इमारत सुरक्षा आणि स्ट्रक्चरल ऑडिटबाबतच्या तरतुदी

‘स्ट्रक्चरल ऑडिट: सुरक्षित आयुष्याची गुरूकिल्ली’ हा लेख १० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर वाचकांनी स्ट्रक्चरल ऑडिटसंदर्भात अनेक प्रश्नांची विचारणा लेखकाकडे केली. त्या प्रश्नांची उकल करणारा लेख-

‘स्ट्रक्चरल ऑडिट: सुरक्षित आयुष्याची गुरूकिल्ली’ हा लेख
१० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर वाचकांनी स्ट्रक्चरल ऑडिटसंदर्भात अनेक प्रश्नांची विचारणा लेखकाकडे केली. त्या प्रश्नांची उकल करणारा लेख-
‘आपलं’ आणि ‘माझं’ यात किती बरं फरक आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीला आपण ती ‘माझी’ आहे, असं म्हणतो, तेव्हा तिची आपण सर्वार्थानं काळजी घेतो. परंतु तीच गोष्ट जर ‘आपली’ असेल, तर आपल्या भूमिकेत आणि त्या गोष्टीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात फरक पडतो. मग आपल्यापकी कोणीतरी घेईल की तिची काळजी, असं म्हणून प्रत्येकजण दुसऱ्याने काळजी घेण्याची अपेक्षा करतो आणि शेवटी अशा गोष्टीला कोणीच वाली उरत नाही. इमारतींच्या बाबतीत अनेकदा नेमकं हेच घडतं.
महानगरपालिका किंवा स्थानिक प्रशासकीय संस्थांच्या नियमांना अनुसरून ‘आíकटेक्ट्स’ अर्थात वास्तुरचनाकार इमारतीचा आणि त्यातल्या घरांचा आराखडा तयार करत असतात. या आराखडय़ासाठी ‘स्ट्रक्चरल इंजिनीअर’ अर्थात वास्तुसंरचनाकार अभियंते बीम, कॉलम, स्लॅब, सज्जा आदींची संरचना तयार करतात. म्हणजेच त्यांची लांबी, रुंदी किंवा जाडी किती असावी, त्यात किती व्यासाच्या लोखंडी सळ्या असाव्यात की जेणेकरून त्यांच्यावर येणारं वजन, इमारतीचे हे भाग पेलू शकतील, ते ठरवतात. म्हणजेच एखादं ठरावीक वजन पेलण्यासाठी हे भाग बांधलेले असतात. मात्र, फ्लॅटमध्ये राहायला येणारी माणसं काही वेळा नूतनीकरण करताना ही वस्तुस्थिती लक्षातच घेत नाहीत. एकदा का फ्लॅट विकत घेतला की ‘माझ्या फ्लॅट’मध्ये हवे ते बदल करायचा मला अधिकार आहे, असं वाटून ‘आपल्या इमारतीकडे’ त्यांचं दुर्लक्ष होतं. म्हणूनच ‘माझं घर’ आणि ‘माझी इमारत’ हा दृष्टिकोन हवा.
एखाद्या इंटिरिअर डिझाइनरकडून घरात बदल करून घेण्याआधी अभियंत्याकडून ते घरासाठी आणि इमारतीसाठी सुरक्षित असल्याची खात्री करून घ्या. अनेकदा केले जाणारे, परंतु करू नयेत, अशा काही बदलांपकी असलेले बदल खाली देत आहे. असे बदल टाळा.
खिडकीवर िभतीबाहेर डोकावणारा सज्जा हा खिडकीच्या वरच्या बाजूला असणाऱ्या छोटय़ा बीममध्ये (म्हणजेच िलटलमध्ये) एका बाजूला घट्ट धरून ठेवलेला असतो. परंतु त्याच्या दुसऱ्या बाजूला त्याला कसलाही आधार नसतो. त्यामुळे त्यावर कसलाही भार देऊ नका. अन्यथा त्याला तडे जातील व भार अधिक झाल्यास कदाचित तो तुटूनही पडू शकतो. (चित्र क्र.१-अ आणि १-ब पाहा) बाल्कनीच्या स्लॅबलाही सज्जाप्रमाणे एकाच बाजूला आधार असतो. त्यामुळे बाल्कनीचं खोलीत रूपांतर करताना या स्लॅबवर फार जड कपाटं अगर वजनदार सामान ठेवू नका. (चित्र क्र. २) बाल्कनीचं टॉयलेटमध्ये रूपांतर करू नका. थेट बाल्कनीच्या स्लॅबवर बगीचा किंवा धबधबा करू नका. (चित्र क्र. ३)
कन्सिल्ड वायिरग करताना बीम किंवा कॉलमला आरपार भोक पाडून त्यातून दुसऱ्या बाजूला वायर नेणे, हे अत्यंत धोकादायक आहे. त्यात बीम कॉलमला तर धोका आहेच, परंतु जर कुठे ओल आली आणि रबरी आवरण नसलेला वायरचा भाग जर सळ्यांना कुठे स्पर्श करत असेल, आणि अशा कॉलमला आपला स्पर्श झाला, तर आपल्याला विजेचा धक्काही बसू शकतो.
असे बदल करणं टाळा. याबरोबर जुन्या किंवा पंधरा वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्वच इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करून घ्यायचे आदेश राज्य सरकारने अलीकडेच दिले. अशाप्रकारे स्ट्रक्चरल ऑडिट करताना पुढील कागदपत्रे तुमच्यापाशी असतील, तर स्ट्रक्चरल ऑडिटचे काम कमीत कमी वेळात पूर्ण होईल-
१)    इमारतीचा आíकटेक्चरल प्लॅन अर्थात मूळ आराखडा.
२)    इमारतीचा स्ट्रक्चरल प्लॅन म्हणजेच इमारतीतल्या प्रत्येक बीम, कॉलम, स्लॅब अशा काँक्रीटच्या भागांच्या आकार आणि त्यातल्या सळ्यांचा तपशील देणारा आराखडा.
३)    इमारतीच्या पायाचा तपशील देणारा फाऊंडेशन प्लॅन.
४)    मागच्या वेळी जर कधी इमारत दुरुस्ती केली असेल, तर ती कशी केली होती, त्यावेळी कुठले भाग दुरुस्त केले होते, याबाबतचा तपशील.
५)    कोणा सदस्याने त्याचा अथवा तिच्या सदनिकेत कोणते बदल केले, याबाबत बदल करू देण्यापूर्वी गृहनिर्माण संस्थेकडे परवानगी मागणे आवश्यक आहे. त्याबाबतचे अर्ज आणि दिलेल्या परवानग्या यांचा तपशील अशी कागदपत्रे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या अभियंत्याला सादर करणे आवश्यक आहे.
गृहनिर्माण संस्थांच्या यावर्षी झालेल्या सुधारित मॉडेल बायलॉज क्रमांक ७७ अनुसार इमारत पंधरा ते तीस र्वष जुनी असेल, तर दर पाच वर्षांनी आणि तीस वर्षांपेक्षा जुनी असल्यास दर तीन वर्षांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणे गरजेचे आहे.
थोडक्यात, माझं घर हे माझ्या इमारतीचा भाग आहे, हे लक्षात ठेवा. अन्यथा इमारत ‘आपली’ म्हणता म्हणता तिचं होणारं नुकसान हे ‘तुमच्या स्वत:’च्या नुकसानाची नांदी ठरू शकतं, हे विसरू नका.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Provision for building safety and structural audit