मंगल कातकर
घरात सुखाच्या राशी घेऊन येणाऱ्या दसरा सणाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो. पितृपंधरवडा संपून अश्विन महिना सुरू होताच घरोघरी घटस्थापना करून आदिमायेच्या उत्सवाचा प्रारंभ केला जातो. त्या नऊ दिवसांत मंगलमय वातावरणाने घर न्हाऊन निघतं.नवरात्री संपल्यानंतर सात्विक वातावरणाने भारावलेल्या घरात दसऱ्याचा सण मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो.
दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा भारतीय संस्कृतीत सणांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपले सगळे सण हे कृषी संस्कृतीशी जोडलेले आहेत. त्यामुळे हे सण साजरे होताना कृषी संस्कृती त्यात डोकावताना दिसते. रोजच्या रहाटगाडय़ात अडकलेल्या लोकांना आनंद देण्यासाठी, उभारी देण्यासाठी प्रत्येक घरात सण साजरा करण्याची परंपरा आपल्याकडे रुजलेली आहे.
कोणताही सण घरासाठी आनंदाची शिदोरी घेऊन येत असतो. मग तो दसऱ्यासारखा साडेतीन मुहूर्तापैकी एक असेल तर नक्कीचं आपला आनंद द्विगुणित करतो. संत तुकाराम महाराज म्हणतात,
दसरा दिवाळी तोची आम्हा सण।
सखे संत जन भेटतील ।।
अमूप जोडिल्या सुखाचिया राशी।
पार या भाग्यासी नाही आता।।
घरात सुखाच्या राशी घेऊन येणाऱ्या दसरा सणाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो. पितृपंधरवडा संपून आश्विन महिना सुरू होताच घरोघरी घटस्थापना करून आदिमायेच्या उत्सवाचा प्रारंभ केला जातो. त्या नऊ दिवसांत मंगलमय वातावरणाने घर न्हाऊन निघतं. जगदंबेची आराधना घरोघरी केली जाते. घरात सात्त्विक भोजन बनवलं जातं. घरावरचं आरिष्ट दूर करण्यासाठी घरात देवीचा गोंधळ घालून देवीला आवाहन केलं जातं. नवरात्री संपल्यानंतर सात्त्विक वातावरणाने भारावलेल्या घरात दसऱ्याचा सण मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो.
दसरा किंवा विजयादशमी हा सण धार्मिक आणि शुभ मानला जातो, कारण या दिवशी रामाने रावणाचा वध केला आणि देवी दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला. वाईटाचे प्रतीक असलेल्या रावणाच्या मोठय़ा पुतळय़ाचे या दिवशी दहन करून विजयोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. दसरा हा नवीन सुरुवात आणि आध्यात्मिक काळ मानला जात असल्यामुळे, आयुष्यात नवीन उपक्रम सुरू करणे शुभ मानले जातात. सकारात्मक ऊर्जा देणारा हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी केलेली घर खरेदी समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन येते, असे मानले जाते. तसेच या शुभ दिवशी घर खरेदी करणे हे भविष्यातील एका मोठय़ा आणि महत्त्वाच्या आर्थिक गुंतवणुकीसाठी शुभ आसल्याची जनमानसात श्रद्धा आहे. त्यामुळे अनेक जण या दिवशी घर, गाडी खरेदी करून आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. नवीन घरात प्रवेश करतात. अनेक व्यापारी या पवित्र दिवशी नवीन व्यवसाय किंवा उद्योगांची, नवीन दुकान, शोरूम इत्यादींचे उद्घाटन करतात. घराच्या सजलेल्या रूपावरून कळते की आज दसरा आहे. या दिवशी सकारात्मक ऊर्जा घरात पसरावी यासाठी घराला एक खास आणि प्रसन्न लुक देण्याचा प्रयत्न करतात. घराच्या प्रवेशद्वारावर आंब्याची पाने, भाताच्या लोंब्या व झेंडूची फुले यांचे छान तोरण बांधतात. हल्ली रंगीबेरंगी फॅब्रिकची तोरणंही बांधलेली दिसतात. दारात सुंदर रांगोळी काढली जाते. घरातला देव्हारा फुलांनी सजवला जातो. सरस्वतीची, शस्त्रांची, अवजारांची, वाहनांची पूजा केली जाते. पुरणपोळी, खीरपुरी, बासुंदी अशा गोडधोड पदार्थाच्या मेजवानीचा बेत घरातल्या लोकांसाठी आखला जातो.
ऐतिहासिक काळात मराठा सरदार दसऱ्याला सीमोल्लंघन करून नवीन मोहिमेवर जात असत. मोहीम फत्ते करून परत येताना धनसंपत्ती घरी घेऊन येत असत. ही परंपरा लक्षात घेऊन आजही लोक दसऱ्याला गावाच्या सीमेपलीकडे जाऊन सीमोल्लंघन करतात. आपटय़ाच्या झाडाची पूजा करून सोन्याचं प्रतीक म्हणून आपटय़ाची पाने घरी आणतात. काही ग्रामीण भागात आपटय़ाच्या पानांचं सोनं एकत्र करून त्याची यथासांग पूजा करून गावातले लोक ते लुटतात. हे लुटलेलं सोनं पुरुष मंडळी घरी घेऊन आले की घरातली स्त्री औक्षण करून त्यांना घरात घेते. त्यानंतर ते सोनं देवाला वाहून आसपासच्या लोकांना ‘सोनं घ्या, सोन्यासारखे राहा’ अशा सकारात्मक शुभेच्छा देत घरोघरी सोनं वाटलं जातं. घरोघरी आनंदी शुभेच्छांची देवाणघेवाण केली जाते.
असा हा घरातल्या नकारात्मकतेला घालवून नवीन ऊर्जा देणारा, वाईटावर चांगल्याचा विजय मिळविणारा पवित्र दसरा सगळय़ांसाठी सुदिन आहे. हा सुदिन प्रत्येकाने आपल्या घरात उत्साहाने साजरा करून आपल्या जीवनात सकारात्मकता पेरावी व आपल्या आयुष्यातला विजयोत्सव साजरा करावा हीच दसऱ्यानिमित्त सदिच्छा!
mukatkar@gmail.com