02 June 2020

News Flash

कचरा-खतातून फुलणाऱ्या झाडांची गोष्ट!

प्लास्टिक पिशव्या वापरतच नाही. रिकामे टेट्रा-पॅक असले तर जमा करून सहकार भांडारच्या ड्रॉपबॉक्समध्ये टाकते.

(संग्रहित छायाचित्र)

अनुराधा राजाध्यक्ष

गेल्या वर्षी आंब्याची ५७ रोपे तयार झाली माझ्या गॅलरीत.. म्हणजे झाली अशी गंमत की, मी ओल्या कचऱ्यापासून खत तयार करते, तर त्यात टाकलेल्या आंब्याच्या कोयींपैकी ५७ कोयी रुजल्या आणि झाली त्यांची रोपं. सकाळी झाडांना पाणी घालायला म्हणून गेले गॅलरीत, तर खतामध्ये एक लुसलुशीत किरमिजी कांडी दिसली आणि त्याला दोन मिटलेली पानं. कळेचना पहिल्यांदा आहे काय हे? दुसऱ्या दिवशी त्या मिटल्या पानांचं पुस्तक उघडलं आणि कळलं, हे तर आंब्याचं रोप. बघता बघता कधी तीन, कधी चार, कधी दोन करत ५७ रोपं  तयार झाली की हो! मी कचऱ्याच्या डब्यात भाज्यांची सालं, फळांच्या बिया, अंडय़ाची टरफलं वगैरे काही म्हणजे काहीसुद्धा ओला कचरा टाकत नाही. त्यामुळे कचऱ्याचा डबा भरतच नाही. कसं आहे, घरात केर काढून जमलेला कचरा, थोडे इकडचे तिकडचे कागदाचे कपटे वगैरे असे असून असून असणार किती ना! तेवढेच असतात माझ्या कचऱ्याच्या डब्यात. मुंबईत हजारो टन कचरा दररोज जमा होतो आणि त्याची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न पडतो. पण त्या कचऱ्यात माझ्या घरातल्या कचऱ्याची भर जवळजवळ शून्य असते बरं का! म्हणजे बघा नं, कागद वगैरे रद्दीत देते. प्लास्टिक पिशव्या वापरतच नाही. रिकामे टेट्रा-पॅक असले तर जमा करून सहकार भांडारच्या ड्रॉपबॉक्समध्ये टाकते. इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक कचरा ई-कचरा जमा करणाऱ्यांना देते. रिकाम्या बाटल्या, चपला भंगारवाल्याला आणि जुने कपडे, चिंध्या, फाटकी चादर वगैरे बोहारणीला.. मग राहणार काय कचऱ्याच्या डब्यात? जवळजवळ काहीच नाही. राहता राहिला ओला कचरा.. त्याचं खत तयार करते. कमरेएवढय़ा उंचीचे दोन ड्रम आणले आहेत मी. एकदाच पाच किलो माती आणली विकत. नारळाच्या शेंडय़ा जमवल्या थोडय़ाशा. त्या एका ड्रमाच्या तळाशी घातल्या. ओला कचरा टाकला की त्याला पाणी सुटतं ना, ते शोषून घेतात या शेंडय़ा. त्यावर मातीचा साधारण वीतभर उंचीचा थर दिला आणि त्यावर टाकत गेले ओला कचरा दिवसभराचा. रात्री झोपताना त्याच्यावर पसरते पुन्हा एक अगदी पातळ थर मातीचा; ओला कचरा उघडा दिसू नये इतपत. रात्री झाकण ठेवलं ड्रमवर- एखादा उंदीर येऊन आतला कचरा उचकटून बाहेर टाकू नये म्हणून ही खबरदारी. सकाळी उठल्यावर त्या ड्रमवरचं झाकण काढून टाकलं. त्याला ऊन, हवा मिळावी म्हणून. पुन्हा टाकत गेले त्यात दुसऱ्या दिवशीचा ओला कचरा. तुम्हाला काय वाटतं, किती दिवसात भरला असेल तो कमरेएवढय़ा उंचीचा ड्रम? तीन-चार महिने लागले तो भरायला. घरात सहा माणसं आहोत आम्ही. म्हणजे त्या मानानं ओला कचरा बराच असूनही एवढा वेळ लागला तो ड्रम भरायला. कारण ड्रम दिवसभर उघडा ठेवला की बाष्पीभवनानं सुकत राहिला ओला कचरा. निसर्गाची किमया किती अफाट, त्या मातीत ओल्या कचऱ्याचं विघटन करणारे जीव-जंतू, गांडुळं तयार झाले आपोआप. त्यांनी सालं, देठं, वगरेंचं रूपच पालटून टाकलं. खोटं वाटेल, पण खरं आहे की त्या सगळ्या ओल्या कचऱ्याची झाली काळी कुळकुळीत माती.

मी काय करते, साधारण महिनाभरानंतर पहिल्या ड्रममधला सगळा साठा दुसऱ्या ड्रममध्ये शिफ्ट करते. त्यामुळे अगदी तळाशी असणारा ओलसर कचरा वर येतो आणि उन्हानं, हवेनं तोही पटकन सुकायला मदत होते. हे सगळं करायला मी एक मोठा लांब चमचा ठेवलाय. आता हे शिफ्टिंग करताना छोटय़ा-मोठय़ा अळ्या, किडे, गांडुळं यांची भेट होतेच मातीत. पण ‘ई’ आणि ‘शी’ असं वाटून न घेता, ते आपल्यासारखेच निसर्गाचे घटक आहेत हे पक्कं असलं ना डोक्यात, की मग त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अत्याचार होणार नाही, जीवितहानी होणार नाही याचीच काळजी घेतली जाते आपल्याकडून. पुढचा मुद्दा दुर्गंधीचा.. एक गोष्ट पक्की ध्यानात आली आहे माझ्या, ओल्या कचऱ्यावर मातीचा पातळ थर आला रे आला, की दरुगधी शिल्लक राहतच नाही. तुम्ही पाहिलं आहे का कधी, मांजर विष्ठा करतात आणि त्यावर पायानं आजूबाजूची माती टाकतात. यामागे हेच लॉजिक आहे. जेव्हा अगदी खालचा ओला कचरा आपण एका ड्रममधून दुसऱ्या ड्रममध्ये टाकतो तेव्हा त्याचा थोडासा वास येतो. पण ती प्रक्रियाच मुळात असते पाच नाही तर दहा मिनिटांची. त्याच्यावर पुन्हा मातीचा थर दिला की मुद्दा संपला. मातीत हात घातले की खराब होतात, पण धुतले की ते स्वच्छही होतात, हे ज्यांना माहिती असतं, त्यांना असे प्रश्न पडतच नाहीत मुळी. माझ्या बाबतीत म्हणाल तर मी माती तयार करते, मी सेंद्रिय खत तयार करते, मी माझ्या शहराला कचऱ्यापासून वाचवते, अशा  विचारांपुढे किळस, घाण वगैरे गोष्टींना थाराच नाही माझ्या मनात. कशाला नसत्या उठाठेवी? असा विरोध, तक्रार, निषेध, चिडचिड, वादावादी या सगळ्याला ठामपणे उत्तर देण्याची मानसिक तयारी असली की सगळे विरोध सहज पार करू शकतो आपण. आणखीन एक- खतातले किडे, अळ्या, गांडुळं त्यांचं-त्यांचं काम खतात राहूनच करतात. त्यांचा आपल्याला काहीही त्रास होत नाही.. एखादा कोणी दिसलाच बाहेर, तर त्या चुकल्यामाकल्या जीव-जंतूला हळूच कागदावर उचलून पुन्हा खतात टाकून देते मी. आणि हो, माझ्या घरात यामुळे आजारपण वगैरे काहीही आलेलं नाही. सडका कचरा गॅलरीत, म्हणजे हमखास डास आणि मग डेंग्यू वगैरे भीतिदायक विचार आला असेल कुणाच्या मनात म्हणून सांगितलं मुद्दाम. स्वानुभवाने सांगते, या किळसवाण्या वाटणाऱ्या कचऱ्यापासून अक्षरश: पहिला पाऊस पडल्यावर मातीचा सुगंध येतो ना, तशी सुगंधित खत स्वरूपातली माती तयार होते. तीच माती माझ्या कुंडय़ांमध्ये रोपांना आणि रस्त्यावरच्या झाडांनाही मी घालते. असं सगळं केलं की होत असलेला विरोध मावळतो आणि त्याची जागा अभिमान घेतो. खत तयार करण्याची वेगवेगळी यंत्रसुद्धा आली आहेत बाजारात. कुणी त्याचाही उपयोग करू शकतो. आता या लेखाची सुरुवात जिथून झाली त्या मुद्दय़ाकडे येते. माझ्या ओल्या कचऱ्यात फळांच्या बियाही असतात. त्यांना रुजायला छान पौष्टिक खाऊ आजूबाजूला असतोच. शिवाय दिवसा ऊन आणि हवाही मिळते. त्यामुळे त्या खतातच रोपं तयार होतात. ती दिसली रे दिसली की मी हळूच उचलून त्यांना कुंडय़ांमध्ये लावते आणि मग उपवर कन्येसाठी घर किंवा वयात आलेल्या मुलासाठी योग्य जोडीदार शोधावा, तसा शोध सुरू होतो माझा. या रोपांना जमीन मिळवून देण्यासाठी अनेक नकार पचवत, उंबरठे झिजवत, योग्य घरात मुलगी जावी आणि सुखी व्हावी तसं होतं मग या रोपांचं. मी त्यांच्यासाठी जागा अशी तशी शोधतच नाही मुळी. त्या इवल्याशा रोपाला पाणी, खत देणारं, माणूसपण जपणारं ठिकाणच शोधते मी. गेल्या वर्षी काही रोपं माझ्या गावी पाठवली गाडीच्या डिक्कीतून, पण काही उरलीच. मग त्या रोपांना शूटिंगच्या स्थळी स्वत:च्या हातानं जमिनीला अर्पण करताना किती आनंद झाला म्हणून सांगू! तिथे माळी आहे. पाणी घालण्यासाठी माणसं आहेत. काय आहे ना, स्मारकं  बांधायला, धार्मिक स्थळं उभारायला ज्या जिद्दीनं, उत्साहानं आणि धडाडीनं लोक पाठपुरावा करतात, जागा शोधतात, पाणी हटवून निर्माणही करतात, तेच सगळे गुण झाडं लावण्यासाठी जागा शोधायला कारणी लावले तर?  ‘इच्छा खूप आहे हो, पण जागाच नाहीए,’ असे नकार उरणारच नाहीत. ‘वेळ कुठे असतो एवढा?’ या प्रश्नाचं उत्तर ‘वेळ काढता येतो’ या एका वाक्यात अनेकांना दिलं आहे. शूटिंग, लिखाण, घर, स्वयंपाक, मुलं वगैरे गोष्टी मीही करतेच. दोन हात, दोन पाय, एक डोकं अशी सर्वसामान्यच आहे मी. त्यामुळेच वाटतं, पावसाचा अभाव आणि उष्णतेचा उच्चतम प्रभाव यांमुळे म्हणता म्हणता संपूर्ण जीवसृष्टीचंच स्मारक होऊ नये, हे  स्मरणात ठेवलं तर झाडं लावण्याचं विस्मरण कधीच होणार नाही कुणाला, नाही का?

anuradharajadhyaksha@ gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2019 12:29 am

Web Title: plants bloom from waste abn 97
Next Stories
1 आरामदायी बेड
2 निर्माल्याचे खत
3 ट्रॉलीज्ची साफसफाई
Just Now!
X