डॉ. नागेश टेकाळे
शेजारच्या ताईंनी माझ्या घराचा दरवाजा सकाळीच ठोठावला तेव्हाच मी अंदाज केला की त्यांना नक्की काही तरी हवे आहे. आणि माझा हा अंदाज खरा ठरला. आमच्या कुंडीमधील ताज्या कडीपत्त्यासाठी त्या आल्या होत्या. कडीपत्ता दिल्यावर गॅलरीमधील कुंडीवर नजर टाकून त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही दोन रोपे आणलीत. एक मला दिले आणि एक तुमच्या या कुंडीत. तुमचा कडीपत्ता बहरला, माझ्याकडे मात्र निष्पर्ण झाला, असे का?’’
गॅलरीत बसल्यावर माझ्या शेजारच्या तिसऱ्या मजल्यावरील ताईंच्या सदनिकेची गॅलरी मी नियमित न्याहाळीत असे. एका कोपऱ्यात गवती चहा आणि दुसऱ्या कोपऱ्यात कडीपत्ता एवढीच हरित श्रीमंती तेथे होती, त्यापैकी कडीपत्ता मला कायम उदास वाटत असे. त्याचे खत, पाणी व्यवस्थित सुरू होते, मात्र पाने कमी होत होती. ताईंचे गॅलरीत येऊन कुंडीकडे पाहण्याचे काम नियमित चालू होते. पाने का कमी होत आहेत हे माझ्या लक्षात आले होते, पण जोपर्यंत त्या आपणहून मला विचारत नाहीत, तोपर्यंत मीही टाळत राहिलो. असेच दोन आठवडय़ांपूर्वी कडीपत्त्याच्या वाढत्या आजारामुळे चिंतीत होऊन त्यांनी मला तंबाखूचे पाणी कुठे मिळेल म्हणून विचारले. मी त्यांना म्हणालो, ‘‘का विकत मिळणार नाही, तुम्ही बाजारातून तंबाखू आणून पाण्यात उकळा आणि त्याचे तीव्र द्रावण कडीपत्त्यावर फवारा.’’
मी त्यांना तंबाखूही विकत आणून दिली, प्रयोगही झाला, पण सफलता मात्र नाही. कडीपत्ता आता जवळपास पर्णहीन झाला होता आणि ताईंना रविवारच्या सकाळी पोहे करण्यासाठी माझ्याकडे त्याची मागणी करावी लागली. दुपारी मी त्यांच्या घरी त्यांनी बोलावल्यामुळे गेलो. कडीपत्त्याची शेवटची फांदी पाहिली आणि पानाखाली लपलेली एक हिरवी अळी मी त्यांना दाखविली. ‘अळी कुठे आहे? मला कशी दिसली नाही?’ या त्यांच्या प्रश्नातच बेमालूम लपलेली ती अळी पाहिल्यावर तीन आठवडय़ांत कडीपत्त्याची पाने, पोह्यचा स्वाद न वाढवता कुठे गेली होती याचे उत्तर त्यांना मिळाले. ती अळी घेऊन मी घरी आलो आणि आमच्या बाल्कनीमधील कुंडीतल्या त्या सुंदर हिरव्या कडीपत्त्यावर तिला सोडले. ताई चिंतातूर नजरेने पाहात होत्या. आता आमचाही कडीपत्ता जाणार याची त्यांना खात्री पटू लागली आणि दुसऱ्याच दिवशी मी त्यांना सुगरण पक्षाने त्या अळीला पकडल्याचा फोटो दाखविला. ‘किती सुंदर!’ या त्यांच्या आश्चर्यचकित शब्दांना ‘पक्षी, अळी की कडीपत्ता?’ या माझ्या प्रश्नाने थोडे गोंधळात टाकले, पण तत्परतेने उत्तर आले, ‘तिन्हीही, पण तुम्हास हे कसे साध्य झाले?’ हे सांगण्यासाठी मात्र पत्नी, मी आणि त्यांची गॅलरीजवळच सकाळच्या वाफाळलेल्या चहासह एक छोटी बैठक झाली.
ताईंची गॅलरी कबुतरांच्या त्रासामुळे डास प्रतिबंधक जाळीने बंद केलेली होती आणि आतील दोन कुंडय़ा एकमेकांमधील संवादाविरहित दोन टोकाला विराजमान होत्या. जाळीमुळे कुठल्याही पक्षाला आतमध्ये प्रवेश नव्हता. आमच्या गॅलरीत जवळपास १८-२० कुंडय़ांची गर्दी होती. त्यात मोगरा, जाई, जुई, जास्वंद, कडीपत्ता, गवती चहा, कोरफड, सदाफुली, तुळस, ओवा, पुदिना, आळू, चिनी गुलाब, मनी प्लॅन्ट, गोकर्ण, लिली, ब्रह्मकमळ, पानफुटी यांची गर्दीच होती. कडक उन्हाळ्यामध्येसुद्धा खोलीत पंख्याखाली बसण्यापेक्षा गॅलरीतच बसावे असे वाटे. गॅलरीत फक्त औषधी वनस्पती आणि फुलझाडांचीच गर्दी नव्हती, तर तेथे फुलपाखरे आणि छोटे पक्षी यांची आवक-जावकसुद्धा होती. सुगरणीचे आगमन कोरफडीचा धागा काढण्यासाठी झाले होते. पत्नी सकाळीच तेथे तांदूळ ठेवत असे. मात्र या सर्व छोटय़ांची गडबड त्या कुंडय़ांच्या परिसरातच जास्त असे. माझ्या घरचा कडीपत्ता आणि इतर सर्व कुंडय़ांमधील झाडे आंनदी, टवटवीत होती ती या छोटय़ा सवगडय़ांमुळेच. गॅलरीमध्ये एक-दोन कुंडय़ांपेक्षा त्यांचा दहा-पंधराचा समूह असेल तर सर्व झाडे भरल्या गोकुळाप्रमाणे दिसतात, प्रत्येकामध्ये एक वेगळे अतूट प्रेमळ नाते तयार होते. डॉ. जगदिशचंद्र बोस यांनी तर या नात्यावर केवढे तरी शास्त्रीय संशोधन केले आहे. या नात्याच्या साखळीत लहान पक्षी, फुलपाखरे एक वेगळीच जैवविविधता निर्माण करतात आणि त्या सर्वाच्या सहवासाचा आनंद म्हणजे स्वर्गीय सुखच. आमची चर्चा सुरूच होती, एवढय़ात शाळेत जाण्यासाठी आलेला आमचा नातू सरळ गॅलरीकडे आला आणि मला बोटांनी काही तरी दाखवू लागला. चहाचा कप ठेवताना ताईंनी उत्सुकतेने नातवाच्या पाठीमागून गॅलरीकडे पाहिले, कुंडीच्या मागे बसलेल्या दोन चिमण्या, सुगरण, छोटा बुलबुल एकदम सावध झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी ताईची गॅलरी पाहिली तो अहो आश्चर्यम्- जाळी बदललेली होती आणि आत दहा-बारा नवीन कुंडय़ा, कडीपत्ता आणि कोरफडीसह आल्या होत्या. ‘‘आता येईल ना तुमची सुगरण इकडे?’’ ताईंच्या प्रश्नाला उत्तर देत मी म्हटले. ‘‘अहो फक्त सुगरणच का? आता सर्वच तेथे येतील, पण तुमच्या नातीला ते बघू द्या, कारण बालवयामधील त्यांचा दफ्तरविरहित हाच खरा अभ्यास आहे.
nstekale@gmail.com