वास्तुरचनाशास्त्राचे अंग असलेला त्या शास्त्राचाच एक छोटासा हिस्सा म्हणजे सज्जा! वास्तूचे सौंदर्य या सज्जामुळे खुलत असे. ‘सज्जा’ या शब्दाचा अर्थ भाषेप्रमाणे बदलत जातो. संस्कृतमध्ये ‘सज्जा’ म्हणजे आरास, प्रसाधन, सजावट; तर आपटे यांच्या मराठी शब्दकोशात ‘सज्जा’ म्हणजे घराच्या वरच्या मजल्यावर काढलेली पडवी असा अर्थ दिलेला आहे. याच शब्दकोशात सज्जासाठी ‘चंद्रशाला’ असा काव्यात्म शब्दीही आला आहे. व्यावहारिक मराठी शब्दार्थकोशात मात्र सध्याच्या मराठीत पटकन समजेल असा अर्थ आहे तो असा- इमारतीच्या बाहेरच्या अंगाला काढलेली व कठडा असलेली जागा म्हणजे सज्जा. हल्लीच्या मराठीमधील बाल्कनी/गॅलरी. सज्जासारखाच भासणारा हिंदीतील शब्द म्हणजे ‘छज्जा’ जो सर्वसाधारणपणे गच्ची/टेरेस या अर्थाने येतो. पण मराठीतच वापरल्या जाणाऱ्या ‘छज्जा’ या शब्दाचा अर्थ ‘दरवाजाच्या किंवा खिडकीच्या वर पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून सिमेंट काँक्रीटची केलेली झापी’ असा आहे. त्यामुळेच मराठीतील ‘सज्जा’ आणि हिंदीतील ‘छज्जा’ हे दोन्ही शब्द अर्थ आणि रचनेच्या दृष्टीने परस्परांना पूरक आहेत.
पूर्वीच्या काळातील सज्जा हा अरुंद असून सलग लाकडापासून बनविलेला असे. वरच्या लाकडी कठडय़ाखाली जाळी/नक्षीकाम असे. चुनखडीतील असे काम असलेल्या सज्जाला ‘चुनेगच्ची’ म्हणत. महाराष्ट्रात विशेषत: पुण्यात पेशवेकालीन दुमजली वाडय़ांमध्ये असे सज्जे आढळून येत. (पुण्याचा विश्रामबागवाडा हे याचे एक उदाहरण.) पुढच्या बाजूचा दिंडी-दरवाजा आणि त्याच्या तिन्ही बाजूंनी इमारत असलेल्या वाडय़ाच्या मधल्या भागात मोठा चौक असे. वाडय़ाला असलेले सज्जे सहसा या चौकाच्या बाजूला असत. खानदानी घरंदाज स्त्रिया कारणाशिवाय सज्जात जात नसत. सज्जाच्या आतील अंगास असलेल्या खिडक्यांमधून जाळीच्या पडद्याआडून चौकातील व्यवहार घरातील स्त्रियांना बघता येत असत. वाडय़ाच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या सज्जामध्ये तर स्त्रिया कधीच दिसत नसत; पण वास्तूला शोभिवंत करणारा हा सज्जा पेशवाईच्या काळात मात्र नायकिणीचा/कलावंतिणीचा सज्जा म्हणून बदनामही झाला.
मुसलमानांच्या आक्रमणानंतर त्यांच्या अनेक गोष्टींचा प्रभाव जसा भारतीय जीवनशैलीवर पडला तसाच तो वास्तुरचनांवरही पडला. साहजिकच त्याचाही वापर आपल्या वास्तुरचनांमध्ये झालेला दिसतो. अशा तऱ्हेचे सज्जे, वास्तुरचनेचे नमुने मांडू, चंदेरी, गुजरातमध्ये बघायला मिळतात. कौशल्यपूर्ण कलाकुसर केलेल्या ब्रॅकेटच्या सपोर्टवर आधारित असे छोटे-मोठे सज्जे/छज्जे राजस्थान, गुजरात, पंजाब, उ. प्रदेशमध्ये दिसून येतात. राजस्थानमध्ये दिसणारा झरोखा हादेखील सज्जाचाच एक प्रकार आहे. ज्यात मुगल आणि राजस्थानी शिल्पकला अभिव्यक्त होते. इमारतीच्या बाहेरच्या अंगाला पुढे येणारे झरोखे तिच्या सौंदर्यात भरच घालतात. तसेच परिसराच्या निरीक्षणासाठी/ हवा खाण्यासाठीही उपयोगात आणता येतात. जयपूरचा हवामहल हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. शिवाय सज्जावरच्या छज्ज्यामुळे ऊन-पाऊस यांपासून संरक्षणही मिळते.
दक्षिण भारतातील ऐतिहासिक ठिकाणे म्हणून परिचित असलेल्या श्रीरंगम्, शृंगेरी अशांसारख्या गावांमध्ये मात्र सज्जांचा अभाव जाणवतो. परंतु गेल्या काही वर्षांत बंगलोर, मंगलोर अशांसारख्या शहरातून सज्जा/ छज्जा लोकप्रिय व्हायला सुरुवात झाली आहे. खिडक्यांवर पर्यावरणाशी जुळवून घेणारे मंगलोरी कौलांचे उतरते छत बसवून घेण्याकडे लोकांचा कल दिसून येतो. कधी कधी त्यासाठी टेराकोटा टाइल्सही वापरल्या जातात. हरियाणामध्ये सज्जाला ‘भारजा’ असेही म्हटले जाते. जुन्या पारंपरिक घरांना असे भारजे रस्त्याच्या बाजूला पण असत. त्यांचा दुहेरी उपयोग होई. घरातल्या माणसांना जाण्या-येण्यासाठी जागा मिळत असे आणि रस्त्यावरच्या घटनाही बघायला मिळत. इमारतीच्या दर्शनी भागाला सौंदर्य देणाऱ्या या सज्ज्यांमुळे रस्त्यालाही व्यक्तिमत्त्व प्राप्त होते. हरियाणातील एका परंपरागत जुन्या घराचा सज्जा नूतनीकरणाच्या वेळी मोठय़ा खुबीने नव्या घरात सामावून घेतला.
मुंबईमध्ये, सज्जे असलेल्या काही जुन्या इमारती आजही पाहायला मिळतात. मागेपुढे सज्जे व मध्यभागी मोठा चौक असलेल्या चाळीही इथेच दिसतात. या सज्जांचा उपयोग झोपण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी, पाणी साठविण्यासाठी अशा विविध  कारणांसाठी केला जातो. बदलत्या काळानुसार सज्जाही रंग, रूप, अर्थ असा सर्वागांनी बदलत गेला. आधुनिक बाल्कनीने त्याची जागा घेतली. अधिक रुंद बाल्कनी टेरेस म्हणून समजली जाऊ लागली. शहरीकरणाच्या रेटय़ामुळे, जागेची टंचाई व गगनाला भिडलेल्या भावांमुळे बाल्कनी बंद करून तिचा विविध कारणांसाठी वापर केला जातो. मोठय़ा शहरात नवीन बांधल्या जाणाऱ्या इमारतीत तर सज्जाच राहिला नाही. हल्ली मराठीतील ‘सज्जा’ हा शब्द जसा विसरला गेला आहे, तसाच मुंबईसारख्या महानगरांमधील वास्तुरचनेतून सज्जाही हद्दपार होत चालला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home balcony
First published on: 16-08-2014 at 01:02 IST