News Flash

वास्तुमार्गदर्शन

सोसायटीच्या सर्वसाधारण सभेला गैरहजर राहाणाऱ्या सभासदाविरुद्ध दंडात्मक कारवाई करता येते का? - अशोक परब, ठाणे. आपण दिलेली माहिती अपुरी आहे. सभासद पूर्वपरवानगीने गैरहजर राहातो का,

| July 20, 2013 01:02 am

सोसायटीच्या सर्वसाधारण सभेला गैरहजर राहाणाऱ्या सभासदाविरुद्ध दंडात्मक कारवाई करता येते का?
– अशोक परब, ठाणे.

आपण दिलेली माहिती अपुरी आहे. सभासद पूर्वपरवानगीने गैरहजर राहातो का, त्याच्या गैरहजेरीमागे खरोखरच योग्य कारण होते का? यासाठी प्रथम खुलासा होणे आवश्यक आहे.

मी राहातो ती जागा कलेक्टर लँड आहे. ती जागा नावावर होण्यासाठी कलेक्टर अ‍ॅप्रूव्ह व ट्रान्सफर फी भरावी लागते. त्यानंतरच ती जागा आपल्या नावावर होते. मी यासाठी लागणारी सर्व रक्कम बिल्डरला दिली आहे, परंतु त्याने ती संबंधित कार्यालयात भरणा केली नाही. याबाबत आपण चौकशी केली तर सदर कार्यालयात दाद लागत नाही. आज या गोष्टीला चार वर्षे होऊन गेली तरी आम्हाला अप्रूव्ह लेटर मिळत नाही. बिल्डरही दाद देत नाही. उलट वारंवार चौकशी करून त्रास दिलात तर तुमचे नाव यादीतून काढून टाकीन अशी धमकी देतो. सदर बिल्डरची पूर्वीची देणी बाकी असल्यामुळे त्याचे काम पुढे सरकत नसल्याचे समजते. तर याबाबत आपण मार्गदर्शन करावे.
– अंकुश पाटील, बोरिवली (प.), मुंबई

आपला प्रश्न वाचला, परंतु त्यामध्ये काही गोष्टींचा उल्लेख आपण केलेला नाही. त्या म्हणजे आपण बिल्डरला जी रक्कम देऊ केली आहे त्याची पावती आपल्याकडे आहे का? जर आपणाकडे पावती असेल तर आपणाला त्याचा पाठपुरावा करणे सोयीचे होईल. दरम्यानच्या काळात आपण बिल्डरला लेखी पत्रे पाठवा व त्याची पोचपावती घ्या अथवा त्यांना पाठवायची पत्रे ही रजिस्टर पोस्टाने पाठवा. त्यामध्ये आपण दिलेल्या पैशाचा तपशील स्पष्टपणे लिहा व त्यावर त्यांनी आपणाला जे सांगितले की तुमचे नाव यादीतून काढून टाकीन, याचाही उल्लेख करा. या पत्राची प्रत मा. जिल्हाधिकारी यांना देखील पाठवा. याचा उपयोग न्यायालयीन कामकाजासाठी निश्चित होईल. यानंतर काय कृती करावयाची हे बिल्डरकडून येणाऱ्या प्रतिसादावरच अवलंबून राहील. त्यामुळे त्याबद्दल आणखी काही माहिती या ठिकाणी देणे शक्य नाही.

डीम्ड कन्व्हेयन्सला किती खर्च येतो?
– अशोक परब, ठाणे.

असा खर्च सांगणे अवघड आहे. आपल्याकडे असणारी कागदपत्रे त्यात असणाऱ्या त्रुटी या लक्षात घेतल्यानंतरच डीम्ड कन्व्हेयन्सबाबत अंदाज देता येईल.

अनधिकृत इमारतींचा पुनर्विकास करता येतो का?
– अशोक परब, ठाणे.

एकदा इमारत पाडल्यावर ती अधिकृत-अनधिकृत हा प्रश्न सहसा निर्माण होत नाही. कारण पुनर्विकासासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेणे आवश्यक असते. त्यामुळे आमच्या मते अनधिकृत इमारतीचा पुनर्विकास होऊ शकतो.

मी व माझा मुलगा असे दोघे जण स्लम एरीयातील एका दुमजली इमारतीचे मालक आहोत. त्याबद्दल पुढील प्रश्न आहेत ते असे-
१) भाडेकरूंनी अनधिकृत बांधकाम केले आहे, त्याबद्दल तक्रार करूनही दाद घेतली जात नाही. त्याबाबत काय करावे?
२) वाढीव अनधिकृत बांधकामांमुळे मालमत्ता कर वाढला असून त्याचा बोजा आमच्यावर पडत आहे. तो आम्ही भरला पाहिजे का?
३) संबंधित भाडेकरूंवर न्यायालयात खटला दाखल केला आहे व त्याचा निकाल आमच्या विरुद्ध गेल्याने आम्ही अपीलात गेलो आहोत. सदर अपील अद्याप प्रलंबित आहे, त्याचा निकाल बाकी आहे. याबाबत आम्हाला मार्गदर्शन करणे.
४) भाडेकरू आमची परवानगी न घेताच तिऱ्हाईत व्यक्तींना लिव्ह लायसन्स तत्त्वावर ठेवतात, तसे त्यांना करता येते का?
५) माझा मुलगा सरकारी नोकर असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यास अडचण येईल का?
– एस. एस. नाईक, मुंबई

आपले सर्व प्रश्न व पत्र वाचले. परंतु त्यामध्ये आपण एका मुख्य गोष्टीचा उल्लेख केलेला नाही तो म्हणजे आपली चाळ ज्या एरीयामध्ये आहे तो सर्व एरीया स्लम म्हणून जाहीर झाला आहे का? सदर एरीया स्लम म्हणून जाहीर झाला असेल तर मालकाला काही हक्क उरत नाही. भाडेकरू हे स्वत: मालक असल्यासारखे वागू शकतात. आपणाकडून आणखी एका बाबतीत खुलासा आवश्यक आहे तो म्हणजे आपल्या सर्व भाडेकरूंना फोटोपास मिळालेले आहेत का? याचा खुलासा असता तर आपल्या प्रश्नांना अधिक समर्पक उत्तर देता आले असते. आपली चाळ स्लम एरीया म्हणून जाहीर झाली आहे हे गृहीत धरून आपल्या प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे-
१) याबाबत स्लम एरीया डिक्लेअर झालेला असल्यामुळे अनधिकृत बांधकामांची जबाबदारी आपणावर येत नाही. आपण त्या भाडेकरूला आपण अनधिकृत बांधकाम केले आहे, हे नमूद करणारे सविस्तर पत्र पाठवावे व त्याची प्रत बृहन्मुंबई महापालिका आयुक्तांना आपल्या तक्रारपत्रासह पाठवावी. सदर पत्रे रजिस्टर एडीने पाठवून त्याच्या स्थळप्रती व पोचपावत्या जपून ठेवाव्यात.
२) आपण प्रत्येक भाडेकरूला आपला टॅक्स भरण्याबाबत रजिस्टरपत्र पाठवावे व प्रत्येक भाडेकरूच्या नावाने वेगळे करपत्रक देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत रजिस्टर पोस्टाने अर्ज करावा.  त्याचीही पोचपावती करणे अथवा रजिस्टर पोस्टाने पत्रव्यवहार करावा.
३) आपण कशासाठी खटला दाखल केला आहे त्याचा निकाल काय लागला, आपण कशासाठी अपीलात गेला आहात हे सर्व पाहिल्याशिवाय कोणताही सल्ला देणे आम्हास शक्य नाही.
४) जर सदर एरीया स्लम म्हणून डिक्लेअर झाला असेल तर त्याबाबत भाडेकरू ठेवण्यासाठी आपल्या परवानगीची जरुरी नाही. मात्र स्लम नसेल तर आपण मालक म्हणून प्रत्येकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकता.
५) आपला मुलगा सरकारी नोकर आहे याचा अडथळा कायदेशीर कारवाई करताना येणार नाही. मात्र आपणाला वेळ नसेल तर एखादा चांगला वकील शोधावा व त्याला याविरुद्ध खटले दाखल करण्यास सांगावे, तसे केल्यावर प्रत्येक दिवशी आपणाला त्या ठिकाणी जायची जरुरी नाही.
ghaisas2009@gmail.com
टॅक्स कन्सल्टंट अ‍ॅण्ड लीगल अ‍ॅडव्हायजर्स
ब्लॉक नं. २ ए विंग, तळमजला, चंदन सोसायटी, कीíतकर कंपाऊंड, नूरी बाबा दर्गा रोड, मखमली तलावाजवळ ऑफ एल.बी.एस. रोड, ठाणे (प.) ४००६०१.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2013 1:02 am

Web Title: vastumargadarshan response to readers quarries 2
Next Stories
1 वास्तुप्रतिसाद : पंचवटीचं सचित्र दर्शन
2 डीम्ड कन्व्हेयन्स : अपयशाची कारणे
3 डीम्ड कन्व्हेयन्स आणि शासकीय व्यवस्थेचा नाकर्तेपणा
Just Now!
X