विनिता कौर चिरागिया आदिवासी गावातील व्यक्ती हाताने सारवण करून हातांचे ठसे त्या सारवणावर उमटवतात. त्यांच्या मते, हे म्हणजे आपल्या आत्म्यातील अंश घरावर उमटवणे. घर ही आपल्याला सांभाळणारी एक जिवंत व्यक्ती आहे, ही आदिवासींची समजूत. घरातील व्यक्ती जशी आजारी पडल्यावर आपण तिची काळजी घेतो, तशीच काळजी आदिवासी आपल्या घरांची घेतो, हे ज्ञान आपण समजून घ्यायला हवे. उत्क्रांतीमध्ये मानवाचा मेंदू मोठा झाला. अग्नीवर आपण प्रभुत्व मिळवलं. शेतीमुळे मनुष्यप्राणी स्थिर झाला. या सर्वातून जी सामाजिक रचना उदयाला आली, त्यामुळे आपण नैसर्गिक अन्न साखळीतून जवळजवळ बाहेरच पडलो. या सर्व प्रक्रियेत मनुष्य निसर्गापासून अधिकाधिक दूर जाऊ लागला. जगण्यासाठी मानवाचा निसर्गातील ज्या काही जटिल आणि सूक्ष्म परिसंस्थांशी जो संबंध होता, तो हळूहळू नष्ट होऊ लागला. मनुष्य हा निसर्गचक्राचा केंद्रिबदू नसून, त्याच वर्तुळाचा एक भाग आहे याचा आपल्याला संपूर्ण विसर पडलेला आहे. औद्योगिक क्रांतीनंतर प्रगतीची अनेक शिखरे पादाक्रांत करणारी वास्तुरचनासुद्धा मानवाला निसर्गचक्राच्या केंद्रस्थानी ठेवू पाहते आहे. आजच्या घडीला ‘वातावरण बदल’ किंवा ‘जागतिक तापमान वाढ’ हे विषय कळीचे मुद्दे झाले आहेत. जगभर पर्यावरणीय आणीबाणी घोषित करण्यासाठी आंदोलने होत आहेत. जागतिक तापमान वाढ हे आधुनिक अर्थशास्त्राचे उत्पादन आहे हे शास्त्रज्ञांनी सिद्ध करून आता बराच काळ लोटला आहे. एकरेषीय अर्थव्यवस्थेतील ‘घ्या- बनवा- वापरा- फेकून द्या’ या रचनेमुळे होणाऱ्या उत्पादनात नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास आणि प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढते आहे. शाश्वत अर्थव्यवस्थेची समीकरणे मांडणाऱ्या महात्मा गांधी, इ. एफ. शुमाकर, अमर्त्य सेन यांसारख्या समाजतज्ज्ञांनी आणि अर्थतज्ज्ञांनी यावर चक्रीय अर्थव्यवस्थेचे सहज सोपे उपाय सुचवले आहेत. चक्रीय अर्थव्यवस्था ‘पुनर्वापर- देवाणघेवाण- दुरुस्ती- पुनारोत्पादन- पुनर्रचना- पुनर्निर्माण’ या तत्वांवर अवलंबून असते. यामध्ये नैसर्गिक संसाधनाचा वापर जाणीवपूर्वक आणि योग्य होतो. टाकाऊ पदार्थाची निर्मिती कमी होते. निर्मिती ऊर्जा आणि उष्णता उत्सर्जन कमी होते. परिणामी प्रदूषणसुद्धा कमी होते. पण या सर्वाचा वास्तुरचनेशी काय संबंध? एक उदाहरण देतो- भारतातील कोणत्याही आदिवासी गावात घराभोवतीची कंपाउंड भिंत वाळलेल्या काठय़ाकुटय़ा वापरून बनवली जाते. ही भिंत पाऊसपाण्याला उघडी असते. साधारण ३-४ वर्षांत ही भिंत खराब होते. मग तिचा वापर चुलीतील जळणासाठी होतो. चुलीतून मिळणारी राख अंघोळीसाठी आणि भांडी घासण्यासाठी वापरली जाते. हे पाणी कंपाउंडमधील झाडांना आणि बागेला वळवले जाते. त्यातून झाडांना आणि बागेला आवश्यक ते घटक मिळून झाडे चांगली वाढतात. मग याच झाडांच्या फांद्या वापरून ही कंपाउंड भिंत पुन्हा बनवली जाते. हे सारे इतके जास्त सोपे आहे की, या रचनेचे साधेपण आता आपल्याला समजण्यापलीकडे गेले आहे. याच गावात बांधल्या जाणाऱ्या कुडाच्या भिंतीसुद्धा याच चक्रीय जीवनशैलीचा भाग आहेत. या भिंती खराब झाल्यावर शेतात फेकून दिल्या जातात. त्यातील शेणाचे उत्तम खत होते. याच शेतातील उत्पन्न घेतल्यावर उरलेला चारा गायी-बलांना दिला जातो. त्यांच्या शेणाने कुडाच्या भिंती पुन्हा बनवल्या जातात. भारतात पूर्वापार बांधली जाणारी नैसर्गिक घरे ही याच नैसर्गिक चक्रीय व्यवस्थेची उत्तम उदाहरणे आहेत. या सर्व निसर्ग व्यवस्थेच्या साधेपणाची ताकद आणि आधुनिकतेने होणारा निसर्गाचा ऱ्हास हे गांधीजींनी जवळजवळ १०० वर्षांपूर्वीच जाणलं होतं; हे आपल्याला अजूनही का समजून येत नाही? घरे ‘मेंटेनन्स फ्री’ असण्याचा एक वेगळाच विचार या आधुनिक जगात प्रत्येकाच्या मेंदूत उतरला आहे. आणि या विचाराला बळकटी देऊन अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी अनेक वित्तसंस्था आणि उत्पादन कारखाने कंबर कसून बाजारात उतरले आहेत. माणसाच्या भौतिक आणि तात्पुरत्या गरजा पूर्ण करणे, अजून गरजा वाढवणे आणि नैसर्गिक संसाधनांचा अमर्याद वापर करणे.. यात एक वेगळीच स्पर्धा चालू आहे. बांधकाम क्षेत्र याच अर्थसंस्थेचा एक अविभाज्य घटक आहे. सिमेंट, स्टील यांसारखे कृत्रिम बांधकाम साहित्य बनवताना निसर्गाची अपरिमित हानी होते. हे घटक सहज निसर्गात पुन्हा विलीन होत नाहीत. त्यामुळे प्रदूषण वाढते. आजकाल घरे सुंदर दिसण्यासाठी रासायनिक कृत्रिम रंग मोठय़ा प्रमाणात वापरले जातात. या रंगांच्या निर्मितीत वापरली जाणारी रसायने जलाशयांचे पाणी दूषित करतात. या रंगातून निघणारे हानिकारक वायू कर्करोगाचे कारण होऊ शकतात. सिमेंट, स्टीलची घरे निकामी झाल्यावर निसर्गात पुन्हा विलीन होणे जवळजवळ अशक्यच. त्याचा पुनर्वापरसुद्धा नाहीच. यामुळे बऱ्याच मोठय़ा प्रमाणात आपण नैसर्गिक संसाधनांना कचऱ्यात बदलत आहोत. कदाचित आपल्या देशातील बऱ्याच मोठय़ा जनतेला यातील दुष्परिणाम दिसत नसतील. कारण हे आपल्या डोळ्यासमोर घडत नाही. किंवा याचे परिणाम लगेच दिसून येत नाहीत. परंतु व्यावसायिक वास्तुतज्ज्ञ, उद्योगपती, कारखानदार यांना हे परिणाम उघडपणे दिसतात. तंत्रज्ञान आणि औद्योगिक साहित्याचा निसर्गावर होणारा परिणाम आणि आघात बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वानी समजून घ्यायला हवा आणि त्या दृष्टीने योग्य पावले उचलायला हवीत. हे सारे जाणून उमजूनही त्यावर कृती न करणे हे अतिशय असंवेदनशील आहे. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वाची ही एकत्रित जबाबदारी आहे. उत्पादनापासून बांधकाम ते निकामी झालेल्या साहित्याबद्दल सर्वानी सजग राहायला हवे. पूर्वी भारतात घराची डागडुजी (मेंटेनन्स) हा कधीच चिंतेचा विषय नव्हता. दिवाळीसारख्या सणांना सर्व कुटुंब एकत्र येऊन घराची डागडुजी करत असे. घर सारवणे, रंगवणे, दुरुस्त करणे हे आपण साजरे करत होतो. किंबहुना, आताही भारतात मोठय़ा प्रमाणावर दिवाळीला सडा-सारवण केले जाते. यात निसर्गाप्रती आदर व्यक्त केला जातो. निसर्गाचे ऋण समजून घेतले जातात. परंतु मेंटेनन्स फ्री, कायम स्वरूपी, दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि झटपट बनणाऱ्या घरांचा हव्यास आपल्याला कोणत्या थराला नेतोय याची पुसटशी कल्पनाही आपल्याला नाही. आपल्याला जलरोधक घरे हवी आहेत. घराला पाण्याचा स्पर्श होऊ नये म्हणून वेगवेगळे हानिकारक जलरोधक रसायनांनी आपण घर रंगवून टाकत आहोत. घरात किडेकोष्टके बनू नयेत म्हणून हानिकारक रसायनांचा घरावर मारा करीत आहोत. घरे मेंटेनन्स फ्री करताना आणि निसर्ग चक्राच्या मध्यभागी येताना आपण निसर्गाची किती मोठी किंमत मोजत आहोत याची जाण आपल्याला नाही. आदिवासी गावातील व्यक्ती हाताने सारवण करून हातांचे ठसे त्या सारवणावर उमटवतात. त्यांच्या मते, हे म्हणजे आपल्या आत्म्यातील अंश घरावर उमटवणे. घर ही आपल्याला सांभाळणारी एक जिवंत व्यक्ती आहे, ही आदिवासींची समजूत. घरातील व्यक्ती जशी आजारी पडल्यावर आपण तिची काळजी घेतो, तशीच काळजी आदिवासी आपल्या घरांची घेतो, हे ज्ञान आपण समजून घ्यायला हवे. अन्यथा मेंटेनन्स फ्री संकल्पनेतून या वर्षी महाराष्ट्रात आलेले पूर आणि त्याचे परिणाम आपण पाहिले आहेतच. अनुवाद- प्रतीक हेमंत धानमेर vinita@designjatra.org औद्योगिक बांधकाम साहित्य आणि नैसर्गिक बांधकाम साहित्य चक्र