वाडवडिलांचं मोठंथोरलं घर. माजघराच्या सर्व बाजूंनी खूप खोल्या. या माजघरात काळोख आहे. कारण घराला खेटून मोठा उभाच्या उभा डोंगर आहे.
‘बालकाण्ड’ म्हणजे ह. मो. मराठे यांनी कादंबरीच्या ढंगानं लिहिलेली पण आयुष्यातल्या सत्य घटनांची कहाणी! दैवानं हनुमंतला झोळमं, सरुल, मालवण अशा ठिकाणी फिरवलं. मराठे तसतसा लेखनात चित्पावनी, मालवणी कोकणी अशा बोलींचा आणि प्रमाण भाषेचाही वापर करतात.
हनूचं (ह. मो. मराठे) झोळम्याचं घर चांगलं प्रशस्त! लांबलचक पडवी. माजघर, चूल खोली, बाळंतिणीची, मुलांची, कोठीची अशा खूप साऱ्या खोल्या. मागच्या बाजूलाही लांब-रुंद पडवी. तिथेच पुढे काचेसारखी गुळगुळीत सारवलेली दोन खळी. त्यात नेहमीच काही ना काही वाळत घातलेलं असे. घरापुढच्या अंगणात तुळशीवृंदावन. पण खरं वैभव म्हणजे घरामागची वाडी. हनूचे वडील-त्यांना तो ‘काका’ म्हणतो. ते सतत आगरात काम करत. अनेक गडी-माणसांना घेऊन फळं, फुलं, पानांची निगराणी करत. दुभत्या गाई, गुरं, वासरं त्यांचा राखणदार. पडवीत सतत पेटलेलं चुलाण. त्यावर चहाचं पातेलं आणि अधूनमधून चहा पिणारे काका! पावसाळय़ात त्याच्या वरच्या दांडीवर वाळत घातलेले कपडे, बाजूलाच पडवळ, घोसाळी, काकडय़ा इ. भाज्यांचे हिरवेकंच मांडव, त्याला लोंबकळणाऱ्या भाज्या, रांगणारे भोपळे! तशाच काढून आगीवर भाजलेल्या ताज्या भाज्या, त्यांची अनोखी चव. कधी कधी केळीच्या पानावर लावलेला तांदळाचा पानगा, कधी घरात चुलीवरून काढलेले गरमागरम जाळीदार घावन वा आंबोळय़ा केळीच्या पानावर वाढलेल्या आणि नारळाच्या गोड दुधात बुडवून खाताना धो-धो पावसाची, वाऱ्याने हिंदकळणाऱ्या झाडापेडांच्या आवाजाची साथ, त्याला असलेली तापलेल्या तेलाची, चुलीच्या धुराची, आगीच्या उबेची आणि वासाची संगत. कधी दारच्या केळी, पपया, फणसाची भाजी, नाचणीचं आंबील, सोलकढी यांचा बेत असे. आगराच्या पलीकडे डोंगर आणि डोंगराच्या पायाशी पाण्याचं लहानसं तळं! त्याचं पाणी पाटा-पाटातून खेळवलेलं. पाटही आखीव-रेखीव, कोन न् कोन जोडलेले, फटी-बिळं विटा-मातीनं लिंपलेल्या. माडां-पोफळींवर नागवेल, मिरींचे वेल सोडलेले. फाटकी पानं, पाचोळा तण काढून स्वच्छ केलेलं. पानांचे द्रोण, पत्रावळी बनवत. ते विकायला जात. घरासमोर चार खांबांवर छप्पर घालून केलेल्या मांगरात लाकूडफाटा, शेणी, गोवऱ्या, घमेली, कुदळी, फावडी अशा सामानाबरोबरच एखादा वांड, मारकुटा बैल बांधलेला.
गुरांढोरांमुळे घरात भरपूर दूधदुभते असे आणि गडय़ा-मोलकरणींनाही भरपूर ताक देण्याची दानतही हनूच्या आईकडे होती. व्यायलेल्या दोन तरी गाई असतच; आणि छोटा हनू गोठय़ात जाऊन थेट गाईच्या आचळाला तोंड लावून ते उबदार दूध पीत असे. असं हनूच्या बालपणचं कोकणातल्या समृद्धीचं प्रातिनिधिक म्हणावं असं चित्र डोळय़ांसमोर उभं राहतं पण.. बोलता बोलता त्या चित्रावर पाणी पडावं तसं त्या चित्रावर वेडेवाकडे फराटे उमटतात.
अथर्वशीर्ष, पुरुषसूक्त, रुद्र, पवमान, देवे सर्व मुखोद्गत असणारे, खणखणीत आवाजात रोज ते म्हणत काम करणारे, वाडीवर प्रेम करणारे, वाडीसाठी रक्त आटवणारे, नारळ-सुपाऱ्या काढताना गडय़ांचा पाय वेल-रोपांवर पडू नये म्हणून दक्ष असणारे छोटय़ा फणसुलीची पानं मुलांनी तोडली म्हणून दात-ओठ खाणारे काका-बाया मोलकरणीला घरात आणून ठेवतात आणि आईची रवानगी शेणी-गोवऱ्या, ढोरांचं राज्य असणाऱ्या मांगरात करतात.
काही दिवसांनी आई घरात येते खरी, पण काकांचा तापट शिवराळ स्वभाव. व्यवहारज्ञान नाही. ‘मी म्हणेन तेच खरं’ ही वृत्ती, रक्त आटवून उभी केलेली वाडी विश्वासावर भोळेपणाने दुसऱ्याच्या हाती सोपवणं, निर्णय घेताना भविष्याचा विचार नसणं, त्यातच तीर्थयात्रेला जाण्याचं वेड, आईची सतत होणारी बाळंतपणं, लहान मुलांचे मृत्यू, त्यामुळे आईची ढासळत जाणारी प्रकृती यामुळे हे सगळं खचत खचत जातं. गाव सोडून ही मंडळी गोव्यातल्या सरुल या गावी येतात. इथे वाडवडिलांचं मोठंथोरलं घर आहे. माजघराच्या सर्व बाजूंनी खूप खोल्या. या माजघरात काळोख आहे. कारण घराला खेटून मोठा उभाच्या उभा डोंगर आहे. त्या डोंगरावरच्या उंच उंचच थोरल्या वेली लोंबून मागच्या चिंचोळय़ा अंगणात येतात आणि अंगण आणखीच गजबजलेलं आणि अरुंद करतात. शिवाय घरातला वाराही बंद होई. पण पुढे मोठं अंगण, ओसरी. वरच्या माडीवर जायला घरातून जिना. तिथे दिवसाही अंधार! माजघरात जायला पायऱ्या. त्यातली एक उचलली की तळघरात जायचा जिना. पूर्वी गोव्यात खूप धामधूम असे. संरक्षणाकरिता, किमती चीजवस्तू, साठवणीची धान्याची पोती इथे सुरक्षित ठेवत. स्वयंपाकघराच्या भिंतीला लागून विहीर. भिंतीलाच असलेल्या खिडकीतून पूर्वी पाणी काढलं जाई. पण आता ती वापरात नव्हती. वेलींचं माजवण आणि वटवाघळांची वस्ती होती. पिढी-पिढीतल्या काकी-आजी-पणजींनी त्यात जीवही दिले होते. त्यामुळे भयाचं सावट होतं.
पण हे घर काही हनूच्या आईला लाभलं नाही. अतिशय हाल हाल होऊन ती गेली. हनूसारखा छोटा मुलगा तिची मनापासून सेवा करतो. तिचं कुत्र्यासारखं भुंकणं, घाडीनं (भुतं-खेतं उतरवणारा) सांगितल्यावर हाता-पायांचा वापर करून शक्तिहीन शरीरात बळ आल्यागत प्राण्यासारखं ओणवं तरातरा चालत वहाळापर्यंत जाऊन निपचित पडणं. तिचा आजार म्हणजे करुणा आणि भय यांचा चढता आलेखच!
पुन्हा भटकंती करून ते सुल्र्याला येतात, पण मधल्या काळात घरात कोणाचा वावर नव्हता म्हणून घराची अगदी दुर्दशा होते. खळय़ात गवत माजून सुकलेलं. काचेसारखं चोपलेलं खळं उखडून गेलेलं, दारं नुसती ओढून घेतलेली. त्यामुळे दिवसाउजेडीसुद्धा उंदीर, घुशी आणि वटवाघळांचं राज्य! कधी तर सरसरत जाणारा दिवड. घरभर कुबट वास कोंदलेला, सर्वत्र लोंबणारी कोळिष्टकं, लेंडय़ांची पखरण. पण काका उमेदीनं झाडून सारवून घराला रंगरूप आणतात. पण तिथेच झालेलं आईचं ते भयानक आजारपण आठवून बाबल आणि हनू ही भावंडं राहायला घाबरतात. आईचं रडणं, कुंथणं, भुंकणं याचा त्यांना भास व्हायला लागतो. मग काका खळय़ातलं माजलेलं गवत काढून ते चापून-चोपून सारवून घेतात आणि बाहेरच चूल मांडली जाते. मुख्य घराचं दारही बंद करतात पण मुलांचं भय कमी होत नाही. म्हणून या घरापासून दूर पण त्याच्या आवारात झापा, चुडती वासे-मेढी घेऊन दोन दिवसांत खोप उभारली. गंमत म्हणजे या छोटय़ा घराच्या मध्यातून माडाचं झाड आकाशात झेपावत होतं आणि घराभोवती पाण्याचा पाट होता. असं वेगळंच घर!  जवळच गाईला बांधलं होतं. काका नेहमीप्रमाणे झाडा-पानांत कष्टत होते, आपली वाडी मिळवण्यासाठी कोर्टात खेटे घालत होते. ही दोन लहान भावंडं जमेल तसा एखादाच पदार्थ, दारच्या भाजीचं तोंडी लावणं करत. कधी शेजारचा ‘भाऊ’ येऊन देवाचं म्हणे तर कधी सुभद्राहरण, जयद्रथ वधातील भाषणं अभिनयासह म्हणे, कधी रिद्धी-सिद्धीचा नाच करून दाखवी आणि हळहळे, ‘मला नाटकात कामं करायचीत रे बाबल, पण भटाच्या पोरानं तोंडास रंग फासून नाचायचं का? असं म्हणून माझा बाबा मला अडवतो.’’ अशा या भाऊमुळे घराला जाग राही आणि हनू-बाबलचं भय कमी व्हायचं हे मात्र खरं!
पण काका सगळीकडूनच हरत चालले होते. तोंडातल्या शिव्या आणि संताप वाढत होता. मनाविरुद्ध झाल्यावर समोरच्याच्या अंगावर धावून जात होते. त्यांच्या जमिनी लुटल्या होत्या, काही कुळकायद्यात गेल्या होत्या. घराचा ठावठिकाणा नव्हता. आणि सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे हनू आणि बाबलच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होत होता. प्रत्येक ठिकाणी अर्धीमुर्धी शाळा, शाळेला लागणाऱ्या किमान पाटी-पेन्सिलचीही वानवा, अंगात घालायला पुरेसे कपडे नाहीत. काय शिक्षण घ्यायचं याचं धोरण नाही. कधी गदाधर शास्त्रींकडे दीक्षा घ्यायची तर कधी शाळेत जायचं. सातत्य कशातच नाही. जी खोप आसऱ्यासाठी होती तीही मोडून पडली- मोडायचीच होती ती.
मग डेरेदार आंबा हेच घर बनलं. त्याच्या खाली रामजन्मोत्सव साजरा करून पाच-सात ब्राह्मण आणि पाच-सात सवाष्णींचं भोजन झालं. तो सर्व स्वयंपाक झाडाखाली तीन धोंडे मांडून केला.
पुढे ते तिघे महादेव भटाकडे येतात. तिथे जमेल तशी भिक्षुकी करून पै-पैसा, तांदूळ-सुपारी आणून दिवस काढतात. पण इथे एक झालं ‘हनू’च्या शाळेला सुरुवात झाली. ‘बाबल’ भिक्षुकीबरोबरच शिवणकाम शिकू लागला. या ठिकाणी जरा बस्तान बसलंय असं वाटतं तोच पुन्हा काका आणि ‘बाबल’ यांचं भांडण जुंपतं आणि काका संतापाच्या तिरीमिरीत हनूला घेऊन अशाच डळमळणाऱ्या वाटेवरून निघतात. पण.. बाबलने निर्धार करून हनूचा हात धरला आणि निर्णायक स्वरात काकाला सांगितलं, ‘‘तुला कुठे मष्णात जायचं तर जा पण ‘हनू’ आता इथेच राहील. माझ्या आयुष्याचा सत्यानाश केला तेवढा पुरे. त्याच्या आयुष्याची वाट लावू नकोस.’’ तसाच पुढे तो ‘हनू’ला सांगतो, ‘‘तू शिक. तेवढं मी करीन. पास झालास की तुला प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळेल. ती धर आणि जा कुठे तो तुझ्या पोटामागे.’’ हाच तो चिरस्थायी उज्ज्वल क्षण! हे वाक्य ‘बाबल’ वचनासारखं पाळतो. आणि ‘हनू’ हृदयावर कोरतो. आपला आवाका ‘बाबल’ला ठाऊक आहे. त्यामुळे तो अवाजवी महत्त्वाकांक्षा ठेवत नाही.
फार मोठय़ा समृद्धीतून आलेली खचत जाणारी परिस्थिती, घर नाही दार नाही, स्वैंपाकाची चार भांडी नाहीत. एक वेळ अशी येते की एकच तांब्या, त्यातच भात शिजवायचा. तो रिकामा झाला की घासून मग त्यातून पाणी प्यायचं. दूधदुभतं दूर दूपर्यंत नाही. केवळ संतापी, विवेकशून्य पित्यामुळे ते कष्टाळू असूनही ‘बाबल’, ‘हनू’ आणि आईची झालेली फरपट! सगळे मार्ग कोंडून गेलेले. प्रकाशाची तिरीपही दिसत नाही. ‘बाबल’ जमेल तेवढा विरोध करतो, बापाचा संताप अंगावर घेतो आणि या कोंडीतून मार्ग काढतो.  आणि मग सुरू होतो ‘हनू’ आणि ‘बाबल’ या दोन भावंडांचा संसार. सुरुवातीला पिशवीतूनच वस्तू ठेवल्या जातात. खुंटीवर एखाद् दुसरा कपडा, एखादी मिणमिणती चिमणी.. बस्स! एवढंच सामान. पण कुठेतरी-कसेतरी तीन धोंडे मांडण्याऐवजी सारवलेली चूल आहे. त्रुटी-अभाव आहेच, पण वादळात हेलकावणाऱ्या बोटीवर उभं राहिलं की सतत डगमगणाऱ्या देहासारखं अस्थिर आयुष्य संपलंय. आता एक स्थैर्य आहे, आयुष्याला सुनिश्चित दिशा आहे. आपलं शिक्षण थांबलंच हे बाबलने मनोमन कबूल केलं आहे. पण ‘हनू’च्या शिक्षणाबाबत तो दक्ष राहतो. ‘हनू’ही आपली बुडालेली र्वष एकेका वर्षांत दोन दोन इयत्ता पूर्ण करून पुढे जात राहतो. दोघांचं जेवण म्हणजे उरकण्याचं काम आहे. आयुष्य एकूण खडतरच आहे. पै-पैशासाठी अतोनात श्रम आहेत. मग डोळय़ांपुढे उभा राहतो छोटा ‘हनू’ संघर्ष करणारा. कुवतीबाहेर जाऊन भिक्षुकी करणारा, प्रसादाचा स्वयंपाक बनवणारा, त्याच्या लंगोटीवरून, शेंडीवरून, कमी कपडय़ांवरून मानहानी सहन करणारा, रणरणत्या उन्हातून दूरवरून पाणी आणणारा, घरचे काम सांभाळून अभ्यास करणारा. पण आता उमेद आहे. दोन भांडी घ्यावीत, एखादी ट्रंक घ्यावी यासाठी पैसे जमवावेसे वाटतात. आता घरात एक मांडणी, दोन डबे दिसू लागतात. ‘बाबल’ ‘हनू’ला नवे कपडे स्वत: शिवतो. शिक्षकांकडून कौतुक वाटय़ाला येतंय. बाबलही आपलं वाचन चांगलं वाढवतोय. दोघांची साहित्य, वाचन, लेखनाची आवड त्यांची जडणघडण करतेय. अनेक मानहानीचे प्रसंग येतात. पण अनेक हातांचे आधारही मिळतात. कष्ट, कष्ट आणि कष्ट करून ही कोंडी फोडून मार्ग काढतात. ‘हनू’ बी. ए. ऑनर्स होतोच. पण यशस्वी संपादक, पत्रकार, कादंबरीकार, कथाकार अशा अनेक पैलूंनी ‘ह. मो. मराठे’ या नावाला वलय प्राप्त करून देतो. पण या सर्वाची पायाभरणी ‘बाबल’ने (देवदास मराठे) घातलेली आहे याची कृतज्ञतापूर्वक जाणीवही आयुष्यभर ठेवतो.

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
Loksatta sanvidhanbhan Constitution Struggle for equality
संविधानभान: समतेसाठी संघर्षयात्रा
An increase in the price of silver compared to gold
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ… हे आहे आजचे दर…
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका