तापर्यंत आपण मंदिर किंवा राजप्रासादाच्या स्थापत्याचा विचार केला. आता नगररचना किंवा सामान्य प्रजेची घरे कशी होती त्याचा विचार करू या. मानसारात नववा व दहावा अध्याय अनुक्रमे ग्राम व नगररचनेवर आहे. त्यानुसार दण्डक, सर्वतोभद्र, नंद्यावर्त, पद्मक, स्वस्तिक, प्रस्तर, कार्मुक आणि चतुर्मुख असे आकारावरून गावांचे प्रकार केले आहेत. गाव वसवायचे निश्चित झाल्यावर जेथे ते वसवायचे आहे त्या भूमीची मोजमापे, नंतर गावाचा आराखडा, यज्ञात आहुती, गावातील प्रत्येक घराचा आराखडा आणि मग पाया अशा साऱ्या गोष्टी येतात. यातील काही प्रमुख गोष्टींनुसार होणाऱ्या गावांच्या प्रकारांचा आपण विचार करणार आहोत.
दंडकग्राम : दंडकग्रामाचे लांबी-रुंदीनुसार तीन प्रकार होतात.
१. वानप्रस्थग्राम : पूर्वी आयुष्याची चार आश्रमांत विभागणी केली असल्याने गृहस्थाश्रम पूर्ण झाल्यावर वानप्रस्थातील लोकांसाठी विशेष गावांची निर्मिती होत असावी असे वाटते. यासाठी धनुग्र्रह दण्डानी (सत्तावीस अंगुल) पंचवीस दंड ते शंभर दंडापर्यंत गावाची रुंदी व लांबी रुंदीच्या दुप्पट असावी. दंडक प्रकारातील हे सर्वात छोटे गाव वानप्रस्थींसाठी असे.
२. मध्यमग्राम : एकतीस दंडांपासून सुरुवात होऊन एकशे सात दंड इतकी रुंदी व त्याच्या दुप्पट लांबी असे मध्यमग्रामाचे माप मानले आहे.
३. ब्राह्मणग्राम : सदतीस दंडापासून सुरुवात होऊन एकशे पंचवीस दंड रुंद असे ब्राह्मणगाव सांगितले आहे. येथे त्याची लांबी दिली नसली तरी ती वरीलप्रमाणेच रुंदीच्या दुप्पट असणार. रुंदीनुसार या गावाचे एकूण पंचवीस प्रकार मानले आहेत.
ह्या मापांनुसार गावाची माजेणी निश्चित झाल्यावर गावातील प्रमुख घराची आखणी केली जात असे. आराखडय़ात विस्तार करायचा झाल्यास या मुख्य घरापासून मापे गृहीत धरली जातात. सर्व प्रकारच्या गावांभोवती संरक्षक िभत व त्याभोवती खंदक केला जाई. संरक्षक भिंतीला चार दिशांना चार दरवाजे व छोटी प्रवेशद्वारं असत. गावांमधून तीन रथमार्ग असत. गावाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जाणारे छोटे मार्ग असावते किंवा नसावेत ह्याचा विचार गावाने करावा, पण मुख्य तीन रथमार्ग असलेच पाहिजेत. त्यांची रुंदी साधारणपणे गावाच्या लांबी-रुंदीनुसार एक ते पाच दंड मानली आहे. हे तीनही मार्ग सारखे असावेत. ह्यातील मध्यवर्ती रथमार्गाला दोनही बाजूंनी पदपथ तर इतर दोन मार्गाना एक बाजूने असला तरी चालेल.
मानसारच्या मते, गावाबाहेर पश्चिमेला सीमेवर विष्णू मंदिर किंवा गावाच्या आत वरुण किंवा मित्र ह्या दोन्ही पश्चिम दिशेच्या देवता असल्यामुळे त्यांची मंदिरे बांधून त्यात विष्णूची इच्छेनुसार मूर्ती स्थापन करावी. ईशान्येला गावाबाहेर शंकराची व गावाच्या आत पर्जन्य देवतेची किंवा ह्या दोन्ही देवता ईशान्येच्या असल्यामुळे त्यांची उत्तरेला स्थापना करावी.
हे गाव वानप्रस्थींसाठी असल्याने ज्यात पंचवीस यती आहेत ते ग्राम, नदीकिनाऱ्यावरील ते पूर, पन्नास दीक्षितांसाठी धर्मशाळा असलेले ते नगर, अठ्ठावन्न ब्राह्मणांसाठीचे मंगल, शंभर ब्राह्मणांसाठी धर्मशाळा असणारे ते कोष्ठ असे प्रकार मानले आहेत.
सर्वतोभद्र : साठ दंड ते तीनशे तेरा दंड रुंद असे सर्वतोभद्र ग्रामाचे दोन प्रकार आहेत. गावाच्या मधोमध ब्रह्मा, विष्णू व शंकराची मंदिरे असावीत. ह्यात तपस्वी, यती, ब्रह्मचारी, योगी, किंवा बुद्ध व जैन संन्यासी व गृहस्थ यांच्यासाठी आवश्यकतेनुसार निवासस्थाने असावीत.
एक ते पाच रथमार्ग पदपथासह असावेत. ग्रामांतर्गत एकेक पदपथ व बाहेरच्या मार्गाला दोन पदपथ सांगितले आहेत. ग्रामदेवतेचे मंदिर गावाबाहेर ईशान्येला असावे व मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाला दोन्ही बाजूंना पदपथ असावा. गावाच्या चारी दिशांना मठ किंवा मंदिरं व त्यात धर्मशाळा आणि आग्नेय दिशेला पाणपोयी असावी. ग्रामांतर्गत चार दिशांच्या रथमार्गाच्या टोकाला मठ व धर्मोपदेशकाचा आवास असावा.
चार दिशांना चार प्रवेशद्वारं असावीत. गावाभोवती सुरक्षेसाठी अपरिहार्यपणे तटबंदी व खंदक असावेत. सर्व प्रकारच्या कारागिरांची घरे मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूंना असावीत. तटबंदीने युक्त गोठे असावेत. याशिवाय विशिष्ट दिशेला विशिष्ट कारागिरांच्या घरांचा निर्देश केला आहे. गावाच्या दक्षिणेला, पश्चिमेला व नर्ऋत्येला गावाला स्नान व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी टाकी खोदावी.  
नंद्यावर्त : एकशे सत्तावन दंड ते पाचशे पासष्ठ दंड रुंद नंद्यावर्त. गावाची लांबी-रुंदी समान असताना चंडिक, मंडूक व स्थंडील प्रकारचे आराखडे, तर लांबी जास्त असताना परमशायिक  आराखडा सांगितला आहे. चंडिक आराखडय़ात जमिनीचे चार तुकडे मधोमध येतात त्याला ब्रह्म भाग म्हणतात. त्याच्या बाहेर बारा तुकडय़ांना दैवक, त्याच्या पुढे चौवीस तुकडय़ांना मानुष, त्याच्या भोवतीच्या अठ्ठावीस तुकडय़ांना पशाच अशी नावे दिली आहेत.
परमशायिकात ब्रह्मस्थानी नऊ तुकडे, त्याच्या बाहेरील सोळा तुकडे दैवक, त्याच्या बाहेरील चौवीस मानुष व मानुष भागाभोवती असणाऱ्या बत्तीस तुकडय़ांना पशाच म्हणतात. ह्या आराखडय़ातील जमिनीच्या तुकडय़ांची रचना नंद्यावर्त प्रकारातील थोडक्यात संपूर्ण गावाला वेढून टाकणारी वर्तुळाकार आकाराची असते. मार्गाचे वैशिष्टय़ म्हणजे पूर्वेकडील रथमार्ग उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा, दक्षिणेकडील पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा, पश्चिमेकडील दक्षिणेकडून उत्तरेकडे तर उत्तरेचा मार्ग पश्चिमेकडून पूर्वेकडे असे असतात. यातील सर्व वर्तुळे ब्राह्मणांकडून निवसित केली जातात तेव्हा त्यांना मंगल, क्षत्रिय, वैश्य व जातींकडून वसवली जातात तेव्हा पूर, वैश्य व शूद्रांकडून व इतर जातींकडून वसवल्यास अग्रहार अशी नावे आहेत. या गावातील वरुण (पश्चिम) स्थानी चक्रवर्ती राजाचा निवास, तर मित्र (पश्चिम), जयंत (ईशान्य) व रुद्रजय (वायव्य) यापकी कोणत्याही पादावर राजनिवास सांगितला आहे. याच भागात योद्धय़ांचीही घरे सांगितली आहेत. तर नृर्ऋत्येकडे श्रीकर म्हणजे कारकुनांची घरे सांगितली आहेत.   
स्थंडील प्रकारात जमिनीचा ब्रह्म हा केवळ एकच तुकडा मध्ये त्याच्या सभोवतीचे आठ भाग दैवक, त्यानंतरचे सोळा मानुष व त्यासभोवताली चौवीस अशी पशाच प्रकारातील आखणी केली जाते.
पद्मक (१५८) : शंभर दंड ते एक हजार दंड रुंदीचे ते पद्मक. ह्याची लांबी-रुंदी समान असली तरी बाहेरची तटबंदी वर्तुळाकृती, चौकोनी, षटकोनी किंवा अष्टकोनी यापकी कोणतीही असावी. गरजेनुसार चंडित किंवा स्थंडील यापकी कोणत्याही आराखडय़ाची निवड करावी. चार कोपऱ्यांना सहा तुकडय़ांवर एकमेकांना आडवी जाणारी निवासी घरं असावीत. तेथे नेहमी सभागृह बांधावे. सर्व मार्ग पदपथांनी युक्त असावेत. गावाच्या मधून मार्ग नसावा, पण चार दिशांना प्रवेशद्वारे असावीत.
स्वस्तिक (१६३) : गावाची रचना स्वस्तिकाच्या आकाराची असल्याने याला स्वस्तिक असे म्हटले आहे. दोनशे एक दंड ते दोन हजार एक दंड रुंदी व तेवढीच लांबी असणारे ते स्वस्तिकग्राम. स्वस्तिकाची लांबी-रुंदी परमशायिकात सांगितल्याप्रमाणे असते. नंद्यावर्तात सांगितल्याप्रमाणे पशाच व त्याच्या भोवतीच्या वर्तुळाभोवती रथमार्ग असे. चार दिशांनी स्वस्तिकाचा आकार करत येणाऱ्या रस्त्याच्या टोकांना प्रत्येकी दोन प्रवेशद्वारे असत. अशा प्रकारे स्वस्तिक ग्रामात एकूण आठ प्रवेशद्वारे होतात. याशिवाय मृग, अंतरिक्ष, भृंगराज, वृश, शोश, रोग, अदिती व उदित या स्थानांवर दोन झडपांची लहान प्रवेशद्वारं सांगितली आहेत. तटबंदीवर गरजेनुसार ‘चूलिका’ म्हणजे निरीक्षणासाठीचे बुरुज असावेत. या गावात मध्यभागी शिवमंदिर असावे व त्यात केवळ िलगाची स्थापना करावी. सर्व प्रकारचे लोक येथे राहात असले तरी खासकरून हे राजाच्या निवासाला योग्य मानले असल्यामुळे सन्याच्या पाहाणीसाठी खास मंडपाच्या उभारणीचा उल्लेख येतो.
प्रस्तर (२०८) : तीनशे दंड ते दोन हजार दंड विस्तार व एक्यांशी भूखंडावर वसलेल्या या गावाचा आकार आयताकृती किंवा चौकोनी असतो. गरजेनुसार शंभर दंड वाढ करण्यास संमती आहे. गावाची विभागणी एक्यांशी तुकडय़ात करावी. पशाच मंडलातील मार्ग दोन पदपथांनी युक्त व सर्व गावाभोवती असतो. खासकरून राजा व वैश्यांसाठी हा गाव योग्य मानला आहे. या सर्वात मोठय़ा मार्गाच्या कडेने सर्व प्रकारची दुकाने मांडावीत. हा मार्ग महाराजांच्या प्रासादाशी जोडलेला असावा.
कार्मुक (२२७) : कार्मुकाची रुंदी पासष्ठ दंड ते पाचशे दंड व रुंदीच्या
दुप्पट लांबी मानली असली तरी लांबी-रुंदी समानसुद्धा चालेल असा नियम आहे. याचे वैश्यांचे संघ असलेले ते पत्तन, प्राधान्याने शूद्रसंघ असलेले खेटक
व क्षत्रियांकडून वसवले गेलेले खरवट असे तीन प्रकार होतात. गावातील
बाहेरच्या बाजूचे सर्व मार्ग कार्मुक म्हणजे धनुष्याच्या आकाराचे दिसत असल्यामुळे कार्मुक.
चतुर्मुख (२३८) : तीसदंड ते शंभरदंड रुंद व रुंदीच्या दुप्पट लांबी असणारे चतुर्मुख आयताकृती असते. गरजेनुसार आराखडय़ात दोन दंडांची वाढ करणे संमत आहे. बाहेरची तटबंदी चौकोनी किंवा आयताकृती असते. गावाच्या सभोवतालून दोन्ही बाजूंनी पदपथ असलेला मार्ग असावा. मध्ये असणाऱ्या चार तुकडय़ांच्या ब्रह्म भागातून हा  मार्ग चार महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा असावा. त्या ठिकाणी प्रत्येकी एक अशी चार प्रवेशद्वारं असावीत. या चार द्वारांकडे जाणारे लघुमार्ग असावेत. महामार्गाच्या भोवताली सर्व वर्णाच्या लोकांची घरे असावीत. कोणत्या वर्णाची वस्ती जास्त आहे यावरून गावाला नाव पडत असे. गावात शूद्रांची संख्या जास्त असल्यास ते आलय, ब्राह्मणांची जास्त असल्यास पद्म, व वैश्यांची जास्त असल्यास कोलक अशी नावे आहेत.  
वरील वर्णनावरून काही प्रमुख गोष्टी लक्षात येतात. ग्रामरचनेसाठी वेगवेगळे आराखडे अस्तित्वात होते. साऱ्या गावांच्या मापांत गरजेनुसार काही दंड वाढ करण्याची संमती होती. गावात एक महामार्ग, इतर लहान मार्गानी मिळून रस्त्यांचे जाळे तयार होत असे. शिवाय पादचारी मार्ग आवश्यक होता. सुरक्षेसाठी गावाभोवती तटबंदी व खंदक असत. गावात सर्व प्रकारच्या लोकांचा निवास होईल याची काळजी घेतली जाई.
नगररचना : नगररचनेत राजांच्या प्रकारावरून नगररचना केली जाई. त्यात अष्टग्राहीन्, प्राहारक, पट्टभाज्, मण्डलेश, पट्टधर, पाíष्णक, नरेन्द्र, महाराज व चक्रवर्ती असे प्रकार होतात. आधीच्यापेक्षा प्रत्येक पुढील नगराचा विस्तार वाढत जातो. या नगरांना राजधानीय, केवल नगर, नगरी, खेट, खर्वट, कुब्जक, पत्तन.
राजधानी – राजा निवास करत असेल व अनेक श्रीमंत लोकांनी वसलेली, नदीच्या काठावरील, प्रवेशद्वारावर विष्ण मंदिर असणारी नगरी राजधानी.
केवल – चार मोक्याच्या ठिकाणी चार द्वारं, गोपुरांनी सुशोभित, जागोजागी रक्षागृहांनी युक्त, सनिकांच्या छावण्या असलेले, अनेक व्यापारी व बाजारानी गजबजलेले, वेगवेगळ्या देवतांच्या मंदिरांनी युक्त व माणसांनी भरेलेले.
पूर – उपवनं व बागांनी युक्त, विविध प्रकारच्या लोकांनी युक्त, व्यापारी व ग्राहक सदैव असलेले, व्यापाऱ्यांच्या आवाजाने भरून गेलेले, व सात देवांच्या मंदिरांनी युक्त.
नगरी – वरील प्रकारेच सर्व असणारी पण त्याचबरोबर राजाचा निवास असलेली.
खेट – नदी किंवा प्रवताच्या पायथ्याशी वसलेले, शूद्र किंवा सेवक वर्गाचा निवास असेलेले व सर्व बाजूंनी उंच िभत असलेले.
खेटक – पर्वतांच्या मध्ये असलेले, सर्व प्रकारच्या जातींनी वसलेले व खूप मोठय़ा प्रमाणात चराईची कुरणं असलेले.
कुब्जक – सर्व जातींचे लोक असणारे, पण भोवती िभत नसलेले.
पत्तन – पाण्याजवळ वसलेले, तटबंदीनी युक्त, विविध जातीच्या लोकांनी वसवलेले, व्यापाऱ्यांनी भरलेले, रत्न, रेशमी वस्त्र व कापराचा व्यापार जिथे होतो.
असे नगरांचे प्रकार मानसारात सांगितले आहेत. थोडक्यात वेगवेगळ्या प्रकारच्या नियोजित गावांची व नगरांची रचना ही संकल्पना चांगली मूळ धरलेली होती.