सुदृढ पर्यावरणाचा बळी देऊन शहरे वाढली आणि बकालसुद्धा झाली. भटकी कुत्री आणि कावळ्यांच्या संख्येत होणारी लक्षणीय वाढ ही याचमुळे. गृहसंकुलात भटक्या कुत्र्यांचे अस्तित्व हे परिसर असुरक्षित असण्याबरोबरच अस्वच्छतेचेसुद्धा दर्शक आहे.
म नुष्याच्या सहवासात असणाऱ्या पाळीव प्राण्यांमध्ये सर्वात जास्त समस्या असलेला प्राणी म्हणजे श्वान. कुत्र्यास संस्कृतमध्ये श्वान असे म्हणतात. हा गळ्यात पट्टा घालून कुटुंबाचा घटक सदस्य म्हणून तरी असतो किंवा गृहसंकुल जवळच्या रस्त्यावर भटक्याच्या रूपात फिरत असतो. पट्टा बांधलेला कुत्रा हा सदनिकेमध्ये अथवा बंगल्यावर सांभाळलेला असतो. त्याची रीतसर नावनोंदणी असते व सोसायटीच्या नियमांनुसार त्याचे पालनही होते असे असूनही त्याचे भुंकणे, शी आणि शू हा सदस्यांमध्ये वादावादीचा मुद्दा ठरूशकतो.  रस्त्यावरील भटके कुत्रे नेहमी लहान टोळीमध्ये असतात. एकदा का त्यांचा प्रवेश संकुलात झाला की मग त्यांना बाहेर काढणे अवघड होऊन बसते. पूर्वी महानगरपालिकेच्या कुत्रा पकडणे या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत असे. पण आता ही भटकी कुत्रे वेळीच सावध होऊन त्या कर्मचाऱ्याचा चांगलाच घाम काढतात. गृहसंकुलात भटकी कुत्रे येण्याची विविध कारणे आहेत, त्यातील एक मुख्य म्हणजे श्वान प्रेम. काही लोक त्यांना शिळे, ताजे अन्न, बिस्किटे, पाव, टोस्ट खाऊ घालतात. वास्तविक कुत्रा हा मांसाहार करणारा शिकारी प्राणी आहे. त्याच्या दातांची रचनासुद्धा अन्न फाडून खाणारी आहे. शाकाहारी अन्न खाताना त्याचे हाल होतात. भूक ही पशूंना माणसाचा कसा गुलाम बनविते याचे हे उदाहरण आहे. गृहसंकुलाबाहेर कचरा कुंडी ओसंडून वाहत असेल तर तेथे भटकी कुत्री अन्नाच्या शोधात हमखास गर्दी करतात आणि ते खाल्ल्यावर पुन्हा मिळवण्यासाठी इतर ठिकाणी जातात. अशा वेळी नजीकच्या गृहसंकुलाचे फाटक उघडे असेल तर त्याची आतील आनंद यात्रा सुलभ होते. पावसाळा हा कुत्र्यांचा प्रजनन काळ. गृहसंकुलात एखादी मादी आली तर तिच्या शोधात माग काढत इतर कुत्रे आत येतात. गृहसंकुलातील पाळीव कुत्रा मालकाबरोबर बाहेर फिरावयास आल्यावर त्याच्या गोंडस रूपडय़ावर भाळून अनेक भटकी कुत्रे त्याच्याशी मत्री करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या निमित्ताने त्यांचे संकुलात आत-बाहेर चालू होते. आत आलेली कुत्रे कायम सुरक्षित निवाऱ्याच्या शोधात असतात. पाìकग जागामधील वाहनाखालील जागा त्यांना जास्त आवडते. दररोज गाडय़ा धुण्याच्या पद्धतीमुळे खाली थंडावा असतो याचाही ते फायदा घेतात. गृहसंकुलातील दुर्लक्षित बागा, ओसाड, अडगळीच्या जागा येथे त्यांना जास्त सुरक्षितता मिळते. एखादी कुत्री आत येऊन प्रसूत झाली तर तिला मनुष्य दयेचा पूर्ण अधिकार मिळतो आणि उघडय़ावर का होईना तिचे कुटुंब संकुलात व्यवस्थित बस्तान बसविते.
भटके श्वान गृहसंकुलात अजिबात असू नयेत, त्यांच्या वेळी-अवेळी भुंकण्यामुळे रहिवाशांचे मानसिक स्वास्थ्य बिघडते. त्याचबरोबर रात्रीच्या नीरव शांततेत त्यांचे दीर्घ केविलवाणे ओरडणे, त्यांची आपआपसातील भांडणे अनेकांचा निद्रानाश करतात. रात्री कामावरून उशिरा येणाऱ्यांना त्यांच्यामुळे असुरक्षित तर वाटतेच, पण त्याचबरोबर लहान मुलांना त्यांच्या अचानक आक्रमणाची व चावण्याची भीतीही निर्माण होते. भटक्या कुत्र्यांची पडलेली विष्ठा हीसुद्धा एक डोकेदुखीच असते.
सुरक्षारक्षकांच्या हस्ते काठीने मारून त्यांना पळविणे हा एक उपाय असला तरी त्यामुळे मूळ प्रश्न सुटत नाही. एकदा का तीन-चार भटकी कुत्री संकुलात आली की त्यांची टोळी बनते आणि ते इतर कुत्र्यांना आत येऊ देत नाहीत हे जरी सत्य असले तरी त्यांच्या बच्चे कंपनीमुळे भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्यता जास्त असते. कुत्र्यांना मारणे, शारीरिक इजा पोहोचविणे हा शिक्षापात्र गुन्हा आहे. कायद्याच्या कक्षेत राहून महानगरपालिकेच्या मदतीने गृहसंकुल श्वानमुक्त होऊ शकते मात्र त्यासाठी सर्व सदस्यांचे सोसायटीस पूर्ण सहकार्य हवे. प्रशिक्षित सुरक्षारक्षक भटक्या कुत्र्यांना सहजपणे बाहेर काढू शकतात. मादी कुत्री जर संकुलाबाहेर गेली तर इतर कुत्र्यांचा आपोआप बंदोबस्त होतो. गृहसंकुलातील विविध कार्यक्रम, उत्सव आणि नंतरच्या जेवणांच्या पंगती हे कुत्र्यांना आत येण्यास उघडपणे दिलेले आमंत्रणच असते. संकुलातील मंदिर व आसपासचा परिसर हे त्यांच्यासाठी कायम सुरक्षित ठिकाण. सदनिकेमधून गोळा केलेल्या कचऱ्यातील शिळे अन्नपदार्थ आणि इमारतीच्या डागडुजीमध्ये दुर्लक्ष असेल तर गृहसंकुलात भटक्या कुत्र्यांचे प्राबल्य वाढते. त्यांच्यापासून रक्षण करण्यासाठी रहिवाशांनी काही पथ्ये जरूर पाळावीत. लहान मुलांनी त्यांच्या समोरून पळू नये, कुत्रा भुंकत असेल तर त्याच्याकडे न बघता निघून जावे, त्यास काठी अथवा दगड मारू नये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सदस्यांनी त्यांना खाऊपिऊ घालून श्वान प्रेम वाढवू नये.
सुदृढ पर्यावरणाचा बळी देऊन शहरे वाढली आणि बकालसुद्धा झाली. भटकी कुत्री आणि कावळ्यांच्या संख्येत होणारी लक्षणीय वाढ ही याचमुळे. गृहसंकुलात भटक्या कुत्र्यांचे अस्तित्व हे परिसर असुरक्षित असण्याबरोबरच अस्वच्छतेचेसुद्धा दर्शक आहे हे वेगळे सांगावयास नको.

Survey, Finds 58 percentage Indians, Suffer from Mosquito Bites, Affecting sleep, Affecting Productivity, Mosquito Bites, Indians Mosquito Bites, gcpl survey,
डासांमुळे निम्म्या भारतीयांची होतेय झोपमोड; महाराष्ट्रासह पश्चिम भारताला बसतोय सर्वाधिक फटका
What are the reasons for increase in average life expectancy of Indians
भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढतेय… कारणे कोणती?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!