‘प्रेमाचा मार्ग पोटातून हृदयाकडे जातो’ या उक्तीला अनुसरूनच स्वयंपाकघराला संपूर्ण घराचे हृदय अशी पदवी बहाल केली गेली असावी. इंटिरीअर डिझायनिंगचा अभ्यास करत असताना ‘kitchen is the heart of the home  असे स्वयंपाकघराचे वर्णन वाचनात आले होते. परंतु जेव्हा शिक्षण पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली तेव्हा घरातील कर्त्यां स्त्रीचा स्वयंपाकघराच्या नूतनीकरणासंदर्भातील उत्साह अनुभवला. माझा आजवरचा अनुभव असे सांगतो की, प्रत्येक कर्त्यां स्त्रीला कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस आरोग्यपूर्ण व रुचकर पदार्थ करून खाऊ  घालावेत असे मनोमन वाटत असते. त्यासाठी ती नेहमीच प्रयत्नशील असते. परंतु नोकरी/व्यवसाय व इतर जबाबदाऱ्यांनी तिचे वेळेचे गणित खूपच अवघड करून ठेवलेले असते. यातून मार्ग काढण्यासाठी ती कुटुंबातील इतर मंडळींची, वरकामाला नेमलेल्या व्यक्तीची तसेच आधुनिक उपकरणांची मदत घेते. याच कारणास्तव सर्व मदतनीस मंडळींना सुटसुटीतपणे काम व वावर करता यावा, सर्व उपकरणे सोयीस्कर जागी ठेवता यावीत व आवश्यक ते सामान साठवून ठेवता यावे अशा सोयी असलेले स्वयंपाकघर ही तिची गरज ठरते.
ws10नूतनीकरणाचे काम सुरू करण्याआधी जेव्हा मी त्या घरातील सदस्यांशी चर्चा करतो तेव्हा मला त्यांच्या सवयी, आवडी-निवडी व गरजांचा अंदाज येतो. स्वयंपाकघराच्या बाबतीत वेगवेगळ्या गरजा समोर येतात. कोणाची साठवण अगदी वर्षभराची असते, तर कोणाची महिन्या-दोन महिन्यांची. त्यानुसार सामान ठेवण्याची जागा निश्चित करावी लागते. कोणाकडे  microwave oven पासून dish washer  पर्यंत अनेक आधुनिक उपकरणांची सोय करावी लागते, तर कोणाकडे कमी जागेत एका वेळेस दोन व्यक्तींना काम करता यावे अशी रचना करावी लागते. Borewell’’चे पाणी वापरावे लागत असल्यास water purifier ची गरज भासते. फक्त पिण्याचे पाणी त्यातून गाळून करायचे की इतर कामांसाठी लागणारे पाणीदेखील; यावर त्या purifier ची जागा, आकार व त्या अनुषंगाने ‘plumbing निश्चित करावे लागते. त्याशिवाय आधुनिक शेगडी, धुराचा त्रास टाळण्यासाठी चिमणी, तळणाची आधुनिक उपकरणे, उष्टे-खरकटे यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी under sink crusher  या व अशा अनेक आधुनिक सोयी-सुविधांची गरज आजच्या कर्त्यां स्त्रीला भासू शकते. सामानाची साठवणूक करण्यासाठीसुद्धा आधुनिक कपाटे, trolleys, drawers   इत्यादी सध्या उपलब्ध आहेत; ज्यांचे दरवाजे हलक्याशा धक्क्य़ानेदेखील अलगद बंद होतात. वरवर क्षुल्लक वाटणारे कित्येक बदल लहानसहान कामांचा थोडा थोडा वेळ वाचवतात. त्यामुळे जो एकत्रित परिणाम साधला जातो तो तारेवरची कसरत करत स्वयंपाकघराची धुरा सांभाळणाऱ्या स्त्रीसाठी फार मोलाचा असतो. म्हणूनच अशा सोयी-सुविधांच्या बाबतीत आजच्या स्त्रिया आग्रही असतात. त्यांच्या गरजेनुसार स्वयंपाकघराची मूलभूत रचना निश्चित करावी लागते व त्यामुळे सरसकट एकच एक रचना प्रत्येक स्वयंपाकघरासाठी ठरवणे योग्य नसते. अर्थात, स्वयंपाकघराचे नूतनीकरण करताना काही मूलभूत नियमांचा उपयोग निश्चितच होतो. स्वयंपाकघराचे तीन मुख्य घटक मानले जातात-ओटा, सिंक ws09व फ्रीज. हे तीन घटक एकमेकांपासून कमीत कमी व जास्तीत जास्त किती अंतरावर असावेत याबाबतचे नियम पाळल्यास स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीसाठी सोयीस्कर वातावरण निर्माण करता येते. याचबरोबर इतरही काही गोष्टींचे एकमेकांपासून अंतर काही विशिष्ट नियमांनुसार असल्यास स्वयंपाकघरात सुटसुटीतपणे वावर करता येतो. उदाहरणार्थ मुख्य दरवाजा व खिडक्यांचे दरवाजे (उघडल्यानंतर) यांचे जवळील गोष्टींपासून अंतर; स्टोअर युनिट्स, फ्रिज, मायक्रोवेव्ह ओवन इत्यादींचे (दरवाजे उघडल्यानंतर) एकमेकांपासून व इतर गोष्टींपासून अंतर; ओटा व त्यावरील वॉल माऊंट स्टोअरेज सुनिटमधील अंतर; ओटय़ाची उंची इत्यादी. या तांत्रिक बाबींबरोबरच रंगसंगती, सुशोभीकरणाच्या दृष्टीने आवश्यक असणारे बदल केले की सोयी-सुविधांनी सज्ज अशा स्वयंपाकघराला घरपण येते. होम मिनिस्टरच्या गरजा, स्वयंपाकघराच्या मर्यादा व जागेच्या सुयोग्य वापरासंदर्भातील नियम या सर्व घटकांचा विचार करून सर्व सोयींनी सुसज्ज, सुटसुटीत व आकर्षक स्वयंपाकघर घडवणे हे एक आव्हानच असते. घरातील ज्या जागेतून दरवळणाऱ्या चहाच्या सुगंधाने सर्व मंडळी ताजीतवानी होत उठतात, जिथे दिल्या गेलेल्या फोडणीवर अनेक रुचकर पदार्थ शिजतात, जिथे पोळी टम्म फुगते व कुटुंबीयांची ऊर्जा फुलवते, जिथे शिजणारा वाफभरला भात साऱ्या घराचा थकवा दूर करतो आणि ज्या जागी फर्माईशींना दाद व पाककलेला वाव मिळून सर्वाची मने राखली जातात; त्या स्वयंपाकघराचे नूतनीकरण हा नक्कीच एक आनंददायी अनुभव असतो.
अमोल जोशी -amoljoshi_27@yahoo.co.in
इंटिरीअर डिझायनर