scorecardresearch

निवारा : वातावरणाशी अनुकूलता साधणाऱी घरे

मातीच्या घरचा संदर्भ जिथे जिथे येतो, तिथे घराच्या आतील थंडावा अधोरेखित होतो.

निवारा : वातावरणाशी अनुकूलता साधणाऱी घरे
(संग्रहित छायाचित्र)

प्रतीक हेमंत धानमेर

मागे, माझ्या गावातील एका आदिवासी मित्राला माझ्या एका विद्यार्थ्यांने प्रश्न विचारला- ‘‘दादा, तुमच्या घराला खिडक्या का नाहीत हो?’’ यावर माझ्या आदिवासी मित्राने खूप छान उत्तर दिलं- ‘‘बाहेर उन्हातानात काम करून दमल्यावर विश्रांतीसाठी पुन्हा आईच्या गर्भात गेल्यासारखं वाटावं म्हणून!’’ या उत्तराने माझ्या मनाचा ठाव घेतला. घराची तुलना आईच्या गर्भाशी करून माझ्या त्या मित्राने त्या घराच्या अवकाशाचे पावित्र्य माझ्या मनामध्ये खोल बिंबवले. आईच्या गर्भाच्या आरामदायीपणाची तुलना बाकी कशाशी होणे अशक्यच. गर्भाचा उबदारपणा, मंद प्रकाश, शांतता आणि सुरक्षित असल्याची भावना याचा अनोखा मिलाफ आपल्या पूर्वजांना घरांमध्ये बांधता यायचा. मग आता वास्तुकला आपल्या कक्षा रुंदावत असताना आपण नक्की कुठे चुका करतो? माझ्या आदिवासी मित्राच्या सांगण्याप्रमाणे आईच्या गर्भासारखी घरे आता आपण का बनवत नाही आहोत?

मातीच्या घरचा संदर्भ जिथे जिथे येतो, तिथे घराच्या आतील थंडावा अधोरेखित होतो. आजी-आजोबा मातीच्या घरांचे वर्णन करताना थकत नाहीत. मातीप्रमाणे सर्वच नैसर्गिक साहित्याचे गुणधर्म हे तिथल्या स्थानिक वातावरणाशी अनुकूलता साधणारे असतात. राजस्थानसारख्या अतिउष्ण भागातील वालुकाश्म दगडातील घरे आतील वातावरण थंड ठेवतात, तर हिमाचलमधील पाटीच्या दगडाची घरे किंवा मातीच्या कच्च्या विटांची घरे आतील वातावरण उबदार ठेवतात. लडाखसारख्या अतिशीत शुष्क प्रदेशात मातीच्या जाड भिंती बनवून आणि घरे काहीशी जमिनीखाली दाबून जमिनीतील उब घरात घेतली जाते. दक्षिण दिशेला काचेची तावदाने लावून सूर्याची उष्णता घरात साठवली जाते. पूर्वाचलमध्ये अतिपर्जन्याच्या प्रदेशात बांबू आणि शेणामातीने बांधलेली घरे बाहेर दमटपणा असूनही आतून कोरडी राहतात. मराठवाडा विदर्भातील पांढऱ्या मातीची घरे तिथल्या अतिउष्ण आणि अतिथंड वातावरणाला अनुकूलता साधून घराचे तापमान नियंत्रित करतात. दक्षिण भारतातील वीट आणि चुना वापरून बनवलेले सपाट छप्पर (मद्रास टेरेस) तिथल्या बोचऱ्या उष्णतेला घरात शिरू देत नाही. कोकणातील चारही बाजूंनी उतरते छप्पर असलेली कौलारू घरे तिथल्या अतिवृष्टीला तगून राहतात. कोकणातील चिऱ्याचा दगड घरातील अतिरिक्त बाष्प शोषून घेतो आणि घराला कोरडे ठेवतो. कौलारू छपराची उंची उष्ण हवेला वर निघून जाण्यास मदत करते. अशा घरातील पोटमाळा ही उष्णता धरून ठेवतो. अशा उष्ण खोलीत धान्य साठवल्यास जास्त टिकते. घरातील सर्व खोल्यांचे नियोजन, दरवाजे, खिडक्यांच्या रचना आणि स्थानसुद्धा यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मध्ये अंगण सोडून बाजूने बांधलेले घर हे आजही भारतीय वास्तुरचनेचे एक उत्तम उदाहरण मानले जाते. यामुळे घरातील सर्व खोल्यांना समसमान प्रकाश मिळतो. हवा खेळती राहते.

भारतीय वास्तुशास्त्राची सांगड ही स्थानिक हवामानाभोवतीच गुंफलेली आहे. ही सारी घरे सजीव असल्याप्रमाणे नैसर्गिक संस्थेमध्ये सहभागी होतात. ही घरे निसर्गातून उभी राहतात आणि निसर्गात लीलया विलीन होतात. ही घरे निसर्गावर अतिरिक्त भार टाकत नाहीत. या घरांचे कर्ब उत्सर्जन शून्य असते.

भारताला जैवविविधतेचे वरदान आहे आणि या नैसर्गिक विविधतेप्रमाणे हजारो पद्धतींचे नैसर्गिक बांधकाम तंत्र आपल्याकडे उपलब्ध आहे. हीच जैव विविधता ग्रामीण भागातील मोठय़ा समाजाकडून वापरली जात असल्याने त्याचे व्यवस्थापन आणि संवर्धनसुद्धा या समाजाकडून होत आहे. सामाजिक नैतिकता टिकून आहे. परंतु या विविधतेला झुगारून आपण बांधकामाचे प्रमाणीकरण करण्यात आपली सर्व बौद्धिक ऊर्जा खर्च करत आहोत. प्रमाणीकरण आर्थिक प्रगतीला फायदेशीर असते, तर विविधता आर्थिक प्रगतीमध्ये मोठा अडथळा ठरते- म्हणूनच कदाचित हा अट्टहास. कारखान्यातून निघणाऱ्या बांधकाम साहित्याचे कर्ब उत्सर्जन हे इतके जास्त असते की, आजघडीला बांधकाम क्षेत्र हे दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषण करणारे क्षेत्र आहे. तसेच या बांधकाम साहित्यासाठी मोठय़ा प्रमणावर कच्चा माल म्हणून नैसर्गिक साहित्य लागते. या प्रक्रियेत नैतिकतेचा अभाव असल्याने निसर्गाची प्रचंड हानी होते. कारखान्यातील बांधकाम साहित्य हे श्वसन करत नाहीत किंवा त्यातील रसायनांमुळे हे साहित्य शिथिल झालेले असते. म्हणून वातावरणाशी त्यांची अनुकूलता साधण्याची क्षमता शून्य असते. मग अशा साहित्याने बांधलेल्या घरामध्ये तापमान नियंत्रित करण्यासाठी अधिकाधिक ऊर्जेचा वापर होतो. सिमेंटमध्ये बांधलेली घरे उन्हाळ्यात गरम होतात तर हिवाळ्यात थंड पडतात. पावसाळ्यात घरातील दमटपणा भिंती शोषून घेऊ शकत नाहीत. तसेच हे वातावरण नियंत्रित करताना वापरलेल्या उपकरणांमुळे बाहेरील वातावरणाची हानी होते हा वेगळा भाग. मानवनिर्मित ऊर्जेचा वापर करून नियंत्रित केलेले वातावरण हे आरोग्यासाठी हितकारकही नसते. अशा घरात राहणाऱ्या व्यक्तींना आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. आज मानवनिर्मित ऊर्जा बनविण्याची प्रक्रियासुद्धा जागतिक तापमानवाढीला कारणीभूत आहे. निसर्गाला घरात येऊ देणाऱ्या सच्छिद्र साहित्याने घर बांधल्यास घरातील हवा खेळती राहते, शुद्ध राहते. पर्यावरणाची हानी होत नाही. ऊर्जा बचत होते. म्हणूनच कदाचित आपल्या आजी-आजोबांचे या वयातील आरोग्य हा आपल्यासाठी कौतुकाचा विषय आहे.

ग्लोबल वॉìमगचा (जागतिक तापमानवाढ) विषय गंभीर होत चालला आहे. पारा चाळिशी ओलांडून पन्नाशी गाठायचा प्रयत्न करतोय, पण काचेच्या इमारतींचा आपला हव्यास अजूनही तसाच आहे. यालाच जोड म्हणून वातानुकूलित यंत्रे बाजारात आपली मक्तेदारी टिकवून आहेत. घराचे वातावरण नियंत्रित करण्यासाठी आपण वारेमाप पसा आणि ऊर्जा खर्च करीत आहोत. काचेच्या दक्षिणाभिमुख इमारती सूर्याकडे आ वासून बघत आहेत आणि आवश्यकता नसताना उष्णता गिळत आहेत. ही उष्णता शमवण्यासाठी पुन्हा ऊर्जा खर्च होत आहे. या सर्व पाश्चात्त्य देशांच्या अंधानुकरणात हवामानाला अनुकूलता साधणारी घरे कुठे हरवत आहेत? की आजी-आजोबांच्या गोष्टींप्रमाणे ही घरेसुद्धा काळाच्या ओघात लुप्त होऊन जाणार आहेत? आजच्या काळातील वास्तुशिल्पी आईच्या गर्भाची शांतता आणि उबदारपणा पुन्हा घराला देऊ शकतील का? सतत आर्थिक नफ्याचा विचार करून तयार झालेल्या बाजारू विचारसरणीला सोडून जर नैतिकतेने आपण विचार केला तर कदाचित या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतील.

pratik@designjatra.org

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-06-2019 at 01:27 IST

संबंधित बातम्या