माणूस दोन पायांवर चालायला लागला व इतिहास घडला आणि काही काळाने चालणाऱ्या माणसांना चप्पल वापरावी लागली. पूर्वी ती फक्त राजे-श्रीमंत लोक वापरत. भारतात सामान्य लोकांनी चप्पल वापरणे उशिरा सुरू झाले. आज प्रत्येकाचे अनेक जोड पडून असतात. किमान ३ ऋतूंचे ३ जोड तरी असतातच. पण फॅशन म्हणूनदेखील अनेक जोड घेतले जातात व तुटायची वाट न पाहता जागेअभावी फेकून दिले जातात. आणि आपण नवी चप्पल आली की जुनी चक्क विसरतोही.

आजच्या लेखात मात्र ऋतूनुसार नाही.. फॅशननुसार नाही, तर आयुष्याच्या विविध टप्प्यावर आठवणीत राहणारे चपला जोड आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

घरातील चपलांचे हे कलेक्शन आहे ठाण्यातील  चित्रा विद्वान्स आणि अविनाश विद्वान्स या वकील दाम्पत्याचे; आणि चपला आहेत त्यांच्या एकुलत्या एक मुलीच्या! शालेय वयापासून ते लग्नाच्या रिसेप्शनपर्यंत अनेक महत्त्वाच्या घटनांची आठवण करून देणाऱ्या लेकीच्या चपला. थोडी हटके साठवण आहे, पण त्यासाठी नव्या घरात, तिच्यासाठी राखीव ठेवलेल्या बेडरूममध्ये दर्शनी भागातच हे मोठ्ठं शोकेस केलेलं आहे. यात महागडय़ा, स्वस्त अशा सर्वच प्रकारच्या चपला आहेत.

कामाच्या स्वरूपामुळे विद्वान्स कुटुंबाला मुंबई व उपनगरात अनेक ठिकाणी वास्तव्य बदलावं लागलं. त्या फिरतीतच मुलगी लहानाची मोठी झाली. तिचं हे कलेक्शन नकळत साठत गेलं.

चित्रा विद्वान्स या कलेक्शन मागची कहाणी सांगतात. आजची पिढी चप्पल तुटे-फाटेल याची वाट न बघता सरळ दुसरी चप्पल घेऊन येते. परिस्थिती चांगली असल्याने मुलीची हौस आम्ही भागवू शकत होतो; पण आधीचे जोड वापरातून काढणं हेही जीवावर येत होतं. म्हणून सुरुवातीला मी तिचे जोड जपून ठेवले. शाळा बदलल्या तसा युनिफॉर्म बदलायचा. मग ते कॅनव्हास शूजही बाद व्हायचे आणि मुलगी वापरायची देखील नाही. मग मी त्या शूजना रंग, नक्षी काढून बुटांचे रूप पालटून टाकायचेआणि मग मुलगी नव्याने ते वापरायची. अशाने मी अनेक चपलांवर रिवर्क केलं आहे. हीच संकल्पना व आवड पुढे मुलीला लागली. तिने तिच्या लग्नात नवी चप्पल घेण्याऐवजी माझी जुनी चप्पल पुन्हा रंगीत नक्षीकाम, टिकल्या वगैरे करून वापरली. आणि ते पैसे वाचवून रिसेप्शनला जरा महागडी चप्पल घेतली.

आता तिचा, माझा आणि कलेचा स्पर्श झाल्याने चप्पल-बूटचं मूल्य बाजारातील मूळ किमतीपेक्षा वाढलं आणि म्हणून ते कुणालाही देणंही कठीण झालं.  तसेच एका वाढदिवसाला स्वत:ला मिळालेल्या बक्षिसाच्या पैशातून चप्पल घेतल्यानं तिची तिनंच जपून ठेवली. तिनं शालेय स्तरावर बॅडमिंटन स्पर्धेत यश मिळवलं म्हणून आणखी चांगलं खेळण्यासाठी स्पोर्ट्स शूज घेऊन दिले. त्या शूज-चपल्लांच्या किंमती खूप जास्त असतात हे तेव्हा कळलं. मुलीनं पुढे खेळ थांबवला, पण माझ्यातील भारतीय आईला ते महागडे शूज मात्र अडगळ म्हणून काढता आले नाही. म्हणून तेही राहिले.

आज हे कलेक्शन पाहताना मुलीच्या आयुष्यातील एकेका टप्प्याला, शिकण्या-नटण्याच्या नैसर्गिक ओढीला मी आठवू शकते. तिने केलेला तिचा प्रवास या वहाणा बघताना डोळ्यासमोर उभा राहतो. एकुलती एक मुलगी सासरी गेल्यानंतर ही आठवण दर्शनीभागातच असावी असं वाटून गेलं. या कल्पनेला अविनाशनेही साथ दिली. आणि मग नंतर हे वेगळं शोकेस बनवून घेतलं.

लहानपणीचे अल्बम रोज बघता येत नाहीत. त्यात मी टेक्नोसॅव्ही नसल्याने जगताना सतत कॅमेरे वापरले नाहीत. त्या काळी ऑर्कुट-फेसबुक नसल्याने फोटो साठवताही आले नाहीत. अजूनही स्मार्टफोन व फेसबुक वापरत नसल्याने याच चपला, आठवणींचे हे कपाटच एकमेव साधन आहे. पायातली वहाण पायात नाही, तर चांगली दर्शनी भागात ठेवली. नातेवाईक माझ्या आठवणींच्या कलेक्शनला चेष्टेने ‘शूज शॉप’ म्हणतात. म्हणे ना का, माझ्या मुलीच्या वयाच्या २८ वर्षांचा काळ फेसबुक नाही तर हे शूजबुक दाखवतं.

– श्रीनिवास बाळकृष्णन

chitrapatang@gmail.com