News Flash

आजोळचे घर

खळाळणारी नदी, नदीपलीकडे रांगोळीच्या ठिपक्यासारखी दिसणारी घरं आणि मागे-पुढे आपल्याच नादात असलेली भावंडं, मोठी माणसं.

(संग्रहित छायाचित्र)

मोहना प्रभुदेसाई जोगळेकर

गडय़ाच्या खांद्यावर बसलेली, टुकूटुकू नजरेने आसमंत न्याहाळणारी लहानगी. खळाळणारी नदी, नदीपलीकडे रांगोळीच्या ठिपक्यासारखी दिसणारी घरं आणि मागे-पुढे आपल्याच नादात असलेली भावंडं, मोठी माणसं. त्यांच्या बोलण्याचे आवाज. पाहता पाहता गडय़ाच्या चालीने ते आवाज हवेत विरायला व्हायला लागतात, मागे पडतात. आता फक्त  साथीला आसमंत आणि गडय़ाचं झपाझप चालणं. बघता बघता त्या चिमुकलीला गडय़ाच्या खांद्यावर बसायचा कंटाळा येतो. ती खांद्यावरून उतरते. कपडय़ांवर उडालेली माती झटकत पुन्हा पुन्हा पायाने माती उडवत राहते. मातीतलाच हाताला लागलेला दगड उचलून नदीच्या दिशेने भिरकावते. तेवढय़ात मळकट कपडय़ातला, खांद्यावर काठी धरलेला गुराखी भेटतो. त्याच्याबरोबरची म्हैस संथपणे रस्ता ओलांडते. गडी आणि गुराखी गप्पांत रंगतात. एव्हाना मागे-पुढे असणारी सगळी एका लयीत चालायला लागलेली असतात.

हा प्रवास सुरू व्हायचा तो मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटणच्या पुलापाशी. गोवा महामार्गावरचा पुलाला लागून असलेला डेरेदार वृक्ष हाच मोसम गावाचा थांबा. पुलावरून एसटी वळली की फुर्रफुर्र आवाज करत तिथे थांबायची. गाडीतून उतरून मोसमच्या रस्त्याकडे तोंड केलं की वेगळ्या जगात पाऊल पडायचं. काळीभोर डांबरी सडक अचानक नाहीशी व्हायची आणि जिकडेतिकडे लाल माती दिसायला लागायची. दोन-अडीच मलांचा पट्टा असा पार झाला की, वळणावरची खोपटंवजा टपरी दिसायला लागायची. गडय़ाच्या आवाजात जोर यायचा. ‘‘आलं हा. चला बिगीबिगी.’’ हे शब्द कानावर पडले की कधी एकदा आजी-आजोबांपाशी पोचतोय असं होऊन जायचं. आणि कानावर घरात पोचण्याआधीच आजोबाचा ‘दम धर हां’ असा खणखणीत आवाज घुमल्यासारखा वाटायचा. त्यामागची नेहमीचीच आठवण ताजीतवानी होऊन समोर उभी ठाकायची. उन्हाळ्याच्या सुटीत दुपारी मोठय़ा मंडळींची वामकुक्षी आणि लहानग्यांचा धुडगूस- एकच वेळ. आजोबांच्या खोलीतल्या धनाडाळीवर सगळ्यांचाच डोळा. नानाआजोबा धनाडाळ जेमतेम एखादा चमचा हातावर टेकवणार आणि दादाआजोबा खोलीत जाण्याआधीच ‘दम धर हां’ असा हग्या दम भरणार.

टपरीत विसाव्यासाठी थांबलं की अशी कुठली ना कुठली आठवण निघायची आणि मोसमला सुटीसाठी कोण आलं असेल याचे अंदाज बांधले जायचे. तिथे बसल्या बसल्या लक्षात यायचं, वाटेत दोन मलाच्या अंतरात माणसांची चाहूल जवळजवळ नव्हतीच. इथे खोपटय़ात मात्र ये-जा चालू. कुणी ना कुणी येताजाता टेकलेलं. आजूबाजूच्या वस्तीतलं कुणी ना कुणी डोकावूनही जायचं. त्यांच्याशी मोठय़ाचं काही ना काही बोलणं चालू असे. तोपर्यंत काचेच्या बरणीतल्या रावळगाव, श्रीखंडाच्या वडय़ा खुणावायला लागायच्या. थोडासा हट्ट केला की हा खाऊ मिळायचाही. श्रीखंडांच्या लाल-पिवळ्या वडय़ा तोंडात टाकत अरुंद खडकाळ वाटेवरून पुन्हा पायी चालणं सुरू. लांबून गोठा दिसला की मुक्कामाला पोचल्यासारखंच वाटायचं. त्याच वेळी मोसमहून खारेपाटणकडे जाणारं कुणीतरी गडय़ाला विचारायचं. ‘‘खोतांचं पाव्हणं ना? जा बाबांनो वाट बघत्यात सगळे.’’ गडीच घाई करायला लागायचा. विस्तीर्ण माळावर डौलात (आमच्या दृष्टीने) उभा असलेला आमचा गोठा लागला की आता मोसम दूर नाही याची खात्री पटायची. गोठय़ात कधी गुरं दिसली नाहीत. त्याचा वापर धान्य साठवण्यासाठी व्हायचा. कदाचित घराजवळ गोठा बांधल्यावर या गोठय़ाचा वापर धान्यासाठी केला जात असावा. पण तरीही त्याला आम्ही गोठाच म्हणायचो. गोठय़ावर नजर खिळवून चालता चालता माळ संपायचा. आता सगळा उतार. करवंदांची जाळी, आंब्यांची झाडं. करवंदांचा मोसम असेल तर करवंदं खात उतरंडीवरून चालत राहायचं. निर्मनुष्य माळावरून उतरताना ‘ओ, बॉ, बॉ, बॉ’ अशा निर्थक आरोळ्या किंवा बोंब मारायला मजा यायची. क्वचित खालूनही तशाच आरोळ्या वर येऊन हवेत विरायच्या. ‘‘वहाळावर आलेले दिसतायत.’’ चालणारं यातलं कुणीतरी म्हणायचं. आणि थोडय़ाच वेळात वहाळावर चुबूकचुबूक कपडे धुणारी, पोहणारी, गायीला अंघोळ घालणारी माणसं नजरेला पडायची. त्यापलीकडे काठावर घरातलं कुणीतरी उभं असायचंच. वाट पाहणारं. लांबूनच हात हलवत धावतच सगळे वहाळपर्यंत पोचायचे. तिथपर्यंत पोचलं की मात्र, पाणी खोल असेल? पाण्याला जोर असेल? अशा शंका विनाकारण मनात यायला लागायच्याच. हळूच पाण्यात पाय टाकले जायचे. पाण्याच्या थंडगार स्पर्शाने थकवा पळून जायचा, उत्साह अंगात भिनायचा.

वहाळ पार केला की लगेचच घर.  बेडं उघडायचं आणि पटकन मधल्या वाटेने घरापाशी जायचं नाहीतर राजमार्गाने खळ्यात पोचायचं. खळं, खळ्यातला झोपाळा, ओटी, पुन्हा झोपाळा, ओटीच्या बाजूची खोली, माजघर, माजघरातून माडीवर जाणारा जिना, कोठीची खोली, स्वयंपाकघर- तिथली मातीची चूल आणि अंग शेकत बसलेली मांजरं, मागच्या अंगणात पडवी, तिथेच बाजूला विहीर, पायरहाट, हौद अशी कोकणातल्या जवळजवळ सगळ्याच घराची रचना असते तीच रचना मोसमच्या घराची. तिथे पोचलं की मीठमोहरी या घेऊन आजी ओवाळायला पुढे व्हायची. आजी कमरेत वाकलेली तर ताईआजी उंच, ताठ. दादाआजोबा, नानाआजोबा सगळेच आजोबा उंचेपुरे, ताठ असेच डोळ्यासमोर येतात. मोसमलाच राहणारी आमचे चुलतकाका-काकू आणि चुलत भावंडं त्यांच्यामागे दारात उभे असायचे. नावालाच हा चुलतपणा. सगळी एकत्र जमली की खऱ्या अर्थाने सुटी सुरू व्हायची. मुलांचा दंगा, खेळ, मोठय़ांच्या गप्पा, पडवीतले पत्त्यांचे डाव, आजोबांच्या खोलीतल्या पुस्तकांचा वाचून फडशा पाडणं, फणस, आंबे, रायवळ आंबे चोखून  खाणं, फणसाची सांदणं, ग्रामदेवतेचं दर्शन, उंडारता उंडारता टेकडीवरच्या शाळेत डोकावणं; एक ना अनेक आठवणी. दिवस असा संपला की संध्याकाळी झोपाळ्यावर परवचा जोरजोरात म्हणण्याची अहमहमिकाच असायची. झोपाळा जसा उंच जायचा तसं कंदिलाच्या मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात घराला वेढलेला काळोख अधिकच गडद व्हायचा. खिडकीतून स्वयंपाकघरात निरशा दुधाचा चहा पित बसलेली मोठी माणसं पाहिली की जरासा धीर यायचा. पण तरीही भुतांच्या, महापुरुषाच्या ऐकलेल्या गोष्टी चटकन मनात फेर धरायला सुरुवात करायच्या. जेवणं आटोपली, रात्र चढली की माजघरातल्या जमिनीवर अंथरुणं टाकली जायची. मोठय़ांचं बोलणं ऐकत डोळे काळोखात भुताची चाहूल घेण्यात व्यग्र व्हायचे. चित्रविचित्र भास होत राहायचे. रात्री देहधर्मासाठी उठून परसाकडे जाण्याचा तर विचारही मनात यायचा नाही. काळोखात दाराबाहेर पाऊल टाकण्याच्या विचाराने आधीच गाळण उडलेली असायची.  यातच कधीतरी डोळा लागायचा. सकाळ झाली की पुन्हा त्याच क्रमात सारं सुरू व्हायचं.

त्या लहानगींच्या मनातलं मोसम वास्तवात बदललं आहे. ते साहजिकही आहे. बदल होणारच. आपण ते कसे स्वीकारतो हे महत्त्वाचं. मोसमच्या घरातले जिवलग काळाच्या उदरात विश्रांती घेत आहेत. घरानेही नव्या चेहऱ्यांचं स्वागत करत कात टाकली आहे. रस्त्याचा लाल रंग डांबरी सडकेने केव्हाच पुसून टाकलाय. चारचाकी थेट दारापर्यंत जाते. पण माझ्या मन:पटलावरचं माझं मोसम तसंच आहे. बालपणातलं. ते मी पिंपळपानासारखं जपून ठेवलं आहे. पिंपळपानातल्या आठवणी कल्पनेत सजीव होतात. त्या स्मृतींची ही गोधडी. म्हटली तर पूर्ण म्हटली तर अपूर्ण. कारण अचानक कधीतरी आठवणींचा तुकडा अलगद समोर येतो. मग धांदल उडते तो तुकडा मनातल्या गोधडीत बेमालूमपणे ओवण्याचा, रंगसंगती साधण्याचा.  मोसम हे गाव आहे, तिथे माझं घर आहे तसंच ते नात्यांचं सार आहे. मोसमला एकत्र जमत आलेली आम्ही भावंडं लौकिक अर्थाने कितीतरी वर्षांत भेटलेलो नाही. पण ‘मोसम’ हा शब्द त्या सर्वांपर्यंत मनाने घेऊन जातो. कुठलीही वास्तू अशीच तर असते. नाती, परिसर, प्रसंगाच्या धाग्यांनी विणलेली. प्रत्येकाच्या मनातली वास्तू काही अंशी सारखीच असते, रंगाची छटा फक्त बदलत जाते. म्हणूनच वास्तुचे रंग नेहमी आकर्षून घेतात. कधी स्वत:लाच कधी स्वत:बरोबर इतरांनाही. जसं आज तुम्ही माझ्याबरोबर माझ्या वास्तूचे रंग जवळून अनुभवलेत.

अगदी तसंच.

mohanajoglekar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 8:10 pm

Web Title: vasturang article house of maternal grandfather abn 97
Next Stories
1 युती दारांची
2 ठाणे महापालिका क्षेत्र- नागरी पुनरुत्थान आणि समूहविकास योजना
3 चाळीतली संस्मरणीय दिवाळी..
Just Now!
X