|| डॉ. मनोज अणावकर
दुरुस्तीच्या किंवा नूतनीकरणाच्या दर्जाबाबत जेव्हा बोललं जातं, तेव्हा चांगला दर्जा हा नेमका कशामुळे मिळतो हे लक्षात घेतलं पाहिजे. बांधकामाचा दर्जा चांगला असण्यासाठी केवळ चांगला कंत्राटदार असून चालत नाही, तर त्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या बांधकाम साहित्याचा आणि कच्चा मालाचा दर्जा, मजुरांच्या कामाचा दर्जा आणि तांत्रिकदृष्टय़ा उचित बांधकाम प्रक्रिया या चारही गोष्टींचा सुयोग्य मेळ जमल्यानंतरच चांगल्या प्रतीचं बांधकाम उभारलं जाऊ शकतं. त्यामुळेच काँक्रीटीकरण असो, विटांचं बांधकाम असो, प्लॅस्टरिंग असो किंवा इतर कोणतीही बांधकाम प्रक्रिया असो, या सर्वच गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तसंच आपण खरेदी करत असलेल्या पैशांच्या मोबदल्यात आपल्याला चांगल्या दर्जाचं काम करून मिळतंय की नाही, हे पाहणंही गरजेचं आहे.
आपलं घर सुंदर असावं, छान दिसावं असं प्रत्येकाला वाटत असतं. आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांनी घर पाहून आपल्या घराचं कौतुक करावं, असं कोणाला वाटत नाही? पण सध्याच्या काळात घराच्या नूतनीकरणाचं काम करून घेताना बराच खर्च आपल्याला सांगितला जातो. कधी कधी या खर्चात नेमकं काय काय समाविष्ट आहे, याची कल्पना आपल्याला नसते; आणि मग जास्तीचा खर्च वाढत जातो, तर कधी बरेच पैसे खर्च करूनही कोणाच्या तरी घरी आपण बघितलेला असतो, तसा उठावदारपणा आपल्या घराच्या कामात आपल्याला आलेला दिसत नाही. कधी कधी घराच्या नूतनीकरणाआधी आपल्या इमारतीच्या जुनेपणानुसार, तिच्या वयानुसार थोडी दुरुस्तीही करणं गरजेचं असतं. ही दुरुस्ती नेमकी कशी करायची, ती बरोबर केली जाते आहे की नाही हे कसं कळणार? असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला सतावतात आणि मग नूतनीकरण हे आनंददायी होण्याऐवजी ती डोकेदुखी ठरते की काय, कशाला उगाचच हे सगळं काम काढलं, असा विचारही मनाला शिवून जातो. त्यामुळे अशा भंडावून सोडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं ‘घर स्वप्नातलं’ या सदरातून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत.
आपल्या घराशी प्रत्येकाचं एक जवळचं आणि अतूट नातं असतं. म्हणूनच प्रत्येकाचं आपल्या घरावर प्रेम असतं. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, इतकंच कशाला, अगदी आपण ज्या वस्तूवर प्रेम करतो, तिचीही आपण जिवापाड काळजी घेत असतो. त्यामुळेच आपलं घर सुंदर दिसावं, यासाठी आपण जितके दक्ष असतो, तितक्याच दक्षतेने घराच्या वास्तूंची किंवा इमारतीचीही काळजी घेणं, तिची देखभाल करणं हेदेखील आवश्यक असतं. घराचं नूतनीकरण करताना किंवा इमारतीची देखभाल करताना नेमकं चांगल्या दर्जाचं काम म्हणजे काय? कामाचा दर्जा कसा तपासायचा? याविषयी सर्वसामान्य माणसांना माहिती नसते. काम जर इमारतीच्या दुरुस्तीचं असेल आणि ते मोठय़ा प्रमाणावर असेल, तर अर्थातच अशा वेळी आपण एखाद्या अभियंत्याची नेमणूक करतो. पण जर काम आपल्या घरापुरतं असेल, तर केवळ घराच्या नूतनीकरणाच्या कामावर देखरेख करण्यासाठी आणि झालेल्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी अभियंता नेमणं हे काही आर्थिकदृष्टय़ा परवडणारं नसतं. म्हणूनच घराचं नूतनीकरण असो किंवा अगदी इमारतीची दुरुस्ती असो, नेहमी लागणाऱ्या काही तांत्रिक बाबींबाबत काही प्राथमिक आणि किमान जुजबी माहिती तरी असणं आवश्यक आहे. याच दृष्टीने दुरुस्ती किंवा नूतनीकरणादरम्यान नेहमी वापरल्या जाणाऱ्या काही कामांच्या पद्धती तसंच त्याकरता लागणारं साहित्य याबाबत मार्गदर्शन करणारं हे सदर..
माणसाप्रमाणेच इमारतींनाही आयुष्य असतं. इमारतीच्या आयुष्याच्यासंदर्भात ‘इकॉनॉमिकल लाइफ’ अशी संज्ञा वापरली जाते. या संज्ञेचा नेमका अर्थ समजून घ्यायचा तर असं म्हणता येईल की, एखाद्या इमारतीचं वय एका विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यानंतर तिच्यावर होणारा खर्च, जेव्हा तिच्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा किंवा फायद्यापेक्षा अधिक व्हायला लागतो, तेव्हा तिचं ‘इकॉनॉमिकल लाइफ’ संपलं असं आपण म्हणतो. वयामुळे येणारी जर्जरावस्था ही माणसासारखीच इमारतीलाही येत असते. इमारत कोसळली तर त्या इमारतीत वावरणाऱ्या अनेक व्यक्तींना, कुटुंबांना आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे कोणतीही इमारत कोसळेपर्यंत न थांबता, वेळीच तिची आवश्यक ती मोठी दुरुस्ती अगर पुनर्बाधणी करून घेणं गरजेचं असतं. इमारतीच्या बांधकामापासूनच तिची योग्य ती काळजी घेण्याची जबाबदारी जशी इमारत बांधणारा बिल्डर, कंत्राटदार, आर्किटेक्ट अगर सिव्हिल इंजिनीअर यांची असते, तशीच तिचा वापर करायला लागल्यावर आपल्या सर्वाचीही ती तितकीच जबाबदारी असते. यासाठी सिव्हिल इंजिनीअरिंगचं सखोल ज्ञान असण्याची गरज नाही. परंतु इमारतीच्या संदर्भातील काही जुजबी, प्राथमिक परंतु महत्त्वाची माहिती आपण करून घेतली, तर आपल्या इमारतीची आणि पर्यायाने आपल्या घराची काळजी घेणं आणि आपल्या स्वप्नातल्या घराचं सौंदर्यकाळ सरला तरीही बऱ्यापैकी टिकवून ठेवणं आपल्याला शक्य होईल.
दुरुस्तीच्या किंवा नूतनीकरणाच्या दर्जाबाबत जेव्हा बोललं जातं, तेव्हा चांगला दर्जा हा नेमका कशामुळे मिळतो हे लक्षात घेतलं पाहिजे. बांधकामाचा दर्जा चांगला असण्यासाठी केवळ चांगला कंत्राटदार असून चालत नाही, तर त्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या बांधकाम साहित्याचा आणि कच्चा मालाचा दर्जा, मजुरांच्या कामाचा दर्जा आणि तांत्रिकदृष्टय़ा उचित बांधकाम प्रक्रिया या चारही गोष्टींचा सुयोग्य मेळ जमल्यानंतरच चांगल्या प्रतीचं बांधकाम उभारलं जाऊ शकतं. त्यामुळेच काँक्रीटीकरण असो, विटांचं बांधकाम असो, प्लॅस्टरिंग असो किंवा इतर कोणतीही बांधकाम प्रक्रिया असो, या सर्वच गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तसंच आपण खरेदी करत असलेल्या पैशांच्या मोबदल्यात आपल्याला चांगल्या दर्जाचं काम करून मिळतंय की नाही, हे पाहणंही गरजेचं आहे.
याबरोबरच आपण आणखीही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती ही की, आपल्या घराचं सौंदर्य वाढवताना आपण आपल्या घराच्या सुरक्षिततेबरोबर एकूणच इमारतीची सुरक्षितता आपल्या नूतनीकरणाच्या कामामुळे धोक्यात तर आणत नाही ना, याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. आपण केलेल्या कामांमुळे आपल्या किंवा इतरांच्या घरात पाण्याची गळती किंवा पाझर सुरू होणार नाही ना, इमारतीतल्या बीम, कॉलम, अथवा स्लॅबला तडे जाणार नाहीत ना, याची दक्षता घ्यायला हवी. घरात स्वयंपाकाचा ओटा घालणं, प्लंबिंग करणं, फ्लोअरिंग, टाइल्स घालणं अशा अनेक कामांसाठी चांगल्या दर्जाचा कच्चा माल कसा बघून घ्यावा, त्याच्या बांधकाम प्रक्रिया कोणत्या आहेत, त्यात चांगल्या दर्जाचं काम होण्यासाठी मजुरांचं काम कशाप्रकारे होणं गरजेचं आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या सदराच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. थोडक्यात, सिव्हिल इंजिनीअरिंग आणि इंटिरिअर डिझायनिंगशी संबधित बाबींची मूलभूत माहिती आपण या सदरातून करून घेणार आहोत.
सिव्हिल इंजिनीअर आणि इंटिरिअर डिझायनर
anaokarm@yahoo.co.in