– प्राची पाठक

स्वच्छ, कोरडा राखलेला, उजेडी, हवेशीर असा संडास एक नकोशी जागा न होता एक कम्फर्ट स्पॉट, रिलॅक्सेशन स्पॉटदेखील होऊ शकतो.

संडासाची खोली घरापासून दूर कुठेतरी ते घराच्या बाहेरच्या बाजूने.. ते चाळीच्या/इमारतीच्या एखाद्या कोपऱ्यात एकत्रच अनेक संडास.. घरात अडगळीसारख्या वाटणाऱ्या जागेत ते हळूहळू अंघोळ करायच्या जागेतच अटॅच असे संडासाचे भांडे; ज्याने अंघोळीची खोली वेगळी आणि संडासाची वेगळी हा ट्रेंड मोडला. असे विविध प्रकार गेल्या काही वर्षांतच सर्वत्र दिसू लागले. जागेची टंचाई असणाऱ्या ठिकाणी तर छोटय़ाशा खोलीत मधोमध भारतीय पद्धतीचे संडासाचे भांडे आणि त्याचा वापर करून झाला की त्यावर एक फळकूट किंवा फरशी सरकवून तेच अंघोळ करण्यासाठी बाथरूम म्हणूनदेखील वापरलेले दिसते. अंघोळीच्या स्पेसमध्ये भारतीय पद्धतीचे अथवा कमोडसारखे संडासाचे भांडे असणे, याबद्दल तीव्र नाराजी असणारा एक गट असतोच. त्यांना दोन्ही खोल्या वेगवेगळ्या हव्या असतात. त्याचे समर्थन करताना एका वेळी दोन जण दोन वेगवेगळ्या गोष्टी करू शकतात. वेळ वाचतो, हा मुद्दा पुढे येतो. काही ठिकाणी तर बेसिनसुद्धा त्याच एका अटॅच टॉयलेट बाथरूममध्ये असते. तेव्हा हा मुद्दा योग्यच ठरतो. कारण आत कोणी गेले असेल, तर साधी हात धुवायची सोयदेखील बाहेर उरत नाही. खोळंबून राहावे लागते. कोणाला बाथरूममध्येच मल-मूत्र विसर्जन सोय ‘घाण’ वाटत असते. मलमूत्र विसर्जनासाठी चांगली सोय या प्रकाराला एक प्रकारे वाळीत टाकणे, हे आपल्या अंगात जणू भिनले आहे.

जसजसा कमोडचा शिरकाव वाढला, तसतसे अटॅच टॉयलेट-बाथरूम वाढत गेले. दुसरा काही पर्यायच नसल्याने लोक हळूहळू कमोडची सोय नाकं मुरडत का होईना पण वापरू लागले. हळूहळू काहींना त्यातील सोय लक्षात आली. जेट स्प्रे आणि नोझल असे दोन्ही असलेले अथवा केवळ नोझल किंवा केवळ जेट स्प्रे असलेले असे कमोड शरीर पुसायला पेपर वापरून कार्यभाग उरकायच्या सक्तीपेक्षा बरे आहेत, हे लोकांच्या लक्षात आले. भारतीय पद्धतीच्या भांडय़ावर बसताना कपडय़ांची आवरसावर खासकरून स्त्रियांना फारच करावी लागते. बाहेरचे कपडे खराब होतात वगैरे मुद्देही वापरातून कळू लागले. िरगचा वापर व्यवस्थित केलेले, कोरडे राखलेले, जेट किंवा नोझल नीट चालणारे कमोड घरातल्या ज्येष्ठ नागरिकांनादेखील फार सोयीचे वाटू लागले. वर्षांनुवर्षे भारतीय पद्धतीच्या भांडय़ावर बसायची सवय / कसरत केवळ या सोयीसाठी चट्कन मोडली गेली. भारतीय भांडय़ापासून मलमूत्र विसर्जनाची सवय लागलेले लोक कमोडला सरावले, ते या सोयीमुळेच.

सार्वजनिक जागी असलेल्या कमोडबद्दल प्रचंडच तिरस्कार लोकांच्या मनात असतो. खरे तर, अशा ठिकाणचे भारतीय संडासदेखील तितकेच घाण असू शकतात. शरीराला कमोडचा होणारा स्पर्श यावरून खूपच चर्चा झडतात. लोकांना नीट त्या सोयी वापरता येत नाहीत आणि म्हणून ते घाण होतात, ही बाजू तितकीशी लक्षात घेतली जात नाही. मुळातच अत्यंत कमी देखरेख असलेल्या या अंधाऱ्या, नकोशा जागा असतात. पाण्याच्या उपलब्धतेचे प्रश्न असतात. कमोडला पाणी जास्त लागते आणि भारतीय पद्धतीच्या संडासाला कमी पाणी लागते, या मुद्दय़ातदेखील विशेष तथ्य नाही. कमीतकमी पाणी लागणारे कमोड बसवून घेता येतात. बाकीच्या स्वस्वच्छतेच्या अनेक गोष्टींसाठी भारतीय भांडय़ाचा वापर केल्याने जितके पाणी लागते, त्यापेक्षा कमीच पाणी एका कोरडय़ा ठेवलेल्या स्वच्छ कमोडला वरच्या स्वस्वच्छतेसाठी लागते, हेही मुद्दे आहेतच. सार्वजनिक जागांचे कमोड असलेले सर्वच संडास घाणच असतात, असेही नसते. उदाहरणार्थ, मॉलमध्ये असलेले टॉयलेट्स बहुतकरून स्वच्छ-कोरडे असतात. वापराची माहिती आणि योग्य देखरेख या दोनच बाबी आटोक्यात आणल्या, तरी पुष्कळ काही साध्य होते.

कसे वापरतो आपण भारतीय भांडं असलेलं संडास? बचाबच पाणी सांडलेले असते त्या भागात. म्हणजे आत जायचे तर पाय ओले होणार. पाय आधीच मळके असतील तर ती घाण त्या भागात असलेल्या पाण्यामुळे फरशीवर उमटणार. तेही पूर्ववत साफ करण्यासाठी पाणी लागणार. कार्यभाग साधून झाल्यावर हाताचा वापर केल्याने हात धुण्यासाठी वेगळे असे भरपूर पाणी लागणार. फ्लश करण्यासाठी लागणारे पाणी वेगळे. पायांचे ठसे त्या ओल्या परिसरात आत-बाहेर पडल्याने ते मिटवण्यासाठी, पुसण्यासाठी लागलेले पाणी वेगळेच. संडासला जायचे तर ओल्यातच जावे लागेल, हे डोक्यात फिट्ट होते. काहींना तिथे जाणे जास्त थंडीच्या काळात खासकरून नकोसेसुद्धा होऊ शकते. थंडीच्या दिवसांतच मूत्र विसर्जनासाठी वरचेवर जास्त जायची वेळ येते, हा मुद्दा वेगळाच. मग चप्पल ठेवा दाराशी वगैरे प्रकार करूनही आतली चिकचिक तशीच राहिली तरी स्वच्छतेसाठी पाणी लागणारच. दरवेळी आजारी असा वा नसा, घरातले कपडे असो अथवा बाहेरचे कपडे घातलेले असो, ते द्राविडी प्राणायाम करून खाली बसावेच लागेल. पुरुषांना मूत्र विसर्जनासाठी बसायची गरज असतेच असे नाही. पण स्त्रियांना मूत्र विसर्जनासाठी दरवेळी मुख्यत्वेकरून त्या प्रकारे खाली बसावे लागते. असे केल्यानेच गुडघे वगैरे शाबूत राहतात आणि भारतीय प्रकारच्या संडासाचे भांडे कसे नैसर्गिक आहे, कसा व्यायाम होतो, अशी कमोडची ‘तिरस्कार पॉलिसी’ सोय या मुद्दय़ाकडे पूर्णच दुर्लक्ष करते. एरवी आपण गुडघ्यांच्या आणि एकूणच शरीराच्या व्यायामासाठी जमिनीवरच बसायला हवंय, मांडी ठोकून! खुर्ची तरी का वापरावी? असेही ते खेचता येते. आपण बसण्यासाठी खुर्ची वापरतो, कारण आपल्याला दरवेळी खाली उठबस करणे शक्य नसते. वयोमानापरत्वे ते अवघडसुद्धा असते. तसेच, कमोड ही एक सोय आहे.

स्वच्छ, कोरडय़ा राखलेल्या कमोडला दरवेळी तिथे जाऊन आले की भसाभस हात-पाय धुवत बसायची, सगळीकडे पाणीच पाणी सांडून चिकचिक करून ठेवायची गरज पडत नाही. अतिशय कमी पाण्यात बेसिनला हात धुता येतात. कमोड परिसराची खालची फरशी पूर्णत: कोरडी ठेवता येते. संडास-बाथरूममध्ये आणि त्या परिसरात पाय सटकून खाली पडणे, हे प्रकार कमी होऊ शकतात. कमोडचा भाग आणि ती खोली पूर्णत: कोरडी ठेवणे शक्य असते. दरवेळी पाय धुवायची गरज पडत नाही. गरज पडलीच, तर वेगळ्या कोपऱ्यात ते साधून हा भाग मात्र कोरडा ठेवता येतो. कमोडवर बसून प्रेशर येत नाही, ती नैसर्गिकरचना नाही उत्सर्जनाची, असे वाटत असेल तर कमोडवर बसल्यावर पायाखाली छोटा स्टूल ठेवता येतो. भारतीय भांडे विरुद्ध कमोड असे हे युद्ध नसून एक पारंपरिक पद्धत आणि एक सुधारित सोय असा हा प्रवास आहे.

स्वच्छ, कोरडा राखलेला, उजेडी, हवेशीर असा संडास एक नकोशी जागा न होता एक कम्फर्ट स्पॉट, रिलॅक्सेशन स्पॉटदेखील होऊ शकतो.  एकटय़ाने विचार करू शकायची एक निवांत जागा. असाही विचार करून बघता येतोच की!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

prachi333@hotmail.com