|| विश्वासराव सकपाळ

या लेखात आपण महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१च्या नियम १०७ अन्वये जप्त करण्यात आलेल्या जंगम / स्थावर मालमत्तेचे वाजवी बाजार मूल्य ठरविताना होणाऱ्या अनियमिततेवर करण्यात आलेल्या सुधारित कार्यपद्धतीची व मार्गदर्शक सूचनांची माहिती घेऊ.

‘‘महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१च्या नियम १०७ मध्ये सहकारी संस्थेच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेची विक्री उद्घोषित करण्यापूर्वी निबंधकाची पूर्वसंमती वसुली अधिकारी घेईल. तसेच ऋणकोचे म्हणणे ऐकल्यानंतर, वसुली अधिकाऱ्याचा प्रस्ताव मिळाल्यानंतर, मान्यताप्राप्त परीक्षकाचे मूल्यांकन प्राप्त झाल्यानंतर एक महिन्याच्या आत विद्यमान बाजार किंमत, तयार गणनेचे दर, याचा विचार करून निबंधक हातच्या किंमतीला मान्यता देईल अशी तरतूद आहे. तरी देखील सदर जप्त केलेल्या  जंगम / स्थावर मालमत्तेचे वाजवी मूल्यांकन करून विक्री करताना बऱ्याचवेळा सदर स्थावर मालमत्तेशी हितसंबंध असलेल्या व्यक्तींच्या मालमत्तेचे वाजवी मूल्य बाजार किंमतीपेक्षा कमी दाखवून संस्थेने अथवा वसुली अधिकारी यांनी विक्री केल्याच्या तक्रारी शासनास प्राप्त होत असत. त्यामुळे कायदेशीर प्रश्न निर्माण होऊन संस्थेच्या वसुली कामकाजावर विपरीत परिणाम होऊन संस्थेच्या आर्थिक स्थितीवर अनिष्ट परिणाम होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे वाजवी मूल्यांकन करून मिळण्याबाबत संबंधित संस्थेच्या निबंधकाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा वेळेत निपटारा होत नाही. वरील बाबींचा विचार करता वाजवी मूल्यांकन करण्याविषयी निश्चित अशा मार्गदर्शक सूचना वसुली अधिकारी तसेच क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. जंगम / स्थावर  मालमत्तेचे वाजवी मूल्यांकन देताना अवलंबावयाची सर्वसाधारण कार्यपद्धती निश्चित करणे आवश्यक असल्याने या परिपत्रकाद्वारे खालील कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.

(अ ) वाजवी मूल्यांकन ठरविण्यासाठी संस्थेने प्रस्तावासोबत सादर करावयाच्या कागदपत्रांची यादी-

ल्ल कलम १५४ – ब – २९ (या आधीचे कलम १०१, १३८, ९१, ९८) अन्वये प्राप्त वसुली प्रमाणपत्र / अवॉर्ड याची प्रमाणित प्रत.

ल्ल मागणी नोटीस प्रत.

ल्ल जंगम मालमत्ता जप्त केलेली आहे किंवा कसे याबाबतची माहिती.

ल्ल जंगम मालमत्ता जप्त केली असल्यास त्याचा तपशील. त्या मालमत्तेचा पंचनामा केला नाही याबाबचे प्रमाणित प्रत.

ल्ल जंगम मालमत्ता जप्त करून विक्री केली असल्यास त्याचा तपशील.

ल्ल स्थावर मालमत्ता जप्ती आदेश.

ल्ल स्थावर मालमत्ता जप्त करून योग्य त्या अधिकाऱ्यास नोंदणी घेण्यास आदेश देण्यात येऊन त्यानुसार नोंद झाल्याबाबतचे कागदपत्र (जप्तीची नोंद झालेल्या ७/ १२ उतारा, ६ ड उतारा / प्रॉपर्टी कार्डवर बोजा नोंद असल्याची प्रत .)

ल्ल स्थावर मालमत्तेबाबत कोणत्याही न्यायालयात दावा दाखल नसल्याबाबतचे वसुली अधिकारी यांचे प्रमाणपत्र.

ल्ल मालमत्ता लिलावाने विक्री करण्यात येईल याबाबतची थकबाकीदारास / मालमत्तेशी हितसंबंध असलेल्या व्यक्तींना दिलेल्या नोटीशीची प्रत.

ल्ल स्थावर मालमत्तेच्या मूल्यांकनाबाबत प्रस्ताव दाखल करण्यापूर्वीचे अद्ययावत दुय्यम निबंधक यांचे विक्री करावयाच्या स्थावर मालमत्तेचे रेडी रेकनरनुसार मूल्यांकन अहवाल ( जी मालमत्ता विक्री करावयाची असेल त्या मालमत्तेच्या क्षेत्राचे मूल्यांकन नमूद करण्यात यावे.

ल्ल तुलनात्मक अद्ययावत बाजार मूल्य अहवाल. 

ल्ल शासनमान्य मूल्यांकनकार यांचा जप्त केलेल्या व विक्री करावयाच्या स्थावर मालमत्तेचा मूल्यांकन अहवाल. (सदर अहवालात बाजार किंमतीनुसार मूल्यांकन (मार्केट व्हॅल्यू), शासकीय मूल्यांकन (गव्हर्नमेंट व्हॅल्यू) व त्रास / विपत्ती मूल्य (डिस्ट्रेस व्हॅल्यू) यांचा       समावेश असावा.

ल्ल कर्जदार / जामीनदार / जबाबदार व्यक्ती / स्थावर मालमत्तेशी हितसंबंध असलेल्या व्यक्तीचे सध्या राहत असलेले परिपूर्ण पत्ते याबाबतची माहिती.

ल्ल झेड नमुन्यातील नोटीस.

वाजवी किंमत प्रस्ताव पाठविताना वसुली अधिकारी यांनी घ्यावयाची दक्षता

ल्ल प्रस्तावासोबत अलीकडच्या काळातील शासनमान्य मूल्यांकनकार व दुय्यम निबंधक यांचा मूल्यांकन अहवाल जोडण्यात यावा.

ल्ल जंगम मालमत्तेचे मूल्यांकन ठरविताना दुय्यम निबंधक यांचे मूल्यांकन अहवालाची आवश्यकता नाही.

ल्ल कर्जदार / जामीनदार / मालमत्तेशी हितसंबंध असलेल्या व्यक्ती यांना प्रस्तावासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या प्रती देणे आवश्यक असल्याने त्या प्रमाणात कागदपत्रांच्या प्रती प्रस्तावासोबत जोडण्यात याव्यात.

संस्थेच्या निबंधकांनी वाजवी मूल्य ठरविताना घ्यावयाची दक्षता-

ल्ल वाजवी मूल्यांकनाचा प्रस्ताव संस्थेने वरीलप्रमाणे सादर केलेली कागदपत्रे आवश्यक त्या प्रतीत प्रस्तावासोबत जोडलेली आहेत याची खात्री करण्यात यावी.

ल्ल वाजवी मूल्यांकनाचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम तरतुदीनुसार कर्जदार / ऋणको / जामीनदार / मालमत्तेशी हितसंबंध असलेल्या व्यक्तींना नोटीस देऊन वाजवी मूल्यांकनाबाबत नैसर्गिक न्यायतत्त्वाचे पालन होईल असे पाहावे. यासाठी सर्व संबंधित जबाबदार यांना नोटीस देऊन प्रस्तावासोबत जोडण्यात आलेली कागदपत्रेही सर्व जबाबदार यांना उपलब्ध करून देण्यात यावीत.

ल्ल वाजवी मूल्यांकनासंबंधी सुनावणीकामी देण्यात येणाऱ्या नोटिसीमध्ये जप्त जंगम / स्थावर मालमत्तेच्या बाजार मूल्य व त्रास मूल्य (डिस्ट्रेस व्हॅल्यू ) यांचा समावेश असावा. तसेच जबाबदार यांनी जप्त केलेल्या जंगम / स्थावर मालमत्तेच्या मूल्यांकनाबाबत काही आक्षेप असल्यास अथवा सहकारी संस्थेने सादर केलेले मूल्यांकन हे कमी असल्यास जबाबदार यांनी स्वतंत्रपणे शासनमान्य मूल्यांकनकार यांच्याकडून नव्याने अधिक मूल्य असल्याबाबतचा सुधारित मूल्यांकन अहवाल सादर करावा असे नोटिसीमध्ये स्पष्ट नमूद करण्यात यावे.

ल्ल वाजवी मूल्यांकनाचे सुनावणीवेळी फक्त वाजवी मूल्यांकनासंदर्भात जबाबदार यांचे म्हणणे ऐकावे. वसुली दाखल्यासंदर्भात, व्याजामधील आक्षेपाबाबत किंवा तद्नुषंगिक तक्रारी ऐकून घेण्याची आवश्यकता नाही. त्याबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार पुनरीक्षण करण्याच्या तरतुदीबाबतची जाणीव करून घ्यावी.

ल्ल वाजवी मूल्यांकनासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावाची छाननी करून काही त्रुटी असल्यास सात दिवसांच्या आत प्रस्तावातील त्रुटी संस्थेस कळविण्यात यावी.

ल्ल वाजवी मूल्यांकनासाठी परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून एक महिन्याच्या आत निकाली काढण्यात यावा.

ल्ल वाजवी मूल्यांकनाप्रमाणे तीन वेळेस जंगम/ स्थावर मालमत्तेचा रितसर लिलाव करूनही सदर मालमत्ता विक्री न झाल्यास त्यानंतरच्या लिलावासाठी त्रास / विपत्ती मूल्य  (डिस्ट्रेस व्हॅल्यू) हे वाजवी मूल्यांकन असेल असे आदेशात स्पष्ट नमूद करावे.

ल्ल सुनावणी नोटीस नमुना व छाननी तक्त्याचा नमुना कार्यालयात उपलब्ध असेल.

vish26rao@yahoo.co.in