कृष्णपूरम पॅलेस म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठय़ा लाकूडकामातील राजवाडा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मूळच्या पद्मनाभपूरम् राजवाडय़ाची छोटी प्रतिकृती समजली जाते.
भित्तिचित्रांच्या (म्युरल्स)च्या बाबतीत समृद्ध असे केरळपेक्षा दुसरे राज्य भारतात दुसरे असेल, असे वाटत नाही. कोटायमचे एटुमानूर, त्रिचूरच्या वडक्कुम्नाथ या मोठमोठे आवार असलेल्या शिवमंदिरात तर ती आपल्याला दिसतातच, पण कोचीच्या मत्तानचेरी पॅलेसपासून ते कन्याकुमारीजवळील पद्मनाभपूरम पॅलेसपर्यंत ती हमखास आढळतात.
आता म्युझियममध्ये परिवíतत केलेला कृष्णपूरम राजवाडा हा एन. एच. क्र. ४७ च्या पश्चिम बाजूला, हायवेपासून अंमळ आतील बाजूला, कायमकुलम गावापासून दोन किलोमीटरवर आहे. अलापुळा जिल्ह्याच्या अगदी दक्षिण टोकाला  असलेल्या या राजवाडय़ाच्या आवारात शिरताच लक्ष वेधून घेते ती पुरातन काळातील पोस्टाची पेटी. आतमध्ये जुनी पेंटिंग्स, फíनचर व शिल्पं, नाण्यांचा संग्रह, तळमजल्यावरील स्मृतिचिन्ह, राजाची दुधारी तलवार व ढाल इत्यादी राजवैभव दर्शविणाऱ्या गोष्टी या राजवाडय़ात पाहायला मिळतात. वाडय़ाच्या आतील एका दालनातून दुसऱ्या दालनात जाण्यासाठी असलेले अरुंद मार्ग, वायुवीजनासाठी असलेल्या छपरातील खिडक्या, राजवाडय़ाचे खूप उतार असलेले छप्पर, अंतर्गत चौकांचा (नालुकेट्ट) केलेला मुबलक वापर, कलाकुसरीच्या कठडय़ाने युक्त असलेले लाकडी जिने इत्यादी केरळच्या वास्तुशास्त्राप्रमाणे असलेला हा अतिशय प्रमाणबद्ध राजवाडा, भोवताली राखलेल्या  हिरवळीमुळे देखणा दिसतो. त्रिपुन्नीत्तुरा, त्रिचूर, मत्तानचेरी येथील राजवाडय़ा च्या तुलनेत हा राजवाडा लहान आहे हे खरे, तरी तो प्रसिद्ध आहे तो त्यातील एकाच मोठय़ा चौकटीत असलेल्या दहा फुटी गजेंद्र-मोक्षाच्या भित्तिचित्रासाठी. त्रावणकोरचा (पूर्वीचे त्रिप्पापूर स्वरूपम) राजा अनिळम तिरूनल मरतड वर्माने (१७२९-१७५८) केरळच्या पारंपरिक वास्तुशास्त्राप्रमाणे हा वाडा बांधला. राजा या वाडय़ाचा ‘समर पॅलेस’ म्हणून उपयोग करीत असे. कन्याकुमारीजवळील पद्मनाभपूरम येथे राजधानी असलेले, दक्षिण केरळचे त्रावणकोर हे एक सामथ्र्यवान राज्य बनविण्यासाठी या राजाने श्रम घेतले. कोचीनच्या राजाशी सख्य करून कोळीकोड (कालिकत) च्या झामोरिन राजाला कोचीन घेण्यापासून त्याने वंचित केले.  
आशिया खंडातील सर्वात मोठय़ा लाकूडकामातील राजवाडा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मूळच्या पद्मनाभपूरम राजवाडय़ाची हा दुमजली कृष्णपूरम पॅलेस ही छोटी आवृत्ती समजली जाते.
इतरांच्या नजरेस येणारा नाही असा, राजवाडय़ाच्या मागील बाजूस राजघराण्याच्या स्त्रियांना विहार करण्यासाठी छोटासा तलाव आहे. राजाला त्यांचा जलविहार निरखता यावा म्हणून वरच्या मजल्यावर एक लांब-रुंद खिडकीची (ओपिनग) योजना केली आहे. या तळ्याच्या तळाशी, शत्रूचा हल्ला झाल्यास निसटून जायला एक गुप्त भुयार आहे, असं म्हणतात. याच तळ्याचे पाणी राजवाडय़ाखाली गारवा वाटावा म्हणून खेळविले आहे.
आवारात असलेली बुद्धाची मूर्ती ही अलापुळा जिल्ह्यात असलेल्या चार मूर्तीपकी एक आहे. राजवाडय़ातील खूप उतार असलेल्या जिन्याला त्याला मिडलॅिण्डगचा थांबा देऊन त्याचा उतार कमी करणे, वाडय़ाभोवतालच्या अनावश्यक खोल्या पाडणे इत्यादी जरुरीची कामे करून मोडकळीस येऊ पहाणाऱ्या या वाडय़ाची डागडुजी पुराणवस्तू खात्याने १९५० मध्ये केली आणि त्याला आत्ताचे नीटस रूप दिले आहे. िहदूंच्या निवासस्थानी, शौचालयाची योजना घराच्या आतील भागात केली जात नाही, पण येथे पहिल्या मजल्यावर दक्षिण दिशेस आढळणारे शौचालय हा पोर्तुगीजांनंतर भारतात आलेल्या डचांनी नंतर जोडल्याचे त्याला बाहेरून दिलेल्या आधारावरून स्पष्ट दिसते. राजवाडय़ाच्या पूर्वेस तळमजल्यावरील स्वयपांकघरातील दगडी रगडे आणि दगडी चुली अजून शाबूत आहेत. तेव्हाच्या रीतीप्रमाणे स्त्रियांना फारसं बाहेर जावे लागू नये म्हणून त्याला लागूनच विहिरीची योजना केली आहे. राजवाडा पाहायला जाताना शक्यतो तो दुपारी बाराच्या आत बघितला तर दर्शनी भागाचे फोटो काढताना सूर्याचे किरण कॅमेराच्या िभगावर येत नाहीत, हे लक्षात ठेवावे.