|| यशवंत तुकाराम सुरोशे
घराची रेखाचित्रे काढून घरे बांधण्याची कला अगदी अलीकडची! पूर्वी माणूस राहत असलेल्या घरालाच पक्के रूप देण्यासाठी घराचे बांधकाम करी. म्हणजे रोजच्या जगण्याला आवश्यक असणारी जागा तो बंदिस्त करी. कच्च्या रूपाचे तो पक्क्या घरात रूपांतर करी. ग्रामीण भागात आजही घर बांधणारा आधी आपली जागा नि जवळचा पैसा यांचा विचार करून घराचे कल्पनाचित्र मनात रेखाटतो. हे कल्पनाचित्र गावातील एखाद्या टुमदार, हवेशीर पक्क्या नि सुरक्षित घराचे असते. आयुष्यभर असे उभारताना त्याचे स्वप्न पूर्ण होत जाते.
पण घराचे स्वप्न पाहणाऱ्या नि स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या कित्येकांनी ‘घराची पायरी’ गृहीत धरलेली असते. आधुनिक काळात शहरीकरणाला वश झालेल्यांना तर फक्त जिन्याच्याच पायऱ्या माहीत आहेत. उद्वाहनामुळे या पायऱ्याही काहींना नकोशा वाटतात. पण गावाकडील घरांच्या पायऱ्या वैशिष्टय़पूर्ण असतात. अर्थात घर बांधताना किंवा बांधण्यापूर्वी घरांच्या पायऱ्यांचा कोणी विशेष विचार करत नाही. पण घराचा दरवाजा, घराचे प्रवेशद्वार कोठे ठेवायचे असा प्रश्न आधीच सोडवला जातो. घराचा जोत्या झाला की दरवाज्याची चौकट तयार होते. मग सुतार चौकट कोठे ठेवायची तेथील माप घेऊन जायचा. त्याच्या खुणा पाहून साऱ्या गावाला माहीत व्हायचं, घराचे प्रवेशद्वार इकडे आहे म्हणून!
मग संपूर्ण घराचे बांधकाम होताना या चौकटीतून मजुरांची, माणसांची नि गवंडी-सुताराची येजा होई. जोत्या जरा उंच असेल तर दगडाची नाहीतर मातीची भरलेली पोती एकावर एक ठेवून पायरी बनवली जायची. ही तात्पुरती सोय! पण खरं तर हाच त्या घराच्या पायरीचा जन्म असतो. कधी-कधी घराचे बांधकाम संपून छपरावर कौलं पडेपर्यंत पाऊस सुरू व्हायचा नि तात्पुरती बनवलेली पायरीच ‘कायम’ व्हायची. मग पुढे कधीतरी घराचे प्लॅस्टर, अन्य बांधकाम करताना पक्की पायरी बांधली जायची. घरात लहान बाळ असेल, वृद्ध माणूस असेल तर घरातील माणसे घरातील कर्त्यां माणसाला या पक्क्या पायरीची आठवण करून देत. मग कर्ता पुरुष म्हणायचा, ‘‘पायरी बांधायलाच हवी! धान्याची पोती, कणगी यांची ने-आण करताना पायरी महत्त्वाची असते. ’’
काही घरांच्या पायऱ्या अगदी मंदिराप्रमाणे उतरत जाणाऱ्या! काळ्या कुळकुळीत दगडाच्या! दगडांच्या खाच खळग्याने त्या घराचे वय ओळखता येते. अशा पायऱ्यावर पडणारे पायही भारदस्त असावेत असा नुसताच भास होत राहतो. पायरींच्या संख्येवरूनही आपण अंदाज करत राहतो. गाभाऱ्यात पोहचल्यावरही पायऱ्यांचा झालेला स्पर्श मनात रुतून राहतो, तसेच काही घरांच्या पायऱ्या मनात रुतून राहतात. त्या घरातील संस्काराचा गाभारा पायऱ्यापासूनच सुरू होतो.
काही घरांच्या पायऱ्या कशा गुळगुळीत! काहीशा निसरडय़ा दुरून पाहता क्षणी नजर खेचून घेणाऱ्या! पण घरात प्रवेश करताना चपला कोठे काढाव्यात असा प्रश्न विचारणाऱ्या! रंगीत मार्बल ल्यायलेल्या पायऱ्या चढताना उगीचच पाय जड होतात. पाऊल अडखळते. तरी घराची ओढ असतेच मनात! कधी-कधी पायरीवर अडखळलेले पाऊल उंबऱ्याच्या आत गेले की माणुसकीचा गालीचा स्पर्श करतो नि पायरी बद्दलचा आकस संपून जातो.
काही पायऱ्या मात्र वैशिष्टय़पूर्ण असतात. प्रेयसीसोबत गप्पा मारण्याची एक जागा म्हणजे घराची पायरी! तिच्या घराची अथवा त्याच्या घराची! घराच्या पायरीपासून या प्रेमाला वाट फुटलेली असते. प्रेमाच्या पायरीपासून ही वाट घरात जाते. कधी-कधी एखाद्याची वाट बघून मन आणि शरीरही थकून जाते. मग आपण आपसूक पायरीवर बसून वाट बघत राहतो. पाय आणि मनाला विसावा लाभला की मनात विचार येऊन जातो. एवढा वेळ आपण या पायरीवर का बसलो नाही? पायरीवर क्षणभर टेकावे नि घरातील व्यक्ती येताना दिसावी.
पण काही पायऱ्या मात्र कधीच चढायला लागू नयेत अशीही घरे असतात. आयुष्याला पुरेल इतका अपमान करणाऱ्या घराची पायरी चढणे नकोसे वाटते. काहीजण तर अगदी भीष्मप्रतिज्ञा केल्यासारखे आयुष्यभर अशा घरांच्या पायऱ्या चढत नाहीत. खरं तर यात पायऱ्यांचा काय दोष? पण घराच्या वर्तणुकीची वाट किंवा स्वभावाचा प्रवाह या पायरीवरूनच जातो.
काही घरांच्या पायऱ्या संध्याकाळ झाली की माणसांनी भरून जातात. शेतावरून सरपणाचा भारा आणून अंगणात टाकला की वडील पायरीवर बसायचे. आई घरातून थंडगार पाण्याचा तांब्या पायरीवर आणून ठेवी. खांद्यावरच्या टॉवेलने वडील घाम पुसत नि पायरीवर पाय ठेवत. मग रस्त्यातून एखादा वाटसरू जात असेल तर वडील हमखास आवाज देत. ‘‘अरे ये, पाणी तरी घे!’’मग चार घटका गप्पा रंगत पायरीवरच! आमच्या घरच्या पायरीने कितीतरी जणांची सुखदु:खे ऐकली आहेत.
आम्हा मुलांची संध्याकाळी गप्पांसाठी बसायची हक्काची जागा म्हणजे घराची पायरी! शाळेत जाऊ लागल्यावर, अक्षर ओळख झाल्यावर याच पायरीवर कितीतरी अक्षरे गिरवली. कितीतरी चित्रे काढली, पुसली. पुन्हा काढली. उन्हाळ्याच्या दिवसात याच पायरीवर चिमणी ठेवून अंगणात जेवायला बसायचो. दिवाळीत याच पायरीवर पणत्या मांडल्या जात आणि याच पायरीवरून फटाके वाजवले जायचे. भाजी-धान्य यांच्या एकापेक्षा अधिक पिशव्या असतील तर एखादी पायरीवर ठेवली जाते.मग घरातलं अन्य कोणी ती पिशवी घरात आणतो.
काळ सरकत गेला. पोटापाण्यासाठी माणसे शहराकडे गेली. वृद्ध माणसं घराची राखण करायला उरले. मग कातरवेळी पायरीवरून बसून रस्त्याकडे बघत बसायचे एवढाच छंद! माझी आई संध्याकाळ झाली की पायरीवर बसून राही. मोतीबिंदूमुळे अंधूक झालेल्या दृष्टीने रस्ता न्याहाळत राही. रस्त्यातून मी आल्याचा कानोसा घेई. मी पायरीपर्यंत येईस्तवर मला निरखीत राही. तिच्या मनातला हा आनंद मी आजही घराच्या पायरीत शोधतोय!
कितीतरी पावसाळे या पायरीवरून मी पाहिलेत. पायरीवर उभे राहून पागोळ्यांशी खेळलो. उडय़ा मारण्यासाठी पायरी इतकी सुंदर जागा या जगात नाही. याच पायरीवरून पडताना दात पडता-पडता वाचले. घराच्या पायरीवर बसून क्रौंचवध, अमृतवेल, विशाखा, ययाति इत्यादी साहित्य वाचलं. याच पायरीवर बसून मुलीला मांडीवर बसून चिऊ, माऊ दाखवली. आईचा स्पर्श, तिची माया शोधण्यासाठी मी घराच्या पायरीवर नेहमीच बसतो. थोरामोठय़ांच्या पायधुळीने पवित्र झालेल्या पायरीवर आशीर्वादाचे कण शोधतो.
surosheyashavant@gmail.com