19 April 2019

News Flash

गडपति, जळपति, भूपति..!

‘हे  राज्य व्हावे ऐसे श्रींचे मनी फार आहे..’ हे विलक्षण शब्द १६४५ सालच्या एका शिवकालीन पत्रात सापडतात.

|| डॉ. मिलिंद पराडकर

‘हे  राज्य व्हावे ऐसे श्रींचे मनी फार आहे..’ हे विलक्षण शब्द १६४५ सालच्या एका शिवकालीन पत्रात सापडतात. हे पत्र लिहिलं गेलं त्या वेळी आमच्या थोरल्या राजाची उमर अवघ्या पंधरा वर्षांची होती. हे अभूतपूर्व स्वप्न उराशी घेऊन ते लेकरू पुढली पस्तीस र्वष अथकपणे चालत राहिलं. स्वत:च्या ध्येयावर, स्वत:च्या संगीसाथ्यांवर, स्वत:च्या कर्तृत्वावर अन् सख्या सह्य़ाद्रीच्या अंगाखांद्यावर रचलेल्या अजेय दुर्गाच्या ठायी असलेल्या विश्वासावर त्यानं ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. परिणामी आपल्या देशाचा इतिहास त्या लेकरानं वेगळ्या वळणावर नेऊन ठेवला.

या स्वप्नाच्या मागे उरीपोटी धावताना, नूतन राज्य उभे करताना, सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगांच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून अन् त्याचा पूर्ण उपयोग करून राज्यविस्तार करण्याचे लक्ष्य दृष्टीसमोर ठेवताना, शिवछत्रपतींनी स्वराज्यावर होणाऱ्या संभाव्य आक्रमणांचाही विचार केला होता ही गोष्ट अगदी स्पष्टपणे जाणवते. तत्कालीन युद्धसाधनांचा विचार करता, त्यांनी ताब्यात घेतलेले वा नवीन बांधलेले दुर्ग हे त्यांच्या राज्ययंत्रणेचे अन् राज्यसंरक्षणाचे एक अतिशय प्रभावी असे हत्यार ठरले. सह्य़ाद्रीची दुर्गम दरीखोरी, अतिगर्द अरण्ये अन् या साऱ्यांच्या वर मस्तके उंच उभवून असलेले गिरिशिखरावरील ते बळकट दुर्ग.. यांचा अतिशय कुशल उपयोग शिवछत्रपतींनी आपल्या रणनीतीत केला. केवळ अगोदरच्या काळापासून अस्तित्वात असलेले दुर्गच नव्हेत तर त्यांनी जे नवीन दुर्ग रचले, त्यामध्येसुद्धा स्थळे निवडताना त्यांनी कृत्रिम अभेद्यतेपेक्षा नसर्गिक अभेद्यतेवर भर दिला; अन् मगच कृत्रिम लेणी लेववून ती अगोदरच दुर्घट असलेली स्थळे त्यांनी पार दुर्जेय करून टाकली. हे वाक्य लिहिताना डोळ्यांसमोर चार बलदंड दुर्ग उभे ठाकतात : स्वये शिवछत्रपतींनी जातीने लक्ष घालून नव्याने रचलेले राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग अन् रायगड हे चारही दुर्ग म्हणजे त्या दुर्गपतीच्या असाधारण अशा प्रज्ञेचा केवळ चमत्कार होता! मात्र येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, नसर्गिक अभेद्यतेला महत्त्व देताना त्यांनी तटबंदी, द्वाररचना, दुर्गाभोवतालची गर्द अरण्ये, यांसारख्या दुर्गाच्या वास्तुशास्त्रीय व नसर्गिक अशा दोनही प्रकारच्या वैशिष्टय़ांकडेही दुर्लक्ष केले नाही. राजगडाच्या सुवेळा व संजीवनी या माच्यांची चिलखती तटबंदी ही दुर्गबांधणीशास्त्रातला एक चमत्कार म्हणावा या योग्यतेचीच आहे. राजगडाच्याच पाली दरवाजाचे बांधकाम हेसुद्धा खास शिवछत्रपतींच्या दुर्गबांधणीशास्त्राचाच परिपाक आहे. या पाली दरवाजाच्या बांधणीत मध्ययुगीन बहामनी शिल्पशास्त्र व शिवकालीन शिल्पशास्त्र यांचा मिलाफ आढळतो. या दरवाजांच्या माथ्यावर असलेल्या फुलांच्या पाकळ्यांच्या आकाराची अर्धदलाची रचना (बहुधा हा सबंध जगाने कौतुक केलेल्या नजरेस लोभावणाऱ्या मुसलमानी कमानीचा अजून एक वास्तुशास्त्रीय आविष्कार असावा) हा गुणविशेष थेट बहमनी काळातील दुर्गाच्या स्थापत्यशास्त्राचा दुवा अबाधित असल्याचे जाणवून देतो. बीदर, गोवळकोंडा, विजापूर या दुर्गाची द्वारे अन् राजगडाचा पालीदरवाजा यांच्या वास्तुशास्त्रीय संकल्पनेमध्ये विलक्षण साम्य आहे. फरक एवढाच की बीदर, गोवळकोंडा, विजापूर हे दुर्ग मदानी होते, तर राजगड सह्य़ाद्रीच्या एका उत्तुंग अशा शिखरावर रचलेला होता. मात्र हा दुर्ग रचणारे कारागीर हे या मुसलमानी मुलखातूनच आयात केलेले होते हे नि:संशय. नवीन दुर्ग बांधण्यासाठी लागणारा पका आणि सत्ता ही त्याकाळी या मुसलमान राज्यकर्त्यांपाशीच होती. त्यामुळेच मुसलमानी छाप असलेली बांधकामे रचण्यात कुशल असलेल्या या शिल्पींनी रचलेल्या तत्कालीन बांधकामांवर असलेला मुसलमानी वास्तुशास्त्राचा प्रभाव आपल्याला जाणवत राहतो. राजगड हा शिवछत्रपतींनी रचलेला पहिलावहिला कौतुकाचा दुर्ग. मग त्यासाठी त्यांनी या शास्त्रातील उत्तम शिल्पज्ञ मागवूनच राजगडाच्या बांधकामाचा श्रीगणेशा केला असावा यात संशय नाही.

बचावात्मक विशेषांवर भर देतानाच प्रतिकार करण्याच्या किंवा प्रसंगी आक्रमणाच्या धोरणांस अनुकूल ठरणारी रचनाही उभारण्यात आली. राजगडाच्या सुवेळा व संजीवनी या माच्या, तर रायगडावरील खूबलढा बुरूज, हिरकणी बुरूज व मदारमोर्चा ही ठिकाणे या प्रकारच्या रचनेची उत्तम उदाहरणे आहेत. शत्रूचा हल्ला आल्यास बचावाची संधीही मिळावी, मात्र शक्य झाल्यास तटाबुरुजांच्या साहाय्याने अन् आश्रयाने आक्रमकांवर तिखट प्रतिहल्लाही करता यावा अशाच पद्धतीची ही सारी रचना केली गेली आहे. तटाच्या प्रत्येक वळणावर बांधला गेलेला बुरूज, हा त्या बुरुजाच्या डाव्या-उजव्या बगलांवर असणाऱ्या तटबंदीवर होणाऱ्या आक्रमणावर प्रतिहल्ला चढवण्याच्या दृष्टीनेच बांधला गेला आहे. तोफा, बंदुका, बाण, इत्यादी तत्कालीन शस्त्रास्त्रे व त्यांचे पल्ले विचारात घेऊनच त्यातील जंग्यांची रचना केली गेली आहे. ही पद्धत साऱ्याच मध्ययुगीन व शिवकालीन दुर्गाच्या स्थापत्यामध्ये आढळते. यामध्ये केवळ बचावाच्या हेतूपेक्षाही आक्रमणात्मक बचावाचा हेतू प्रामुख्याने जाणवतो. संभाव्य आक्रमणाच्या दृष्टीने कमकुवत जागा हेरून, त्या जागा तटाबुरुजांनी बंदिस्त करून केलेले बांधकाम, हे शिवछत्रपतींच्या आक्रमणात्मक बचावाची मनोवृत्ती अधिक उत्तम प्रकारे दाखवून देते.

दुर्ग हे राज्याचे एक अंग. कौटिल्याच्या व्याख्येप्रमाणे राज्याच्या सप्तांगांपकी एक. त्यामुळे राज्यसाधनेचे एक प्रभावी साधन या दृष्टीनेच शिवछत्रपतींनी दुर्गाकडे पाहिले. अन् मग या राज्यसाधनेस म्हणजेच पर्यायाने दुर्गास आक्रमणाची तोशीस लागू नये वा लागलीच तर त्यांनी प्रतिआक्रमणास सदैव सिद्ध असायला हवे, या दृष्टीनेच शिवछत्रपतींनी नवीन दुर्गाची बांधकामे केली वा जुनी बांधकामे पाडून त्याजागी स्वत:ला हवी तशी नवीन बांधकामे रचली.

राज्यसंरक्षण अन् राज्यसंवर्धन हा शिवछत्रपतींचा दुर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लक्षात घेतला, तर त्यासाठी त्यांनी सह्य़ाद्रीच्या अतिदुर्गम भौगोलिक परिसराचा वा सागराच्या दरुलघ्य परिसराचाच अधिक अन् अचूक असा उपयोग करून घेतल्याचे आपणास आढळते. सह्य़ाद्रीचे रौद्रभीषण कडे, उत्तुंग शिखरे, पाताळाचा आभास देणाऱ्या दऱ्या, ती घनगर्द अरण्ये आणि या साऱ्याचेच तळहाताच्या रेषांगत असलेले ज्ञान या साऱ्याच घटकांचा त्यांनी आपल्या युद्धशास्त्रामध्ये अतिशय चाणाक्षपणे अन् न भूतो न भविष्यति असा उपयोग करून घेतला. शत्रूचे आक्रमण होऊ शकेल हे गृहीत धरून त्यांनी आपल्या दुर्गाच्या परिसरातली भौगोलिक परिस्थिती जोपासली. स्वसंरक्षण वा राज्यसंरक्षणाच्या दृष्टीने जिथे भौगोलिक घटकांची कमतरता वाटली तिथे कृत्रिम साधनांचा वापर करून ती अवघड बनविली गेली. याची काही उदाहरणेसुद्धा देता येतील. रायगडाचे उदाहरण द्यायचे झाले तर या दुर्गास दुर्लभ म्हणावी अशी नसर्गिक दुभ्रेद्यता लाभली आहे. चहूबाजूंनी दऱ्या व पर्वतशिखरांनी वेढलेला हा दुर्ग ऐन कोकणात सह्य़ाद्रीच्या गाभ्यात दडलेला आहे. समुद्रसपाटीपासूनची याची उंची २८५२ फूट. हा डोंगर इतर दुर्गाप्रमाणे कुण्यातरी डोंगररांगेच्या शिखरावर नसून, चारही बाजूंनी पूर्णतया सुटावलेला आहे. चारही बाजूंस उभे ताशीव कडे आहेत. बखरकार सभासदाच्या लिखाणातून जाणवते त्याप्रमाणे शिवछत्रपतींनी हा दुर्ग बहुधा स्वत: जातीने चहूदिशांनी हिंडून पाहिला. शिवछत्रपतींचा चरित्रकार बखरकार सभासद त्याने लिहिलेल्या बखरीत म्हणतो : ‘राजा खासा जाऊन पाहता गड दीड गाव उंच. चौतर्फा गडाचे कडे तासिलियाप्रमाणे चखोट. पर्जन्यकाळीही कडियावरी गवत उगवत नाही..’ तसे पाहिले तर तत्कालीन युद्धशास्त्राच्या अन् युद्धशस्त्रांच्या दृष्टीनं रायगड अजेय होता. बहुधा त्याच सुमारास शिवछत्रपतींच्या मनी तो राजधानी या दृष्टीने ठसला असावा. चहूबाजूंस उभे कडे असल्यामुळे बहुतांश दुर्गास कृत्रिम तटबंदीची आवश्यकता भासली नाही. दुर्गमतेच्या दृष्टीने ही नसर्गिक तटबंदीच पुरेशी होती. मात्र महादरवाजा, वाघदरवाजा, भवानी टोक अन् हिरकणी टोक या मोजून चार ठिकाणी कृत्रिम तटबंदीचे अवशेष आढळतात. इ.स. १६७३च्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात इंग्रजांचा वकील टॉमस निकल्स रायगडावर आला होता. रायगडाचे वर्णन त्याने नोंदून ठेवले आहे. तो म्हणतो : ‘..जिथे टेकडीस नसर्गिक अभेद्यता नाही, तिथे चोवीस फूट उंचीचा तट बांधला आहे. चाळीस फुटांवर दुसरा तट बांधून हा दुर्ग इतका अभेद्य बनविला आहे, की अन्नाचा पुरवठा भरपूर असल्यास अल्पशा शिबंदीच्या साह्य़ाने तो सर्व जगाविरुद्ध लढू शकेल..’ तर ग्रँट डफ या मराठा इतिहासकाराच्या मते, स्पेनच्या दक्षिण टोकाशी असलेला जिब्राल्टरचा पहाड हा लष्करीदृष्टय़ा जेवढा अजिंक्य, तेच महत्त्व पूर्वेकडल्या रायगडाचे. किंबहुना रायगड हा पूर्वेकडला जिब्राल्टर असेच म्हणावे लागते. अगोदर उल्लेखिलेल्या ठिकाणांपकी महादरवाजा सोडला तर उरलेल्या तीन ठिकाणांची तटबंदी मिळून जेमतेम शंभर फुटांच्या आसपास आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की, एवढय़ा प्रचंड आकाराच्या दुर्गावरल्या या छोटय़ा जागासुद्धा त्यांनी तटबंदीविना सोडल्या नाहीत. याचाच अर्थ वेगळ्या दृष्टीने असाही घेता येतो की, याही वेगळ्या नाजूक जागा रायगडावर दुसऱ्या नाहीत!

याच्या नेमके विरुद्ध उदाहरण आहे राजगडाचे. तीन बाजूंस तीन माच्या व मधोमध असलेला पाचेकशे फूट उंचीचा बालेकिल्ला असलेला हा दुर्ग म्हणजे कोणत्याही काळातील कृत्रिम दुर्गबांधणीचा एक उत्कृष्ट व आदर्श नमुना आहे. चहूदिशांनी हा दुर्ग तटाबुरुजांनी बंदिस्त केला आहे. जिथे ही करोल तटबंदीही कमी वाटली म्हणून की काय, तेथील कडा छिन्नी लावून तासून तुळतुळीत केलेला आहे. सुवेळा अन् संजीवनी या दोन्ही माच्यांच्या टोकाशी असलेल्या बुरुजांखालच्या कडय़ांवर छिन्नीचे घाव अगदी स्पष्ट दिसतात. दिसायला मकाण कठीण भासले, तरी ते अजून दुर्गम करावे याशिवाय दुसरा उद्देश यामागे असूच शकत नाही. तीच गोष्ट राजगडाच्या बालेकिल्ल्याची. तिथे जाणारी एकुलती एक वाट कळकळत्या कडय़ावरून वर चढते तिथेच थोडीफार तटबंदी करून भागले असते असे आज पाहताना वाटते. मात्र शिवछत्रपतींनी राजगडाचा अवघा बालेकिल्ला चहूदिशांनी तटबंदी बांधून मजबूत केला. यामागचा एकच हेतू असू शकतो, तो म्हणजे दुर्गास नसर्गिक अभेद्यता लाभली असली, तरीसुद्धा त्यास अधिक अभेद्य करण्यास कृत्रिम तटबंदीचीही आवश्यकता असते. म्हणून दोहोंचा उत्तम मेळ घालून ते स्थळ आक्रमकांसाठी अधिकाधिक दुर्घट करावे, म्हणजे ते संरक्षणाच्या दृष्टीने सोपे होते हे साधे पथ्य पाळलेले आपल्याला इथे दिसून येते.

इथे अजूनही एक उदाहरण देण्याचा मोह आवरत नाही. मालवणच्या किनाऱ्यापासून पश्चिमेला मलभर अंतरावर असलेल्या कुरटे नावाच्या एका बेटावर शिवछत्रपतींनी सिंधुदुर्ग हा विख्यात जलदुर्ग रचला. या दुर्गाला चहूदिशांनी सागराचा घेरा आहे, त्यामुळे जमिनीवरून आक्रमण करून हा दुर्ग जिंकणे केवळ अशक्यप्राय आहे. केवळ आरमारी युद्धातच हा दुर्ग जिंकला वा हरला जाऊ शकतो. मात्र याला ऐन समुद्रातही नसर्गिक संरक्षण लाभले आहे. मालवण बंदरातून दुर्गापर्यंत जाणाऱ्या मार्गात पाण्यात लपलेले भलेमोठाले खडक आहेत. ओहोटी असली तरच ते दिसतात. भरतीच्या वेळी ते पुरते पाण्याखाली असतात. कोणतेही गलबत माहीतगार नाखव्याशिवाय बंदरातून थेट दुर्गापर्यंत जाऊच शकत नाही. या नसर्गिक रचनेस शिवछत्रपतींनी धक्काही लावला नाही. ते खडक फोडून दुर्गाकडे यायचा मार्ग त्यांनी सुगम केला नाही. अर्थ असा की, गिरिदुर्गाच्या बाबतीत जे महत्त्व तटबंदीला अन् त्याच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या गर्द अरण्यांना होते तेच महत्त्व सिंधुदुर्गाच्या बाबतीत या पाण्यातील खडकांना होते! इतकेच नव्हे तर सिंधुदुर्गाच्या आधारासाठी सर्जेकोट, राजकोट, निवतीचा खडक या मोक्याच्या जागी लहान जलदुर्गाची रचना करून सिंधुदुर्गासाठी जणू संरक्षक कवचाची संरचना तयार केली आणि स्वराज्याची ती सागरी राजधानी आणिकच दुभ्रेद्य करून सोडली.

विचार करू जाता एक गोष्ट यातून निखळपणे स्पष्ट होते की, दुर्गस्थळ निवडताना त्या स्थळाची भौगोलिकता पूर्णतया विचारात घेतली जात असे. भौगोलिक घटकांचा उपयोग करून दुर्ग जास्तीत जास्त दुर्गम करण्यात येत असे. तेही पुरेसे भासले नाही तर त्यांच्या जोडीला कृत्रिमरीत्या म्हणजेच तटबंदी, वेगळी द्वाररचना आदींच्या मदतीने दुर्ग जास्तीत जास्त दुष्कर करण्यावर भर दिला जात असे. संभाव्य आक्रमणास जास्तीत जास्त परिणामकारकरीत्या तोंड देता यावे हाच यामागचा स्पष्ट उद्देश असे.

आक्रमणात्मक बचाव हा जरी शिवछत्रपतींच्या गनिमी काव्याच्या युद्धपद्धतीचा पाया होता अन् यामध्ये प्रमुख भर जास्त नुकसान न होण्यावर अन् बचावावर होता, तरीसुद्धा निव्वळ आक्रमणाच्या दृष्टिकोनातूनसुद्धा दुर्गाचे स्थान विचारात घेतले जात असे. दुर्गाची जागा निवडतानासुद्धा ती अशी निवडली जाई की, त्या दुर्गावर आक्रमण करणे शत्रूस निरतिशय कठीण व्हावे. मात्र दुर्गावर असलेल्या फौजेस आक्रमकांवर सुरक्षितपणे प्रतिआक्रमण करणे अतिशय सोपे जावे. दुर्ग असलेला पर्वत जेवढा जास्त उंच, तेवढाच तो आक्रमण करण्यास कठीण व प्रतिआक्रमणास सोपा. दुसरी बाब म्हणजे, दुर्गाच्या घेऱ्यामध्ये असलेली अरण्ये वा आडोसा साधून आक्रमण करण्याच्या परिणामकारक युद्धतंत्रास ही गर्द अरण्ये अतिशय उपयोगाची ठरत. शिवकाळात लढवय्या मराठी सन्याने याच पद्धतीच्या आक्रमक युद्धतंत्राचा अतिशय कुशलतेने वापर करीत निभ्रेळ यश मिळविले.

इथे एक गोष्ट नमूद करावीच लागेल की, वास्तुशास्त्र, नीतिशास्त्र वा शिल्पशास्त्राच्या नाना ग्रंथांमध्ये नानापरींच्या दुर्गाची वा त्यांच्या लक्षणांची जंत्रीच दिलेली आहे. त्यांचे उपयोग व त्यांच्या वैशिष्टय़ांची सांगोपांग चर्चा केलेली आहे. मात्र कोणत्याही ग्रंथातील कोणत्याही प्रकरणात, कोणत्याही ग्रंथकर्त्यांने गिरिदुर्गाच्या सभोवताली असलेल्या अरण्यांचा उपयोग दुर्ग आणिकच दुर्गम करण्यासाठी करावा असा वा या अर्थाचा पुसटसादेखील उल्लेख कुठेच केलेला नाही. उल्लेख केवळ स्वतंत्र अशा वनदुर्गाचे व त्यांच्या प्रकारांचे आहेत. कसे कुणास ठाऊक, मात्र सारेच विचारवंत हा मुद्दा विसरले, हे खरे! या पद्धतीचा उपयोग सुचणारा अन् ती पद्धत यशस्वीपणे उपयोगात आणणारा शिवछत्रपती हा भारतीय इतिहासातला पहिला राजा. ती पद्धती नमूद करणारा अन् त्यास जणू कायद्याचे रूप देणाराही तो पहिलाच राजा. दुर्गशास्त्राचा हा नवीन पलू शोधून काढणारा राजा म्हणून दुर्गाभ्यासकांना शिवछत्रपतींचे नाव नमूद करावेच लागेल!

शिवकालात गिरिदुर्ग ही सत्ताकेंद्रे तर होतीच, मात्र त्याचबरोबर ती लष्करी युद्धकेंद्रेदेखील होती. मराठय़ांच्या लष्करी हालचालींची ती केंद्रस्थाने होती. या केंद्राच्या भोवती आपले युद्धतंत्र प्रभावीपणे वापरता यावे यासाठी आवश्यक अशा आडोशांचीही त्यांना तेवढीच गरज होती. ‘एकवेळ अस्वलीच्या केसातली ऊ सापडेल, पण जावळीच्या रानात हरवलेला हत्ती सापडणार नाही,’ अशा पद्धतीचे उल्लेख बखरींमध्ये सापडतात. आणि ही खरोखरीच अतिशयोक्ती नव्हती. आजही जावळीचे रान तेवढेच घनगर्द आहे. पण मग त्यासाठीही धारे निर्माण केले गेले. ‘गडाचे संरक्षण म्हणजे कलारग्याची झाडी. या रानातली काठीही कोणास तोडो देऊ नये,’ असे पंतअमात्यांनी आज्ञापत्रात म्हटलं आहे. राजाचीच आज्ञा म्हटल्यावर ही राने मग मुद्दामहून काळजीपूर्वक जोपासली गेली. सांभाळली गेली.

सह्य़ाद्रीचा दुर्गम डोंगराळ प्रदेश, दऱ्या-दरकुटे, तेथली गहन वने, या साऱ्याचाच उपयोग शिवछत्रपतींनी स्वराज्यउभारणीच्या आपल्या राजकारणात अतिशय कुशलतेने करून घेतला. सुरुवातीच्या काहीशा अस्थिर व बेभरवशाच्या कालखंडात, आक्रमक दृष्टिकोनाचा विचार केल्यास, नव्या राज्याच्या उभारणीसाठी त्यांनी केलेली प्रदेशाची- त्यातही सह्य़ाद्रीच्या अतिदुर्गम भागाची निवड अचूक ठरली. या प्रदेशातल्या उत्तुंग दुर्गानी अन् गहन अरण्यांनी त्यांच्या आक्रमणात्मक बचावाच्या युद्धपद्धतीस आणि मानसिकतेस अभूतपूर्व अशी साथ दिली अन् तीच त्यांना यशाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत घेऊन गेली.

राज्यसंरक्षण व राज्यसंवर्धन ही दुर्गाची दोन प्रमुख काय्रे होती, तर प्रजापालन हे तिसरे प्रमुख कार्य होते. काहीशा वेगळ्या शब्दांत सांगायचे तर राज्याच्या सीमा वाढवत जाणे, त्या सीमांचे रक्षण करणे अन् त्या सीमांतर्गत राज्यकारभाराचे, प्रजापालनाचे उद्दिष्ट यथास्थित होईल असे पाहणे, ही त्रिसूत्री शिवकालामधील दुर्गाचे महत्त्वाचे कार्य अधोरेखित करते.

हा वारसा तर त्या विख्यात कौटिल्यापासून चालत आलेला आहे. त्या धुरंधराने, त्याने रचलेल्या दंडनीतीच्या संदर्भात म्हटले आहे : ‘अलब्धलाभार्था’ – जे आजवर लाभले नाही ते लाभून देणारी; ‘लब्धस्य प्रतिपालिनी’ – जे लाभले त्याचा प्रतिपाळ करणारी; ‘प्रतिपालितस्य परिवर्धिना’- ज्याचा प्रतिपाळ केला, ते वृद्धिंगत करणारी; आणि त्याही पुढे जाऊन कौटिल्य म्हणतो, की ही दंडनीती ‘परिवर्धितस्य तीथ्रे प्रतिपादिनी’ म्हणजे जे जे वृद्धिंगत झाले- यात ज्ञान, कला, राज्य, लक्ष्मी, मित्र किंबहुना कौटिल्याच्या मते राज्याची जी सप्तांगे – राजा, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, सन्य व मित्र, या साऱ्यांची जी भरभराट होईल ती प्रजेच्या ठायी रुजू करण्याचे वा त्या भरभराटीचा उपयोग प्रजेला होईल हे पाहण्यासाठीच अर्थशास्त्र या ग्रंथाची वा दंडनीतीची रचना झालेली आहे!’

दोन हजार वर्षांचा हा प्राचीन वारसा, शिवछत्रपतींनी दुर्गाच्या आधारे समर्थपणे पुढे तर नेलाच; मात्र अभूतपूर्व अशा उंचीवरही नेऊन ठेवला, हा केवळ अभिमान बाळगण्याजोगा इतिहास आहे.

discover.horizon@gmail.com

First Published on August 11, 2018 4:53 am

Web Title: loksatta vasturang marathi articles 28