21 April 2019

News Flash

वास्तुमार्गदर्शन

माझे हॉटेलमध्ये एक दुकान आहे. हॉटेल पागडी सिस्टीमवर आहे. मी त्या हॉटेलचा सबटेनंट आहे. मी हॉटेलला नियमित भाडे देत आहे.

| July 4, 2015 01:01 am

* माझे हॉटेलमध्ये एक दुकान आहे. हॉटेल पागडी सिस्टीमवर आहे. मी त्या हॉटेलचा सबटेनंट आहे. मी हॉटेलला नियमित भाडे देत आहे. माझ्याजवळ वेगळे गुमास्ता लायसन्स आहे. माझ्याजवळ वेगळा विजेचा मीटर मात्र नाही, या पाश्र्वभूमीवर माझे प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत.
१) मुंबई भाडे नियंत्रण कायदा सबटेनंटला संरक्षण देतो का?
२) इमारतीच्या पुनर्विकासाच्या वेळी माझा पोटभाडेकरूचा हक्क राखून ठेवेल का?
३) याबाबत हॉटेलमालकावर काही कायदेशीर बंधने आहेत का?
४) मला ओनरशिपवर जागा मिळण्याची शक्यता आहे का?
५) मला वेगळा वीज मीटर मिळेल का?
-दत्ताराम ब्रीद, मुंबई.
*  १) मुंबई भाडे नियंत्रण कायदा सबटेनंटला संरक्षण देतो. पण त्यासाठी विशिष्ट वर्षांपर्यंत सबटेनंट ती जागा वापरत असल्याबद्दलचा पुरावा आवश्यक असतो. आपल्या बाबतीत संरक्षण मिळण्याची शक्यता वाटते, कारण तुमच्याजवळ वेगळे गुमास्ता लायसन्स आहे. त्याशिवाय आणखी काय गोष्टी/ कागदपत्रे आपणाकडे आहेत हे समजल्याशिवाय या प्रश्नाचे पूर्णाशाने उत्तर देणे कठीण आहे.
२) तत्त्वत: पोटभाडेकरूचा हक्क हा त्याला मिळू शकेल, पण आता ज्या इमारतीचा पुनर्विकास करावयाचा आहे तो कोणत्या प्रकारे आहे ते स्पष्ट होणे जरूरीचे आहे. उदा. सदर इमारत उपकर वर्गीकृत इमारतीमधील आहे का? इत्यादी.
३) आपण जर आपली सबटेनन्सी योग्य तऱ्हेने सिद्ध करू शकला तर आपला सबटेनन्सीचा हक्क त्याला मान्य करावाच लागेल. अगदी काटेकोरपणे कायद्याच्या भाषेत बोलायचे झाले तर जागा रिडेव्हलपमेंटला गेली तर भाडेकरूला त्याच्या कब्जात असलेल्या जागेएवढी जागा मिळते. त्याहून भाडेकरूला जास्त हक्क त्या मिळकतीवर पोचत नाही किंवा कायद्याने तो इमारतीच्या पुनर्विकासाला अडथळा आणू शकत नाही. आपण हॉटेलमालकाशी बोलल्यास बरे होईल.
४) आपणास ओनरशिप जागा मिळू शकेल का, याचे उत्तर सर्वसाधारणपणे हो असे आहे. मात्र आपणाकडे कोणती कागदपत्रे आहेत? आपला बिल्डर कोणत्या प्रकारे जागा विकसित करू इच्छितो, त्यासाठी त्याने मालकांशी इमारतीचा पुनर्विकास करारनामा केला आहे किंवा नाही! या साऱ्या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहेत आणि या सर्व गोष्टी पाहणे आवश्यक आहे. त्यानंतरच आपल्या प्रश्नाचे उत्तर देता येईल. आपण आपली सारी कागदपत्रे एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीला दाखवून त्यांचे त्याबद्दलचे मत घेणे इष्ट ठरेल.
५) आपणाला वेगळा वीज मीटर मिळायला हवा. कारण आपण म्हणता की आपणाकडे गुमास्ता लायसन्स आहे. आमच्या मते, तो मिळवण्यासाठी मालकाचे (टेनंटचे ना हरकत प्रमाणपत्र लागेल ते आपल्याला तसे ना हरकत प्रमाणपत्र (एन.ओ.सी.) मिळते का ते पाहावे. जेथपर्यंत आपले ‘स्टेटस’ हे पोटभाडेकरू असे आहे तिथपर्यंत या गोष्टीची गरज आहे. ज्यावेळी आपल्याला ओनरशिपची जागा मिळेल त्या वेळी हा प्रश्नच उद्भवणार नाही. तरीसुद्धा त्यावेळी त्या ठिकाणी स्थापन झालेल्या गृहनिर्माण संस्थेचा ना हरकत दाखला लागेल असे आम्हाला वाटते.
* माझ्या सासऱ्यांच्या पश्चात नामांकनाआधारे राहती सदनिका त्यांच्या नावावर केली. त्यानंतर सोसायटी रिडेव्हलपमेंटला गेली. बिल्डरने त्यासंबंधीचे अ‍ॅग्रीमेंट माझ्या सासूबाईंचा मृत्यू झाल्यामुळे माझ्या यजमानांच्या नावे व माझ्या दिराच्या नावे रजिस्टर केले. सासूबाईंनी त्यांच्या सदनिकेचे नॉमिनेशन माझे यजमान व माझे दीर यांच्या नावे केलेले आहे. त्याचा रेशो ५०% प्रत्येकी असा आहे. माझे दीर परदेशी असतात. त्यांच्याजवळ सर्व मूळ कागदपत्रे आहेत. या पाश्र्वभूमीवर माझे पुढील प्रश्न आहेत.
१)    माझ्या पतीच्या सहीशिवाय दीर सदनिका हस्तांतरित करू शकतात का?
२) रजिस्ट्रेशन कचेरीतून मला करारनाम्याची कागदपत्रे मिळू शकतील का?
३)    ब्लॉकचा ताबा अद्याप मिळालेला नाही. तो सोसायटीच्या चेअरमन, बिल्डरकडून परस्पर घेऊन ब्लॉक विकू शकतात का?
४)     बिल्डर व चेअरमन ब्लॉक भाडय़ाने देऊ शकतात का?
एक वाचक, मालाड, (पूर्व)
* १) आमच्या मते, आपल्या यजमानांच्या सहीशिवाय कोणीही सदनिका हस्तांतरित करू शकणार नाही. अर्थात, आमचे हे मत त्यांनी त्यांच्या वतीने कुणाला कुलमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अटर्नी) व तत्सम कागदपत्रे बनवून दिली नाहीत हे गृहीत धरून आहे.
२) रजिस्ट्रेशन कार्यालयातून आपणाला आपण रजिस्ट्रर केलेल्या करारनाम्याची प्रत मिळू शकेल. त्यासाठी त्या कार्यालयात आपणाला अर्ज करून त्याबाबच्या तांत्रिक गोष्टींची पूर्तता करावी लागेल.
३) अशा प्रकारे ते ब्लॉक विकू शकत नाहीत. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण गृहनिर्माण संस्थेला व बिल्डरला एक पत्र देऊन ठेवावे. त्यामध्ये अद्याप सदनिकेचा ताबा मिळालेला नाही याचा उल्लेख करावा व त्याची पोचपावती घेऊन ठेवावी.
४) बिल्डर व चेअरमन परस्पर आपला ब्लॉक भाडय़ाने देऊ शकत नाहीत. कारण आजकाल ब्लॉक देताना करारनामा नोंद करावा लागतो. तो ते कसा करणार? तरीसुद्धा काळजी घ्यायची म्हणून वर दर्शविल्याप्रमाणे एक पत्र गृहनिर्माण संस्थेला व बिल्डरला एक पत्र देऊन ठेवणे इष्ट ठरेल.
* सहयोगी सदस्य कमिटीचा सदस्य होऊ शकतो का किंवा तो गृहनिर्माण संस्थेचा पदाधिकारी बनू शकतो का?
-भास्कर खरे, ठाणे.
* होय. सहयोगी सदस्य गृहनिर्माण संस्थेचा पदाधिकारी वा कार्यकारी मंडळाचा सदस्य बनू शकतो. मात्र त्यासाठी त्याला मूळ सदस्याचा पाठिंबा असला पाहिजे.
* सहयोगी सदस्य होण्यासाठी कोणत्या गोष्टींची पूर्तता करावी लागते?
-भास्कर खरे, ठाणे.
* सहयोगी सदस्य होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज गृहनिर्माण संस्थेकडे करावा लागेल व त्याला संस्थेची मान्यता घ्यावी लागेल.
२) गृहनिर्माण संस्थेने दिलेल्या भागप्रमाणपत्रावर सहयोगी सदस्याचे नाव चढवणे आवश्यक आहे. तसे झाल्यावरच तो या अगोदर दर्शविलेली कामे करू शकेल.
श्रीनिवास घैसास -ghaisas2009@gmail.com

First Published on July 4, 2015 1:01 am

Web Title: vaastu guidance 5