घराच्या अंतरंगात बदल करून आपल्या अंतर्मनाला अधिक आनंद मिळतो. येत्या गुढीपाडव्यानिमित्त गृहसजावटीसाठी काही टिप्स..
आपल्या जीवनात असे अनेक क्षण येत असतात, की जे आपल्यासाठी अगदी विलक्षण ठरत असतात. अशा अनेक विलक्षण क्षणांचा साक्षीदार आणि सोबती म्हणजे आपलं घर. हे क्षण सणासुदींचे असतील तर ते नेहमीच अविस्मरणीय ठरत असतात. यातही काही सणांचं आणि क्षणांचं महत्त्व निराळं असतं. त्यांतून आपल्या अंतर्मनाला मिळणारा आनंददेखील निराळा असतो. यांतीलच एक मोठा सण म्हणजे गुढीपाडवा. नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी अत्यंत भाग्यकारक समजला जाणारा क्षण साडेतीन मुहूर्तापैकी एक. ‘पाडव्याचा सण मोठा आनंदा नाही तोटा,’ असं म्हणत आपण साजरा करतो. चैत्र महिन्यापासून सुरू होणारा हा मराठी वर्षांरंभाचा दिवस एका निराळ्या अनुभवांची प्रचीती देत असतो. आनंद घेऊन येणारा हा सण आणि आपलं अंतर्मन प्रफुल्लित करणारं वातावरण- ज्याची आपण सर्व जण आतुरतेने वाट बघत असतो. नवनवीन कपडे, वस्तू, दाग-दागिने, वाहन, नवीन वास्तू अर्थात घर हे सर्व काही या सणाचं औचित्य साधून घेण्यावर आपल्या अंतर्मनाचा ओढा असतो.
एका निराळ्या वातावरणाची अनुभूती घेणारं आपलं अंतर्मन या दिवसासाठी आपल्या घरकुलात सौंदर्याचा साक्षात्कार घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असतं. ज्याप्रमाणे मनातल्या आणि घरातल्या सणाचा आनंद आपण मनमुराद लुटत असतो, त्याप्रमाणे सणातल्या घराला आनंदी बनवण्यासाठी आणि सजावट करण्यासाठी काही तरी करावं या दृष्टीनं शोध घेत असतो. घराच्या अंतरंगात बदल करून आपल्या अंतर्मनाला अधिक आनंद मिळवायचा हा हेतू असतो.
जसं महत्त्व घरातल्या सणाला दिलं जातं तसंच महत्त्व सणातल्या घरालादेखील देणं सुरू असतं. घरासाठी वर्षभरात काही ना काही तरी घेऊन घराची सजावट करण्यासाठी आपण नवनवीन वस्तूंचा शोध घेत असतोच, पण या सणाचं औचित्य साधून निवडलेल्या गृहसजावटीच्या वस्तूंना वेगळंच महत्त्व प्राप्त झालेलं असतं. आपल्या अंतर्मनावर ठसणाऱ्या वस्तूंची निवड आपण जेव्हा सणासुदीला करतो तेव्हा आपल्या शारीरिक, आर्थिक, मानसिक, धार्मिक, सामाजिक तसेच व्यावसायिक अशा अनेक पातळीवर संबंध असणारा हा सण आपल्या घराच्या सजावटीच्या माध्यमातून साजरा केला जाऊ शकतो. अशा वेळी आपलं व्यक्तिमत्त्व आणि अंतर्मन एका निराळ्या प्रकारे व्यक्त होत असतं. या सजावट करण्याच्या कामात सुरुवात आपल्या घराच्या प्रवेशद्वारापासून करता येऊ शकते. या सणासाठी आपल्या घराच्या प्रवेशद्वारापासून अगदी घरातल्या प्रत्येक दालनासाठी सजावटीच्या खास वस्तूंची निवड करता यावी यासाठी बाजारपेठही सज्ज झालेली असते. या विशेष सणासाठी घराची विशेष सजावट करण्यासाठी काही हटके वस्तूंची निवड करता येऊ शकते.
डोअर मॅट : आपल्या घराची सुरुवातच मुख्य प्रवेशद्वारापासून होते. त्यामुळे सजावटीची सुरुवातदेखील त्याच ठिकाणापासून व्हायला हवी. या सणाच्या निमित्तानं आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी डोअर मॅट सज्ज असलं पाहिजे. अनेकदा आपल्या घराच्या सजावटीच्या कामात डोअर मॅटसारख्या वस्तूंकडे दुर्लक्ष केलं जातं अथवा त्यांची निवड उशिरा केली जाते. सणाचं औचित्य साधून डोअर मॅटची निवड करता येद शकते. निरनिराळ्या प्रकारच्या वस्तूंपासून बनवलेल्या आणि विविध रंगांचा वापर करून बनवलेल्या डोअर मॅट सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्याची निवड करण्यासाठी अनेकविध पर्याय उपलब्ध आहेत. काही डोअर मॅटवर कल्पकतेने काही ना काही तरी लिहिलेलं असतं. त्यावर लिहिलेले केवळ दोन-चार शब्ददेखील आपल्या घरी या विशेषदिनी येणाऱ्यांना आगत्याचे वाटू शकतात, त्यांच्याविषयीच्या आपल्या अंतर्मनातील भावभावना व्यक्त करण्यासाठी त्यावर लिहिलेले ते शब्दसुद्धा पुरेसे ठरतात.
कलापूर्ण पडदे : बाजारात विशेषत: सणासुदीच्या दिवसांत नवनवीन आणि आकर्षक वस्तू बघायला मिळत असतात. त्यांपैकी एक म्हणजे वैविध्यपूर्णता असलेले कलापूर्ण पडदे. या सणासाठी खास पडदे निवडून तसेच आकर्षक पद्धतीने त्यांची शिलाई करवून घेऊन आपलं घर अंतर्मनाला भुरळ घालू शकेल आणि ते अत्यंत निराळ्या वातावरणाची निर्मिती करण्यास उपयुक्त ठरू शकेल. विशेषत: रंग तसेच प्रकाश आणि सावलीचा खेळ या माध्यमातून या पडद्यांचं सौंदर्य अधिकच खुलवणं शक्य होऊ शकतं. पडद्यांच्या सजावटीत थोडं हटके काम करण्यासाठी निराळ्या तऱ्हेने शिलाई करवून घेऊन कामात वेगळेपण आणता येतं. अशा कलापूर्ण पडद्यांचा उपयोग या सणाच्या दिवशी घरातल्या घरात होणाऱ्या कौटुंबिक कार्यक्रमाचे फोटो काढण्याच्या वेळी होतो.
बेडशीट्स आणि बेड स्प्रेड्स : काही वेळा आपल्या घरातील बैठकव्यवस्थेत दिवाण अथवा भारतीय बैठकीची व्यवस्था केलेली असते. त्याचप्रमाणे बेडरूममध्ये असलेल्या बेडची रचना साकारलेली असते. या दोन्ही ठिकाणी बेड स्प्रेडचा वापर सणासाठी विशेष सजावट म्हणून करता येऊ शकतो. आपल्या घरात नेहमी आणि रोजच्या रोज वापरातल्या बेडशीटवर आच्छादन म्हणून वापरण्यासाठी खास आकर्षक आणि मुलायम अशा सॅटिन अथवा वेल्वेटच्या कपडापासून बनवलेल्या, शिवाय त्यावर नक्षीकाम केलेल्या बेड स्प्रेडचा वापर या सणाच्या दिवशीची खास सजावट म्हणून करता येऊ शकतो. बेडरूमसाठी विशेषत: लाल, नारिंगी, आकाशी, गुलाबी अशा विविध रंगांच्या कलात्मक वापरातून राजेशाही थाट अनुभवता येऊ शकतो.
डायनिंग टेबलची सजावट : कोणताही सण म्हटला की आपण घरात काही ना काही तरी गोडधोड करून खात असतो. जसं सणाचं जेवण आपल्याला साग्रसंगीत हवं असतं, तसंच ज्या डायनिंग टेबलचा वापर आपण करतो त्या टेबलाची सजावटदेखील खास असायला हवी. आनंदमय आणि प्रफुल्लित करणाऱ्या वातावरणात डायनिंग टेबलवर ठेवलेल्या खास सणासाठी बनवलेल्या पदार्थाचा आस्वाद घेताना त्या टेबलाची सजावट केलेली असेल तर ती पक्वान्नं ग्रहण करण्याचा आनंद निराळाच असेल. आणि तो निश्चितच अविस्मरणीय ठरू शकेल. सध्या बाजारात विविध प्रकारच्या डायनिंग टेबल सजवण्याच्या वस्तू उपलब्ध आहेत. यांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे टेबल मॅट्स, डिनर सेट्स, ग्लासेस, डीशेस, बाऊल्स, टेबल नॅप्किन इत्यादी वस्तू असतात. यांपैकी निवडक वस्तूंची पसंती करून या सणासाठी आपण त्या वापरू शकतो. पसंत केलेल्या या वस्तूंची मांडणी टेबलवर करताना आपल्या सौंदर्यदृष्टीचा कस लागत असतो.
फोटो फ्रेम्स आणि फॅमिली पोटर्र्ेट : हल्ली फोटो काढण्यासाठी ना फोटोग्राफरला बोलवावं लागत, ना फोटो स्टुडिओत जावं लागत. शिवाय स्वतंत्र कॅमेरा असण्याची देखील आता गरज राहिलेली नाही. कारण हल्ली प्रत्येकाकडे असणाऱ्या मोबाइलमध्येच कॅमेरा असतो, तोही अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा. त्यामुळे या सणाचं औचित्य साधून घरातच फोटो सेशन होऊ शकतं. यासाठी निश्चितच आपल्या घरालादेखील सजवणं आणि फोटोसाठी खुलवणं आवश्यक झालं आहे. या आठवणी कॅमेऱ्यात घेण्यासाठी हल्ली आपण नेहमीच उत्सुक असतो. अशा आठवणींना फोटो फ्रेम्स अथवा फॅमिली पोटर्र्ेटच्या माध्यमातून साकारता येतं आणि घराच्या सजावटीचं काम करताना फोटो फ्रेम्स आणि फॅमिली पोटर्र्ेट यांचा वापर करून आपण सौंदर्यात भर घालू शकतो.
शोभेची झाडं आणि शोभेच्या वस्तू : निसर्गाशी आपलं असलेलं नातं आणि आपल्याला आनंद देणारी सुंदर फुलझाडं शक्य झाल्यास नैसर्गिक अथवा कृत्रिम निवडून ठरावीक ठिकाणी सजावट करण्यासाठी वापरू शकतो. सोबत काही शोभेच्या वस्तूंची मांडणीदेखील करता येऊ शकते. एकप्रकारे वातावरणात जिवंतपणा आणण्याचं काम या अशा छोटय़ा, पण कलात्मकतेने बनवलेल्या वस्तू आणतात.
गुढीपाडव्याचं औचित्य साधून, थोडा वेळात वेळ काढून बाजारात फेरफटका मारून आपल्या स्वप्नातल्या घराचं नंदनवन बनवण्यासाठी आणि अंतर्मनाला अधिक आनंद मिळण्यासाठी सणातलं घर सजवून घरातला सण साजरा करू या.
शैलेश कुलकर्णी (इंटिरिअर डिझायनर)