|| यशवंत सुरोशे

वळचण म्हणजे घर आणि पागोळ्या यांच्यातील मधली जागा! ग्रामीण भागातील बैठी घरे कुडांची असत. पावसाळ्यातील पाणी साठून घरात येऊ नये म्हणून थोडा उंचवटा करून त्यावर घर बांधले जाई. दगडांवर-दगड रचून, मातीची भुई घालून पाया मजबूत केला जाई. सहा-आठ मजबूत खांबावर घराचा डोलारा पेलला जाई. मग आडोसा म्हणून जंगलातून आणलेल्या कारवीचे कूड सभोवती विणायचे. ते शेणाने सारवायचे. हे कूड जोत्यापासून थोडय़ा आतल्या बाजूला बनवत. जोत्याचा बाहेर राहिलेला मोकळा भाग म्हणजे वळचण. घराच्या चारी बाजूंना ही वळचण रांगोळीच्या चौकोनाप्रमाणे शोभून दिसे.

pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
dhairyasheel mane criticizes raju shetty
“पाठिंब्यासाठी दुसऱ्याच्या पायऱ्या का झिजवत आहेत?”, खासदार माने यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!

आमचे घर रस्त्याच्या कडेलाच! जाणारे-येणारे सहज विश्रांतीसाठी वळचणीला बसत. वडिलांसोबत गप्पा सुरू होत. चहापान झाल्यावर तंबाकूच्या बाराने मैफल संपे. घरात कोणी पाहुणे आले की मुलांना घरात खेळायला मज्जाव केला जाई. मग मुलांची हक्काची जागा म्हणजे वळचण! सारी भावंडे  वळचणीवर असली की आईच्या जिवालाही घोर नसे. मुलांची भांडणे पटकन् सोडवली जात. दुकानात जायचे असेल तर आई पटकन् आवाज देई. वळचणीवर खेळताना तव्यावर भाजलेल्या हरभऱ्यांचा वास येई. वाटीभरून हरभरे वळचणीला आणून खायचे. भातुकलीचा खेळ वळचणीवर रंगायचा. भातुकलीत आई-बाबा-आजी यांच्याप्रमाणे बाहुल्या वागायच्या. मुले खेळण्यात दंग होऊन जात.

शाळेत जाऊ लागल्यावर घरचा अभ्यास संधी प्रकाशात करायला योग्य जागा म्हणजे वळचण! झाडूने स्वच्छ झाडली की वळचणीवर शेजारपाजारची मुले जमायची. दिवस मावळेपर्यंत  वळचणीवर अभ्यास चालायचा. पण अंधार पडल्यावर घरातील मोठी माणसे मुलांना घरात बोलवत. उन्हाळ्याच्या दिवसात दगडाच्या फटीत विंचू राहत. कधी-मधी मुलांना विंचू डसे. मग काही दिवस वळचणीची भीती वाटे. विशेषत: लहान मुलांना झोपण्यापूर्वी सू करायला माणसे बाहेर पाठवायची. तेव्हा वळचणीचाच आधार वाटे. तेव्हा टीव्हीवर रामायण मालिका चालू होती. त्यात युद्धप्रसंगी योद्धे आपल्या तोंडातून धूरसदृश्य शक्ती शत्रूवर सोडत. आणि कित्येक सैनिक मारले जात. माझा एक भाऊ या प्रसंगाने फारच प्रभावित झाला होता. तो मला वळचणीला नेऊन तोंडातून असा धूर काढून दाखवी. मी नवलाने त्याच्याकडे पहात टाळ्या वाजवी, नाचे, हसायचो. मग त्यालाही उत्साह आला. घरात दुसरे कोणी नव्हते. भाऊ घरात जाई. वळचणीवर येई. तोंडातून धूर काढे.. मी टाळ्या पिटी. त्याचे गाल दुखू लागल्यावर तो थांबला. मी खूप विचारले तरी त्याने ही जादू मला सांगितली नाही. शेवटी रात्री आईने भाकरी करताना डब्यातले पीठ कमी कसे झालेय म्हणून चौकशी करू लागली. वळचणीवर, घराच्या मागच्या बाजूला ठेवलेली काटय़ा आणायला गेल्यावर तिला पडलेले धूर (खरं तर पीठ) दिसले. तिने आम्हा दोघांना रात्रभर वळचणीवर उभे केले होते.

पावसाळ्याच्या दिवसात पोट भरण्यासाठी भटकणारी कुत्री, मांजरी, कोंबडय़ा वळचणीवर येत. मोठी माणसे शेतावर, मुले शाळेत, मग या कुत्र्या, मांजरांना हाकलणार कोण? काही कुत्री वळचण वाकरायचे. खड्डा करायचे, त्यात बसायचे. वळचणीवर ठेवलेल्या काटय़ांच्या आडोशाला कोंबडय़ा लपत. एखादी वेंधळ्यासारखी तिथेच अंडी घाली. कोंबडय़ाचा कलकलाट ऐकायला आला की समजायचं मांजर वळचणीवर उतरली आहे. कधी घरात धुसफूस होई. दिवस असेल तर वडील वळचणीवर न खाता-पिता, काहीच न झाल्यासारखे दाखवत बसायचे. रात्र असेल तर आई या वळचणीला जाऊन बसे. आम्ही मुले तेव्हा अंधारातही आईला शोधायला वळचणीवर फिरत असू.

ताईचे यजमान जायला निघाले की ताई वळचणीला जाई. मग भावोजीसुद्धा जायचे. ताईच्या हातात ते पैसे देत. आई आम्हाला घट्ट धरून ठेवी.

घरातील म्हातारी माणसे वळचणीवर बसायची, रात्री तिथेच झोपायची. प्रत्येक घराची वळचण एक अस्तित्व होतं. कोणाच्या वळचणीला जाणार नाही असा स्वाभिमान बाळगणारी माणसे स्वत:ची वळचण सांभाळून असत. एखाद्याची वळचण नेहमी मुले-माणसांनी भरलेली असणे मोठेपणा मानला जाई. वळचणीच्या स्वच्छतेवरून गृहिणीची पारख होई.

गावाकडे जातो तेव्हा घराभोवती फुलझाडांची गर्दी पहतो. रोपटय़ांखाली मला वळचण दिसू लागते. त्या मातीला झालेल्या माणसांचा स्पर्श शोधण्यासाठी मी फुलांना हुंगत राहतो.