|| सुचित्रा साठे
‘‘दिवसाच्या चोवीस तासातले बारा तास, या हिशेबाने माझं निम्म आयुष्य या सुरांच्या सहवासात गेलं आहे. हिंदी चित्रपट संगीताच्या बाबतीत ‘तुझ्या बिगर करमेना’ अशी माझी अवस्था आहे,’’ असं सांगताना चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार असल्याचा आनंद चंद्रशेखर ऊर्फ नंदन रंगनाथ धर्माधिकारी यांच्या चेहऱ्यावरून भरभरून ओसंडून वहात होता. सध्या कळव्यात राहत असले तरी पूर्वी दादरला ‘बादल बिजली’च्या जवळ राहाणारं हे कुटंब. चित्रपट क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व- दत्ता धर्माधिकारी हे यांचे काका तर निर्माते दत्ता केशव हे व्याही. त्यामुळे चित्रपटांचं आकर्षण उपजतच होतं. श्रीसाऊंड राजकमल, नटराज, रणजित स्टुडिओत पाहिलेलं शूटिंग, त्यानिमित्ताने बी. आर. चोप्रा, राजेंद्र कुमार, राज कपूर अशांच्या भेटी यामुळे धर्माधिकारी त्या सुरील्या वातावरणात अडकत गेले. त्यांचे आई-वडीलही संगीतातील दर्दी, कला आणि कलाकार यांच्यावरून जीव ओवाळून टाकणारे. प्रत्येक नाटक चित्रपट बघायचाच असतो हा नियम पाळणारे, कौतुकाने कलाकारांची आपल्या गाडीतून ‘ने आण’ करणारे एचएमव्हीत गेले की ध्वनिमुद्रिकांचे बॉक्सच्या बॉक्स खरेदी करणारे, जरा वेळ मिळाला की ध्वनिमुद्रिका ऐकणारे-ऐकवणारे अशा सुरेल वातावरणात नंदन धर्माधिकारी यांचा ‘कान’ तयार झाला नसता तर नवल!
शिक्षण संपवून घरचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय काही काळ करून ते कॅम्लिन कंपनीत नोकरीला लागले. हे त्यांच्या ‘श्रवणभक्तीला’ पूरकच ठरले. घरी सिलोन रेडिओ आणि बाहेर ट्रान्झिस्टर सतत सोबत करू लागला. व्यवसायानिमित्त फिरताना ‘नजर’ चित्रपटगृह आणि तिथे लागलेला चित्रपट यांच्या कायम शोधात असत. कामाचं आणि वेळेचं गणित अचूक सोडवून चित्रपट बघितलाच जात असे. चित्रपट आणि संगीत यांचा उत्तम मिलाफ असण्याचा तो काळ. योगायोग असा की, ‘जे वेड मजला लागले, तुजला ही ते लागेल का?’ असा प्रश्न न विचारताच संगीतप्रेमी सहधर्मचारिणीशी नयनाशी त्यांची लग्नगाठ बांधली गेली. सुरांना ‘घर’ मिळालं. जे जे ऐकलं, आवडलं, मनात घोळत राहिलं ते ते पुन्हा ऐकण्यासाठी कॅसेटच्या स्वरूपात संग्रहित करायला त्यांनी सुरुवात केली. १९३५ ते १९७५ हा काळा चित्रपट सृष्टीच्या संगीताच्या दृष्टीने बहरलेला होता. एक एक करत पाचशे चित्रपटांच्या गाण्यांच्या कॅसेट्स जमा होत गेल्या. त्या काळात प्रदर्शित झालेल्या हिंदी, मराठी चित्रपटांपैकी पंचाहत्तर ते ऐंशी टक्के चित्रपट पाहिल्याचे ते आनंदाने मान्य करतात. अगदी एकापाठोपाठ दोनदा. तसं रेडिओवर गाणी ऐकायला मिळायची, पण ते लावतील तीच गाणी ऐकावी लागायची. निवड त्यांच्या हातात असे. कॅसेटमुळे आपल्याला हवं ते गाणं हवं तेव्हा ऐकण्याची सोय झाली. धर्माधिकारींचा रेडिओबरोबरच टेपरेकॉर्डरही गाऊ लागल्या नंतर व्हिडीओ कॅसेटचा जमाना आला. नुसती गाणी ऐकण्यापेक्षा पडद्यावर दिसू लागली. आपला आवडता अभिनेता किंवा अभिनेत्रींवर चित्रित झालेलं गीत कृष्णधवल पडदा असूनही मनावर मोहिनी घालू लागलं. अशाही पंचवीस व्हिडीओ कॅसेट्सनी गाण्यांच्या संग्रहाला दुसरी मिती प्राप्त झाली. हळूहळू सीडीज्चा जमाना आला. घरातलं सुरांचं साम्राज्य वाढत गेलं. भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये ज्या संगीतकारांनी सप्तसुरांनी सजावट केली त्यापैकी पन्नास संगीतकारांची सगळी गाणी धर्माधिकारांच्या घरात दुमदुमू लागली. नुसतं गाणं पहाण्यापेक्षा आणि ऐकण्यापेक्षा तो चित्रपटच पहायला मिळाला तर? मनातला विचार कृतीत उतरवायला त्यांनी सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणजे ऑडिओ-व्हिडीओ सीडीज् लगबगीने घरात स्थानापन्न होऊ लागल्या. हळूहळू ती संख्या आठशेच्या घरांत पोहोचली. हिंदी सिनेसंगीताबरोबरच मराठी भावगीत, भक्तीगीत, गीतरामायण, खोटा पैस, मायबाप, अमानत असे चित्रपटही त्यांच्या खजिन्याची शान वाढवतात. ही फर्माईश असते सौभाग्यवतीची.
हा छंद जोपासण्यासाठी लॅमिंग्टन रोड, सिम्फनी ही जिव्हाळ्याची ठिकाणं आहेत. कोणत्याही कारणाने कुठल्याही भागात गेलं तरी धर्माधिकारी रमतात ते तिथल्या म्युझिक सेंटरमध्ये. हीच शोध मोहीम धुळ्याच्या दौलत म्युझिक सेंटपर्यंत पोहोचली, तिथल्या कटारियांनी धर्माधिकारींचं स्वागत केलं. सुरांवर प्रेम करणारे दोघे एकत्र आले. याचं फलित म्हणजे धर्माधिकारींनी हव्या असलेल्या सीडीज्ची विचारणा करायची आणि कटारिया यांनी कळव्याला ती घरपोच करायची. असा नवा सिलसिला सुरू झाला. ऋ णानुबंधाच्या अशा अनेक गाठी घट्ट होत गेल्या आहेत.
संगीत या विषयाशी जोडलेलं ‘काहीपण’ असलं तरी धर्माधिकारी यांना ते प्रियच असतं. म्हणून अंमळनेरचे अरुण पुराणिक यांच्या वेगवेगळ्या प्रदर्शनांना ते जोडीने हजर असतात. इथेच त्यांना कृष्णधवल रंगातले चित्रपटातील तारे आणि तारका यांच्या फोटोंनी सजलेली कॅलेंडर्स मिळाली. दरम्यान, ऐसपैस घरातली एक खोली म्युझियम बनली होती. मग या फोटोंनी नव्हे, दैवतांनी म्युझिक रूमच्या भिंती सजल्या. कॅसेट, व्हिडीओ कॅसेट, सीडीज्नी सोयीस्कर जागा निर्माते, दिग्दर्शक, गायक, वादक, संगीतकार यांच्या छोटय़ा छोटय़ा फोटोंनीही ‘इंच इंच लढवू’ म्हणत कपाटाच्या आतल्या बाजूला, भिंतीवर आपल्या अस्तित्वाची मोहोर उमटवली.
धर्माधिकारी यांच्या संग्रहात काय काय आहे याची यादी देणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे. वानगीदाखल राजा हरिश्चंद्र, अछुत कन्या, गानदान (प्राणचा पहिला सिनेमा), तानसेन (सेहगलचा), पतंगा (गोप आणि याकुबचा), खोटा पैस, मायबाप, अमानत ही नावं. सुज्ञांनी तावरून ताकभात ओळखा. हुस्नलाल भगतराम, शामसुंदर, नौशाद, विनोद अशा संगीतकारांची श्रवणीय ‘कला’कुसर आहे. ‘दिल दे के दिल लिया है’ हे स्टेज चित्रपटातील रफी आशा यांचे गीत, ‘आज मेरे नसीब में’ हे लताचे ‘हलचल’ मधील गीत, दिल मेरा तेरा दिवाना, तलत मेहमूद आणि मधुबाला जव्हेरी यांचे ‘आपली इज्जत’मधील गीत, ‘बचना जरा ये जमाना है बुरा’ हे गीता दत्त यांचे ‘मिलाप’मधील कोरसगीत ‘बेईमान तोरे नैनवा’ हे लताचे ‘तराना’ मधील गीत, ‘ढलती जाए रात’ हे रफी आशाचे रझिया सुलतान, ‘आयी बहार’ हे डॉक्टरमधील गीत ही त्याची झलक. ढाके की मलमल, कॉफी हाऊस असे चित्रपट त्यांच्या ‘प्रतीक्षा’ यादीत आहेत. जितकं गाणं किंवा चित्रपट दुर्मीळ तितकी किंमत जास्त, असं व्यस्त प्रमाणातलं गणित ते चातुर्यानं सोडवतात याला कारण यातून मिळणारा आनंद.
धर्माधिकारी यांचे वैशिष्टय़ म्हणजे फक्त गाणी, चित्रपटांच्या सीडी जमवणे एवढय़ावरच ते खूश नाहीत. तर ते स्वत:ही सातत्याने, नियमाने सगळ्या सीडी ऐकत असतात, बघत असतात. तसेच इतरांनाही प्रत्येकाच्या सोयीने हा आनंद आग्रहाचे कौतुकाने न थकता वाटत असतात. ‘जे होते हवे ते मिळाले’ अशीच येणाऱ्या कानसेनांची अवस्था होते. कोणतेही चित्रपट गीत ऐकताना त्याचे गीतकार, गायक, पडद्यावरील कलाकार, त्यात वापरलेली वाद्य, त्यांचा मेळ अशी कुंडली ते सहज मांडतात.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे मध्यंतरी बाहेर जाता येत नव्हते. अशा वेळी त्यांनी स्वत:ला जणू सुरांच्या ‘ध्यानात’ गुंतवले आणि ते बरे झाले. ‘म्युझिक थेअरपी’चं जणू त्यांनी प्रात्यक्षिक दाखवले. बाहेर कुठेही न जाता ‘सूर’ सागरात डुबकी मारायला त्यांना फार आवडते. एकदम ताजंतवानं झाल्यासारखं वाटतं.
वयाच्या ७१ व्या वर्षीचं वेळापत्रक असं आहे. सकाळी आठला उठायचं. नाश्ता करून गाणी ऐकायला बसायचं, दीड वाजता ‘चला पानं मांडली आहेत’, असं दोन-तीनदा ऐकल्यावर जेवायला जायचं. दुपारची वामकुक्षी झाल्यानंतर पुन्हा रात्री बारा-एकपर्यंत श्रवणयज्ञ. त्यावेळी रोज एक सिनेमा बघायचा. त्यांचं हे वेळापत्रक इतकं नियमबद्ध आहे की साधारण अडीच-तीन वर्षांनी चित्रपटाचं आवर्तन पुरं होतं. कधीही केव्हाही कुठेही या सुरेल प्रवासाची साथसंगत अनुभवणं याच्यासारखं दुसरं आनंदनिधान नाही. माझ्या दोन तासांतल्या सीसीटीव्हीतल्या चित्रण बघताना धर्माधिकारी यांच्या घरी ‘सुरांचे ‘नंदन’वन फुलले’ असेच शब्द ओठावर येतात.
suchitrasathe52@gmail.com