रत्येकाची गरज बनलेली आहे. चांगल्या प्रकारे हाताळली तर वीज ही अत्यंत उपयोगी आहे; परंतु तिचाच वापर अयोग्य रीतीने केल्यास ती अतिशय धोकादायक आहे.
आपण जेव्हा निरनिराळ्या बातम्या वाचतो किंवा ऐकतो तेव्हा हमखासपणे असे दिसून येते की, कोणीतरी गृहिणी कपडे वाळत घालताना किंवा नळ सोडताना, गिझर वापरताना शॉक लागून दगावली. काही ठिकाणी सर्व घरात शॉक लागतो, विहिरीत काही कारणास्तव उतरले असताना विजेच्या धक्क्याने जीवितहानी होणे, तात्पुरत्या वायरचा वापर करताना त्याचे इन्सुलेशन घासून किंवा उंदराने कुरतडल्यामुळे तो लाइव्ह भाग लोखंडी सामानाच्या वा पत्र्यांच्या (Tinshed)सान्निध्यात आल्यामुळे घडलेला अनेकांचा मृत्यू. लग्न आणि तत्सम समारंभात डेकोरेशनच्या सिरीजला स्पर्श होऊन झालेले अपघात, इत्यादी. दैनंदिन जीवनात इस्त्री, कूलर, पंखा इत्यादी नियमित वापराच्या गोष्टीसुद्धा अधूनमधून अनेकांना झटके देतातच की! तर मंडळी अशा या बहुआयामी विजेला आपल्या उपयोगासाठी संपूर्ण घरात फिरवण्यासाठी जी यंत्रणा असते, तिला हाउस वायरिंग (House Wiring) म्हणतात, तिच्याबद्दल आज चर्चा करणार आहोत.
मित्रहो, बऱ्याच वेळा असे आढळलेले आहे, की विजेचे बिल आले की शेजारच्या बिलाशी तुलना करण्यात येते, परंतु हे बरोबर नाही. प्रत्येकाचा विजेचा वापर हा वेगळा असू शकतो, त्या प्रमाणात बिलाच्या रकमेत कमी-जास्त होते. परंतु बिल जास्त येण्यामागे इतर अनेक कारणांबरोबरच वायरिंगची आणि उपकरणांची परिस्थिती हा एक प्रमुख घटक असतो आणि त्याच्यावर उपाय केल्यास विज बिल निश्चितच कमी होऊ शकते. त्यासाठी प्रत्येक ग्राहकाने उत्तम दर्जाचे मटेरिअल, त्याची नियमांनुसार उभारणी व उच्च प्रतीची देखभाल ((Maintenance) असणे आवश्यक आहे. हे करीत असताना हाउस वायरिंग किती प्रकारे केली जाते ते पाहूया. प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे.
१)    क्लीट वायरिंग (Cleat Wiring )
२)    केसिंग आणि कॅपिंग (Casing and Capping) वायरिंग
३)    मेटल शिथ्ड वायरिंग (Metal Sheathed Wiring)
४)    कॅब टायर शिथ्ड वायरिंग (Cab tyre sheathed or CTS)
५)    पी.व्ही.सी. इन्सुलेटेड (PVC Sheathed) वायरिंग
६)    मेटल कंडय़ूट वायरिंग (Metal Conduit)
७)    पीव्हीसी कंडय़ूट वायरिंग (PVC Conduit wiring)
८)     गुप्त वायरिंग (Concealed Wiring)
भारतभर प्रचलित असलेल्या नॅशनल इलेक्ट्रिक कोड २०११ अर्थात राष्ट्रीय विद्युत संहिता २०११ प्रमाणे हे वर्गीकरण अधोरेखित झालेले आहे.
त्या-त्या ठिकाणी होत असलेल्या प्रक्रिया, विशिष्ट संचमांडणी व कामे तसेच बजेट इ.चा विचार करून वरील प्रकारांमधून योग्य प्रकारचे वायरिंग निवडण्यात येते. उदा. औद्योगिक संचमांडणीस मेटल Conduit  वायरिंगचा वापर हा वैश्विक पातळीवर ठरलेला आहे, त्याप्रमाणे भारतीय कारखान्यांमध्येसुद्धा मेटल कंडय़ूट वा केबल ट्रंकिंगचा उपयोग केला जातो.
पन्नास ते साठ वर्षांपूर्वी आपल्या देशात क्लीट वायरिंग करण्याची पद्धत होती. यामध्ये व्ही.आय.आर. (Vulcanized India Rubber) वायर्स आणि पोर्सीलीन वा प्लास्टिक क्लीटचा वापर करीत असत. अजूनही तात्पुरत्या वा कमी खर्चीक (Economical) वायरिंगसाठी क्लीट वायरिंगचा वापर करतात. काही काळानंतर याची जागा केसिंग अँड कॅपिंग या वायरिंगच्या प्रकाराने घेतली, जी प्रत्येक घर, बंगला व ऑफिसेसमध्ये करण्यात येत होती. या वायरिंगमध्ये लाकडी चौकोनी आकाराच्या पट्टय़ा (Planks) भिंतीवर स्क्रूच्या साहाय्याने लावून त्यांच्या खोबणीतून (Grooves) वायर्स फिरविल्या जातात. ही पद्धत बरीच वर्षे घर आणि ऑफिससाठी विद्युत कंत्राटदार वापरत होती. साधारणपणे १९७०च्या पुढे CTS वायरिंग प्रकर्षांने सर्व बिल्डर, इंजिनीअर व कंत्राटदारांनी आपापल्या हाउसिंग स्कीम्समध्ये वापरायला सुरुवात केली. यामध्ये सागवान लाकडाच्या (Teak wood) विविध जाडीच्या पट्टय़ांवर धातूंच्या क्लिप्सच्या साहाय्याने वायर्स फिरविल्या जातात. घरात किंवा ऑफिसला असलेल्या विविध उपकरणांच्या भाराप्रमाणे (Load) त्याला योग्य अशा लाकडी पट्टय़ा (Battens) भिंतीवर ठोकून त्यावर लावलेल्या क्लिप्समधून वायर फिरविल्यानंतर त्या दिसायलाही खूप आकर्षक दिसत व काही फॉल्ट झाल्यास किंवा वायर जुन्या झाल्यास ते डोळ्यांना दिसल्यामुळे सुरक्षेबाबत निश्चित हमी. कालांतराने १९८५ च्या पुढे विद्युत क्षेत्रात खूप बदल झाले. रिवायरेबल फ्यूजेस जाऊन सर्किट प्रोटेक्शनसाठी एमसीबी, ईएलसीबीचा वापर सर्वत्र होऊ लागला, तसेच सीटीएस वायरिंगच्या जागी PVC केसिंग कॅपिंग आणि PVC कंडय़ूट वायरिंगची सर्व हाउसिंग कॉम्प्लेक्स आणि कापरेरेट ऑफिसेसमध्ये सुरुवात झाली. सध्या सर्वत्र गुप्त वायरिंग म्हणजेच Concealed wiring वापरण्यावर खूपच भर देण्यात येत आहे.
आजकाल घर, बंगला, हाउसिंग स्कीम्स (उदा. लोढा, डीएसके, इ. ) व कापरेरेट्समध्ये सौंदर्याला (Aesthetic Sense) बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे, त्यामुळे महत्त्वाच्या अशा वायरिंगला भिंतीत गाडले जाते. घरामध्ये फॉल्स सीलिंग केल्यानंतर छतावरील वायरिंग ही सीलिंग रोज (Ceiling Rose) पर्यंत गुप्त असल्यामुळे रोजच्या देखभालीत दिसत नाही व कालांतराने त्याच्यातच उंदराने कुरतडून शॉर्ट सर्किट झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशा घटना टाळण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी प्रत्येक घराच्या विजेच्या मागणी (LOAD) प्रमाणे मुख्य एमसीबी (MCB)ची क्षमता ठरवावी, जसे १५  A,, ३२  A,, ६४  A, इत्यादी त्यानंतर प्रत्येक खोलीत ए.सी., पंखे, लाइट्स वगैरे पाहून त्याप्रमाणे प्रत्येक सर्किट ओव्हरलोड होणार नाही याची काळजी घेऊन त्या त्याप्रमाणे त्याचे फ्यूज अथवा ब्रेकर ठेवणे, त्यामुळे प्रत्येक सर्किटला ब्रेकरचे संरक्षण मिळून विद्युत-सुरक्षा प्राप्त होते. विद्युत कंत्राटदारानेसुद्धा कुठलेही विद्युतीकरणाचे काम करताना नेहमी स्टँडर्ड आणि ISI  मटेरिअलच वापरावे. शक्यतो तांब्याच्या वायर्सचा वापर करावा. पैसा कमी लागतो म्हणून अ‍ॅल्युमिनियम वायर्स, नॉन ISI  व कमी गुणवत्तेची साधने वापरू नयेत, अन्यथा शॉर्ट सर्किट व आगीच्या घटना घडून ती जबाबदारी त्यांच्यावर किंवा बिल्डरवर येऊ शकते हे ध्यानात ठेवावे.
आजकाल प्रत्येकाच्या घरी जास्तीतजास्त विद्युत उपकरणे वापरली जातात. जसे, मिक्सर, ग्राइंडर, मायक्रोवेव्ह, इस्त्री, गिझर, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, वातानुकूल यंत्रे, इ. सध्याच्या Concealed Wiring च्या  युगात अतिरिक्त वायरिंग करणेही कठीण असते. म्हणून विद्युतीकरणाचे आराखडे ज्या वेळी मंजुरीसाठी जातात त्याच वेळी प्रत्येक खोलीत जास्तीतजास्त प्लग आउटलेट्स देण्यात यावीत म्हणजे एकाच प्लगवरून मल्टिप्लगच्या मदतीने दोन-तीन उपकरणे जोडल्याने ओव्हर लोडमुळे होणारे नुकसान टाळता येते.
मागील लेखांमध्ये लिहिल्याप्रमाणे बिल्डर अर्थात विकासकाने सोसायटीची मीटररूम जिन्याखाली अथवा अडचणीच्या ठिकाणी न ठेवता सी.ई.ए. अधिनियम- २०१० प्रमाणे मुख्य इमारतीपासून वेगळ्या जागेत करण्यात यावी, जेणेकरून वीज कंपनीच्या गलथान कारभारामुळे मीटररूममध्ये शॉर्ट सर्किट झाले तर कमीतकमी धुराचा त्रास रहिवाशांना होणार नाही.
बिल्डर, ग्राहक आणि वीज कंत्राटदार या सर्वानी जागरूक राहून आपल्या पॉवर लोडला योग्य अशी वायरिंग निवडून त्याची काळजी आणि देखभाल केल्यास विद्युत सुरक्षा दूर नाही. मंडळी, नुकतेच कायद्यात काही सुधारणा झाल्याचे ऐकिवात आले. विद्युत अधिनियम – २०१०मध्ये काही बदल झाल्याचे कळले, ज्यामुळे ग्राहकास Self Certification  चे अधिकार दिले आहेत. पूर्वी जी निरीक्षणे शासनाचे विद्युत निरीक्षक करीत असत, ती आता मान्यताप्राप्त चार्टर्ड इंजिनीअरकडून करून ग्राहकानेच Certify  करावीत असे त्यात म्हटल्याचे समजते. विद्युत निरीक्षकांनी फक्त हाय व्होल्टेजच्या पुढील निरीक्षणे करावीत असा आदेश असल्याचे समजते.
मंडळी, असे झाले तर फार कठीण होईल. कारण बहुतांशी विद्युत अपघात हे लो अथवा मीडिअम व्होल्टेजवर झालेले आढळतात. त्यानंतर नुकसानभरपाई व शिक्षा या बाबी विद्युत निरीक्षकाच्या अहवालावर संबंधित न्यायालय ठरवीत असते. असे असताना निरीक्षणालयास हाय व्होल्टेजच्या वरचीच निरीक्षणे करण्यास सांगणे व त्याखालील सर्व लो व्होल्टेज संचांसाठी Self Certification चे अधिकार देणे म्हणजे विद्युत अपघात शॉर्ट सर्किट व आगींना निमंत्रण देण्यासारखे नाही का? आंध, तेलंगणा, चेन्नई येथील मुख्य विद्युत निरीक्षक यांची एका परिषदेत भेट झाली. त्यांनी हा बदल तिकडे लागू केला नाही, त्यासाठी इलेक्ट्रिसिटी अ‍ॅक्ट २००३च्या कलम १८० अन्वये एक नोटिफिकेशन काढावे लागते. ज्यामुळे विद्युत कायद्यात आपल्या राज्याला योग्य अशा सुधारणा करण्याचे अधिकार आहेत
मी या निमित्ताने सध्या कार्यरत असलेले मुख्य विद्युत निरीक्षक यांना नम्रपणे आवाहन करू इच्छितो की वरीलप्रमाणे अधिसूचना काढण्याबाबत योग्य ती कार्यवाही त्वरित त्यांच्या कार्यालयातर्फे झाल्यास केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या अधीन राहून री’elf Certification व हाय व्होल्टेजच्या खालच्या निरीक्षणांबाबत एखादा नेमस्त मार्ग बरोबर निघेल याची मला खात्री आहे, ज्यामुळे काळबादेवी किंवा मंत्रालयासारख्या दुर्घटना टळतील अन्यथा..  सुज्ञास सांगणे न लगे.
विद्युत सल्लागार आणि सदस्य,
राष्ट्रीय सुरक्षा परिषद
प्रकाश कुलकर्णी -plkul@rediffmail.com

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
air pollution control system has been in dust since three months
पिंपरी : हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तीन महिन्यांपासून धूळखात
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?