डॉ. मनोज अणावकर

आ  मचे एक देसाई सर होते. त्यांनी आम्हा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यर्थ्यांना अभ्यासक्रम संपताना एक कानमंत्र दिला होत. ते म्हणाले होते की, घर विकत घेणाऱ्या ग्राहकांचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे- घर घेणारा तरुण वर्ग, जो कर्जाच्या माध्यमातून घरासाठी पैसे उभे करताना आपली आयुष्यभराची कमाई माध्यमातून तुम्हा घर बनविणाऱ्या इंजिनिअर्सच्या हाती सोपवत असतो. दुसऱ्या प्रकारचे ग्राहक निवृत्तीनंतर आयुष्यभर काम करून फंड आणि निवृत्ती वेतानाच्या रूपाने हाती आलेल्या आयुष्यभराच्या कमाईला घरासाठी विश्वासाने तुमच्या सुपूर्द करत असतात. थोडक्यात, कोणताही ग्राहक त्याची आयुष्यभराची मिळकत मोठय़ा विश्वासाने तुमच्याकडे देत असल्यामुळे चांगल्या दर्जाचे बाधकाम असलेले घर त्याला देण्याची महत्त्वाची जबाबदारी इंजिनिअरवर असते आज बांधकामाच्या दर्जाबाबत लिहीत असताना या गोष्टीची पुन्हा एकदा आठवण झाली.

बांधकामाचा हा दर्जा नेमका कोणकोणत्या बाबींवर अवलंबून असतो, घर घेताना जनसामान्यांना ते तपासून घ्यायचं झालं तर त्यातल्या काही जुजबी गोष्टी पाहता येतील का, अशा प्रश्नांची उत्तरं आपण आज या भागात जाणून घेणार आहोत. त्याआधी इमारतीच्या बांधकाम प्रकारांविषयी थोडी जुजबी माहिती घेणे आवश्यक आहे.  इमारतीच्या बांधकामाचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात. फोटोची फ्रेम म्हणजे चौकट असते, तशाप्रकारचं आडवी बीम (तुळई) आणि उभे कॉलम (स्तंभ) यांच्या चौकटीच बांधकाम असलेला फ्रेम्ड स्ट्रक्चर हा एक प्रकार (आकृती १ (अ)) किंवा मग संपूर्ण इमारतीचं वजन भिंतीच्या माध्यमातून तोलून धरणारा बीम- कॉलम नसलेला लोड बेअरिंग स्ट्रक्चर’ दुसरा प्रकार (आकृती १ (ब)) कधीकधी या दोन्ही प्रकारांचं मिश्रण असलेला संयुक्त प्रकारही असतो, पण तो फारच कमीवेळा आढळून येतो. फ्रेम्ड स्ट्रक्चर या प्रकारात प्रत्येक मजल्याची स्लॅब हो बीमवर तोलून धरली जाते. म्हणजे स्लॅबचं वजन बीमवर तर बीमचं कॉलमवर, कॉलमचं वजन इमारतीच्या पायावर आणि तिथून ते पायाखाली असलेल्या माती अथवा खडकावर दिलं जातं. या प्रकारातल्या भिंती या एखाद्या पडद्याप्रमाणे खोल्या निर्माण करण्याकरता बीम- कॉलमच्या चौकटीत उभारल्या जातात, त्यामुळे या भितींवर इमारतीचं कोणतंही वजन येत नसतं. त्यामुळे या प्रकारच्या बांधकामात तुलनेन भिंती कमी जाडीच्या असतात. असं असल्यामुळे काहीवेळा इमारतीच्या किंवा घराच्या नूतनीकरणाच्यावेळी अशा प्रकारच्या काही भिंती काढून टाकल्या किंवा त्यात काही जुजबी बदल केलेत तर ते तितकसं धोकादायक नसतं पण असं करताना इमारतीचं वय आणि इतर काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. लोड बेअरिंग स्ट्रक्चर या प्रकारात स्लॅबचं वजन थेट भितींवर, तिथून ते भिंतीखालच्या पायावर आणि मग माती किंवा खडकावर दिले जाते, त्यामुळे अशाप्रकारच्या भिंतींमध्ये कोणतेही बदल म्हणजे इमारत कोसळण्याला निमंत्रण म्हणावे लागेल या प्रकारच्या बांधकामातल्या भितींची जाडी बरीच जास्त असते. जसे मजले वाढत जातात, तशी वजन घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी भितींची जाडी खूपच वाढवावी लागते, पण इमारतीच्या भूखंडाचे क्षेत्रफळ मात्र मर्यादित असतं आणि म्हणूनच त्या मजल्याबरोबर लोड बेअरिंग स्ट्रक्चर या प्रकारावर मर्यादा येतात म्हणूनच बहुमजली इमारती उभारताना वर उल्लेखलेल्या या दोन प्रकारांपैकी फ्रेम्ड स्ट्रक्चर हाच प्रकार आजच्या काळात प्रामुख्याने इमारत बांधकामासाठी वापरला जातो.

तयार घरं घेत असताना इमारतीच्या आतून आणि बाहेरून रंगकाम झालेलं असतं त्यामुळे बांधकामाचा दर्जा तपासणं काहीसं अवघड असतं. पण जर बांधकाम सुरू असेल तर घराची नोंदणी करण्याआधी खालील गोष्टी तपासून बांधकामाचा दर्जा चांगला असल्याची खात्री करून घ्यावी.

१) कॉक्रीटचे बीम, कॉलम, स्लॅबचा तळ यांचे पृष्ठभाग हे नितळ पांढऱ्या रंगाचे असावेत ते मधमाशीच्या पोवळ्याप्रमाणे अजिबात सच्छिद्र असता कामा नयेत, त्यावर कोणताही खडबडीतपणा अथवा तडे नसावेत काटकोनातले पृष्ठभाग जिथे मिळतात, ते कॉर्नर फुटलेले नसावेत. २) बीम, कॉलम, स्लॅब किंवा सज्जा अथवा पोटमाळा हे भाग तयार झाल्यानंतर इमारतीच्या अशा सरचनात्मक भागांमधल्या लोखंडी सळ्या अजिबात दिसता कामा नयेत ३) या संरचनात्मक भागाच्या पृष्ठभागावर काळसर बुरशीसदृश्य घर अथवा शेवाळ असता कामा नये. कारण अशाप्रकारची बुरशी किंवा शेवाळ असण्याचा अर्थ त्यासाठी आवश्यक असलेली ओल म्हणजेच पाण्याचा पाझर कुठेतरी असल्याचे द्योतक आहे. याचाच दुसरा असाही अर्थ कधीकधी असू शकतो, की अशा भागामध्ये आतून कुठेतरी सूक्ष्म भेगा, सच्छिद्रता असल्यामुळे काँक्रीटची घनता आणि म्हणून ताकद कमी झालेली असू शकते.

(४) भिंतीसाठी वापरलेल्या विटांवर किंवा कॉक्रीटच्या ब्लॉक्सवरही दोष असता कामा नयेत.

५) जर भिंतींना प्लॅस्टर झाले असेल, तर त्याचाही पृष्ठभाग उभा-आडवा सरळ रेषेत असावा, त्यावर उंचसखलपणा असता कामा नये. ६) नळासाठी वापरलेल्या पाईपच्या जोडण्या जर भिंतीत लिपण्याआधी दिसू शकत असतील, तर त्यातून पाण्याची गळती किंवा पाझर होत नाही ना याची खातरजमा करून घ्यावी. अन्यथा राहायला गेल्यागेल्या काही दिवसातच गळतीच्या तक्रारी सुरू होतात.

७) दरवाजे-खिडक्यांसाठी वापरलेल्या लाकडाच्या चौकटींवर भेगा अथवा लाकडातल्या गाठी असता कामा नयेत. नाहीतर या चौकटी सडायला लवकर सुरुवात होते.

(८) भिंतीवरील टाईलिंगच्या कामात कुठेही ओबडधोबडपणा नसल्याची किंवा टाईल्स फुटल्याने पॅचवर्क  केलेले नाही, याची खात्री करून घ्यावी.

९) रंगकाम झालेले असले, तरी कुठेही पाण्याचा पाझर किंवा गळती नाही ना, ते नीट पाहावे.

१०) विजेच्या वायर्स कुठेही उघडय़ा नाहीत, पंखे- दिव्याच्या बटणाची उपडझाप व्यवस्थित होत आहे, ती खिळखिळी नाहीत याची खात्री करून घ्यावी, नाहीतर शॉर्टसर्किट अथवा शॉक बसायचा धोका असतो. तुम्ही जरी नवं घर तयार घेणार असाल, तरी वर दिलेल्या मुद्यांपैकी क्रमांक ७ ते क्रमांक १० पर्यंतचे मुद्दे तपासून घेऊ शकता.

शेवटी घर हे आपल्या आनंदासाठी असतं आणि नव्या घराचा आनंद तेव्हाच असतो, जेव्हा आपण खर्च केलेल्या प्रचंड रकमांच्याबदल्यात आपल्याला उत्तम दर्जाचे घर मिळते. शिवाय इमारतीचा दर्जा जर घर घेतानाच खराब असेल, तर अवघ्या काही वर्षांतच दुरुस्तीचा खर्च आपल्यावर लादला जाऊ  शकतो. म्हणूनच बांधकामाच्या दर्जाबाबतच्या या किमान जुजबी गोष्टी तरी तपासून बघा आणि तुमच्या घराच्या आरोग्याची खात्री करूनच घर निवडा.

सिव्हिल इंजिनीअर आणि इंटिरिअर डिझायनर

  anaokarm@yahoo.co.in