scorecardresearch

गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन

आपली सोसायटी स्थापन झाल्यानंतर लगेचच कार्यकारिणीची निवड करण्यात येते.

राजन बुटाला

आपली सोसायटी स्थापन झाल्यानंतर लगेचच कार्यकारिणीची निवड करण्यात येते. या निवडलेल्या कार्यकारिणीच्या हातून इमारतीची दुरुस्ती व भविष्यात येणाऱ्या समस्या यांची निगराणी करण्यासाठी सर्वानुमते नियोजन व तरतूद करणे आवश्यक आहे; योग्य प्रकारे नियोजन व तरतूद केल्यास सोसायटीची आर्थिक स्थिती भक्कम होते आणि ती भक्कम असायालाच हवी यामुळे सभासदांवरील आर्थिक भार कमी होण्यास तेवढीच मदत होते.

आपल्या संस्थेच्या सिंकिंग फंडाची रक्कम फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवली जाते. ही रक्कम इमारतीची डागडुजी करतेवेळी उपयोगात आणता येते. मासिक बिलात रिपेअर व मेटेनन्स याकरिता दोन वेगवेगळे रकाने असावेत. पहिला- मेजर रिपेअर फंड व दुसरा- मायनर रिपेअर फंड.

  • दरमहा जमा होणारी पहिल्या रिपेअर फंडाची रक्कम  बँकेत ७ वर्षांसाठी रिकरिंग डिपॉझिटमध्ये ठेवावी किंवा दरवर्षी फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवत जावी. आपल्या इमारतीचं जेव्हा प्लास्टर, पेंटिंग यांसारखी मोठी कामं करावी लागतात. त्यावेळी मुदतीनंतर व्याजासहित मिळणारी रक्कम पाहता काम करतेवेळी सभासदांकडून गोळा करण्यात येणाऱ्या रकमेचा भार हलका होण्यास मदत होते.
  • मायनर रिपेअर फंडाची रक्कम जरुरीप्रमाणे वापरू शकतो.
  • इमारतीच्या विम्याचा प्रीमियम, प्रॉपर्टी टॅक्स, अकाउंट व ऑडिट चार्जेस हे वार्षिक भरावयाचे असतात म्हणून याकरिता जमा होणाऱ्या रकमेचा हिस्सा एक वर्षांसाठी बँकेत दरमहा रिकरिंग स्वरूपात ठेवावा. यामुळे मुदतीनंतर रकमेवरील व्याज छोटय़ा कामांसाठी उपयोगात आणता येते.
  • वरीलप्रमाणे नियोजन केल्यानंतर बाकीची रक्कम पाणी बिल, वीज बिल, सव्‍‌र्हिस चार्जेस याकरिता वापरात येईल.
  • सोसायटीच्या सभासदांसाठी उद्वाहन (Lift)  बसवताना  चांगल्या व सुप्रसिद्ध कंपनीचाच विचार करावा, कारण सुरक्षा ही महत्त्वाची! उद्वाहन कोसळून अपघात झाल्याच्या अनेक घटना आपल्याला वृत्तपत्रातून पाहायला मिळतात;

म्हणूनच सुरक्षेशी तडजोड करणे धोकादायक ठरू शकते. उद्वाहन सुस्थितीत ठेवण्यासाठी कंपनीशी कायमस्वरूपी देखभाल करार करणे आवश्यक आहे. मासिक शुल्क आकारताना याचाही विचार व्हावा.

  • सोसायटीमधील ड्रेनेज चेंबर्स वर्षांतून एकदा साफ करून घेतल्यास चेंबर्स स्वच्छ राहतात, झाकणं कितीही घट्ट बसणारी असली तरी वाळू व माती जाऊन चेंबर्स तुंबतातच.
  • ड्रेनेज चेंबर्सची झाकणं एकेक उघडून त्यामध्ये झुरळांचा स्प्रे मारून लगेच झाकण बंद करावे. दर चार महिन्यांनी किंवा झुरळे व किडे यांचा त्रास जाणवल्यास फवारणी करावी, यामुळे त्यांचा त्रास फारसा जाणवत नाही. सभासदांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही फवारणी आवश्यक आहे.
  • सोसायटीमधील पाण्याच्या टाक्या जरुरीप्रमाणे साफ करून घ्याव्यात.

यामुळं सभासदांना स्वच्छ पाणीपुरवठा होण्यास मदत होईल. हल्ली पाण्याच्या टाक्या मशीनचा वापर करून साफ केल्या जातात पण मशीनचा वापर करून प्रेशरने टाक्या साफ केल्यास प्लास्टर ढिलं (Loose) होण्याची तसेच निखळण्याचीही शक्यता अधिक म्हणून मशीनचा वापर टाळणं हिताचं.

  • पुनर्निर्माण निधी : इमारत नवीन असतानाच ठरावीक रक्कम विशिष्ट कालावधीसाठी दरमहा जमा केल्यास मोठी रक्कम जमा होईल व तिचा विनियोग करून  इमारतीचं  पुनर्निर्माण (Self redevelopment) करता येईल. या फंडामुळे सभासदांचा भार मोठय़ा प्रमाणात हलका होईल.
  • मुख्य व महत्त्वाचा मुद्धा म्हणजे पाणी व वीज यांचं नियोजन.

पिण्याचं पाणी येण्याच्या वेळेत पंप चालू करण्यासाठी स्वतंत्र माणूस ठेवला जातो, त्यासाठी साधारणपणे मासिक २५०० रुपये वेतन अधिक वार्षिक बोनस २५०० विचारात घेता  वर्षांला ३२५०० रुपये खर्च होतात म्हणजे मासिक वेतन २७०० रुपये, शिवाय दरवर्षी वाढत जाणारा पगार व बोनस हा वेगळाच!    

पंप चालू करण्यासाठी नेमणूक केलेली  व्यक्ती साधारणपणे १० ते १२ सोसायटय़ांचे काम पाहत असते. परिणामी मोठय़ा प्रमाणात पाणी वाहून  जाण्याचीच शक्यता अधिक. महानगरपालिकेच्या वाहिनीमधून सोसायटीच्या टाकीत येणारे पाणीही अनेक वेळा वाहून जाते आणि हेच वाहून वाया जाणारे पाणी आपल्याला वाचवायचे आहे. सोसायटीच्या टाकीत येणाऱ्या पाण्याच्या लाइनला बॉलकॉक बसविल्यास पाणी वाहून जाणार नाही. वाहून वाया जाणारे पाणी आणि त्याकरिता जास्त वेळ चालणारा पंप यामुळे पाणी व वीज यांवरील वाढता खर्च आपण विचारात घेतच नाही. पंप पूर्ण स्वयंचलित केल्यामुळे मनुष्यबळ लागत नाही, वाहून जाणारं पाणी वाचवू शकतो.  परिणामी मासिक खर्चात मोठी  बचत होते आणि हीच बचत ठराव करून ७ वर्षांच्या रिकरिंग डिपॉझिटमध्येही गुंतवता येते जी भविष्यात इमारतीच्या कामासाठी उपयोगात येईल.

पंपासोबत आपल्या इमारतीच्या परिसरातील बाहेरील दिवेही स्वयंचलित केल्यानं वाचणारी वीज व पाणी आजूबाजूच्या गावांतील नागरिकांना उपलब्ध होऊ शकतं. गृहनिर्माण संस्थेनं येणाऱ्या वीजबिलांवर नियंत्रण आणायला हवं. जोडीला सोलर ऊर्जा हासुद्धा एक उत्तम पर्याय आहे. पंप स्वयंचलित करण्यास येणारा खर्च  साधारणत: ३ ते ५ महिन्यांत वसूल होतो. चांगल्या दर्जाचे युनिट व उच्च दर्जाची केबल याबाबत तडजोड करू नये. सेन्सरसाठी खर्च येण्याची शक्यता असते, पण तोही फारसा विचारात घेण्यासारखाही नसतो. मोनोब्लॉक पंपापेक्षा सबमर्सिबल पंप केव्हाही चांगला.  

उत्तम सेवा, सभासदांच्या आनंदात पडणारी भर  व आजूबाजूच्या गांवातील नागरिकांनाही मिळणारा दिलासा यापेक्षा वेगळे अपेक्षित नाही. काम करण्याची इच्छा व तत्परता मात्र हवी. यासाठी कोणीतरी जबाबदारी घेणे आवश्यक आहे.

butala21@gmail.com

मराठीतील सर्व वास्तुरंग ( Vasturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Housing redevelopment management institutions ysh

ताज्या बातम्या