उन्हाळ्यातली झाडांची सळसळ कमी होऊन आता डोंगरदऱ्यातली पाण्याची खळखळ सुरू झाली आहे. एखाद्या घाटातून जाताना ओबडधोबड दगडांचे उतार, कोरडय़ा पडलेल्या या दगडांना असलेली पाण्याची ओढ आणि यातून ज्येष्ठातल्या पावसाच्या सरी बरसून गेल्यावर तयार झालेले छोटेछोटे ओढे हे उन्हाळ्याने शिणलेल्या मनाची आणि डोळ्यांचीही तहान भागवतात. बोडक्या डोंगरमाथ्यांवरून तांबट पिवळसर किंवा काळसर मातीतून अधूनमधून डोकावणारी जमिनीवरची आणि झाडांवरचीही हिरवी-पोपटी पालवी, या झाडा-झुडपांना वळसा घालून जाणारे निर्झर जणू निसर्गातून झरझर झरणाऱ्या नवचतन्याची चाहूलच देतात. हा हिरवेपणाही एखाद्या बहुरूप्याप्रमाणे किती विविध रूपं धारण करतो. कधी ढगांना बाजूला सारून पावसात स्वच्छ धुऊन निघालेली सोनसळी उन्हं या हिरवाईवर पडलीत की, या हिरवळीचा रंग सोनेरी हिरवट दिसतो, तर लपाछपी खेळणारा सूर्य पुन्हा एकदा ढगांआड लपला की, आलेल्या छायेत ही हिरवळ पाचूच्या रंगाची साडी निसर्गाला लेववते. मधूनच या निसर्गराजाला अभिषेक करणारी पावसाची एखादी लहर शिडकावा करून गेली, की हीच हिरवाई संपूर्ण आसमंताला गर्द हिरवी झूल पांघरवते. प्रवासात असताना घाटातून खाली दरीत बघितलं, तर कधी उतारावर, तर कधी डोंगराखालच्या सखल भागात वाफे पाडलेली हिरवीगार शेतं चौकडीची नक्षी दाखवतात. हे सगळं बघितलं की मन टवटवीत झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर हल्ली विशेषत: मुंबई-पुण्यासारख्या सिमेंट-काँक्रीटच्या जंगलांनी वेढलेल्या शहरांमधली माणसं ही घर आणि ऑफिसच्या चक्रातून थोडीशी सुटका करून घेऊन मुद्दाम वर्षांसहलींना जातात आणि पुन्हा एकदा शरीर आणि मन टवटवीत झालं की नव्या जोमाने कामाला लागतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिवंतपणा, ताजेपणा आणि टवटवीतपणा यांचा मिलाफ म्हणजे हिरवा रंग! निसर्गानं भूसृष्टीवर वसंतात चढवलेला हिरवा साज अधिकच खुलवून ताजा, टवटवीत आणि जिवंत करण्याचं काम ज्येष्ठ महिन्यातल्या आणि ग्रीष्माची चाहूल देणाऱ्या पावसाच्या पहिल्या सरी करतात. या सरींचा मायेचा हात वृक्षराजीवरून फिरताच निसर्गात नवचतन्य आलेलं जाणवतं. प्रवास करत असताना चालत्या वाहनातून बाहेर नजर टाकल्यावर अशा या निसर्गाकडे पाहताना मन ताजं आणि प्रफुल्लित तर होतंच, पण त्याला एक प्रकारची उभारीही मिळते. सप्तरंगांच्या रंगचक्रावर मध्यभागी येणारा हिरवा रंग हा भडक रंग आणि थंड रंगांमध्ये संतुलन साधण्याचं काम करतो. त्यामुळेच डोळ्यांना आणि मनाला तो शांत करतो. ही टवटवीत हिरवाई म्हणजे वनराईच्या आरोग्याचं प्रतीकच आहे. कारण जिथे अनारोग्य असतं, तिथली वनराई सुकलेली, करपलेली अगर बावलेली असते. त्यात हिरवेपणाचा शुद्ध उत्साह जाणवण्याऐवजी एक प्रकारची रोगट किंवा सुकलेल्या गवतासारखी असलेली निस्तेज पिवळसर पांढरट छटाच अधिक जाणवते. नुकतीच फुटलेली लालसर हिरवी किंवा पोपटी पालवी ही त्या पुढल्या काळात वेगाने होऊ घातलेली तिची वाढ दर्शवते आणि अशा रंगानं मढलेली वृक्षराजी नसíगक श्रीमंतीनं समृद्ध झालेली दिसते. तद्वतच आपल्या आयुष्यातही हिरवा रंग हाही आरोग्य, वाढ आणि समृद्धी याचं प्रतीक बनतो.

त्यामुळेच अचेतनाला चेतनाचं दान देणाऱ्या या हिरव्या रंगाचा वापर आपण घरात केला, तर मन शांत, प्रफुल्लित, ताजं आणि टवटवीत राहायला मदत होते. लििव्हग रूममध्ये आपण अनेक वेळा सहकुटुंब बसून गप्पा मारत असतो. त्यामुळे अशा खोलीत हिरव्या रंगाचा उपयोग कुठल्या ना कुठल्या प्रकारे केला तर आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक असलेला निवांतपणा मिळू शकतो. बेडरूमसारख्या खोलीत जिथे आपल्याला मन:शांतीची आणि विसाव्याची गरज असते, अशा खोलीसाठीही या रंगाचा वापर अधिक प्रभावी ठरू शकतो. लििव्हग रूममध्ये इतर रंगांचा वापर करतानाच हिरव्या रंगाचाही उपयोग करायचा असेल, तर सोफ्याच्या कव्हर्ससाठी त्याचा चांगला उपयोग करून घेता येईल. तसंच सेंटर टेबलवर एखादं नसíगक किंवा कृत्रिम रोपटं छोटय़ाशा डिझायनर फ्लॉवरपॉटमध्ये लावलं, (छायाचित्र-१ पाहा) तर या खोलीत आवश्यक असलेला टवटवीतपणाचा शिडकावा आपल्याला करता येईल. आपला जर बंगला असेल, तर घराबाहेर असलेल्या नसíगक हिरवाईचाही आपल्याला चांगला उपयोग करून घेता येईल. चहा घ्यायला किंवा गप्पा मारायला बसताना निसर्ग सान्निध्यातल्या अशा जागा एक वेगळाच आनंद देतात. (छायाचित्र-२ पाहा) अशा बठकीच्या व्यवस्थेवर मोठी छत्री उभारली, तर उन्हापासूनही संरक्षण मिळू शकतं. त्यामुळे अशा प्रकाशदायी हवेशीर आणि सभोवताली हिरवी वृक्षसंपदा असलेल्या जागी कुटुंबासमवेत बसून चहापान करताना एक वेगळा आनंद मिळतो. जर अशी नसíगक वनराजी घराच्या आजूबाजूला नसेल किंवा आपण फ्लॅट सिस्टीममध्ये रहात असू, तर घरातल्या फíनचरसाठी म्हणजेच त्याच्या कव्हर्स किंवा लॅमिनेशनसाठी कृत्रिम हिरव्या रंगाचा वापर आपण करू शकतो. त्याबरोबरच सेंटर टेबलवर किंवा खोलीच्या कोपऱ्यांमध्ये चार ते पाच फूट उंचीची नसíगक किंवा कृत्रिम हिरवी झाडं ठेवलीत, तरीही त्यामुळे खोलीला एक जिवंतपणा येऊन (छायाचित्र-३ पाहा) तिच्या सौंदर्यात भर पडेल. गर्द हिरव्या सोफा कव्हर्सवर तक्क्यांसाठी नािरगी कव्हर्सही उठून दिसतील. पोपटी हिरवा आणि आकाशी निळा यांची जोडीही आल्हाददायी वाटते.

बेडरूमसाठी हिरव्या रंगाचा वापर करताना खोलीच्या पडद्यांकरता, खोलीतल्या खुच्र्याकरता तसंच इतर काही वस्तूंकरता हिरव्या रंगाचा वापर करून अधूनमधून हिरवा रंग डोकावणारी बेडशीट वापरली तर खोलीतलं वातावरण शांत आणि आरामदायी व्हायला मदत होते. इथेही छोटय़ा फ्लॉवरपॉटमध्ये हिरवी पानं आणि फुलं किंवा रोपटी साइड टेबलवर ठेवता येतील. (छायाचित्र-४ पाहा) हिरव्या-पांढऱ्या रंगातली रंगसंगतीही स्वच्छ ताजेपणा दर्शवते.

अशा या ताज्या टवटवीत हिरव्या रंगाचा वापर करून निसर्गाशी जवळीक साधायचा प्रयत्न आपण आपल्या घरात किंवा कार्यालयात केला, तर मन शांत राहायला मदत होते आणि शांत मनाने घेतलेले अनेक निर्णय किंवा केलेले अनेक विचार हे आपल्याला फलद्रूप ठरून आपल्या आरोग्याला, वाढीला आणि भरभराटीला पूरक ठरू शकतात.

(इंटिरियर डिझायनर)

anaokarm@yahoo.co.in

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on green colour beauty
First published on: 17-06-2017 at 06:05 IST