• एखादा सदस्य नॉमिनेशन न करता निधन पावला व त्याचे संस्थेच्या मालमत्तेतील भाग / हितसंबंध हस्तांतरित करायचे झाल्यास त्यासाठी स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देणे आवश्यक आहे, की तसे करणे ऐच्छिक आहे. तुलसीदास आसवेकर

एखाद्या सभासदाचे नामनिर्देशन न करताच निधन झाले तर त्याचे भाग कसे हस्तांतरित करावे याबद्दलची माहिती संस्थेचे उपविधी क्र. ३५ मध्ये दिली आहे. यामध्ये सदर नोटीस किमान दोन स्थानिक वृत्तपत्रांत प्रसिद्ध करावी असे म्हटले आहे. त्यात पुढे असेदेखील म्हटले आहे की, या नोटिशीवर प्राप्त झालेल्या हरकती व मागण्या लक्षात घेऊन संस्था त्याबाबत निर्णय घेईल. म्हणजेच या हरकती / मागण्या  माहीत होण्यासाठी अशी जाहिरात देणे अनिवार्य आहे असे आम्हाला वाटते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वडिलांच्या मृत्यूनंतर वारस नोंद करण्यासाठी कोर्टातून वारस दाखला मिळवण्यासाठी काय नियम व कार्यवाही असते? तसेच मुंबई व ग्रामीण भागातील पद्धतीत काही फरक असतो का? ग्रामीण भागात जिल्हा कोर्टात अर्ज करावा की तालुका स्तरावरील कोर्टात दाखला देण्याचे अधिकार दोन्हीपैकी कोणत्या कोर्टाला आहेत, मी मुंबईत उपनगरात राहतो व गावीसुद्धा वडिलांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. आई, मी व एक भाऊ असे आम्ही तीन वारस आहोत. सर्व मुंबईतच राहतो. गणेश राऊत

  • कोर्टातून वारसा दाखल मिळवण्यासाठीचे नियम हे सारखेच असतात. मुंबई आणि ग्रामीण यामध्ये तत्त्वत: फरक नसतो. सर्वसाधारणप्रमाणे ग्रामीण भागात जिल्हा कोर्टात वारसा दाखल्यासाठी अर्ज करावा लागतो. तुमच्या प्रश्नात आपणाला वारसा दाखला कोणत्या कारणासाठी हवा आहे याचा खुलासा केलेला नाही, तो खुलासा केला असता तर प्रश्नाचे उत्तर देणे अधिक सोपे झाले असते. गावाकडील सातबारा हा विहित नमुन्यातील अर्ज देऊन तसेच योग्य तो पंचनामा करूनदेखील बदलता येतो.

अकरा महिन्यांचा भाडे करार रजिस्ट्रेशन करून घेणे, स्टॅम्प डय़ुटी भरणे व पोलीस ठाण्यातून व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट घेणे हे सोसायटीला व ब्लॉकधारकांना बंधनकारक आहे की नुसते स्टॅम्पपेपरवर नोटरीची सही पुरेशी आहे. याची सरकारी जी.आर. सह माहिती द्यावी.  ए. टी. सोनुर्लीकर

  • अकरा महिन्यांचा भाडेकरार अथवा त्याहून जास्त मुदतीचा भाडेकरार हा नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंद करणे अनिवार्य आहे. रेन्ट कंट्रोल कायदा १९९९ प्रमाणे लिव्ह लायसन्स करार रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. नुसता स्टॅम्पपेपरवर केलेला करार तसेच नोटरी केलेला लिव्ह लायसन्स करार हा पुरेसा नाही, तो नोंदणी केलेलाच असावा लागतो; तसेच लिव्ह लायसन्सवर एखादी सदनिका देताना त्याला गृहनिर्माण संस्थेची परवानगी घेणे अनिवार्य आहे. याशिवाय संबंधित पोलिस ठाण्यातील व्हेरिफिकेशन  घेणेदेखील अनिवार्य आहे. याबाबतची परिपत्रके शासनाच्या सहकार खात्यामध्ये उपलब्ध होतील.

आमची एक सामाईक जमीन आहे. त्या जमिनीच्या सातबारावर माझ्या वडिलांचे व त्यांच्या भावांचे नाव लागलेले आहे. आता माझे काका व वडील दोघेही हयात नाहीत. ज्या वेळी आम्ही आमच्या जमिनीचा सातबारा पाहिला त्या वेळी आमच्या काकांच्या कुटुंबीयांची नावे सातबारावर लागलेली आढळली, आता मला माझ्या कुटुंबीयांची नावे सातबारावर लावायची आहेत, तरी त्याबाबत मार्गदर्शन करावे. समिधा वऱ्हाडकर

तुमच्या प्रश्नावरून तुमची जमीन ही वडिलोपार्जित आहे असे मला वाटते. आणि तसे गृहीत धरूनच आम्ही या प्रश्नाला उत्तर देत आहोत. आपली जमीन वडिलोपार्जित असल्यामुळेच तुमच्या वडिलांचे व त्यांच्या भावंडांची नावे सातबाराच्या उताऱ्यावर लागली गेली. आपले काका वारल्यानंतर त्यांच्या वारसापैकी कुणीतरी अर्ज करून त्यांच्या वारसांची नावे महसूल दप्तरी दाखल केली असावीत, आपणही आपल्या वडिलांचा मृत्यू दाखला देऊन त्यांच्या सर्व वारसदारांची नोंद सातबारावर करू शकता. त्यासाठी आपणाला संबंधित तलाठी कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल.

  • १७ मजली ४ आणि ७ मजली ४, अशा ८ इमारतींची सोसायटी बिल्डरने बनविली आणि तो निघून गेला. ७ मजली ४ इमारतींत राहणाऱ्या रहिवाशांना आपली स्वतंत्र सोसायटी हवी होती. त्यांनी या सोसायटीत समावेश न करता स्वतंत्र सोसायटीसाठी निवेदन दिले आहे. त्याला ३ वर्षे झाली. या ७ मजली इमारतीचा कारभार बघण्यासाठी Welfare association बनवून  १५४ रहिवाशांकडून पैसे वसूल करून कारभार केला जात आहे. ही  NOC कोणत्याही प्रकारची ठडउ  देऊ  शकत नाही. आणि जे रहिवासी याला विरोध करतात त्यांना पाणी बंद करण्याची धमकी देण्यात येते, हे योग्य आहे का? यावर काही तोडगा आहे का? किंवा याविरुद्ध कोठे तक्रार करता येईल?  अजित अंगडी, गोरेगाव

आपल्या पत्रावरून आपल्याला एका सोसायटीतून बाहेर पडून दुसरी सोसायटी स्थापन करायची आहे असे वाटते व त्यासाठी आपण ३ वर्षे प्रयत्न करत आहात असेदेखील वाटते. आपण आपल्या उपनिबंधकाकडे याबाबत पाठपुरावा करून वेगळी सोसायटी स्थापन करून घेऊ शकता. मात्र, जोपर्यंत अशा प्रकारे वेगळी गृहनिर्माण संस्था स्थापन होत नाही तोपर्यंत आपण सध्या अस्तित्वात असणाऱ्या गृहनिर्माण संस्थेचेच सदस्य आहात हे आपण लक्षात ठेवले पाहिजे व त्या सोसायटीच्या नियमांचे पालनदेखील केले पाहिजे. आमच्या मते ही’ Welfare Association बनवून  आपण नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थेतील काही इमारतीचा कारभार पाहू शकत नाही. ज्या वेळी एखाद्या भूखंडावर अनेक गृहनिर्माण संस्था असतात त्या वेळी  त्यांचे काही सामायिक प्रश्न असतात. उदा. अंतर्गत रस्त्यांची देखभाल करणे, उद्यानाची देखभाल करणे, क्लब हाउसची देखभाल करणे, इत्यादी. यासाठी अपेक्स बॉडी निर्माण केली जाते व वरील गोष्टींसाठीचे खर्च भागविले जातात. मात्र, आपण म्हणता तसे वेल्फअर असोसिएशन अशा प्रकारे मेंटेनन्स वसूल करू शकत नाही. याबाबत आपण एखाद्या तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेतल्यास बरे होईल.

अ‍ॅड. श्रीनिवास घैसास

ghaisas_asso@yahoo.com

 

 

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vastu guidance
First published on: 02-09-2017 at 02:21 IST