गौरी प्रधान

इंटिरिअरबद्दल आणि त्यातही फर्निचरबद्दल लिहीत असताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली. ती म्हणजे, फर्निचरसंबंधीच्या लेखांमध्ये निरनिराळ्या फर्निचरच्या प्रकारांबद्दल लिहिले जाते, परंतु दरवाजे या विषयावर मात्र अभावानेच लिहिले जाते. फक्त घरापुरता विचार करता देखील कित्ती निरनिराळ्या प्रकारच्या दरवाजांशी आपला रोजचा संबंध येतो. अगदी दणकट असा मुख्य दरवाजा- जो घरात एक सुरक्षेची भावना निर्माण करतो. फारसे दणकट नसले तरीही व्यक्तिगत प्रायव्हसी जपणारे बेडरूमचे दरवाजे. आडोशाचे काम करणारे न्हाणीघराचे दरवाजे आणि आगंतुकाच्या नजरेपासून घराच्या अंतर्गत भागाला सुरक्षित ठेवतानाच घराच्या सौंदर्याला चार चांद लावणारे नाजूकसे काचेचे दरवाजे. आता इतक्या प्रकारच्या दरवाजांशी जर आपला संबंध येत असेल तर त्यांच्याबद्दल यथायोग्य माहिती देखील आपल्याला हवी, नाही का?

duvartanacha vedh marathi book
वर्तन कारणांचे उत्खनन
how to make kaju curry at home
Recipe : घरच्याघरी बनवा ढाबा स्टाईल ‘काजू करी’! जाणून घ्या अचूक प्रमाण अन् कृती….
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!

लोकप्रियतेच्या दृष्टिकोनातून दरवाजांमध्ये मुख्यत्वेकरून दोन प्रकार महत्त्वाचे ठरतात. त्यातील पहिला प्रकार म्हणजे संपूर्ण लाकडात बनवलेले पॅनेल दरवाजे, तर दुसरा प्रकार जो आजकाल जास्तच लोकप्रिय आहे तो म्हणजे फ्लश दरवाजे.

यातील पहिल्या प्रकाराबद्दल बोलायचे झाले तर थोडासा महागडा, तरीही देखणा असा हा प्रकार आहे. लाकडात दरवाजे बनविण्याचा फायदा म्हणजे एकतर दरवाजा दणकट बनतो शिवाय त्यात हवी तशी कलाकुसर, नक्षीकाम करता येते. लाकडाचे दरवाजे हे पॅनेलिंगचा वापर करून बनवले जातात. अर्थात लाकडाचे निरनिराळे तुकडे एकत्र जोडून तयार केले जातात. कारण आपल्या दरवाजाच्या लांबी-रुंदी एवढे लाकूड एकाच सलग फळीत मिळणे शक्य नसते. त्यामुळेच हे लाकडाचे निरनिराळे तुकडे मोल्डिंगचा वापर करून तर कधी एकात एक गुंतवून दरवाजा साकारला जातो. पॅनेल, मोल्डिंग यांचा वापर करून बनविलेले दरवाजे कोणत्याही प्रकारच्या इंटिरिअरला शोभून दिसतात.

लाकडात दरवाजे बनवताना लाकडाची निवड देखील महत्त्वाची ठरते. लाकूड योग्य असेल तरच दरवाजा दणकट आणि टिकाऊ बनतो. भारतात तसे पाहिले तर सागवानाला जास्त मागणी दिसून येते. अर्थात, त्याला तसेच योग्य कारणही आहे. आपल्या शेजारी देशातील म्हणजे म्यानमार पूर्वीचा ब्रह्मदेश किंवा बर्मा येथील साग हा जगातील सर्वोत्तम सागवानांपैकी एक मानला जातो. त्यामुळेच भारतातील जुन्या बांधकामांमध्ये, फर्निचरमध्ये सागाचा विपुल प्रमाणात वापर केलेला आढळतो. सागाचे लाकूड हे कठीण लाकडांमध्ये गणले जाते. हे लाकूड वजनदार असून त्याला कधीही वाळवी लागत नाही. म्हणूनच सागाचे लाकूड हे दरवाजांसाठी एक उत्तम पर्याय आहे. परंतु दिवसेंदिवस वाढती मागणी आणि कमी पुरवठय़ामुळे थोडय़ा वेगळ्या लाकडांकडेही लोक वळू लागले आहेत. यामध्ये महोगनी, ओक, मॅपल, वॉलनट असे कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत. शिवाय यातील प्रत्येकाकडे स्वत:चे असे वैशिष्टय़ देखील आहे. ही सर्व झाडे कठीण प्रकारातच मोडतात, तरीही रंग आणि शिरांची वैशिष्टय़पूर्ण रचना यामुळे ती सर्व एकमेकांहून वेगळी ठरतात. उदाहरणच द्यायचे झाले तर महोगनीचा लालसर रंग, ओकच्या लाकडाचेही निरनिराळे रंग आणि त्याचसोबत उच्च दर्जाची वाळवी रोधक क्षमता. मॅपलच्या लाकडातील शिरांची वैशिष्टय़पूर्ण ठेवण आणि वॉलनटच्या विविधरंगी छटा.

संपूर्ण लाकडात बनवलेले दरवाजे घराचे सौंदर्य खुलवतात यात शंकाच नाही, पण त्यांची योग्य प्रकारे निगादेखील राखावी लागते. अन्यथा हेच दरवाजे आपल्या डोकेदुखीचे कारण बनू शकतात. यासाठी लाकूड खरेदी करतानाच ते ज्या झाडाचे सांगितले आहे नक्की त्याचेच आहे याची खात्री करून घ्यावी आणि म्हणूनच खात्रीशीर ठिकाणीच खरेदी करावी. शिवाय कोणतेही लाकूड खरेदी करताना ऊन, वारा, पाणी खाऊन तयार झालेलेच लाकूड निवडावे (Seasoned), म्हणजे मग पुढे दरवाजे फुगणे, त्यात वक्रता येणे इ. गोष्टी होत नाहीत. तरीही लाकूड हे नैसर्गिक असल्याने काही प्रमाणात हवामानाचा परिणाम हा त्यावर होतोच, आपण फक्त त्याचा परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. याचाच एक भाग म्हणून दरवाजे एक तर रंगवावेत किंवा पॉलिश करावेत. अर्थात पॉलिश करण्याचा पर्याय केव्हाही उत्तम, एक तर त्यामुळे दरवाजावर एक प्रकारचे संरक्षक कवच तयार होते आणि लाकडाचे मूळ रंगरूप देखील खुलून येते.

लाकडाच्या दरवाजांचे फायदे अनेक असले तरी लाकडाची घटणारी आवक आणि वाढणारे भाव तसेच लाकूड काम करणाऱ्या कारागिरांचेही चढे दर, कामात होणारी दिरंगाई तसेच लाकडी दरवाज्यांची घ्यावी लागणारी काळजी या सर्व बाबींचा विचार करून लोकांचा कल फ्लश दरवाजांकडे वाढत असलेला दिसून येतो.

बाजारात तयार स्वरूपात मिळणारे फ्लश दरवाजे म्हणजेच ब्लॉक बोर्ड. हव्या त्या जाडीमध्ये उपलब्ध असणारे हे फ्लश दरवाजे कामाच्या वेळेची तर बचत करतातच, पण त्याचसोबत लाकडी दरवाजाइतकेच दणकटही असतात. शिवाय यात अग्निरोधक दरवाजेही मिळतात. ज्यामुळे आग लागण्यासारख्या घटनांमध्ये काही काळ का होईना पण आगीला घराबाहेर थोपवता येते. फ्लश दरवाजांमध्ये सर्वाधिक मागणी ही पाईनच्या अर्थात देवदालच्या दरवाजांना असते, देवदारचे लाकूड वजनाला हलके तरीही टिकाऊ असते. त्याच्या मृदू गुणधर्मामुळे त्यापासून संपूर्ण लाकडी दरवाजा बनू शकत नाही, परंतु ब्लॉक बोर्डच्या स्वरूपात मात्र त्याला मोठी मागणी दिसून येते. वजनाला हलके असल्याने याचे दरवाजे भिंतींना तसेच चौकटींना वजन देत नाहीत. फ्लश दरवाजांचा आणखी एक फायदा म्हणजे हे थेट लॅमिनेट लावलेले देखील विकत मिळतात. म्हणजेच घरी आणलेल्या दरवाजाच्या लांबी रुंदीप्रमाणे थोडीशी काटछाट करा आणि बसवून टाका. अगदीच कमी वेळात दरवाजे तयार. फ्लश दरवाजांचा आणखी एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे हे ध्वनीरोधक असतात. लाकडी दरवाजांच्या तुलनेत फारच कमी किमतीत उपलब्ध होणारे हे दरवाजे ‘आखुडशिंगी बहुगुणीच’ म्हणायला हवेत.

परंतु लाकडी दरवाजे काय किंवा ब्लॉक बोर्डपासून बनणारे फ्लश दरवाजे काय यांचा न्हाणीघरासाठी फारच मर्यादित वापर होतो. जिथे मोठमोठी न्हाणी घरे असतात अशा ठिकाणी याचा सहज वापर करता येतो, परंतु न्हाणीघर लहान असेल आणि तिथे सतत ओल राहत असेल तर अशा ठिकाणी हे दरवाजे अगदी कुचकामी ठरतात. परंतु बरेच वेळा इंटिरिअरमध्ये इतर सगळीकडे लाकडी किंवा फ्लश दरवाजे वापरले जातात, मग न्हाणीघरालाही इतर दरवाजांना साजेसा दरवाजा हवा असतो. अशा वेळी एफआरपी दरवाजे आपली समस्या दूर करतात. एफआरपी म्हणजेच फायबर ग्लास रिएनफोर्सड् प्लास्टिक. या दरवाजांचे वैशिष्टय़ म्हणजे हे अनेक रंगात आणि रूपात उपलब्ध आहेत. वजनाला हलके असेच पटकन लावता येण्याजोगे. शिवाय कोणतेही आधुनिक लॉक यात बसवता येते. यांच्यात ताकद मात्र अतिशय कमी असल्याने मुख्य दरवाजा किंवा बेडरूमच्या दरवाजांसाठी याचा विचार न केलेलाच बरा.

(इंटिरियर डिझायनर)

लोकप्रियतेच्या दृष्टिकोनातून दरवाजांमध्ये मुख्यत्वेकरून दोन प्रकार महत्त्वाचे ठरतात. त्यातील पहिला प्रकार म्हणजे संपूर्ण लाकडात बनवलेले पॅनेल दरवाजे, तर दुसरा प्रकार जो आजकाल जास्तच लोकप्रिय आहे तो म्हणजे फ्लश दरवाजे.

pradhaninteriorsllp@gmail.com