गुढीपाडव्याला घर रांगोळी, तोरण आणि गुढीने सजून जाते.. आनंदून जाते. घराला एक नवी झळाळी येते. 

आपल्या अंगणातल्या किंवा सभोवताली असलेल्या झाडांची शुष्क झालेली पाने पडून तेथे चैत्राची नवपालवी येते आणि सृष्टी फुलते. वसंत ऋतूची चाहूल कोकीळकंठातून येते. याच निसर्गातल्या परिवर्तनाचे, नवचैतन्याचे, नवसृष्टीचे स्वागत आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा करून करतो. येथूनच मराठी नववर्ष सुरू होते. साडेतीन मुहूर्तापैकी हा एक सण आहे. श्रीराम, रावणाचा पराभव करून अयोध्येस परतले, शालिवाहनाने शकांचा पराभव केला, ब्रह्माने विश्व निर्माण केले, हे ऐतिहासिक महत्त्वही गुढीपाडवा साजरा करण्यामागे आहे.

दारात गुढी उभारण्यासाठी गडबड चालू होते. सूर्योदयाच्या वेळेस दारापुढे, गॅलरीत किंवा गच्चीत रांगोळीचे स्वस्तिक काढून, हळदीकुंकू वाहिले जाते. त्यावर पाट ठेवला जातो. पाटावर गुढी ठेवतात. म्हणजे काठी स्वच्छ धुऊन, काठीच्या वरच्या टोकाला तांबडे अथवा रेशीम वस्त्र बांधतात.

हा सण घरात साजरा करताना प्रथम येते ती दारापुढील रांगोळी. गुढीपाडव्याच्या दिवसाची सुरुवात चांगली होऊन पूर्ण दिवस छान जाण्यासाठी, मन प्रसन्न होण्यासाठी रांगोळी काढली जाते. भारतीय संस्कृतीत रांगोळीला असाधारण महत्त्व आहे. घराला अंगण असल्यास ते शेणाने सारवले जाते. त्यावर किंवा फरशी असल्यास त्यावर गेरूने रंगविले जाते. त्यावर ठिपक्यांची किंवा संस्कार भारतीची रांगोळी काढली जाते. काही ठिकाणी दारात बाजारात मिळणारे छाप वापरून पटकन रांगोळी काढली जाते, तर काही ठिकाणी फुलांची रांगोळी काढली जाते. स्वस्तिक, गोपद्म, चक्र अशा विविध रांगोळ्याही दारापुढे रेखाटल्या जातात. कवी केशवसुत यांनी दारापुढील रांगोळी घालणाऱ्या मुलींबाबत कवितेत म्हणतात-

‘होते अंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,

बालार्केअपुली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर,

तिची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली,

रांगोळी मग त्यास्थळी निजकरे घालावया लागली’

नंतर गुढीपाडव्याशी संबंधित येते ते दारावरील शुभ तोरण. गुढीपाडव्याच्या सुमारास आंब्याला मोहोर येऊन आंबे तयार होऊ  लागतात, म्हणून दाराला आंब्याच्या पानांचे, फुलांचे व भाताच्या लोंब्यांचे तोरण बांधतात. काही जण स्वत: हौसेने विणलेले लोकरीचे तोरण दाराला बांधतात. दारात रांगोळी व दाराला तोरण बांधले की घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करायला घर सज्ज होते. कवयित्री इंदिरा संत यांनी दारावरील तोरणाबाबत, ‘दारा बांधता तोरण, घर नाचले, नाचले, आज येणार अंगणी, सोनचाफ्याची पाऊले, भिंती रंगल्या स्वप्नांनी, झाल्या गजाच्या कर्दळी, दार नटून उभेच, नाही मिटायची बोली’, ही सुंदर कविता लिहिली आहे.

यानंतर दारात गुढी उभारण्यासाठी गडबड चालू होते. सूर्योदयाच्या वेळेस दारापुढे, गॅलरीत किंवा गच्चीत रांगोळीचे स्वस्तिक काढून, हळदीकुंकू वाहिले जाते. त्यावर पाट ठेवला जातो. पाटावर गुढी ठेवतात. म्हणजे काठी स्वच्छ धुऊन, काठीच्या वरच्या टोकाला तांबडे अथवा रेशीम वस्त्र बांधतात. त्यावर कडुनिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेच्या गाठींची माळ घालून त्यावर धातूचे भांडे बसविले जाते. काठीला गंध, फूल, अक्षता लावून, उदबत्ती, निरांजन ओवाळून गुढीची पूजा करतात.  गुढी उभी ऐटीत दारी..  अशीच काहीशी मनाची

अवस्था होऊन जाते. गुढीला दूध, साखर किंवा पेढय़ांचा नैवेद्य दाखवितात. घरात गोडाधोडाचा नैवेद्य दुपारी दाखवितात. संध्याकाळी पुन्हा हळदीकुंकू, फुले वाहून, अक्षता वाहून गुढी उतरवितात.

गुढीपाडव्याच्या दिवशी घरात कडुनिंबाची कोवळी पाने घेऊन, त्यात जिरे, मिरी, हिंग, सैंधव, मीठ व ओवा इत्यादी घालून मिश्रण करतात. किंवा कडुनिंब, गूळ, खोबरे एकत्र करून खातात. मग दिवसभर सगळे पंचपक्वान्ने खायला मोकळे होतात. एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देतात. गुढी उभारण्यासाठीची व गुढीपाडवा साजरा करण्याची ही तयारी घरात आधीच्या दिवसापासूनच जोरात चाललेली असते. या दिवशी घरातील लहान मुले पाटीवर सरस्वती काढून तिची पूजा करतात. या दिवशी गुरुपूजनही केले जाते. तरुणवर्ग हल्ली सकाळी लवकर उठून, नटूनथटून मंदिरात देवदर्शनासाठी व शोभायात्रेसाठी घरातून बाहेर पडतो. घरातील इतर सदस्यही नवीन कपडे घालून, बायका नवीन साडय़ा, दागिने, गजरे घालून, उत्साहात घरात लगबग करीत असतात. असे आपले घर गुढीपाडव्याला, नातेवाईक, पाहुण्यांनी वेगवेगळया धार्मिक विधींनी, मंगलकार्यानी भरून जाते. चला तर मग, मानवी ध्यासाचे, उंचीचे प्रतीक म्हणून आपण घरासमोर गुढी उभारून आपला आनंद द्विगुणित करू या.

madhurisathe1@yahoo.com