डॉ. मिलिंद पराडकर

आज्ञापत्रातील दुर्ग प्रकरणात रामचंद्रपंत अमात्य म्हणतात : ‘‘..जैसे वृक्षाचे मूल दृढ शोषक, भूमीत तो वृक्ष विस्ताराते पावतो; तद्वत राज्यमूल जो नृप तो गुणवंत आसता ते राज्य विस्ताराते पावते. ..संपूर्ण राज्याचे सार ते दुग्रे. दुग्रे नसता मोकला देश परचक्र येताच निराश्रय प्रजाभग्न होऊन देश उद्वस होतो. देश उद्वस जाल्यावरी राज्य यसे कोण्हास म्हणावे? याकरिता पूर्वी जे जे राजे जाले त्याणी आधी देशामध्ये दुग्रे बांधून तो देश शाश्वत करून घेतला. आले परचक्रसंकट दुर्गाश्रयी परिहार केले. हे राज्य तरी तीर्थस्वरूप थोरले स्वामींनी गडांवरूनच निर्मिले.. ज्या देशात गडकोट नसतील, त्या देशात आपले राज्याचे सरदेपासून पुढे जबरदस्तीने नूतन स्थले बांधून, बांधीत बांधीत तो देश आक्रमावा. त्या स्थलाचे अश्रई सेना ठेवून त्यापुढील देश स्वशासनवस्य करावा. यसे करीत करीत राज्य वाढवावे. गडकोटांचा आश्रय नसता फौजेच्याने परमुलकी टिकाव धरून राहावत नाही. फौजेविरहीत परमुलकी प्रवेश होणेच नाही. इतकियाचे कारण ते गडकोट. गडकोटविरहीत जे राज्य, त्या राज्याची स्थित म्हणजे आभ्रपटलन्याय आहे. याकरिता ज्यास राज्य पाहिजे त्यांनी गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सन्याचे बल, गडकोट म्हणजे राजलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वसतिस्थळे, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षक, यसे पूर्ण चित्तात आणून, कोण्हाचे भंरवसियावर न जाता, आहे त्याचे संरक्षण करणे व नूतन बांधणे याचा हव्यास स्वतांच करावा; कोण्हाचा विश्वास मानो नये. ..किले कोट जतन करणे हे गोष्ट सामान्य आहे, यसे न समजता तेथील उस्तवारी व शासन यासी तिलतुल्य अंतर पडो न द्यावे.’’

पंत अमात्यांच्या आज्ञापात्रातील अशा उद्धृतांचा या लेखमालेत अनेकदा उल्लेख झाला आहे. या आज्ञापत्राचे वैशिष्टय़ असे की, ते या हिंदुस्थानात अनादि कालापासून रुजलेल्या, वाढलेल्या अन् फोफावलेल्या दुर्गशास्त्राच्या प्राचीन अन् डेरेदार वृक्षाचा तळपत्या उन्हात झळाळणारा शेंडा आहे.

अनेकानेक शासकांनी आपापली राज्ये स्थापन केली. त्या लहानशा राज्यांची साम्राज्ये झाली. नंतरच्या पिढय़ांनी आपापल्या परींनी त्यात भर घातली. काही काळानंतर ही साम्राज्येही लोपली. काळाच्या पडद्याआड लुप्त झाली. काहींचे अवशेष राहिले तर काहींच्या भाळी ते भाग्यही लिहिलेले नव्हते. मात्र या साऱ्यांनीच हिंदुस्थानच्या सांस्कृतिक संपन्नतेत अपरंपार भरच घातली. संस्कृतीचा तो प्रवाह भरभरून वाहतच राहिला. धर्म, भाषा, वंश, प्रांत अगदी कशाचाही अडसर न येता या देशाची संस्कृती उलटणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक श्रीमंतच होत राहिली. शास्त्रे, कला, साहित्य, विज्ञान, अर्थ या साऱ्यांचाच वेलू गगनावेरी गेला. काही अरिष्टे, काही वादळे, काही काळरात्री यांचे येणेही नेमाचेच होते. मात्र त्यातूनही तावून सुलाखून हा वेलू वाढताच राहिला. याला रक्ताची, घामाची, आनंदाश्रू, दु:खाश्रूंची शिंपणे झाली. आत्माहुतींची कुंपणे पडली. सन्ये अन् त्यांचे सेनानी लढले. कधी खस्त झाले तर कधी विजय-पराक्रमांच्या जल्लोषात धुंद झाले. जेत्यांचे जयघोष तर जितांचे सुस्कारे अशा या भावभावनांच्या नाना ऋतुचक्रांचे फेरे पाहत हा वेलू वाढतच राहिला. दुर्गाचा, दुर्गशास्त्राच्या भक्कम, डेरेदार वृक्षाचा आधार घेत हा वेलु गगनांतरी गेला!

वेदोपनिषदांनी, शिल्पशास्त्रांनी, वास्तुशास्त्रांनी, नीतिशास्त्रांनी, पुराणांनी, अर्थशास्त्रांनी आणि राज्यशास्त्रांनी व त्यांच्या कर्त्यांनीही या दुर्गाचा अपरंपार महिमा गायला. त्या साऱ्याच ऋषितुल्य महाभागांचे कवित्व अगदी अतिप्राचीन काळापासून ते परवाच्या अठराव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सुरूच होते- जणू ते अग्निहोत्रच. या अग्निहोत्राची सांगता, त्यात शिवछत्रपतींच्या दुर्गविषयक तत्त्वज्ञानाची शेवटची समिधा घालून, पंतअमात्यांनी आज्ञापत्रातील दुर्गप्रकरणाने केली. नपेक्षा शिवछत्रपती आणि त्यांच्या दुर्गानी केलेले कार्य अन् त्याचं मोल कळणं इतरेजनांना अवघड झालं असतं.

पाश्चिमात्य दुर्गबांधणीशास्त्राविषयी अधिकारवाणीने लिहिणारा फिलो ऑफ बायझांटिअम व अर्थशास्त्राचा प्रणेता कौटिल्य हे दोन समकालीन अन् त्यांच्यानंतर जवळजवळ दोन सहस्रकांनी जन्मलेले शिवछत्रपती अन् त्यांचे दुर्गशास्त्र शब्दबद्ध करणारे रामचंद्रपंत अमात्य या एकाच संपन्न परंपरेच्या दोन टोकांच्या मतांचे मनोज्ञ दर्शनही या लेखमालेदरम्यान घडलं आहे असं मला वाटतं.

फिलोचे पाश्चिमात्य दुर्गशास्त्र, पॅलेस्टीनमधल्या जेरिको या शहरातली ख्रिस्तपूर्व नवव्या सहस्रकातली तटबंदी, बाबिलोन, ऊर, ट्रॉय या शहरांच्या तटबंदींचा कालखंड ख्रिस्तपूर्व तिसऱ्या सहस्रकातला.. इजिप्शिअन्, असिरिअन् व हिटाईट संस्कृतींनी रचलेले दुर्ग, ग्रीस, स्पेन, रोमन, लेव्हान्त, पश्चिम युरोप, इंग्लंड, बायझंटाईन दुर्ग, चीनची भिंत, दक्षिण आफ्रिकेतील व्हॅली ऑफ रूईन्स, अमेरिकन खंडामधले मेक्सिकन दुर्ग व त्यांचे ‘शिलम् बॅलम्’ हे पुस्तक यांपासून ते हिंदुस्थानमधील हडप्पा संस्कृती व वेदांमधील वर्णन केलेले दुर्ग, पुराणे, स्मृतिशास्त्रे, शिल्पशास्त्र, वास्तुशास्त्र, प्राचीन महाजनपदे व त्यांच्या तटबंदीयुक्त राजधान्या, कौटिल्याचे अर्थशास्त्र व त्यातील दुर्गप्रकरणे व दुर्गाचे उल्लेख या साऱ्यांमधील समानता अतिशय विस्मयकारक आहे.

या साऱ्या इतिहासाच्या कालखंडाचा राजकीय वा सामाजिक विचार करताना एक गोष्ट प्रकर्षांने जाणवत राहते, ती म्हणजे त्या त्या कालखंडातील तटबंदीयुक्त शहरांचे वा दुर्गाचे महत्त्व. हडप्पा संस्कृतिपूर्व काळापासून ते अगदी शिवकालाच्या उत्तरार्धापर्यंत दुर्ग हा कुणाही संस्कृतीचा अविभाज्य अन् अनिवार्य असा भाग होता. हे वैशिष्टय़ या अभ्यासादरम्यान दृष्टोत्पत्तीस आले. प्राचीन शिवतत्त्वरत्नाकरात म्हटल्याप्रमाणे :

‘विषहीनो यथा नागो मदहीनो यथा गज: ।

सर्वेषां वश्यतां याति दुर्गहीनस्तथा नृप: ॥’

या ओळी दुर्गाचे कालसापेक्ष महत्त्व अगदी नेटकेपणाने अधोरेखित करतात.

दुर्गाविषयी, तटबंदीविषयी, तटबंदीने युक्त अशी गावे व शहरांविषयीची नोंद अगदी थेट वेदकाळात रचल्या गेलेल्या शिल्पशास्त्रावरील विविध ग्रंथांपासून तो थेट सतराव्या शतकापर्यंतच्या शिल्पशास्त्रावरील विविध ग्रंथांमध्ये आढळते. या प्रदीर्घ कालखंडात दुर्गाच्या मूलभूत कल्पनेत फारसे फरक झाले नाहीत, मात्र शस्त्रास्त्रांच्या प्रगतीमुळे व त्यातून उद्भवणाऱ्या बदलत्या संरक्षणविषयक गरजांमुळे, त्यात काही सहज व अपरिहार्य असे बदल होतही गेले. याचेही विवेचन या प्रबंधात झालेले आहे. प्राचीन काळापासून ते अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे जोपर्यंत दुर्ग रचले जात होते तोपर्यंत- या संदर्भात शनिवारवाडय़ाचे उदाहरण देता येईल. दुर्गाची रचना आचार्यानी ग्रथित केल्याप्रमाणेच होत होती. मात्र बाह्य़ संस्कृती वा आक्रमकांची जोरजबरदस्ती या मूलभूत अशा तत्त्वांवर कधीही प्रहार करू शकली नाही. त्यांचा संसर्ग शिल्पशैलीपर्यंतच मर्यादित राहिला.

तटबंदीने वेढलेली शहरे, ही प्राचीन काळातील दुर्गाची खासियत ठरली. प्रख्यात रोमन इतिहासकार प्लिनीने सातवाहनांच्या राज्यातील तीस तटबंदीयुक्त शहरांची नोंद केली आहे. महाराष्ट्रातील सह्य़ाद्रीच्या शिखरांना दुर्गरूप देणारे सातवाहन हे पहिले राजकुळ. सह्य़ाद्री ओलांडणाऱ्या अनेक व्यापारी वाटांच्या निगराणीसाठी त्यांनी अनेक गिरिदुर्गाची निर्मिती केली. मात्र या साऱ्याच राजकुळांच्या राजधान्या सुपीक पठारी प्रदेशात होत्या. ही परंपरा अगदी शिवकालापर्यंत सुरू होती. या पार्श्वभूमीवर, सह्य़ाद्रीच्या उत्तुंग शिखरावरील दुर्गात राजधानी रचणारा राज्यकर्ता म्हणून शिवछत्रपतींच्या विचारांचे वेगळेपण अन् त्यामुळे त्यांना लाभलेले देदीप्यमान यश, निश्चितच ठसठशीतपणे उठून दिसते.

दक्खनमधल्या साऱ्याच मध्ययुगीन राजधान्या या वर म्हटल्याप्रमाणे भूदुर्ग होत्या. प्रचंड उंचीचे व रुंदीचे तट, त्यांना मजबुती देणारे, ठरावीक अंतरावरचे बुरूज, दुहेरी महाद्वारांची रचना, त्यांचे सर्पाकार प्रवेशमार्ग, तटबंदीच्या माथ्यावर कमलदलाच्या आकाराचे अलंकरण, द्वारांवरचे नक्षीदार शिल्पपट्ट, बाकदार कमानी, दाराखिडक्यांच्या अलंकृत चौकटी, खंदकांची रचना, अनेक मल धावणारी व वेगवेगळ्या पातळीवरची दुहेरी वा तिहेरी तटबंदीची रचना, तटबंदीतील जंग्यांचे वेगवेगळे प्रकार, महाद्वारांमध्ये योजलेले अणकुचीदार खिळे, भुयारांची निर्मिती, दुर्गमतेसाठी कडे तासण्यावर दिलेला भर, खंदकावर ओढून घेता येणारे पूल, दुर्गाच्या महाद्वारांना समोरून झाकणाऱ्या तटबंदीची रचना, या महाद्वारांच्या माथ्यावर असणारे नगारखाने व छज्जे, पाण्याची मुबलक सोय ही साऱ्याच मध्ययुगीन दुर्गाची काही ठळक अशी वैशिष्टय़े म्हणता येतील. पन्हाळ्याची धान्याची कोठारे व अंधारबाव, धोडपच्या माचीवरली भाजलेल्या विटांनी रचलेली देखणी बारव, देवगिरीचा भुलभुलया हीसुद्धा अशा वैशिष्टय़ांची लखलखती उदाहरणे म्हणायची.

मध्ययुगातील दुर्गाची आणिक एक खासियत होती. ती काहीशी मानसिकतेशी जुळलेली होती. बहुतेक वेळा युद्धात राजधानीचा दुर्ग पडला की ते साम्राज्य लयाला गेले असं होई. यादवांची देवगिरी, हरिहर-बुक्कांची विजयनगर, बहमनींची बीदर, निजामाची अहमदनगर ही याबाबतीतली काही ठळक उदाहरणे म्हणता येतील. ही परंपरा अगदी शिवकालातही दिसून येते. औरंगजेबाच्या आक्रमणकाळात, गोवळकोंडय़ाची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही या दोन्ही शाह्य़ा, राजधानीचे दुर्ग पडताच भुईसपाट झाल्या. कारण एकच देता येते की, या सत्ता लष्करी व मानसिकरीत्या राजधानीच्या दुर्गामध्येच एकवटलेल्या होत्या. ही पंगू मानसिकता शिवछत्रपतींनी पार बदलून टाकली. औरंगजेबाने राजधानी रायगड जिंकला तरी शिवछत्रपतींनी उभारलेले हे स्वराज्य अन् त्यांनी उभी केलेली माणसे न हटता, न डगमगता खडी राहून पंचवीस वर्षे त्याच्याशी भांडत होती. थकलेला, भागलेला, निराशेच्या गत्रेत पार बुडालेला तो बुढा पातशहा शेवटी येथेच कायमचा निजला! हे उदाहरण या संदर्भात फार बोलके ठरावे.

शिवछत्रपतींनी रचलेल्या, जगाच्याही इतिहासात आगळ्या ठराव्या अशा दुर्गकेंद्रित राज्यपद्धतीचा हा विजय होता. प्रत्येक दुर्गाला त्यांनी स्वतंत्र सत्ताकेंद्राचा दर्जा दिला. मुलकी व लष्करी अशा दोन्ही जबाबदाऱ्या या प्रत्येक दुर्गाने पेलायला सुरुवात केली. राज्यातल्या इतर दुर्गावर काय घडतेय याची क्षिती न बाळगता स्वराज्यातले दुर्ग आपापली कर्तव्ये न चुकता पार पाडू लागले. याची परिणती झाली सन्याचा, राज्याच्या कारभाऱ्यांचा अन् जनतेचाही आत्मविश्वास दुणावण्यात. औरंगजेबाच्या तडाख्यात सापडून रायगडासारखा राजधानीचा दुर्गही कोसळला. मात्र कोसळली नाही कारभाऱ्यांची, सन्याची आणि जनतेची जिद्द अन् उमेद. सह्य़ाद्रीच्या अभंग अशा कातळकडय़ासारखी ती दुभ्रेद्यच राहिली. तटबंदीमधला केवळ एक चिरा निखळला, यापरते महत्त्व या घटनेला मिळाले नाही. उर्वरीत तटबंदी अडिगच राहिली.

शिवछत्रपतींच्या कार्याचे मोल यामध्येच आहे. हे राज्य व्हावे ऐसे श्रींचे मनी फार आहे, एवढेच म्हणून ते स्वस्थ बसले नाहीत; स्वत:च्या मनीचा हा विचार त्यांनी सर्वसामान्यांना पटवून दिला अन् मग या नळनीळजांबुवंतसुग्रीवहनुमंताकडून त्यांनी लंका जाळून घेतली. जणू दशदिशांस पालाणे घातली.

नि:स्वार्थी नेतृत्वाअभावी, परिस्थितीचे चटके खात, तळतळत जगणाऱ्या समाजमनाला त्यांनी आत्मविश्वास देत उभारी दिली अन् अतक्र्य अशी कर्तुके त्यांनी या देशीच्या पुतांकडून करवून घेतली. दुर्गाच्या साहाय्याविना हे शक्य झाले नसते. पंतअमात्य म्हणतात त्याप्रमाणे : ‘..परंतु राज्यात किले होते म्हणून अवशिष्ट तरी राज्य राहिले. पुढे पूर्ववत करावयास अवकाश जाहला..’

कौटिल्याच्या शब्दात, केवळ थोडासा संदर्भ बदलून सांगायचे झाले तर, हे दुर्ग म्हणजे शिवछत्रपतींसाठी अन् पर्यायाने राष्ट्रासाठीही ‘अलब्धलब्धार्था’- जे आजवेरी लाभले नाही ते लाभून देणारे, ‘लब्धस्य प्रतिपालिनी’ – जे लाभले त्याचा प्रतिपाळ करणारे अन् ‘परिवर्धितस्य तीथ्रे प्रतिपादिनी’ म्हणजे या लाभामुळे आलेल्या भरभराटीचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोचते करणारे असेच होते हे मान्य करावेच लागते.

राज्यशास्त्रे, शिल्पशास्त्र, वास्तुशास्त्रे लिहिणाऱ्या साऱ्याच प्राचीन व अर्वाचीन धुरीणांना दुर्गाकडून हेच अपेक्षित होते. कालौघात अनेक राजांनी अन् राजवटींनी यात थोडेफार यश मिळवलेही, मात्र शिवछत्रपतींनी मिळविलेल्या यशास इतिहासात तोड नाही. हे करताना त्यांस पुरती जाण होती की, मी हाती घेतलेल्या कार्यात दुर्ग हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. या दुर्गाच्या अस्तित्वावरच माझी, माझ्या माणसांची, माझ्या राष्ट्राची संस्कृती, प्रतिष्ठा व अस्तित्व अवलंबून आहे. ही विचारांची बठकच त्यांना अभूतपूर्व अशा यशाप्रत घेऊन गेली.

पंतअमात्यांचे आज्ञापत्र ही शिवछत्रपतींची शब्दबद्ध झालेली विशुद्ध अशी मानसिकता आहे असे माझे ठाम मत आहे. केवळ दुर्गप्रकरणच नव्हे, तर राजा, प्रधान, साहुकार, वतनदार, वृत्ती आणि इनामे अन् आरमार या आज्ञापत्रात अंतर्भूत असलेल्या साऱ्याच प्रकरणांमध्ये लिहिली गेलेली सारी तत्त्वे ही त्रिकालाबाधित मानावी अशाच योग्यतेची आहेत. किंबहुना शिवचरित्राचा साराच डोलारा या सात प्रकरणांमध्ये मांडलेल्या विचारधारेवर भक्कमपणे उभा आहे याविषयी माझ्या मनी यत्किमपि संदेह नाही.

‘राजा’ या प्रकरणाची सुरुवात करताना पंतअमात्य सहजच लिहून जातात : ‘प्रथम राजे लोकी, सकल सृष्टी ईश्वरनिर्मित, सकलांचा नियंता ईश्वर, त्याणे निर्माण केले. जनांमध्ये आपण एक, परंतु सकलांच्या प्रकृती भिन्न भिन्न, त्यांस एक नियम करून संरक्षणकर्ता नसता परस्परे विरोध पावोन नाशाते पावतील यसे न व्हावे, आपली सकल प्रजा निरूपद्रव होत्साती, धर्मपथप्रवर्तक असावी, या प्रजेचे करुणेस्तव ईश्वरे संपूर्ण कृपानुग्रहे आपणांस राज्य दिधले आहे, या ईश्वरआज्ञेस अन्यथा केलियाने ईश्वराचा क्षोभ होईल, हे संपूर्ण भय चित्तात आणून राज्यमदारूढ न होता सार्वकाल अप्रमत्त होऊन प्रजेचे हितकार्यी सादर असावे.. परंपरागत जो उत्तम, वडील आचरीत आले असतील तोच धर्म आचरोन जेणेकडून कीर्तिलाभ होय ते करावे. सकल कार्यामध्ये अपकीर्तिचे भय बहुत वागवावे.’

शिवचरित्रावर नुसती वरवर नजर फिरवली तरी या विचारांचे सूत्र व कार्यकारणपरंपरा आपल्याला ठायी ठायी आढळते. मग ती कर्तव्यात कसूर करणाऱ्या देशमुखास दिलेली जरब असो वा रयतेची हरप्रयत्ने काळजी घ्यावी म्हणून सेनाधिकाऱ्यांस पाठवलेली ताकीदपत्रे असोत. खेडेबारे तर्फेतील रांझे या गांवच्या बाबाजी भिकाजी बिन गुजर पाटील या मुजोरास अनतिक वर्तन वा बदअमल केल्याबद्दल हातपाय तोडण्याची शिक्षा स्वराज्याच्या प्रारंभकाळातील म्हणजे इ.स. १६४५ सालातील आहे. तर मौजे दळवटणे या चिपळूणजवळील गावात पावसाळ्यात मुक्कामास असलेल्या पागेच्या अधिकाऱ्यांस व सर्वसामान्य सनिकांस उद्देशून लिहिलेल्या आज्ञापत्रात सर्वसामान्य रयतेविषयी असलेली कळकळ अतिशय प्रामाणिक असल्याचे आपल्यास दिसून येते, यात शिवछत्रपती म्हणतात :

‘..चिपळुणी कटकाचा मुक्काम होता याकरिता दाभोळच्या सुबेयात पावसाळ्याकारणे पागेस सामान व दाणा व वरकड केला होता, तो कितेक खर्च होऊन गेला ..परंतु जरूर जाले त्याकरिता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तसी पागेची बेगमी केली आहे. त्यास तुम्ही मनास येईल ऐसा दाणा, रतीब, गवत मागाल, असेल तोवरी धुंदी करून चाराल, नाहीसे झाले म्हणजे पडत्या पावसात काही मिळणार नाही, उपास पडतील, घोडी मरायास लागतील म्हणजे घोडी तुम्हीच मारिली ऐसे होईल व विलातीस तसवीस देऊ लागाल. ऐशास, लोक जातील, कोण्ही कुणब्याचेथील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करू लागलेत म्हणजे जी कुणबी घर धरून जीवमात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल की मोगल मुलकात आले त्याहूनहि अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल. तेव्हा रयतेची व घोडियांची सारी बदनामी तुम्हावरी येईल. हे तुम्ही बरे जाणून, सिपाही हो अगर पावखलक हो, गाव राहिले असाल, त्यांणी रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाही ..बाजारास जावे, रास विकत आणावे. कोण्हावरी जुलूम अगर ज्याजती अगर कोण्हास कलागती करावयाची गरज नाही. ..रंधने करिता, आगटय़ा जाळिता, अगर रात्रीस दिवा घरात असेल, अविस्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. खण गवत वाचेल ते करणे म्हणजे पावसाळा घोडी वाचली नाही तर मग, घोडी बांधावी न लगेत, खायास घालावे न लगे, पागाच बुडाली! तुम्ही निसूर जालेत! ऐसे होईल. याकारणे तपशिले तुम्हास लिहिले असे. जितके खासे खासे जुमलेदार, हवालदार, कारकून आहा तितके हा रोखा तपशिले ऐकणे, आण हुशार राहाणे वरचेवरी रोजाचा रोज खबर घेऊन ताकीद करून, येणेप्रमाणे वर्तणूक करीता ज्यापासून अंतर पडेल, ज्याचा गुन्हा होईल, बदनामी ज्यावर येईल, त्यास, मराठियाची तो इज्जत वाचणार नाही, मग रोजगार कैसा? खळक समजो जास्ती केल्यावेगळे सोडणार नाही. हे बरे म्हणून वर्तणूक करणे.’

हे पत्र राज्याभिषेकाच्या अगोदर एक वर्षांपूर्वीचे आहे. मथितार्थ असा की १६४५ साली वयाच्या पंधराव्या वर्षी ज्या विचारधारेची कास धरली, त्यावरची श्रद्धा वयाच्या शेहेचाळीसाव्या वर्षीही तिलप्रायही उणावली नव्हती. अशी अनेक उदाहरणे देता येतील. या संदर्भात अजून एक उदाहरण द्यायचा मोह आवरत नाही. इ.स. १६७६ मध्ये मामले प्रभावळीच्या सुभेदाराला शिवछत्रपतींनी एक पत्र लिहिले आहे. हे पत्र तर हाती छत्रपतित्वाची बिरूदे घेतल्यानंतरचे आहे. या पत्रामध्ये शिवछत्रपती म्हणतात :

‘..चोरी न करावी, इमाने इतबारे साहेबकाम करावे, यसी क्रियाच केली आहेस तेणेप्रमाणे येक भाजीच्या देठास तेही मन न दाखविता रास व दुरूस वर्तणे ..मुलकात बटाईचा तह चालत आहे परंतु रयतेवरी जाल रयतेचा वाटा रयेतीस पावे आणि राजभाग आपणास येई ते करणे, रयतेवर काडीचे जाल व गर केलिया साहेब तुजवर राजी नाहीत यसे बरे समजणे..’  लोककल्याणकारी राज्याची अन् राजाची याहून वेगळी प्रतिमा काय असू शकते? शिवछत्रपती दरोडेखोर होते. त्यांचे राज्य लुटारूंचे होते. ते एका क्षुद्र जमीनदाराचे पुत्र होते. त्यांच्या राज्याचे स्वरूप सरंजामशाहीसारखे होते. त्यांच्या राज्यात रयतेची व जनतेची पिळवणूक होत होती. असा सूर अनेक काहीशा विकृत मनोवृत्तीच्या व अध्र्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या प्राचीन व अर्वाचीनही इतिहासकारांनी आळवलेला दिसतो. बहुधा त्यांनी अतिशय विश्वसनीय अशी मराठी साधने वाचली नसावी अथवा उमजूनही आपल्या डाव्या विचारसरणीशी फारकत घेण्यास त्यांचा दंभ आडवा येत असावा. या विद्वानांनी महाराष्ट्रभर पसरलेल्या मध्ययुगीन मराठा सरदार घराण्यांचा इतिहास अभ्यासावा अन् सरंजामशाही म्हणजे काय ते समजून घ्यावे. ही घराणी जिथे होती तिथेच का राहिली किंवा राष्ट्राच्या संपन्न इतिहासात फारशी भर न घालताच इतिहासजमा का झाली याचा उलगडा झाला तरच त्यांना शिवछत्रपती कळतील. अन्यथा शिवछत्रपती हे काय रसायन होते हे त्यांना कधीच उलगडणार नाही!

हे लोककल्याणकार्य साल्हेरी अहिवंतापासून ते जिंजीतहत पसरलेल्या साडेतीनशे-चारशे दुर्गाच्या माध्यमातून घडले. या बळिवंत दुर्गानीच या कल्याणकारी राज्याला स्थर्य दिले होते. ज्यांच्या विश्वासावर हे राज्ययंत्र निर्धास्तपणे चालावे, राज्यातील सर्वसामान्यांचे जीवन, राजकारण, अर्थकारण हे सारे निर्वेध व्हावे, या साऱ्याचे आदिकारण हे दुर्गच ठरले.

अर्थशास्त्राच्या आठव्या अधिकरणातील पहिल्याच प्रकरणात तो बुद्धिमंत कौटिल्य म्हणतो : ‘दुर्गामुळे कोश व सन्य सुरक्षित रहाते. त्यांची उत्पत्ती दुर्गात होते. कोश, सन्य, गुप्त युद्ध, आपल्याच पक्षातील मुजोरांचे दमन, बळाचा वापर, मदतीला येणाऱ्या सन्याचा स्वीकार व परचक्र आणि रानटी टोळ्या यांचा प्रतिकार या गोष्टी तर दुर्गावर अवलंबून आहेत. दुर्ग नसतील तर कोश शत्रूच्या हाती जातो. कारण ज्यांना दुर्गाचे संरक्षण आहे, त्यांचा उच्छेद होत नाही असे दिसून येते.’

वरील अवतरणातील प्रत्येक वाक्य शिवचरित्रातील दुर्गाच्या उपयुक्ततेविषयी अन् अनिवार्यतेविषयीची जाण करून देते.

इतिहासाची पाने उलगडता उलगडता होणारे हे दुर्गदर्शन मोठे मनोज्ञ भासते. या संपन्न वारशाच्या अनुभूतीने मनी अभिमान दाटून येतो अन् डोळा आसवे उभी राहतात. वाटते, कसे हे दुर्ग अन् त्यांनी रचलेले हे राज्य! या मनीच्या भावना शब्दबद्ध करताना पंतअमात्य म्हणतात :

‘..तीर्थस्वरूप थोरले सिवछत्रपती कैलासवासी स्वामी यांणी हे राज्य कोणे साहसे व कोणे प्रतापे निर्माण केले, ..पंधरा वर्षांचे वय असता, त्या दिवसापासून तितकेच स्वल्पमात्र स्वास्तेवरी उद्योग केला.. शरिरास्ता न पाहता केवल आमानुष पराक्रम जे आजपर्यंत कोण्हे केले नाहीत व पुढे कोण्हाच्याने कल्पवेना, यसे स्वांगे केले.. कोण्हावरी चालोन जाऊन तुंबल युद्ध करोन रणास आणिले; कोण्हावरी छापे घातले; कोण्हास परस्परे कलह लाऊन दिल्हे; कोण्हाचे मित्रभेद केले; कोण्हाचे डेरियांत सिरोन मारामारी केली; कोण्हासी येकांगी करून पराभविले; कोण्हासी श्नेह केले; कोण्हाचे दर्शनास आपण होऊन गेले; कोण्हास आपले दर्शनास आणिले; कोण्हास परस्परे दगे करविले; जे कोण्ही इतर प्रेत्ने नाकलेत त्यांचे देशात जबरदस्तीने स्थले बांधून पराक्रमे करून आकलिले; जलदुर्गाश्रईत होते, त्यांस नूतन जलदुग्रेच निर्माण करून पराभविले; दुर्घट स्थली नौकामाग्रे प्रवेशिले, ज्या ज्या उपाये जो जो शत्रू आकलावा तो तो शत्रू त्या त्या उपाये पादाक्रांत करून साल्हेरी- अहिवंतापासोन चंदीकावेरीतीपर्यंत निष्कंटक राज्य, शतावधि कोटकिले, तसीच जलदुग्रे व विषम स्थले हस्तगत केली.

चालीस हजार पागा, साठ हजार शिलेदार व दोन लक्ष पदाति, कोटय़ावधि खजाना, तसेच उत्तम जवाहीर, सकल वस्तुज्यात संपादिल्या. शाहणव कुलीचे मराठियांचा उद्धार केला; सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणविले. धर्मोद्धार करून देव-ब्राह्मण संस्थानी स्थापून यजनयाजनादि षट्कम्रे वर्णविभागे चालविली. तस्करादि अन्यायी यांचे नाव राज्यात नाहीसे केले. देशदुर्गादि सन्यादि बंद नवेच निर्माण करून यकरूप अव्याहत शासन चालविले. केवल नूतन शृष्टीच निर्माण केली. औरंगजेबासारिखे महाशत्रू स्वप्रतापसागरी निमग्न करून दिगांत विख्यात कीर्ति संपादिली, ते हे राज्य!’

समाप्त

discover.horizon@gmail.com