News Flash

भारतीय बांधकाम पद्धतींची उत्क्रांती

‘घर’ हे मानवाला महत्त्वाचे तर आहेच, पण त्याचबरोबर घर बांधण्याची प्रक्रियासुद्धा आपल्या संस्कृतीचा, आपल्या परंपरेचा एक अतूट भाग आहे

|| शार्दूल पाटील

‘‘घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून,’’ ही म्हण गेल्या कित्येक पिढय़ांना ‘घर बांधकाम’ या प्रक्रियेची महती, त्याची क्लिष्टता आणि त्याचबरोबर त्या प्रक्रियेत दडलेले अनोखे अनुभव याची आठवण करून देते. ‘लग्न’ या संकल्पनेची घर बांधकामाच्या प्रक्रियेची तुलना या म्हणीत केलेली आहे. मानवी सामाजिक संस्कृतीच्या वंशवृद्धीसाठी जितके लग्न (म्हणजेच नाती जोपासणे) महत्त्वाचे, तितकीच महत्त्वाची घर बांधण्याची परंपरा. आपल्या संस्कृतीत, आपले स्वत:चे घर बांधणे म्हणजेच एखाद्याच्या आयुष्याच्या सामाजिक प्रौढत्वाचे व त्याच्या सांसारिक स्थर्याचे पाऊल मानले जाते.

‘घर’ हे मानवाला महत्त्वाचे तर आहेच, पण त्याचबरोबर घर बांधण्याची प्रक्रियासुद्धा आपल्या संस्कृतीचा, आपल्या परंपरेचा एक अतूट भाग आहे. सुगरण पक्षी जसे आपले घरटे आपल्या पिलांचे व त्या पिलांचे रक्षण करणाऱ्या मादीच्या आरामाकरिता बनवतो, मुंग्या जशा त्यांचा सामूहिक धान्याचा ठेवा राखून ठेवण्याकरिता प्रचंड मोठे वारूळं बनवतात, तसेच आपले आणि आपल्या कुटुंबाचे नसíगक घटकांपासून संरक्षण व्हावे या मूळ भावनेने मनुष्य घर बांधतो. घर बांधण्याची ओढ आणि ते बांधण्याची प्रक्रिया या खरं तर पृथ्वीवरील प्रत्येक जिवाच्या डी.एन.ए.मध्ये दडल्या आहेत. म्हणूनच तर ‘निवारा’ ही माणसाची एक मूलभूत गरज आहे.

जगात जिथे जिथे मानवी संस्कृती उगम पावली, तिथे तिथे आपल्या पूर्वजांनी त्या त्या परिस्थितीला अनुकूल घरे बांधण्याची प्रक्रिया व तंत्र विकसित केले. मग ती कंबोडियामधील पाणथळ प्रदेशातील तरंगणारी घरे असोत किंवा आर्टकिमधले इग्लू; जशी जशी शेती आणि शिकार पद्धती विकसित होत गेली, तसतशी घरे ही नुसतीच संरक्षणासाठी नसून, आपल्या अन्नाचा जमा केलेला साठा राखून ठेवण्यासाठी बांधली गेली. माणूस अन्न साठवून ठेवायला लागला आणि त्याचबरोबर मानवी संस्कृतीत स्थर्य आले. माणूस एकत्रित राहू लागला. गाव संकल्पना उदयाला आली. माणूस हा सामाजिक प्राणी बनत गेला. एक सुदृढ समाज आणि त्या समाजातला प्रत्येक घटक हा मानवी अस्तित्वाचा एक महत्त्वाचा भाग बनत गेला. घर बांधण्याची प्रक्रियासुद्धा एक सामाजिक रूप धारण करू लागली. भारतातही हा मानवी समाज किंवा ‘ग्राम’ हा आपल्या संस्कृतीला आणि त्याचबरोबर आपल्या बांधकाम पद्धतीला आकार देत होता.

ग्रामीण भारतात घर बांधकाम ही परंपरा वैयक्तिक नसून, एक सामाजिक कला आहे. भारतातील घर बांधकाम तंत्र हे अनेक शतकांपासून भारतातील विविध नसíगक साधने, विभिन्न भौगोलिक परिस्थिती आणि त्या त्या वातावरणात निरामय आयुष्यासाठी लागणारे ‘अनुकूलन’ या घटकांमुळे विकसित होत गेले. एखाद्या प्रदेशातील पारंपरिक बांधकामशैली तिथल्या प्रत्येक घरात दिसते. संपूर्ण गाव एकच बांधकाम पद्धती स्वीकारतो. अनेक शतके नसíगक आपत्तीला सामोरी जाऊन, अनेक तांत्रिक प्रयोग व प्रमादांचे एकत्रित निष्कर्ष ठरवून आणि वार्षकि वातावरणातील बदलांपासून उत्तम संरक्षण करणारी ही बांधकाम पद्धत, अनेक गावे पिढय़ान् पिढय़ा विकसित करत आहेत. हे एका कुटुंबाचे काम नाही. बांधकाम पद्धती विकसित होतात त्या सामूहिक सहकार्याने.

आजच्या आधुनिक काळातसुद्धा ग्रामीण भागात घर बांधताना अखंड गावाचा सहभाग असतो. घर मालकाचे आणि त्याच्या कुटुंबाचे निर्णय एकीकडे, पण गाव सहभागी होते ते त्या गावाच्या सामूहिक परंपरागत ज्ञानाचे बाळकडू द्यायला. ऊन, वारा व पावसाची दिशा, स्थानिक सामग्रींचा योग्य वापर, हवामानाला अनुकूल आंतरिक रचना, घराच्या खिडक्या व दरवाजांच्या दिशा यांसारख्या सूक्ष्म बाबी गावातील एखाद्या वयस्कर ग्रामस्थाकडून समजून घ्याव्या. इतकेच नाही, तर अनेक गावांमध्ये या बाबी समजावणारी ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वे आजही हे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम करीत आहेत.

आजही कित्येक गावांत एखाद्या व्यक्तीच्या घर बांधकामात संपूर्ण गाव श्रमदान करतो. गावातील प्रत्येक कुटुंबातील एक सुदृढ व्यक्ती हे काम एकाही पशाची अपेक्षा न करता करतो. अशा प्रकारे, गावातील प्रत्येक घर, सर्वात मोठय़ा लेबर खर्चाशिवाय बनते. नसíगक व स्थानिक सामग्री वापरल्यामुळे, घराला लागणारी सर्व साधने अतिशय स्वस्त किंवा आपल्याच परसबागेतील असली (आपल्या आवारातले बांबू, माती, शेण, इत्यादी घर बांधकामात वापरता येते) तर फुकट उपलब्ध होतात. अशा या ‘सामाजिक बांधकाम’ पद्धतीमुळे, भारतात अजूनही अनेक गावे निव्वळ ६ ते १० हजारांत उत्तम घरे बांधण्याची क्षमता जपून आहेत.

घर बांधताना, घर बांधकामाशी निगडित अनेक रूढी जोपासल्या जातात. घरासमोरचे स्थानिक कलाकौशल्याने नटलेले वृंदावन, घराच्या मुख्य खांबाला सजवून त्याची पूजा करणे, घराच्या उंबरठय़ाला दिलेले महत्त्व, घराचे मुख्य छप्पर झाल्यावर दिले जाणारे गावजेवण, अशा अनेक परंपरा समाजाला एकत्र ठेवण्याचे काम करतात. त्याचबरोबर या रूढी, स्थानिक बांधकाम कला आणि जीवनशैली कायम राखतात.

यापलीकडे जाऊन, घर बांधकाम प्रक्रिया

ही त्या त्या गावाची सामूहिक कला असते. एखाद्या गावातील एखादा कुशल कारागीर घर बांधताना त्याच्या कलेला नवी दिशा देत असतो. स्थानिक सामग्रींचे लहानपणापासून निरीक्षण केल्याने गावातील कारागिरांचे त्या गावातील बांधकाम पद्धतीवर प्रभुत्व असते. त्याच अधिपत्यातून अशा कारागिरांना प्रयोग करण्याची क्षमता येते आणि प्रयोगातून निर्माण होते ती कला. स्थानिक बांधकाम पद्धतीने बांधलेले घर त्या त्या प्रदेशाच्या स्थानिक कलाकारीचे व तिथल्या समाजाचे एक प्रतीक ठरते. याच प्रायोगिक वृत्तीमुळे, काळाच्या व राहणीमानाच्या बदलानुसार हे स्थानिक कारागीर स्थानिक बांधकाम प्रक्रियेत योग्य ते बदल घडवत असतात. याच कार्याने आपली स्थानिक बांधकाम परंपरा विकसित होत जाते.

आपण कष्टाने साठवलेला पसा उधळून, कर्जाच्या अवजड ओझ्याखाली दबून, बिल्डरच्या लखलखीत जाहिरातीला आणि त्याच्या प्रखर आश्वासनांना बळी पडून आजचा शहरी माणूस घर विकत घेत आहे. इतके करूनही हातात येतो तो आधुनिक प्रमाणीकरणाच्या आणि रिअल इस्टेट बाजाराच्या नियमानुसार आकारलेला केवळ एक ठोकळा. घर बांधकाम प्रक्रियेचे इतके बाजारीकरण झाले की कित्येकांना आता शहरात घर बांधणे शक्य तर नाहीच, पण घरांच्या वाढत्या किमतीपुढे आपले स्वत:चे घर असणे, हेसुद्धा अशक्य वाटू लागते. असे असताना शहराच्या कल्लोळात, प्रदूषणात, शहराच्या आधारभूत संरचनेला शिव्या देत आपले आयुष्य धक्के खात व्यतीत करणाऱ्या सामान्य इसमाला कुठेतरी ‘घर बांधकाम’ या प्रक्रियेच्या महतीचा विसर पडत गेला. घर बांधकाम ही एक नसíगक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचे बाजारीकरण झाल्याने आपल्या संस्कृतीचे, आपल्या वास्तव्याचे आणि आपल्या शाश्वततेचे प्रतीक म्हणजेच भारतीय बांधकाम परंपरेचा विकासाचा पुढचा पलू कोणता? असा प्रश्न पडतो. नसíगक बांधकाम पद्धती, स्थानिक बांधकाम जपणारे कारागीर आणि त्यांचे कौशल्य आणि आपल्या बांधकाम पद्धतीचे सामाजिक स्वरूप राखणे त्याला ही जबाबदारी आता प्रत्येक घर बांधणाऱ्या घरमालकावर आहे. गरज आहे ती म्हणजे या पारंपरिक पद्धतींना विसंगत न ठरवता, त्यातील तंत्र समजून आजच्या काळाच्या गरजेनुसार त्या पद्धतींचे योग्य रूपांतर करणे.

shardul@designjatra.org

(( भारतीय पारंपारिक बांधकाम परंपरा आजही जोपासणारे दगड, बांबू, लाकूड, माती व अशा अनेक स्थानिक सामग्री वापरून घरे बनवणारे काही कुशल कारागीर. ))

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 12:13 am

Web Title: evolution of indian construction methods mpg 94
Next Stories
1 काचेचा करिश्मा घर सजवताना
2 ज्येष्ठ नागरिक आणि बक्षीसपत्र
3 घर खरेदीदारांची नवी मुंबईला पसंती
Just Now!
X