आपल्याला घराच्या बांधकामासाठी किंवा अंतर्गत सजावटीकरता नेहमी लागणारा घटक म्हणजे लाकूड! पण हल्ली लाकडाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत, लाकडाचे जड ओंडके फर्निचर तयार करताना हाताळणं कठीण जातं, आणि अशा ओंडक्यांपासून तयार केलेलं फर्निचरही वजनाला खूपच जड असतं. याबरोबरच, थेट आणि संपूर्णपणे लाकडाचा वापर करताना कराव्या लागणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची हानीही होते. या सर्वांवरचा उपाय म्हणून लाकडापासून तयार केल्या जाणाऱ्या उत्पादनांचा वापर सध्याच्या काळात वाढला आहे.
यामध्ये प्लायवूड, मिडियम डेन्सिटी फायबरबोर्ड (एमडीएफ), पार्टिकल बोर्ड, ब्लॉकबोर्ड, हाय डेन्सिटी फायबरबोर्ड (एचडीएफ), लॅमिनेटेड व्हिनिअर लंबर (एलव्हीएल), ओरिएण्टेड स्ट्रँड बोर्ड (ओएसबी) आणि हार्डबोर्ड असे लाकडापासून तयार केल्या जाणाऱ्या उत्पादनांचे काही महत्त्वाचे आणि नेहमी वापरले जाणारे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या घरी फर्निचर करून घेताना आपल्याला नेमका कोणता प्रकार वापरावा याविषयी गोंधळून जायला होतं. तयार फर्निचर विकत घ्यायला गेलं, तर तिथला विक्रेता यांपैकी अनेक शब्द वापरून ते अमुकतमुक प्रकारापासून बनलं असल्यामुळे कसं चांगलं आहे ते सांगतो.
पण आपल्याला कोणत्या प्रकारच्या लाकडी उत्पादनाचा वापर कोणत्या उपयोगासाठी केला पाहिजे किंवा खरं तर टाळला पाहिजे, हे माहीत नसल्यामुळे आपण अगदी सश्रद्धपणे त्याने सांगितलेला तो प्रकार कसा अगदी योग्य आहे, त्यावर विश्वास ठेवतो आणि अनेकदा अडीच-तीन वर्षांमध्येच फर्निचर खराब व्हायला लागतं. बरं त्यावर जर जाब विचारायला जावं, तर तो दुकानदार सांगतो की, या प्रकारापासून हे फर्निचर बनल्याचं आम्ही आपल्याला आधीच सांगितलं होतं व म्हणूनच तर कमी बजेट असलेल्यांकरता त्याचा वापर केला जातो, असं सांगून तुम्हाला खजील करवून गप्प बसवलं जातं. थोडक्यात काय, तर या प्रकारांविषयी थोडीफार तरी माहिती हवी, हीच माहिती आजच्या भागात खालील तक्त्यात दिली आहे.

तेव्हा वरील तक्त्यावरून तुम्हाला यापुढे फर्निचर करून घेताना अथवा तयार फर्निचर विकत घेताना ते लाकडाच्या कोणत्या प्रकारच्या उत्पादनापासून तयार केले आहे ते विचारून त्याच्या दर्जाबाबत अंदाज बांधणे सोपे जाईल, जेणेकरून फसवणूक टाळता येईल.
(इंटिरिअर डिझाइनर आणि सिव्हिल इंजिनीअर)
anaokarm@yahoo.co.in