गोल आकाराच्या लाखडी भांडय़ासारखा ‘खल’ आणि त्यात आघात करण्यासाठीचा दणकट लोखंडी दांडा म्हणजे ‘बत्ता.’ ही जोडी आधुनिक मिक्सरचे काम करीत असे.
आ पल्या जुन्या घरातील पाटा-वरवंटा याविषयी ‘वास्तुरंग’ मध्ये वाचले.  याशिवाय आपल्या गावातील घरात खाद्यान्न करण्यासाठी आणखी दोन पारंपरिक साधने असत. एक उखळ-मुसळ आणि त्याचा वामन अवतार असलेला खल-बत्ता.
गावातील माजघरात दणकट लाकडाचे एक उखळ असे. जाड बूड असलेल्या, खाली निमुळते आणि वरच्या बाजूला पसरलेल्या तोंडाचे उखळ चांगलेच वजनदार असे. त्यामुळेच ते माजघरातील एका कोपऱ्यात मुक्कामाला असे. या उखळाचे भावंड ‘मुसळ’ असल्याशिवाय ही जोडी कार्यभागासाठी अपूर्णच म्हणावी लागेल. मुसळ हे दणकट सागवानी लाकडाचा एक चारफुटी दांडा. खालच्या टोकाला पितळी पट्टीने बांधलेला. उखळ-मुसळ या सहयोगी जोडीचा उपयोग, जुन्या काळी गावाकडील घरात भात कांडण्यासाठी होत असे. हा कांडण्यासाठीचा भात म्हणजे आपण पानात वाढून घेतो तो शिजलेला भात, असा समज नवपिढीचा होण्याची शक्यता आहे. पण कांडण्यासाठीचा भात म्हणजे शेतात तयार झालेल्या लोंब्यातून, झोडून वेगळा केलेला टरफलयुक्त तांदूळ. टरफल वेगळे केले की त्याचा होतो कोंडा. भात उखळात टाकून मुसळाने हलकेच दाबला की टरफल वेगळे होऊन तांदूळ तयार होतो. आता हे काम भातगिरणीमध्ये होत असले तरी जुन्या काळी ते घरीच करावे लागे.
कांदेपोहे हा मराठी घरातील नाश्त्याचा लोकप्रिय पदार्थ. पण त्यातील पांढरेशुभ्र पोहे हे उखळ-मुसळ यांच्या सहयोगातून मिळतात. किती जणांना माहीत आहे? पोहे करण्यासाठी टरफलवेष्टित भात रात्रभर गरम पाण्यात भिजत घालून सुकविले की पसाभर उखळीत घालून मुसळाने हलक्या हाताने कांडून घेतले की पोहे तयार. पोहे निर्मिती मोठय़ा प्रमाणात होते ती मात्र भातगिरणीत. काही लहानशा कामासाठी अवजड उखळ वापरणे कठीण जात असे. त्यासाठी गावाकडील घरात माजघरातील एका कोपऱ्यात, जमिनीमध्ये वाडग्याएवढा खोदून तयार केलेला खड्डा म्हणजे उखळी. त्याचा उपयोग पापड करण्यासाठीचे मूलद्रव्य, डांगर हे करण्यासाठी केला जायचा. काही सर्वज्ञात म्हणींमध्ये या उखळ-मुसळ या साधनांचा उल्लेख होतो. ‘स्वत:च्या डोळय़ातील मुसळ दिसत नाही. पण दुसऱ्याच्या डोळय़ातील कुसळही दिसते’ ही ती मराठी म्हण.
पारंपरिक घरातील एक लुप्त होत चाललेली दुसरी जोडी म्हणजे खल-बत्ता. गोल आकाराच्या लाखडी भांडय़ासारखा ‘खल’ आणि त्यात आघात करण्यासाठीचा दणकट लोखंडी दांडा म्हणजे ‘बत्ता.’ ही जोडी आधुनिक मिक्सरचे काम करीत असे. त्याच्या साहाय्याने केले जाणारे लोकप्रिय खाद्यान्न म्हणजे ‘चटणी.’ या स्वयंपाकघरातील खल-बत्त्याचा उपयोगही मराठी भाषेतील वाक् प्रचारात केला जातो. एखाद्या मुद्दय़ावर न संपणारी चर्चा सुरू झाली की, ‘साध्या गोष्टीचा किती खल करता हो?’ अशी सभेत विचारणा होते.
एकेकाळी घराघरातून असलेली दोन उपयुक्त साधने, आता फक्त चित्रातच पाहायला मिळणार का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kitchen stone grinder
First published on: 06-09-2014 at 02:18 IST