शुभांगी पासेबंद
डायनिंग टेबलमुळे गृहिणींची सोय झाली. आजीचे पाय दुखतात किंवा जेवताना कोणी मूल आलेले असेल तर त्यांचे पाय ताटाला लागतात. पाणी लवंडत. ताटात धूळ पडल्यासारखं वाटतं.. अशा अनेक कारणाने डायनिंग टेबलच्या प्रसाराची सुरुवात झाली.
डायनिंग टेबल असं लिहायचं ठरवलं, पण मग इंग्रजी शब्द येतो म्हणून ते टाळलं. पण शेवटी टेबल हा इंग्रजी शब्द आलाच. कारण जेवायचे मेज असं म्हटलं असतं तर फारसं कुणाच्या लक्षात आलं नसतं. जेवणाचं टेबल ही खास परकीय लोकांकडून, गोऱ्या साहेबांकडून भारतात आलेली गोष्ट आहे.
पूर्वी चूल असे. चूल खाली आणि तिथेच समोर पाटावर बसून जेवणं होत असत. जमिनीवर मांडी घालून बसणं यात कुणालाच कमीपणा वाटत नसे. परकीय लोकांना जमिनीवर बसून जेवण्याची सवय नव्हती. त्यामुळे गोरे साहेब जेव्हा भारतात आले, तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत हे जेवायचं मेजसुद्धा आणलं. जमिनीवरच बसून एक छोटं चौपाई सारखं घेऊन त्याच्यावर मुनीमजी, मुलं लिहीत असत. किंवा अन्य लोक अभ्यास करत. पण जेवणाच्या मेजची संकल्पना परकियांनी मांडली.
टेबलचा फायदा असा असतो की ते जमिनीपासून उंचावर असल्यामुळे वारंवार जमिनीच्या दिशेने झेप घेऊन वाकावं लागत नाही. जमिनीला स्पर्श करावा लागत नाही. वस्तू वरच्यावर मिळतात. जेवायला खुर्ची घेऊन बाजूला बसलं की तीही सोय होते. खाली बैठक मांडावी लागत नाही. डायनिंग टेबल हे काही ठरावीकच घरी असायचं. घरोघरी डायनिंग टेबलची पद्धत तेव्हा तरी नव्हती. साधारणपणे माझ्या आठवणीनुसार, १९७० सालात माझ्या घरी डायनिंग टेबल आलं. सनमायका लावलेलं टेबल म्हणजे त्याकाळी खूपच अप्रूप होतं. त्याऐवजी पॉलिश केलेली लाकडी टेबल आणि त्याच्यावर टेबल क्लॉथ घालून जेवणासाठी, अभ्यासाला कशालाही वापरली जायची. एकच टेबल जेवायला, एकच टेबल अभ्यासाला असंसुद्धा वापरलं जायचं. पण डायनिंग टेबल साधारण १९७० सालापासून आलं. कौतुकाची बाळं डायनिंग टेबलवरच बसत.
पण डायनिंग टेबलमुळे गृहिणींची सोय झाली. आजीचे पाय दुखतात किंवा जेवताना कोणी मूल आलेले असेल तर त्यांचे पाय ताटाला लागतात. पाणी लवंडत. ताटात धूळ पडल्यासारखं वाटतं.. अशा अनेक कारणाने डायनिंग टेबलच्या प्रसाराची सुरुवात झाली. डायनिंग टेबलच्या खालची जागा स्टूल खुर्ची, मग न लागणारी तांबे-पितळेची भांडी, गाद्या, मुलांची अभ्यासाची दप्तरं ठेवून वापरली जाई. ही जागा वस्तूंनी व्यापून जात असे. नंतरच्या काळात फोल्डिंग डायनिंग टेबल आलं. म्हणजे जर घर लहान असेल तर त्या डायनिंग टेबलची अडचण होऊ नये म्हणून तीन भागांपैकी दोन भाग (साईडचे) फोल्ड व्हायचे. आणि मधल्या भागा एवढीच उंच जागा उरे. हे टेबल कोपऱ्यात सरकवलं की मोकळी जागा शिल्लक राहायची. ते टेबलही बरेच दिवस फॅशन सोय म्हणून गाजले. नंतर एक नुसतीच एक फळी भिंतीला टांगायची पद्धत आली. खाली रॉड लावून ती फळी जेवायच्या वेळी डायनिंग टेबल म्हणून वापरायची. आणि अन्यथा वर लटकवून किंवा खाली टाकून द्यायची अशी असायची.
चौकोनी, आयताकृती, गोल, बदामाच्या पानाच्या आकाराचे, षटकोनी.. अशा विविध आकारांच्या डायनिंग टेबलची फॅशन यादरम्यानच आली. पण जागा बचत करायला नंतर मग मधल्या काळात साधारणपणे १९९०च्या सुमारास एक मोठी शोकेस घ्यायची पद्धत मध्यमवर्गीयांकडे आली. तसे शोकेसमध्ये टीव्ही, पुस्तक, फोन सगळंच असायचं. ती शोकेस दुभाजकासारखी आडोसा बने. त्या शोकेसचा खालचा भाग, एक फळी, दंडुक्याच्या साहाय्याने वर ओढून त्याला अडचण लावून ती फळीच डायनिंग टेबल सारखी वापरली जायची. जेवण झाले की ते टेबल परत खाली जायचं.
आज या गोष्टी आठवायचे कारण म्हणजे माझ्या सासूबाईंनी खूप हौशीने अक्रोडाच्या लाकडाचे डायनिंग टेबल बनवून घेतलं होतं. कुठेतरी खास ठिकाणी गेल्यावर बऱ्यापैकी म्हणजे त्याकाळी शंभर रुपयाला असं ते डायनिंग टेबल आणि चार खुच्र्या घेतल्या होत्या. खुच्र्या अगदी हलक्या होत्या. नाही तर डायनिंग टेबलची खुर्ची उचलायला त्रासदायक होत असे. ते आता जुनं झालं म्हणून माझ्या जाऊबाईंनी मोलकरणीला देऊन टाकलं. त्यांना वाईट वाटलं.
दरम्यान योगायोगानं त्याच वेळी मीही माझं जुनं डायनिंग टेबल फार मोठं होतं म्हणून कामवाल्या बाईला देऊन टाकलं. तिने ती फळी झोपायला म्हणून वापरली. खालचा लाकडी स्टॅन्ड देऊन टाकला. त्यावेळी माझा सुतार म्हणाला, ‘‘ताई वरची फळी लाकडी होती. खालचा स्टॅन्ड लाकडी मजबूत होता. आपण काच लावून त्याच काचेचं डायनिंग टेबल करून वापरलं असतं.’’ मग त्याने तीच आयडिया वापरून माझा तो रिनग टेबलचा खालचा साचा घेऊन काच लावून ते विकलं. मी मग पावडर कोटेड ऑक्सीडाईजड डायनिंग टेबल आणलं. त्याच्यावर काचही होती. पूर्वीच्या काचा फुटायच्या म्हणून आता टफन ग्लास वगैरे प्रकारच्या काचा निघाल्या.
आज स्वयंपाकघराचं घरपण डायनिंग टेबलनं आहे. टेबल घरा घरांत आहेत. माझ्याच घरात काय, आज घरोघरी डायनिंग टेबल असतं असं मला वाटतं. गृहिणींना वाढणं, मांडणं, वावरणं यासाठीही ते सोयीचं झालंय. एकदम एकत्र येऊन जेवता येतं. वारंवार उठबस करावी लागत नाही. डायनिंग टेबलला मानाचं स्थान मिळालं. स्वयंपाक खोलीतील फर्निचरच्या प्रगतीतील डायनिंग टेबल हा एक मोठा महत्त्वाचा हिस्सा आहे.