डॉ. मनोज अणावकर

आपण अनेकदा बातम्यांमध्ये पावसाळ्यात इमारती किंवा त्यांचे भाग कोसळल्याच्या बातम्या वाचतो. असं नेमकं केव्हा घडतं याचा जर आपण विचार केला, तर आपल्याला असं आढळून येईल की, ज्या इमारती जुन्या आणि जर्जर झाल्या आहेत, त्यांच्या बाबतीत हे असं घडताना दिसतं. वर्षांनुवर्ष ऊन, वारा, पाऊस, यांचे तडाखे सोसत, आपल्याला आसरा पुरवणाऱ्या इमारतीची कालौघात झीज होत असते. अर्थातच, यामुळे तिची ताकद कमी होत असते. त्यातच भरीस भर म्हणून तिच्या ताकदीचा विचार न करता आपल्या हौसेनुसार काहीवेळा त्यात राहणारी माणसं हवे तसे बदल करतात. हे बदलही ताकद वेगाने घटवायला कारणीभूत ठरतात. वेळोवेळी माणसं जशी ताकद भरून काढण्यासाठी टॉनिक घेतात, स्वत:वर उपचार करून घेतात, तशाचप्रकारे काही ठरावीक काळानंतर इमारतीवरही तिच्या दुरूस्तीच्या माध्यमातून उपचार हे पावसाळ्यापूर्वी केले गेले पाहिजेत. स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून स्ट्रक्चरल ऑडिट अर्थात इमारतीच्या स्थितीविषयी सखोल आणि तपशीलवार पाहणी करून घेणं आवश्यक आहे.
यामध्ये सोसायटीने स्ट्रक्चरल इंजिनिअरला खाली दिलेली कागदपत्रं आणि माहिती दिली, तर नेमकी कुठल्या भागांची आणि कशाप्रकारे दुरूस्ती करायची ते ठरवणं त्याला सोपं जातं-
संबंधित नगरपालिका अगर महानगरपालिकेनं संमत केलेल्या मूळ आराखडय़ांची प्रत (मागाहून केलेल्या कोणत्याही बदलाविना असलेला आराखडा ).
इमारतीची स्ट्रक्चरल आणि आर्कीटेक्चरल ड्रॉईंग्ज.
इमारत बांधल्याची तारीख, तसंच इमारत वाढवली असेल, तर त्याची तारीख.
इमारतीचा पाया कोणत्या प्रकारचा आहे, याबाबतची माहिती असल्यास ती द्यावी.
यापूर्वी इमारतीची दुरूस्ती केली असल्यास ती नेमकी केव्हा केली होती, त्याबाबतचा तपशील.
त्या दुरूस्तीच्यावेळी नेमक्या कुठल्या भागांची आणि कशाप्रकारे दुरूस्ती केली होती
इमारतीतल्या रहिवाशांपकी कोणी त्यांच्या घरांमध्ये अंतर्गत बदल केले असल्यास त्याबाबतची माहिती (यावरून गळत्या, पाझर किंवा त्यामुळे झपाटय़ाने झालेल्या नुकसानाचा आढावा घेणं सोपं जातं).
इमारतीतले पाण्याचे आणि सांडपाण्याचे पाईप, पाण्याची टाकी यांची दुरूस्ती केली असल्यास त्याबाबतचा तपशील.
इत्यादी गोष्टींबाबत सर्व तपशीलवार माहिती सोसायटीनं स्ट्रक्चरल इंजिनिअरला सादर केल्यानंतर त्याच्याकडून प्रत्येक सदनिकेतल्या दोषांबाबत, तसंच इमारतीच्या बाहेरच्या बाजूने असलेल्या दोषांबाबत तपशीलवार पाहणी करून अहवाल सादर केला जातो. हा अहवाल सादर करणारा स्ट्रक्चरल इंजिनिअर हा केवळ पदवीने स्ट्रक्चरल इंजिनिअर असून चालत नाही, तर त्याच्याकडे स्ट्रक्चरल इंजिनिअर म्हणून काम करण्यासाठीचा स्थानिक प्रशासकीय यंत्रणेचा (महापालिका, नगरपरिषद, इत्यादीचा) परवाना असणं आणि त्या अहवालावर त्याची स्वत:ची स्वाक्षरी ही त्याच्या स्वत:च्या परवाना क्रमांकासह असणं आवश्यक आहे. यात इमारतीत नेमके दोष कुठले आहेत, त्यावर कोणते उपाय करता येतील आणि त्यासाठी अंदाजित खर्च किती येईल, याबाबतचा अहवाल तो सोसायटीला सादर करतो. हा अहवाल सादर केल्यानंतर प्रत्यक्ष काम कधी सुरू करायचं अथवा करायचं किंवा नाही. किंवा त्या कामातले नेमके किती घटक तातडीने पूर्ण करायचे, याविषयी स्ट्रक्चरल इंजिनिअरच्या सल्ल्याने सोसायटीतल्या सदस्यांची संमती घेऊन सोसायटीने निर्णय घ्यायचा असतो.
एकदा ते ठरलं की, मग कंत्राटदाराची नेमणूक करून कामाला सुरुवात करता येते. इमारतीची दुरूस्ती हा सर्वाच्या हिताचा निर्णय असल्यामुळे त्यात कोणतंही राजकारण आणू नये. आजची दुरूस्ती उद्यावर ढकलली, तर काळागणिक इमारत खंगत जाणार असल्यानं त्याच्या दुरूस्तीच्या खर्चात अधिकाधिक वाढ होत जाणार ही महत्त्वाची बाब सदस्यांनी लक्षात घ्यावी. अखेरीस इमारतीचं होणारं नुकसान म्हणजे आपलंच नुकसान आहे, हे ओळखून वेळीच दुरूस्ती केली, तर आपलं भविष्यातलं फार मोठं नुकसान टळू शकेल. आता हे काम कशा पद्धतीने पार पाडलं जातं, याविषयीची थोडक्यात आणि जुजबी माहिती आपण करून घेऊया.
कामाला सुरुवात करताना भिंतींवरचं जुनं पोकळ झालेलं व भेगा पडलेलं प्लॅस्टर विटा दिसेपर्यंत किंवा बीम, कॉलम अथवा स्लॅब दिसेपर्यंत काढून टाकलं जातं व त्या जागी नवीन पॉलिमर रसायनयुक्त प्लॅस्टर केलं जातं. असं प्लॅस्टर तयार करताना एक काळजी घेतली पाहिजे, ती ही की, ते थापीवर घेऊन भिंतीवर मारण्यासाठी थोडंसं पातळ असलं पाहिजे, पण त्याचबरोबर ते पुरेसं घट्टही असलं पाहिजे, नाहीतर त्यातल्या सिमेंटची ताकद कमी होऊ शकते. बीम, कॉलम, स्लॅब व सज्जा यासारख्या संरचनात्मक भागांना जर तडे गेले असतील, तर ते क्राँक्रीट तोडून आतील सळ्या खुल्या करून घेतल्या जातात. सळ्या खूपच गंजल्या असतील, किंवा त्यांचे तुकडे पडायला लागले असतील, तर या जुन्या सळ्यांचा जो चांगला भाग असेल, त्याला वेल्डिंग करून नव्या सळ्या बसवल्या जातात. या सर्व सळ्यांना गंजविरोधी रसायन लावलं जातं. पॉलिमरयुक्त काँक्रीटचा वापर करून किंवा मायक्रो काँक्रीट या पावडरच्या स्वरूपात असलेल्या तयार काँक्रीटसदृश्य पदार्थामध्ये आवश्यक प्रमाणात पाणी मिसळून त्याद्वारे तयार होणाऱ्या मिश्रणाचा वापर करून हे संरचनात्मक भाग नव्याने भरून काढले जातात. काँक्रीट खूपच खराब झालं असेल, तर जुना भाग पाडून तो नव्याने काँक्रीटमध्ये बांधून काढला जातो. याला जॅकेटिंग असं म्हणतात. मग त्यावरही नवीन प्लॅस्टर केलं जातं. पाण्याचे पाईपही बदलून त्याठिकाणी नवे पाईप घातले जातात. हे नवे पाईप घालताना ते भिंतींना चिकटून बसणार नाहीत याची काळजी घेणं आवश्यक असतं. त्यासाठी क्लिपा मारून भिंतीपासून काही अंतरावर हे पाईप बसवले जातात. कारण पाईपातून जर पाण्याची गळती झाली, तर हे पाणी भिंतींमध्ये झिरपू नये यासाठी ही काळजी घेणं आवश्यक असतं. दुरूस्तीचं सर्व काम पूर्ण झाल्यावर इमारतीला बाहेरून रंग काढणं आवश्यक असतं. हा रंग काढणं म्हणजे पशांची उधळपट्टी किंवा चन नसून ऊन, वारा पाऊस यापासून इमारतीला संरक्षक कवच घालण्यासाठीचा आवश्यक उपाय आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
परंतु अनंत काळापर्यंत दुरुस्ती करून इमारत उभी ठेवता येत नाही, हे सत्यही गृहनिर्माणसंस्थाच्या सदस्यांनी आणि कार्यकारिणीने लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळेच साठी किंवा सत्तरी ओलांडलेल्या इमारतींच्याबाबतीत योग्यवेळी जर पुनर्वकिास हाती घेतला नाही, तर केवळ पुन:पुन्हा केली जाणारी दुरुस्ती ही केवळ डोळ्यांना पाणी लावणारी ठरू शकते. वरवर जरी इमारत दिसायला व्यवस्थित वाटत असली तरी, आतून काँक्रीटची, विटांची घनता कमी झाल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर घटलेल्या ताकदीमुळे लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे संपूर्ण इमारत किंवा तिचा एखादा भाग अशाच एखाद्या पावसाळ्यात कोसळू शकतो आणि होणाऱ्या फार मोठय़ा जीवित आणि वित्त हानीला पुनर्वकिासाच्या बाबतीतला वेळकाढूपणा हाच सर्वस्वी जबाबदार असतो. म्हणूनच काही ठराविक मर्यादेपर्यंत दुरुस्ती केल्यानंतर वेळेवर केला जाणारा पुनर्वकिास, हाही फार मोठं नुकसान टाळण्याकरता तितकाच महत्त्वाचा आहे.
(सिव्हिल इंजिनिअर आणि इंटिरिअर डिझाईनर)
anaokarm@yahoo.co.in