गेल्या आठवडय़ात बालमैत्रिणीच्या खास आग्रहावरून तिचे आधुनिक पद्धतीने सजवलेले (रिनोव्हेट केलेले) घर बघायला गेले होते. मुळातच तिचे सासरचे घर ऐसपैस, पण थोडे जुन्या धाटणीचे होते. नव्या पिढीच्या आवडीनिवडीनुसार गृहसजावटीच्या आधुनिक कल्पनांप्रमाणे त्यांनी त्याच घरांचा संपूर्ण मेकओव्हर म्हणजे कायापालट केला होता. आमच्या त्या भेटीत एक विशेष कार्यक्रम होता. तो म्हणजे, तिथे नव्याने बनवलेल्या  होम-थिएटरमधे सध्या गाजत असलेला चित्रपट पाहण्याचा. काही वर्षांपासून भरपूर मोठी जागा असलेल्या घरात बऱ्याच सधन आणि हौशी कुटुंबात होम थिएटरची कल्पना रुजताना दिसतेय. बाहेरच्या थिएटरमध्ये मुद्दाम जाऊन तिथे चित्रपट पाहण्याऐवजी आपल्या सोयीने हवे तेव्हा हवा तो चित्रपट आपल्याच घरात अगदी आरामात बघण्यासाठी घरात बनवलेली खास स्वतंत्र खोली म्हणजेच होम थिएटर. अर्थात चित्रपटांव्यतिरिक्त टी.व्हीवरील क्रिकेटची रोमहर्षक मॅच किंवा संगीताच्या एखाद्या श्रवणीय मैफिलीचा आस्वादही तिथे रसिकतेने घेता येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेवणानंतर मोठय़ा कौतुकाने आम्ही दोघींनी त्या थिएटरमधे प्रवेश केला. दरवाजापासूनच थिएटरमध्ये शिरल्याचा आभास व्हावा असे विचारपूर्वक गृहसजावट केल्याचे जाणवले. म्हणजे दारातून आत शिरल्याबरोबर समोरच्या भिंतीवर चित्रपटाच्या मुहुर्ताला फटमारच्या फलकाने (क्लॅपिंग बोर्ड) चित्रपटसृष्टीची आठवण करून दिली. आत शिरल्यावर थिएटरमध्ये जशा एकापुढे एक आसनांच्या रांगा असतात, तशाच मागेपुढे अशा दोन रांगांमध्ये प्रत्येकावर तीन-चार जण बसू शकतील अशा दोन गुबगुबीत सोफ्यांची सोय होती. मात्र थिएटरच्या खुर्च्यापेक्षा त्यांचा गुबगुबीतपणा माणूस बसताक्षणी अर्धाअधिक रुतून जाण्याइतपत होता. संपूर्णपणे बंदिस्त अशा त्या मोठय़ा हॉलमध्ये लक्ष वेधून घेत होता तो समोरचा अंदाजे ५ बाय ९चा भला मोठा पडदा. अर्थात गरज नसेल तेव्हा तो वरती गुंडाळूनही ठेवता येतो. काहीजण पडद्याऐवजी भिंतीचाही वापर करतात म्हणे. मिडीया प्लेअरवर सीडी लावून तिने एकीकडे एसी चालू केला. ऑक्टोबरच्या रणरणत्या वातावरणाचा, रस्त्यावरच्या कलकलणाऱ्या घामाघूम वर्दळीचा त्या ठिकाणी मागमूसही जाणवत नव्हता. होम थिएटरमधील सुखद गारव्यात बाहेरच्या एखाद्या थिएटरमध्ये न जाताही एकप्रकारची वातावरणनिर्मिती तर छानच झाली होती. हळूहळू मंद होत चाललेल्या प्रकाशात समोरच्या पडद्यावरचा प्रसंग आणि थिएटरप्रमाणेच साऊंड सिस्टीमद्वारे कानावर पडणारे चित्रपटातील संवाद ऐकता ऐकता समोरच्या पडद्यावरून माझे चित्त काही काळ विचलित होऊन भूतकाळाच्या पडद्याचा मागोवा घेऊ  लागले. अचानक मी लहान होऊन खूप वर्षांपूर्वीच्या चाळीतल्या तिच्याच घरात पोचले.

संपूर्ण चाळीत त्यांच्या घरीच सर्वप्रथम कृष्णधवल टी.व्ही. आणला गेला. तेव्हा खासगीपणा जपण्याच्या आजच्या इतक्या अतिरेकी कल्पना तरी कदाचित नसाव्यात. किंवा मनोरंजनाचे त्या काळचे अत्याधुनिक साधन आणि त्यावरचे कार्यक्रम पाहण्याच्या उत्सुकतेपायी विनासंकोच सर्व चाळकऱ्यांची सुरु वातीला संध्याकाळी त्यांच्याकडे हजेरी.. गेलाबाजार फेरी तरी ठरलेली असायची. मग हळूहळू बुधवारचा चित्रहार.. तसेच गजरा वगैरे कार्यक्रमांना आणि शनिवारचा मराठी आणि रविवारी दिल्लीवरून दाखवला जाणारा हिंदी चित्रपट बघायला त्यांच्या इनमिन दोन खोल्यांतील बाहेरच्या जेमतेम १२ बाय १५ च्या खोलीत (त्यावेळी हॉल किंवा ड्रॉइंग रूम वगैरे शब्दही चाळीत परिचित नव्हते)तर त्या बाहेरच्या खोलीत सगळी चाळकरी मंडळी दाटीवाटीने बसत. आजवर सिनेमा पाहण्याची हौस फिटण्यासाठी कुठल्यातरी थिएटरमधे मग ते वातानुकूलित किंवा बिगर वातानुकूलितसुद्धा असेल तिथे जाऊन तिकिटासाठी उन्हातान्हात आगाऊ  किंवा करंट बुकिंगसाठी रांगेत उभे राहून तिकिटे काढण्याचे सव्यापसव्य करावे लागायचे. पण आता घरातच (भले शेजाऱ्यांच्या का असेना) दर आठवडय़ाला सिनेमा पाहण्याची सोय होऊ  लागली, तीही कुठे यातायात न करता की एक पैही खर्च न करता. अशा प्रकारे थिएटरमधला सिनेमा प्रत्यक्ष घरात आला. आणि घराचे काही प्रमाणात काही काळासाठी तरी थिएटरमध्ये रूपांतर झाले. अर्थात तेव्हा शेजाऱ्यांचे संबंध आजच्यासारखे फक्त हॅलो.. हाय म्हणण्यापुरते मर्यादित नव्हते म्हणूनच त्या थिएटरमध्ये कुणालाही प्रवेश होता. त्या एवढय़ाशा जागेत आम्हा बच्चे कंपनीची तर टी.व्ही.च्या पडद्याकडे बघताना मान मोडून यायची. कारण जेमतेम फूटभर अंतरावर टी.व्हीची स्थापना. शिवाय जागा न मिळालेली किंवा हक्काने घरात बसायला संकोच वाटणारी मंडळी बाहेरच्या गॅलरीत उभी राहून ये-जा करून कार्यक्रमाचे दूर..दर्शन घेत असत. या सगळ्यात बिचारी घरातील मंडळी म्हणजे मैत्रिणीचे आईबाबा मात्र अंग चोरून कुठेतरी स्वत:ला अ‍ॅडजस्ट करून बसायचे. आता प्रश्न पडतो की त्यांनाही कधीतरी आपण कुटुंबानेच फक्त टी.व्हीचे कार्यक्रम बघावे असे वाटले नसेल का? असो.. पण हळूहळू एक एक बिऱ्हाडात टी.व्हीची खरेदी होऊ  लागली, तशी मैत्रिणीच्या घरची गर्दी इतर ठिकाणी पांगली जाऊ  लागली. त्या वेळी टी.व्हीसाठी एक खास कॅबिनेट मिळायची- ज्यात मध्यभागी टी.व्ही. आणि दोन्ही बाजूला आणि खाली कपाट होते. टी.व्ही.बंद करण्याच्या सरकत्या दाराची उघडझाप करायला आम्हाला खूप आवडायचे; पण सतत केल्यास ते अडकून जाईल असा मोठय़ांकडून दम मिळाला की थांबावे लागे. कित्येक घरात तर दोन खोल्यांत बरीच माणसे राहायची. त्यांचे सामानही भरपूर. मग अशा वेळी टी.व्ही. ठेवण्याच्या भन्नाट जागा अनेकांनी शोधून काढल्या होत्या. कुणी भिंतीवर खास फळ्या ठोकून तर कुणी मध्यम उंचीच्या कपाटावर, तर काहीजणांनी चक्क दोन खोल्यांमधल्या दारावर फळी ठोकून तिथे ठेवलेले मी पाहिले आहेत. ते  खरे खरे दू..रदर्शन. एरवी मात्र सर्व सामान्यांच्या घरात त्या काळी जागेअभावी दूरदर्शनवरील कार्यक्रमांचे समीपदर्शनच घडत असे. टी.व्ही.च्या अ‍ॅण्टीना हा प्रकारही फार त्रासदायक वाटायचा. घरांच्या गच्चीवर किंवा गॅलरीत लावलेल्या त्या अ‍ॅण्टीना वाऱ्याने हलल्या की पडद्यावरची चित्रे थरथरू लागत. सगळा रंगाचा बेरंग होई. मग प्रेक्षकांच्या गर्दीतून कुणीतरी उत्साही व्यक्तीने वर जाऊन ती अ‍ॅडजस्ट करणे, खालच्यांनी चित्र ठीक दिसत असल्याचे सांगणे.. तोवर कार्यक्रमातील काही भाग न दिसल्यामुळे बऱ्याच जणांची चुकचुक कानावर पडणे असा सर्व माहोल त्या टीचभर खोलीतल्या थिएटरमध्ये अनुभवायला मिळे. नंतर इंटरनल अ‍ॅण्टीनाच्या पर्यायामुळे या व्यत्ययाला थोडा आळा बसला. खरं तर तेव्हा जागा नाही म्हणून टी.व्हीची खरेदी नाही हे कारण तसे अशक्यच वाटणारे. कारण आहे त्याच जागेत घरातील माणसांनी आणि सामानाने सामावून जायचे हा घरोघरचा शिरस्ताच होता. पण आजच्यासारखे कुठल्याही क्षणी बाजारात जाऊन टी.व्ही खरेदी करून आणणे त्या काळी आर्थिकदृष्टय़ा जसे सहज शक्य नव्हते तसेच आजच्यासारख्या असंख्य कंपन्यांची मॉडेल्सही उपलब्ध नव्हती. माझ्या आठवणीप्रमाणे सरकारी कंपनीचा विशिष्ट टी.व्ही.च त्या काळी विश्वासार्ह मानला जाई आणि त्याच्या खरेदीसाठी वेटिंगलिस्ट होती. कालांतराने मात्र या मनोरंजनाच्या साधनाने सर्व स्तरातील घराघरांत अगदी शौचालयांची सोय नसलेल्या झोपडपट्टयांतही शिरकाव केला. नव्हे, घरातील आवश्यक वस्तूंमधे त्याची गणना होऊ  लागली. इतकी, की एखाद्याच्या घरी टी.व्ही नसणे ही आश्चर्याची बाब वाटू लागली.

आजकाल तर टी.व्ही हे काही सिनेमा बघण्याचे किंवा मनोरंजनाचे एकमेव साधन राहिलेले नाही. कारण कॅम्प्युटरवर अगदी मोबाइलवरही आपल्याला हवा तो  सिनेमा किंवा इतर काही हवे तेव्हा बघणे शक्य झालेय. एकेकाळी घरातील टी.व्हीवरील कार्यक्रम बघायला फक्त कुटुंबीयच नाही तर शेजारीपाजारीही एकत्र येत. आणि  आता मात्र बऱ्याच ठिकाणी एकाच घरात प्रत्येकाच्या खोलीत टी.व्ही सेट लावलेला असतो. ज्यामुळे घरातील प्रत्येक सदस्याला त्याच्या आवडीनुसार स्वतंत्रपणे आपापल्या खोलीत हवा तो कार्यक्रम बघता येऊ  शकतो. अशाच प्रकारातून प्रत्येकाचा खासगीपणा जपण्याच्या कल्पनेचे बीज रुजत चाललंय का.. माणसामाणसांतील अंतर वाढत चालल्याचे हे लक्षण असावे का.. जी बाब टी.व्हीची, तीच काही  प्रमाणात होम थिएटरची. म्हणूनच अतिशय आरामात आणि शांततेत आम्ही दोघीच्या दोघीच चित्रपट पहात असताना माझ्या डोळ्यासमोर काही वर्षांपूर्वीचे सुट्टय़ांमधले आम्ही मित्रमैत्रिणींनी भावंडांनी एकत्रितपणे अगदी घोळक्याने थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्याचे सोहळे फ्लॅशबॅकरूपाने येऊ  लागले.

– अलकनंदा पाध्ये

alaknanda263@yahoo.com

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home theaters music system
First published on: 04-11-2017 at 01:52 IST