* मी एक कव्हर्ड पार्किंग बिल्डरकडून विकत घेतले. मी त्याचे चार्जेस रु. १९७० (प्रतिमहिना) नियमितपणाने भरत आहे. सध्या माझे स्वत:चे वाहन नाही. माझ्या घरात रंगकाम, फर्निचरचे काम चालू आहे. त्यासाठी मी लेबर कॉन्ट्रॅक्टर नेमला आहे. त्याचे वाहन मी माझ्या पार्किंगमध्ये उभे करण्यास सांगितले, त्या वेळी बाहेरचे वाहन उभे करण्यास परवानगी नाही, असे सांगत संस्थेच्या सेक्रेटरींनी आक्षेप घेतला. खरे तर कॉन्ट्रॅक्टरचे वाहन उभे राहिल्याने संस्थेच्या कोणत्याही सदस्याला त्रास नाही. तर मी काय करावे?
– मनोज शेटे, डोंबिवली (पूर्व).
* खरे तर हा तारतम्याचा प्रश्न आहे. प्रत्येक सदस्याने, अगदी पदाधिकाऱ्यांसकट सर्वानी आपणाला स्वत:चे घर वेगळे असे घेता येत नाही म्हणून आपण एकत्रितरीत्या राहत आहोत याचे भान ठेवले पाहिजे. परंतु प्रत्येक संस्थेत हा प्रकार दिसतो. आपण दिलेली वस्तुस्थिती खरी असेल तर आपण प्रथमदर्शनी कॉन्ट्रॅक्टरला वाहन ठेवण्यास संस्थेने आक्षेप घ्यायचे कारण नाही. अर्थात, यासंबंधी संस्थेने काही ठराव मंजूर केले आहेत का हे पाहणेदेखील गरजेचे आहे. समजा असे ठराव मंजूर केले तर ‘स्वत:चे वाहन’ याची व्याख्यादेखील ठरवणे आवश्यक ठरेल. कारण यातदेखील वाद होऊ शकतात. अगदी एखाद्याने सेकंडहँड गाडी घेतली व ती हस्तांतरित झालेली नसेल तर ते स्वत:चे वाहन समजायचे नाही का? एखाद्या कंपनीने कर्मचाऱ्याला गाडी वापरायला दिली, जिची मालकी कंपनीकडे आहे, ते त्याचे वाहन समजायचे नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
तात्पर्य- सध्या आपण कॉन्ट्रॅक्टरला वाहन ठेवायला परवानगी दिली आहे असे संस्थेला सांगावे. दरम्यानच्या काळात काही ठराव असला तर तो मागवून घ्यावा. तो ठराव बेकायदेशीर असेल तर त्याविरुद्ध उपनिबंधक, दुय्यम निबंधक आदी चढत्या श्रेणीने तक्रार करावी. तरीही प्रत्यक्ष दमदाटी, धमकावणे असे प्रकार होत असतील तर पोलीस स्टेशनमध्ये तशी तक्रार नोंदवावी.
*    माझ्या नावे २९० चौ. फुटांचा एक फ्लॅट आहे व माझ्या मुलाच्या नावे २९० चौ. फुटांचा एक फ्लॅट आहे. आम्ही दोघांनीही आमचे फ्लॅट विकले आणि दोघांच्या संयुक्त नावे एकच मोठा (सुमारे ५१५ चौ. फुटांचा) फ्लॅट घेतला तर प्राप्तिकराच्या कायद्याने आम्हाला काही अडचण येईल का?
* प्राप्तिकर कायद्याप्रमाणे (इन्कम् टॅक्स अ‍ॅक्ट) संयुक्तपणे फ्लॅट विकत घेऊ शकता, त्याला कोणतीही आडकाठी कायदा करत नाही. आपल्याला बहुधा भांडवली नफ्याबद्दलचा खुलासा हवा असावा (कॅपिटल गेन) असे समजून आपणाला कळवू इच्छितो की, आपण एखादा फ्लॅट विकलात व त्यावर भांडवली नफा झाला तर त्यावर प्राप्तिकर (इन्कम् टॅक्स) भरावा लागतो. तो भरला तर आपणाला नवीन फ्लॅट घेण्याची जरुरी नाही. आपणाला जर असा भरावा लागणारा प्राप्तिकर (इन्कम् टॅक्स) वाचवायचा असेल तर आपणाला ती रक्कम घर खरेदीत गुंतवावी लागते. आपण दोघांनीही ती जर घर खरेदीत संपूर्ण रक्कम गुंतवल्यास आपणाला प्राप्तिकर भरावा लागणार नाही.
*    कृपया माझ्या पुढील प्रश्नांची उत्तरे द्यावीत. 1) थकबाकीदार सदस्य हा विशेष सर्वसाधारण सभेची मागणी करणाऱ्या पत्रावर सही करू शकतो का?
(ii) एप्रिल महिन्यात झालेल्या संस्थेच्या मीटिंगमधील काही ठराव बदलण्यासाठी ही विशेष सर्वसाधारण सभा बोलावली आहे. दोन महिन्यांत पूर्वीच्या सभेतील ठराव बदलता येतात का?
(iii) वार्षिक सर्वसाधारण सभेत पूर्वपरवानगी न देता केलेल्या काही गोष्टींबद्दल दंड लावण्याचा ठराव करण्यात आला आहे. तो बदलता येतो का?
– शशिकांत धुरी, मनवेल पाडा, विरार (पूर्व)
* आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे. विशेष सर्वसाधारण सभेच्या मागणीपत्रावर कोणताही सदस्य सही करू शकेल. एखाद्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेतील ठराव हा किमान सहा महिने पूर्ण झाल्याशिवाय बदलता येत नाही. अशी स्पष्ट तरतूद संस्थेच्या उपविधीमध्ये आहे. त्यामुळे आपल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. आपल्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तरदेखील नाही असेच आहे.
 श्रीनिवास घैसास- ghaisas_asso@yahoo.com