मधुसूदन फाटक

बीडीडी चाळींपैकी वरळी, नायगाव, परळ येथील चाळींची पुनर्बाधणी झाली की सुमारे पाचशे मराठी कुटुंबे जुन्या चाळ संस्कृतीमधून बाहेर पडून बंद दरवाजांच्या फ्लॅट संस्कृतीत स्थलांतरित होतील. हे होत असतानाच ताडदेवनजीकच्या चिखलवाडीतील चाळीच्या नूतनीकरणाला मान्यता मिळाली आहे. यामुळे मुंबईच्या चाळ संस्कृतीवर मोठा हातोडा पडणार. त्याआधी अनेक कुटुंबीयांना माफक भाडय़ात मुंबईकरांना निवास देणाऱ्या त्या चाळी कशा आहेत. या वेळी गरीब मध्यमवर्गीयांनी वर्षांनुवर्षे जोपासलेली चाळ संस्कृती कशी आहे त्याच्या स्मृती जागृत न झाल्या तर नवल.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
Rural Health Services pregnant woman from Nandurbar lost her life due to lack of timely medical care
ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!

कोकणातून आणि घाटावरून रोजीरोटीसाठी मुंबईत आलेल्या मुंबईकरांना निवारा कसा द्यावा असा पेच फारसा पडला नाही. काही विभागांत, मुंबईत ज्या सैनिकांसाठी बराकी उभ्या राहिल्या त्या महायुद्ध संपल्यानंतर निरुपयोगी झाल्या होत्या. या बराकींमधून बांधकाम व्यावसायिकांना (बिल्डर) ला नवमुंबईकरांसाठी चाळी उभारण्याची कल्पना सुचली आणि वर उल्लेखिलेल्या कामगार वस्तीमध्ये त्यांची बॉम्बे इम्प्रुव्हमेंट ट्रस्टच्या साहाय्याने प्रथम चाळी उभारल्या. त्याच त्या बीडीडी चाळी. हा चाळ उभारणीचा प्रारंभ! हेही तितकेसे खरे नाही, कारण त्याआधीही काही धनाढय़ व्यापाऱ्यांनी ठाकूरद्वार, गिरगाव, ताडदेव, आग्रीपाडा येथे पांढरपेशा मुंबईकरांसाठी चाळी उभारल्या होत्या. तर कापडगिरणी मालकांनी गिरणगावातही त्या उभारल्या. त्यात आश्रय घेतलेल्या कुटुंबीयांनी एक फार मोठे समाजकार्य केले होते. ते म्हणजे संयुक्त समाज ही कल्पना रुजवली आणि मराठी संस्कृतीही जपली.

गिरगाव हे तर चाळ संस्कृतीचे माहेरघरच. मुंबईचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करणारी केशवजी नाईकांची चाळ, त्यानंतर एकामागोमाग एक असे उत्सव सुरू करणाऱ्या कामत चाळ, जगन्नाथ चाळ, शांतारामाची चाळ यांनीही उत्सव सुरू केले आणि आदर्श समाज घडविण्याचे एक मोठे काम वर्षांनुवर्षे पार पाडले.

या चाळींच्या उभारणीचा एक साचा ठरलेला होता. रस्त्यालगतचा तळमजला बांधून त्यावर तीन-चार मजले उभे करायचे आणि तीस-चाळीस कुटुंबांच्या निवासाची सोय करायची, चाळीमध्ये दोन खोल्यांची एक निवासी जागा, तेथे प्रवेशासाठी एक सामाईक लांबच्या लांब गॅलरी, तेथे पोहोचण्यासाठी एका टोकाला एक अरुंद जिना (दादर) आठ-दहा फुटांच्या व्हरांडय़ालगत एक शंभर चौरस फुटांची खोली व लागूनच ऐंशी स्क्वेअर फुटांचे स्वयंपाकघर, एका टोकाला शौचालये आणि वॉकिंग स्पेस, दोन पाण्याच्या तोटय़ा सर्व माफक, यातून बांधकाम खर्चाची बचत साधली जात असे. यामुळे निवासी गाळय़ांचे  भाडे माफक असे. साधारणत: पंचवीस ते तीस रुपये प्रतिमास असे. निम्नवर्गीयांना परवडणारे या भाडे वसुलीसाठी जागा मालकाने एक माणूस मुक्रर केलेला असे. आपण कोणाच्या इमारतीत राहतो आहोत हे भाडेकरूंना माहीतही नसे. पण तशी गरजही भासत नसे. निवासी जागेत जर काही लहानसहान दुरुस्त्या करून घ्या असे उत्तर दिले जाते. या अल्प भाडय़ात मला ते शक्य नाही. एकदा ठरलेले भाडे अमर्याद वाढले जाऊ नये म्हणून शासनाने भाडे नियंत्रण कायदा लागू केला होता ना! यातील अनेक चाळींचे आयुष्य शंभरीसुद्धा ओलांडून गेले तरी दुरुस्तीचे नाव नाही. धोकादायक जागेत जीव मुठीत धरून राहण्याशिवाय गत्यंतर नसे, निवास बदलण्याची कोणाचीही तयारी नसे. कारण आर्थिक अक्षमता आणि सामाजिक बांधिलकी.

अखेर म्हाडा निमशासकीय संस्थेने ही जोखीम घेतली, त्यातल्या भाडेकरूंवर अल्पसा दुरुस्ती कर लावला. तोपर्यंत या चाळीतून कुटुंबाच्या तीन तीन पिढय़ा राहत होत्या. पण म्हाडाच्या योजनेमुळे जीर्ण चाळींनी कात टाकली. या चाळींच्या निवासाचे दरवाजे दिवसभर उघडे असत. हे या संयुक्त समाज संस्कृतीचे वैशिष्ट. चाळीतील कुटुंबामध्ये खूप एकोपा असे. लहानसहान सण उत्सव वाढदिवस विवाहपूर्व केळवणे व्हरांडय़ामध्ये एकत्रित साजरी केली जात. कारण सर्वाचा एकच आर्थिक स्तर हे मुख्य कारण चाळीच्या समोरील पटांगणामध्ये होणारे महाउत्सव हे येथेच राहण्याचे आकर्षण होते. गणेशोत्सवातील नाटकांमध्ये सहभागी होणे, विसर्जनाच्या दिवशी लेझीम खेळत आणि टाळ वाजवीत वारकरी नृत्य करणे आणि प्रतिष्ठितपणाची झूल झुगारून देऊन बेभान होणे यामुळे नवी पिढीही या वातावरणाला चटावली. अशी ही प्राचीन चाळ संस्कृती आता लोप पावू लागली आहे. या चाळींनी कोणाला भुरळ घातली नाही? सिने निर्मात्यांना, नाटककारांना, पु. ल. देशपांडेंसारख्या प्रतिभावंतालाही बटाटय़ाची चाळ तुफान विनोदी आणि अमर करून चाळ संस्कृतीची गंमत अनेक दशके रसिकांसमोर आणून अमर केली. चाळीच्या नवीन कायद्यामुळे चाळीतील निवासी गाळय़ांना आधुनिकीकरणही करता येऊ लागले. ज्येष्ठ नागरिकांची गरज म्हणून कमोड टाइप शौचालय बसवण्याची (अर्थात स्वखर्चाने) अनुमती मिळाली. पाणीटंचाईला उपाय म्हणून बाथरूमवर पाणी साठवण्याची टाकी उभारणे, जुन्या जमिनीवर टाइल्स बसविणे आणि कामे मालकाच्या अनुमतीशिवाय होऊ लागली आणि चाळ निवासाला फ्लॅटचे स्वरूप येऊ लगले. तरीही या चाळ संस्कृतीत जडणघडण झालेले अनेक मान्यवर मुंबईकरांना आपण चाळकरी होतो याचा अभिमानही होता. फणसवाडीतील जगन्नाथांच्या चाळीतील मुंबईतील अल्प वास्तव्यातील रहिवासी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, कामत चाळीतील श्रीपाद अमृत डांगे, शास्त्री हॉलमधील आनंदी चाळीतील भास्करबुवा बखले आणि पावसचे स्वामी स्वरूपानंद (पूर्वाश्रमीचे गोडबोले), गिरणगावच्या चाळीतील शाहीर साबळे, लॅिमग्टन रोडवरील चाळीतील गोवा हिंदू असोसिएशनचे अनेक निवासी कलाकार, समोरच्या त्रिभुवन रोडमधील चाळीतील विजया जयवंत आदी मान्यवर चाळीत राहूनच आपल्या क्षेत्रांत चमकले. अशी ही एकेकाळची विख्यात चाळ संस्कृती इतिहासजमा होऊ घातली आहे याचा खेद होतो, पण परिवर्तनाच्या या काळात हेही अपरिहार्य आहे जे खेदाने स्वीकारताना त्याच्या स्मृतीची जपणूक करणे हेच उरते. वारसा वास्तू जपणूक म्हणून एखादी तरी चाळ मूळ अवस्थेत जपून ठेवावी.