News Flash

खिडकी

खिडक्या खोल्यांना असाव्यात एवढाच विचार मनात येतो.

चार कोनांची, सुरक्षेसाठी बाहेरून लोखंडी ग्रिल लावलेली आणि पारदर्शकतेसाठी काचेची स्लायिडग असलेली हवा आत-बाहेर खेळवणारी अशी खिडकी आपल्या घराचा एका अर्थाने श्वासच असतो. अर्थात प्रत्येक घराच्या खिडक्या वेगवेगळ्या आकाराच्या, काचेच्या, लाकडाच्या, ग्रिलच्या असतात. हॉल, बेडरूमच्या खिडक्यांवर आकर्षक पडद्यांची सजावट करून खिडकीला आकर्षक पोषाख दिला जातो त्याने खिडकीचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. हल्ली ग्रिलमध्ये झाडे लावूनही खिडकीला बगिच्याचं रूप दिलं जातं. मग हळूहळू ही खिडकी बाहेरील निसर्गातील जीवांनाही आपल्या कवेत घेऊन त्यांना आसरा देते. या छोटय़ाशा खिडकीच्या बगिच्यात फुलपाखरे, पक्षी नांदू लागतात, काही घरटीही करतात. अशाप्रकारे खिडकीत चैतन्य खुलतं.

घर बांधताना किंवा फ्लॅट घेताना आपल्याला पुरेशी हवा यावी, प्रकाश यावा अशा खिडक्या खोल्यांना असाव्यात एवढाच विचार मनात येतो. पण या खिडक्यांच्या सहवासात आल्यावर आपलं या खिडक्यांशी कधी भावनिक नातं जुळतं हे कळतच नाही. घरात असताना खिडकीजवळ एखादे दिवस उभं राहून बाहेर पाहिलं नाही असं कधी होतं का हो? उलट मोकळ्या वेळेत आवर्जून खिडकीत जाऊन आपण बाहेरचा परिसर दृष्टीत सामावतो. मग खिडकीबाहेर कोणाकडे तो रस्ता असेल, कोणाकडे सोसायटी असेल, कोणाच्या खिडकीतून डोंगर-नद्यांची दृश्यं असतील, कोणाच्या खिडकीबाहेर मैदान असेल, बाजारपेठ असेल, कोणाकडे परसबाग असेल, अंगण असेल. हे खिडकीबाहेरचं विश्व या खिडकीतून अनुभवणं हा चाळा म्हणा की विरंगुळा म्हणा, पण प्रत्येकालाच असतो. एकांतात ही खिडकी म्हणजे आपली मैत्रीणच होऊन जाते. हिच्या सहवासात मनातील वादळं बाहेर निघून जातात आणि मनातील आनंदवर्षांव येथे रिमझिमतो. उगवते-मावळते सूर्य-चंद्रही या खिडक्यांत लोभस दिसतात. ए. सी. च्या थंडाव्यापेक्षा खिडकीतून आलेली गार वाऱ्याची झुळूक सुखद संवेदना देऊन जाते. खिडकीतले कोवळे ऊन, संध्याकाळ पाहणं, खिडक्यांवर दवाने तयार झालेले गारेगार बाष्प, खिडकीतून दिसणारा आणि ओंजळीत पडणारा पाऊस सारं किती उत्साही वातावरण असतं.

मलाही माझ्या घरातील खिडक्या अशाच प्रिय आहेत. आम्ही उरणच्या कुंभारवाडय़ात घर बांधताना ठरवलेलं की खिडक्या मोठय़ा ठेवायच्या जेणेकरून भरपूर हवा आणि प्रकाश घरात खेळेल. पण या खिडक्यांशी आता घट्ट ऋणानुबंध जोडले गेले आहेत. सकाळी उठताच मी खिडकीच्या कट्टय़ावर बसून बाहेरचा निसर्ग आणि प्रभात गारव्याचा आनंद वाफाळत्या चहासोबत खास वेळ काढून घेते. ही सकाळची पाच मिनिटे दिवसभराचा उत्साह पुरवितात. किचनच्या ओटय़ाला लागून असलेल्या तीन भिंतीला तीन खिडक्या आहेत. सकाळी जेवण बनवतानाचे दोन तास या खिडक्यांमुळे सुखकारक होऊन जेवणातही स्वाद आणतात. एका खिडकीतून बागेतील फुले तर दोन खिडक्यांतून पक्ष्यांचे बागडणे, भक्ष्य टिपणे पाहताना आणि किलबिलाट व सोबतीला मोबाइलमधली प्रभातगीते किंवा लतादीदींची गाणी ऐकताना स्वयंपाक कधी उरकतो हे कळतही नाही व कामाचा थकावाही जाणवत नाही.

आमच्या बेडरूमच्या खिडकीतून पाठीमागच्या एका शेताचा भाग दिसतो. त्यातील खोल डबक्यात पाणी जवळजवळ डिसेंबर-जानेवारीपर्यंत असतं. या पाण्यामुळे अनेक पक्षी इथे येतात व काहींचं झाडावर वास्तव्यही असतं. या पक्ष्यांचे फोटो काढण्याचं आणि निरीक्षण करण्याचं माझं ठिकाण म्हणजे खिडक्याच. आमच्या हॉलच्या खिडकीतून आमच्या घरात कायम बुलबुल ये-जा करतात. वर्षांतून तीनदा तरी ते आमच्या झुंबरावर घरटी बांधून पिलांना जन्म देतात. या खिडक्याच त्या पिलांच्या संगोपनाचा मार्ग असतो. नाजूक सूर्यपक्षीही खिडकीच्या ग्रिलवर टुणूक टुणूक उडय़ा मारतात. माझ्या मुली श्रावणी आणि राधा यांचा भातुकलीचा खेळही खिडक्यांमध्ये रंगतो. बऱ्याचदा आमची कौटुंबिक गप्पांची मैफीलही खिडकीच्या कट्टय़ावर रंगते. रात्रीचा प्राजक्त आणि रातराणीचा दरवळणारा सुगंध या खिडक्यांमध्ये मन रेंगाळून ठेवतो.

प्राजक्ता म्हात्रे

prajaktaparag.mhatre@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 2:05 am

Web Title: importance of windows in houses
Next Stories
1 गृहनिर्माण संस्थेकडून हवी ती कागदपत्रे कशी मिळवाल?
2 आठवणीतील भाडेकरू
3 इमारतीचा आराखडा
Just Now!
X