कविता भालेराव

मेट्रो सिटीमध्ये स्वत:चे घर.. हे फारच अवघड असते. ऑफिस आणि घर यांच्यातील अंतर यांतील वेळेचे गणित बसवताना आपले घरासाठी असलेले बजेटचे गणित बिघडते. बऱ्याचदा आपल्याला घर भाडय़ाने घेऊन राहणे सोईचे असते, पण तेही सोपे नसते. मनासारखे घर मिळाले तरी ते किमान दोन-तीन वर्षे नीट राहता येईल असे तर हवे. पण भाडय़ाच्या घरात सगळेच काही मिळत नाही, म्हणून आपण फक्त उतारकरू सारखे तर नाही ना राहू शकत. या कल्पनेचा विचार करूनच टेंशन येते की, आपण रोज बॅगमधून कपडे काढतोय. भांडी रोज बॉक्समधून काढतोय.. हे सगळे बरोबर आहे, पण आपण असे काय करू शकतो, ज्यामुळे फार खर्च न करता थोडे बजेट ठेवून भाडय़ाचे घरही सुंदररीत्या सजवू शकतो.

सर्वात प्रथम तर आपले सामान हे प्रवाहाबरोबर वाहते करावे. वस्तूंची साठवण कमी करणे, म्हणजे पटकन आपल्याला घर बदलणे आणि परत लावणे सोपे जाते.

सुटसुटीत फर्निचर ही खरी गरज ठेवावी. पटकन हलवता येईल, भिंतीला लागून ठेवता येईल असे. फिक्स फर्निचर ही कन्सेप्ट या घरांना लागू होत नाही. (अपवाद जर का आधीच काही स्टोअरेज असेल तर मग काही प्रश्नच नाही.)

आपल्या गरजेप्रमाणे आपण कपाट बनवून घ्यावे. शक्यतो लॉफ्ट टाळावा. म्हणजे परत सामान हलवताना कपाट काढून ते आपण परत दुसरीकडे नीट लावू शकतो. अशा वेळी लॉफ्टची उंची मात्र बदलू शकते आणि फिक्स लॉफ्ट केला तर फारच तोडफोड होते. कपाट बनवताना दरवाजाच्या उंचीचाही विचार करावा, नाहीतर दुसरीकडे दरवाजाची उंची कमी म्हणून कपाट कापावे लागते. ही खूपच छोटी गोष्ट वाटते, पण नंतर मोठे नुकसान होते. कपाटातील कप्पे काढता येतील असे बनवावे.

बेड बनवताना स्टोरेज नको असा विचार करूनच बनवावा. रूम छोटी असेल तर अशा पद्धतीच्या बेडमध्ये ती मोठी वाटते. आणि अगदी स्टोरेज हवे असेल तर ते वेगळे करता आले पाहिजे. डबल बेडही दोन पार्टमध्ये बनवावा म्हणजे त्याचे ट्रान्सपोर्ट सोपे जाते. घर बदलताना बेड लिफ्टमधून नेता येईल. बेडची मागची बाजूही वेगळी करता आली पाहिजे. साईड टेबलही लावता येईल असेच बनवून घेणे.

किचनमध्ये रॅक पद्धतीचे स्टोरेज वापरावे. आजकाल अतिशय सुरेख रॅक मिळतात. किंवा आपल्याला बनवून घेता येत असेल तर खूपच छान. किचनमध्ये काही सुंदर शेल्फचाही वापर आपण करू शकतो. याशिवाय नॅपकिन रॉड, हूक अशा छोटय़ा असणाऱ्या वस्तू आपण जर का सुबक आणि कलापूर्ण घेतल्या तर किचन फारच छान दिसते. आजकाल फारच वेगवेगळ्या प्लास्टिकचे / मेटलचे ड्रॉवर बाजारात मिळतात, आपण त्याचाही वापर करू शकतो.

सोफा, सोफा कम बेड काहीही असेल तरी खूप जड बनवून घेऊ नये. लिव्हिंग रूममध्ये सोफा- कम-बेड असेल तर चार पाहुणे आल्यावर सोफ्याचा पटकन बेड बनवता येतो. सेंटर टेबलही कॉफी टेबल आणि स्टोरेज युनिट असे बनवून घ्यावे. फर्निचर बरोबरच काही अजून गोष्टी असतात- ज्या हलवता येत नाहीत. त्या फारच महत्त्वाच्या असतात.

भाडय़ाच्या घरात आपल्याला मनासारखे लाइट पॉइंट मिळतातच असे नाही. हँगिंग लाइटचा खुबीने वापर केला तर छानच मूड तयार होतो. सीलिंग नसेल तरी आजकाल सरफेस फिटिंग लाइट्ही सुंदर मिळतात.

भिंत..आपण मोकळ्या भिंती या खूप सामान जमवून वा खूप कपाट बनवून गुदमरून टाकतो. खूप कपाटं करून गर्दी होते. मोकळ्या भिंती छान वाटतात. खूप काही वेगळ्या प्रकारे भिंत सजवू शकत नाही, पण एखादी वेगळ्या रंगाची भिंत छान वाटते. साधासा वॉलपेपरही एक वेगळा लुक देतो. सुंदर पेंटिंग्ज्, फ्रेम, फोटो वॉल, सुबक शेल्फ या सगळ्यांचाही आपण उपयोग करून घेऊ शकतो.

पडदे तर महत्त्वाचेच. लाइटनुसार आपल्याला पडदे पारदर्शक घ्यायचे की अपारदर्शक हे ठरवता येते. गडद रंगाचे पडदे छान वाटतात. पण गडद रंगाचे पडदे लाइट रंगाच्या वॉलवर आणि भरपूर उजेड असणाऱ्या रूममधेच छान वाटतात. छोटय़ा खिडकीला रोमन ब्लाइंडही छान वाटतात.

खिडकीत आपण हँगिंग प्लॅन्ट वापरू शकतो. ग्रीलवरही प्लॅन्टचे ग्रील पॉट येतात ते अडकवू शकतो. विविध प्रकारचे गार्डन डेकोर मिळते, आपल्या जागेनुसार आपण त्याचा वापर करू शकतो.

याशिवाय कार्पेट, कुशन कव्हर, शोभेच्या वस्तू आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सावलीत वाढणारी झाडे- याअगदी सोप्या वाटणाऱ्या, पण घराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या वस्तू ठेवू शकतो.

घर कोणाचे आहे, त्यात काय असायला हवे होते.. इत्यादी मुद्दय़ांवर चर्चा करण्यापेक्षा आणि आपले स्वत:चे घर नाही यावर हळहळण्यापेक्षा नवीन दृष्टीने या घराकडे बघायला हवे. आपण ज्या घरात राहणार आहोत ते आनंदी ठेवणे हेही आपलेच कर्तव्य आहे. घर उपयुक्त आणि सुंदर असले तरच आनंदी राहते.

(इंटिरियर डिझायनर)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

kavitab6@gmail.com